कधी बहर कधी शिशिर

कधी बहर, कधी शिशिर परंतू, दोन्ही एक बहाणे
डोळ्यामधले आसू पुसती, ओठावरले गाणे ॥ १ ॥

बहर धुंद वेलीवर यावा, हळुच लाजरा पक्षी गावा
आणि अचानक गळुन पडावी, विखरुन सगळी पाने ॥ २ ॥

कातरवेळी मिठी जुळावी, पहाट कधि झाली न कळावी
भिन्न दिशांना झुरत फिरावे, नंतर दोन दिवाणे ॥ ३ ॥

हळुच फुलांच्या बिलगुनि गाली, नाजुक गाणी कुणी गायिली
आता उरली आर्त विराणी, सूरच केविलवाणे ॥ ४ ॥

जुळली हृदये, सूरहि जुळले, तूझे नि माझे गीत तरळले
कातरवेळी व्याकुळ डोळे, स्मरुन आता जाणे ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: