जग हे बंदिशाला

जग हे बंदीशाला
कुणी न येथे भला चांगला
जो तो पथ चुकलेला !

ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी
प्रिय हो ज्याची त्याला !

जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलिकडे
उंबरातले किडे-मकोडे
उंबरि करिती लीला !

कुणा न माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते
जो आला तो रमला !

गीत:ग. दि. माडगूळकर
गायक :सुधीर फडके
संगीत: सुधीर फडके
चित्रपट : जगाच्या पाठीवर (१९६०)

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जय पांडुरंगा प्रभो विठ्ठला

कृष्णा....
जय पांडुरंगा प्रभो विठ्ठला
जगदाधारा हरी विठ्ठला

(पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला)

तिर्थ तुझ्या चरणांचे पिवीले
अद्वैतामृत मुखी माझ्या चढले
पायी विभो तव पावन गंगा
(प्रभो पांडुरंगा विभो पांडुरंगा)
पापविमोचन पावन गंगा .१

श्रीचरणी मज द्या विसावा
मंगलमय वर हात द्यावा
आस तुझी मजला श्रीरंगा
(प्रभो पांडुरंगा विभो पांडुरंगा)
आस तुझी मजला श्रीरंगा ..२

जय पांडुरंगा प्रभो विठ्ठला
जगदाधारा हरी विठ्ठला

(पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला)

विठ्ठल विठ्ठल (पांडुरंग) (६)

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जन्मच हा तुजसाठी प्रिया रे

जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी
नव्हत्या माहित मज वेडीला
जन्मांतरीच्या गाठी

मनात आला विनोद केवळ
बोलुन गेले काही अवखळ
ओठी होती अल्लड बोली
आतुरता पोटी

चुरगळली मी हिरवी पाने
सहजपणाने अज्ञानाने
आज उमटली लाल नवेली
मेंदी तळहाती

परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिचय झाला प्रणयाआधी
परिणय मग शेवटी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जय शंकरा गंगाधरा

जय शंकरा, गंगाधरा
गौरीहरा गिरिजावरा
विपदा हरा शशीशेखरा ||धृ.||

विष प्राशुनी जगतास या
दिधली सुधा करुणाकरा ||१||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जय गंगे भागीरथी

जय गंगे भागीरथी
हर गंगे भागीरथी
चिदानंद शीव सुंदरतेची
पावनतेची तू मूर्ती ||धृ.||

जगदाधारा तव जलधारा
अमृत मधुरा कांतीमती
शंकर शंकर जय शीवशंकर
लहरी लहरी त्या निनादती ||१||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जयोस्तुते

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जन पळभर म्हणतिल हाय हाय

जन पळभर म्हणतिल 'हाय हाय'
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचे काय जाय?

रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जेव्हा तुझ्या बटांना

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी
ओढून जीव घेते पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छ्ळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा ?

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा ?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जीवनांत ही घडि अशीच राहु दे

जीवनांत ही घडि अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे ॥ ध्रु ॥

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नांतिल चांदवा जिवास लाभु दे ॥ १ ॥

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्शातुन अंगअंग धुंद होउं दे ॥ २ ॥

पाहुं दे असेच तुला नित्य हांसतां
जाउं दे असाच काळ शब्द झेलता
मीलनांत प्रेमगीत धन्य होउं दे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जाहल्या काही चुका

जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी, हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले

सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन् विंधणार्‍या वेदना
मी असे गीतातुनी सर्वस्व माझे वाहिले

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: