आई तुझी आठवण येते

आई तुझी आठवण येते
सुखद स्मृतीच्या कल्लॊळांनी काळिज काजळते ॥ ध्रु ॥

वात्सल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयाचे मम होउन पाणी, नयनी दाटुन येते ॥ १ ॥

तुजविण आई जगी एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनीची कुणास सांगू, कळिज तिळतिळ तुटते ॥ २ ॥

हाक मारतो आई आई, चुके लेकरु, सुन्या दिशाही
तव बाळाची हाक माउली, का नच कानी येते ॥ ३ ॥

सुजल्या नयनी नुरले पाणी, सुकल्या कंठी उमटे वाणी
मुके पाखरु पहा मनाचे, जागी तडफड करते ॥ ४ ॥

नको जीव हा नकोच जगणे, आईवाचुन जीवन मरणे
एकदाच मज घेई जवळी, पुसुनी लोचने माते ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: