कंठात अंबराच्या

कंठात अंबराच्या झुलवीत मेघ आला
पवनाशी खेळ झाला आला पाऊस आला॥धृ॥
चैतन्यहीन धरणी ग्रीष्मातल्या उन्हाने
पाहून वाट वेडी आतुरल्या मनाने
बोले हळूच कानी प्राशून थेंब ओला॥१॥
अस्मान गर्जू लागे बिजली कडाड वाजे
एकात एक भवरे तालात फेर साजे
झाडे लवूनी वदती आनंद दाटलेला॥२॥
धरती तृषार्त न्हाली पहिल्या सरीत ओली
हिरव्या तृणांकुराचा शालू अपूर्व ल्याली
रेखूनी सप्तरंग पिवळी किनार त्याला॥३॥
धरतीस शांतावया आल्या दुधाळ धारा
पडल्या वरून तारा घेऊन रूप गारा
नवरूप यौवनाचे आले चराचराला॥४॥
तालात मोर नाचे फुलवून तो पिसारा
मल्हार सूर गातो लाटासवे किनारा
येते उधाण भरती आनंद सागराला॥५॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: