तू तर चाफेकळी

"गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी" ॥ ध्रु ॥

ती वनमाला म्हणे, " नृपाळा हे तर माझे घर
पाहत बसले मी तर येथे, जललहरी सुंदर ॥ १ ॥

हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा ॥ २ ॥

घेउनि हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे
भाऊ माझा, मंजुळवाणे गाणे कधी ना विरे "॥ ३ ॥

"रात्रीचे वनदेव पाहुनी, भूलतिल रमणी तुला
तू वनराणी, दिसे न भुवनी तुझिया रुपा तुला ॥ ४ ॥

तव अधरावर मंजुळ गाणी, ठसली कसली तरी
तवनयनी या, प्रेमदेवता धार विखारी भरी ॥ ५ ॥

क्रिडांगण जणु चंचल सुंदर भाल तुझे हे गडे
भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळा उडे ॥ ६ ॥

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी
भूलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी ॥ ७ ॥

सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती घडे
हात लाविता परि नरनाथा ते तर खाली पडे ॥ ८ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: