मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे.
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे.
जरी पंचखंडातही मान्यता घे स्वसत्ताबळे श्रीमंती इंग्रजी,
मराठी भिकारीण झाली तरीही, कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजी ?
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरी, उत्तरी वा असू दक्षिणी दूर तंजावरी,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी.
मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू,
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एका ताटात आम्ही बसू.
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू वसे आमुच्या मात्र हृनमंदिरी,
जगन्मान्यता हीस अर्पू, प्रतापे हिला बैसवू वैभवाच्या शिरी.
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फ़क्त पाहू हिच्या लक्तरा,
प्रभावी हिचे रुप चापल्य, देखा पडावी फिकी ज्यापूढे अप्सरा,
न घालू जरी वांडमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने,
"मराठी असे आमुची मायबोली", वृथा ही बढाई सुकार्यविणे.
मराठी असे आमुची मायबोली, अहो पारतंत्र्यांत ही खंगली,
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी.
जरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी,
नको रीण, देवोत देतील तेव्हा, जगांतील भाषा हिला खंडणी.