घाई नको बाई अशी

घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला
देते जलसंजीवन बंधुजीव आसुसला
नको नको घाई नको बाई अशी, आले रे बकुळफुला

कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा, विसरले न मी तुला
नको नको घाई नको...

पिऊनी चांदणेसरात चांदरात ओसरता
खुणावित मधुनलिनी बोलविती हळुच मला
नको नको घाई नको...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घेई छंद मकरंद

घेई छंद मकरंद
प्रिय हा मिलिंद
मधु सेवनानंद
स्वच्छंद हा धुंद ||

मिटता कमलदल
होई बंदी हा भृंग
तरी सोडी ना ध्यास
गुंजनात हा दंग ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घाल घाल पिंगा

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ||

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्ष झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आचवलं ||

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकलेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंग हुंगुनिया करी कशी गं बेजार ||

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुल वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घन घन माला नभी दाटल्या

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवुन उंच पिसारा

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशांत घुमवी धुंद बांसरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा

वर्षाकालीन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठीस लागे, भिरभिरता वारा

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घडी घडी अरे मनमोहना

घडी घडी अरे मनमोहना, हसुनि गुणिजना देखता
नको रे बोलु मशी
भरम धरिल जन तुझा नि माझा पहा पुरती चौकशी
सजणा नको रे बोलु मशी
छबिदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी, बरी आवडलीस माझ्या मना
कुठे दिसे ना दुजा पुरुष मज, तुजसम रे देखणा
सजणा तुजसम रे देखणा
तुझी प्रीत लाभली कुठुन, रोज नीट उठुन, तुटुन जीव पडतो झाले पिशी
सजणा नको रे बोलु मशी

दिसतेस चटक चांदणी, अगे साजणी, मनी तू ठसलीस अमुच्या गडे
छंद लागला तुझा आम्हाला, रात्रंदिन फाकडे
नीज ध्यास सदा अंतरी, फिदा तुजवरी, घरी मी सिद्ध करुनिया विडे
घरी मी सिद्ध करुनिया विडे
एकांति मुखी घालता, चकाकतील माझ्या हातातील चुडे
इश्काची चटक लागली, जीवा चांगली, रंगली वृत्ती तुजपाशी
सजणा नको रे बोलु मशी
घडी घडी अरे मनमोहना हसुनि गुणिजना देखता
नको रे बोलु मशी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घन रानी साजणा

घन रानी घन रानी साजणा
मी कशी तुझ्यासवे चुकले वाट रे
सांग ना... ||धॄ||

भिरभिर वार्‍याची, थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी, मनभर गाण्याची
तरी बाई सूर नव नवे
सुखद मधुर वाटतात हवे
या मना... ||१||

मधुमय समय असा, बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा, वय ते लावी पिसे
इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घाली कोण
यौवना... ||२||

किती अधीर, अधीर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे, मन बोलत नाही गं माझे
किती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे मन गं माझे
एक शपथ, शपथ त्याला भितीची
हृदया रे, अदया रे
बोल ना... ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

घट डोईवर घट कमरेवर

घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा नंदलाला, नंदलाला रे ||धृ||

कुणीतरी येईल अवचित पाहील
जाता जाता आगही लावील
सर्व सुखाच्या संसाराला नंदलाला रे
नंदलाला रेऽऽऽ घट डोईवर... ||१||

हलता सलता घट खिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला नंदलाला रे
नंदलाला रेऽऽऽ घट डोईवर... ||२||

केलीस खोडी पुरे एवढी
जोवर हसते मनात गोडी
हसूनी तूही हो बाजूला नंदलाला रे
नंदलाला रेऽऽऽ घट डोईवर... ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: