सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥ धॄ ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुता, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी, अन्य देशि चल जाउ, सृष्टिची विविधता पाहू
तइ जननीह्द विरहशंकितही झाले, परि तुवा वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पॄष्ठी वाहीन, त्वरित या परत आणिन
विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ति उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनि सोडले तिजला ॥ १ ॥

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती, दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृ़क्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बालगुलाबहि आता रे. फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ २ ॥

नभी नक्षत्रे बहुत एक प्रिय प्यारा, मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आइची झोपडी प्यारी
तिजविण नको राज्य, मज प्रिय साचा, वनवास तिचा जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तदविरहाची शपथ घालितो तुजला ॥ ३ ॥

या फेनमिषे हंससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिउनी का आंग्लभूमीते
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देशी
तरी आंग्लभुमि भयभीता रे, अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: