पाण्याहून सांजवेळी जात होते घरी

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी, उभा राहे हरी ॥ ध्रु ॥

मनांत मी बावरले, कशीबशी सावरले
अचानक तोच हाय, कोसळल्या सरी ॥ १ ॥

आभाळात ओले रंग, चिंबचिंब माझे अंग
काय उपयोग आता, सावरून तरी ॥ २ ॥

पडे अनोळखी भूल, फुलले मी जसे फूल
बांसरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी ॥ ३ ॥

काही बोलले मी नाही, वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस, धरिला मी उरी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: