जिवलगा, राहिले दूर घर माझे

जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे ॥ ध्रु ॥

किर्र बोलते घनवनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे ॥ १ ॥

गांव मागचा मागे पडला. पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची सूटे सराई, मिटले दरवाजे ॥ २ ॥

निराधार मी, मी वनवासी, घेशिल केंव्हा मज हृदयासी
तूंच एकला नाथ, अनाथा, महिमा तव गाजे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: