पूर्व दिशेला अरुण रथावर

पूर्व दिशेला अरुण रथावर
ध्वज सोन्याचा झळकत सुंदर

पर्णामधुनी किरण कोवळे
चिलापिलांचे उघडी डोळे
पंख उभारुनि उडती गगनी
सप्तसुरांनी उजळे अंबर

अरुणउषेच्या मीलनकाली
प्राजक्ताच्या झाडाखाली
फुले वेचली भरून ओंजळी
गुंफिन प्रभुला माळ मनोहर

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे

प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे
गर्जत आले वारे, वादळ
वारे हे वादळ

फिरू लागले जग वाटोळे,
सुन्न मनाने मिटले डोळे
रात निराशा ओकित काजळ, गर्जत आले वारे, वादळ

भग्न मनोरथ फुटला मचवा,
हात कुणी द्या मला वांचवा
मिळे सागरी अश्रू ओघळ, गर्जत आले वारे, वादळ

तुफान झुंजत दीप-मनोरा,
अढळ उभारी किरण-पिसारा
पिंजून लाटा झरे प्रभावळ, गर्जत आले वारे, वादळ

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पंढरीनाथा, झडकरि आता

पंढरीनाथा, झडकरि आता, पंढरी सोडून चला
विनविते रखुमाई विठ्ठला

ज्ञानदेवें रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला?

धरणें धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती, केवळ अमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला, बघवे ना हो रखुमाईला
यायचें तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात

प्रिया तुज काय दिसे स्वप्नात?
आनंदाचे पाझर फुटले, मिटलेल्या नयनांत

मनासारखी मिळे सहचरी
फुलुन दरवळे सुख संसारी
नकळे केव्हा येती जाती, दिवस आणखी रात

तुला न उरली तुझी आठवण
मी तर झाले तुला समर्पण
दुजेपणाचे नाव न उरले दोघांच्या जगतात

मोहरलेल्या या ऐक्यावर
एक होतसे नवखी थरथर
दिसल्यावाचून जाणवते मज, नवल आतल्या आत

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रीतीच्या पूजेस जाता

प्रीतीच्या पूजेस जाता मी अशी का थांबले?
दाटते भीती उरी का? थबकती का पाऊले?

दर्शनाची ओढ जीवा, दार उघडे स्वागता
अर्पणाचे तबक हाती आडवी ये भीरुता
स्त्रीपणाच्या जाणिवेने शेवटी का गाठिले?
थबकती का पाऊले?

चढून जाता पायर्‍या या मानीनि होते सती
देवता येथून गेल्या, पद्मजा वा पार्वती
पुण्यपंथी चालता या, मीच का भांबावले?
थबकती का पाऊले?

दूर हो लज्जे जराशी, मजसी आता जाऊ दे
साजरे सौभाग्य माझे मजसी पुरते पाहू दे
दोन जीवा जोडणारे, जोडवे हे वाजले
थबकती का पाऊले?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पंढरीची ती पताका

पंढरीची ती पताका घेऊनी भगवी करी
विठ्ठलाचा गजर होतो चंद्रभागेच्या तिरी॥धृ॥
टाळ चिपळ्या वाजती त्या एकतारी वाजते
भाव भक्तिचे सुगंधी चित्त येथे नाचते
संत सगळे जमुनी येथे गर्जती ते श्रीहरी॥१॥
ज्ञानवंतांनो जरा या या पहा कळसाकडे
वैष्णवाच्या भक्तिचा ध्वज उंच गगनी फडफडे
अमृताचा बोल ऐसा सांगते ज्ञानेश्वरी ॥२॥
वारिला येणे इथे हा पूर्वपिढीचा वारसा
ज्ञान वैराग्यात आमुच्या जीवनाचा आरसा
वाळवंटी वाजते या श्री हरीची बासरी॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी, उभा राहे हरी ॥ ध्रु ॥

मनांत मी बावरले, कशीबशी सावरले
अचानक तोच हाय, कोसळल्या सरी ॥ १ ॥

आभाळात ओले रंग, चिंबचिंब माझे अंग
काय उपयोग आता, सावरून तरी ॥ २ ॥

पडे अनोळखी भूल, फुलले मी जसे फूल
बांसरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी ॥ ३ ॥

काही बोलले मी नाही, वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस, धरिला मी उरी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रेम केले

प्रेम केले, काय हा झाला गुन्हा ?
अंतरीची भावना सांगू कुणा ॥ ध्रु ॥

भोगिली शिक्षा पुरी मी प्रितीची
साहवेना ती सुखाची वेदना
साक्ष द्याया बोलके झाले मुके
जीभ चावूनी टळे का वंचना ॥ १ ॥

रंगवीते चित्रलेखा प्रेमला
अनिरुद्ध स्वप्नी ये उषेच्या मिलना
बोलुनी केलीस ही जाहीर चोरी
हासशी का, रे गुन्हेगारा, पुन्हा ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पहिलीच भेट झाली

तो: पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

ती: पहिलीच भेट झाली, जडली अपुर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न राहिले मी किमया अशी कुणाची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

तो: डोळे मिटून घेता दिसतेस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याही भावनांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

ती: लाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेऊनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्नेही मीलनाची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

तो: वार्‍यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
वार्‍यात वाचतो अन या प्रीतीचे कहाणी
दोघे: पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता, जीव वेडावला
उचलुनी घेतले नीजरथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला

जाग धुंदीतुनी मजसि ये जेधवा
कवळुनि तुजसि मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: