तेथे कर माझे जुळती

तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥ ध्रु ॥

हृन्मंदिरी संसृतिशरस्वागत, हसतचि करिती कुटूंब हितरत
गृहस्थ जे हरि उरात रिझवत, सदनी फ़ुलबागा रचिती ॥ १ ॥

ज्या प्रबला निज भावबलाने, करिती सदने हरिहरभुवने
देव-पतिना वाहुनि सुमने, पाजुनि केशव वाढविती ॥ २ ॥

गाळुनिया भाळींचे मोती, हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरि येउनिया जाती, जग ज्यांची न करी गणती ॥ ३ ॥

शिरी कुणाच्या कुवचनवॄष्टी, वरिती कुणी अव्याहत लाठी
धरती कुणी घाणीची पाटी, जे नरवर इतरांसाठी ॥ ४ ॥

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥ ५ ॥

स्मिते जयांची चैतन्यफुले, शब्द जयांचे नव दीपकळे
कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे, प्रेम विवेकी जे खुलती ॥ ६ ॥

जिथे विपत्ति जाळी, उजळी, निसर्ग लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी, एकाची सगळी वसती ॥ ७ ॥

मध्यरात्री नभघुमटाखाली, शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती ॥ ८ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: