नीज माझ्या नंदलाला

नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झऱ्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे

झोपल्या गोठ्यात गाई
साद वा पडसाद नाही
पाखरांचा गल्बलाही बंद झाला, बंद झाला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

सावल्यांची तीट गाली
चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

नीज रे आनंदकंदा,
नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागऱ्यांच्या छंदताला, छंदताला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नको विसरू संकेत मीलनाचा

नको विसरू संकेत मीलनाचा
तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा

दिवस मावळता धाव किनार्‍याशी
तुझे चिंतन मी करीन तो मनाशी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नवल वर्तले गे माये

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||

हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||

पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||

चैत वार्‍याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ॥ ध्रु ॥

नको नाचूं तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सातेली पातेली, आणू भांडी मी कोठून ॥ १ ॥

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून ॥ २ ॥

आडदांडा नको येऊ, झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून ॥ ३ ॥

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐक ना
वाटेवरी सखा माझा, त्याला माघारी आण ना ॥ ४ ॥

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फ़िरव पांथस्थ ॥ ५ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आणि संभाळून
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन ॥ ६ ॥

पितळेची लोटिवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥ ७ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निघाले आज तिकडच्या घरी

निघाले आज तिकडच्या घरी ॥ ध्रु ॥

एकदांच मज कुशीत घेई, पुसुनि लोचने आई
तुझी लाडकी लेक आपुले, घरकुल सोडुनि जाई
तव मायेचा स्पर्श मागते, अनंत जन्मांतरी ॥ १ ॥

पडते पाया तुमच्या बाबा, काय मागणे मागू ?
तुम्हीच मज आधार केवढा, कसे कुणाला सांगू
या छत्राच्या छायेखालुन सातपावली करी ॥ २ ॥

येते भाऊ, विसर आजवर, जे काही बोलले
नव्हती आई, तरिही थोडी रागावुन वागले
थकले अपुले बाबा आता, एकच चिंता उरी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नाहि कशी म्हणू तुला

नाहि कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने, आड येते रीत ॥ ध्रु ॥

नाहि कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी, जायचे न लांब ॥ १ ॥

नाहि कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी ॥ २ ॥

नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव ॥ ३ ॥

नाही कशी म्हणू तुला, मांडू सारीपाट
परी नको फार काळ, दूध उतूं जातं ॥ ४ ॥

नाहि कशी म्हणू तुला, जरा लपूछपू
परी पाया खडीकाटे लागतात खुपू ॥ ५ ॥

नाहि कशी म्हणू तुला, विडा दे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी ॥ ६ ॥

नाहि कशी म्हणू तुला, हिरव्या पदराचा शेव
परी हळु माप निळ्या डोळ्यांतला भाव ॥ ७ ॥

नाहि कशी म्हणू तुला, हाती घ्याया हात
आले वाटते भावोजी, घेऊनी गणित ॥ ८ ॥

नाहि कशी म्हणू तुला, लाविते मी दार
परी नाही दाराचा या नीट अडसर ॥ ९ ॥

नाही कशी म्हणू तुला, जाऊं चांदण्यांत
परी पहा दिसे चंद्र छान खिडकीत ॥ १० ॥

नाही कशी म्हणू तुला, पहाटमागणी
परी घालायचे आहे, तुळशीस पाणी ॥ ११ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नववधू प्रिया मी बावरते

नववधू प्रिया मी बावरते. लाजते, पुढे सरते, फिरते ॥ ध्रु ॥

कळे मला प्राणसुखा जरि, कळे तूच आधार सुखा जरी
तुजवाचुनि संसार फुका जरि, मन जवळ यावया गांगरते ॥ १ ॥

मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
बागाबगीचा येथला मळा, सोडिता कसे मन चाचरते ॥ २ ॥

जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करु, उरी भरभरते ॥ ३ ॥

चित्र तुझे घेउनि उरावरि, हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि, तू बोलविता परि थरथरते ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निळ्या जळावर कमान काळी

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूंची बेटे॥१॥
फूलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकूम टिम्बे
आरसपानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिम्बे॥२॥
घाटामध्ये शिरली गाडी अन्‌ रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करते दिडदा दिडदा॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निळ्या आभाळी कातरवेळी

निळ्या अभाळी, कातरवेळी, चांदचांदणे हसती
मी हुरहुरते, मनात झुरते, दूर गेले पती

टिपूर चांदणे धरती हसते
पती पाहता मी भान विसरते
नदी समींदर नकळत मिसळूनी, एकरूप होती

मन मंदिरी मी पूजीन त्यांना
वाहीन पायी प्रीत फुलांना
पाच जीवांच्या उजळून ज्योती, ओवाळीन आरती

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निजल्या तान्ह्यावरी

निजल्या तान्ह्यावरी,
माउली दॄष्टि सारखी धरी ॥ ध्रु ॥

तिचा कलेजा पदरी निजला
जिवापलिकडे जपे त्याजला
कुरवाळुनि चिमण्या राजाला
चुंबी वरचेवरी ॥ १ ॥

सटवाई जोखाइ हसविती
खळी गोड गालावरि पडती
त्याची स्वप्ने बघुनि मधुर ती
कौतुकते अंतरी ॥ २ ॥

अशीच असशी त्रिभुवनजननी
बघत झोपल्या मज का वरुनी
सुखदु:खाची स्वप्ने बघुनी
कौतुकशी का खरी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: