रात्र आहे पोर्णिमेची, तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जिवांच्या, एकदा ऐकून जा ॥ धॄ ॥
निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी
मिसळल्या मॄदु भावनाही झोपल्या पानांतुनी
जागती नेत्रातली ही पाखरे पाहून जा ॥ १ ॥
पांखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ॥ २ ॥
अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही
रंग तो पाहून जा, तो तोषवी अंधासही
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ॥ ३ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: