आकाश देऊळवाडा

आकाश देऊळवाडा तिथे वाजतो चौघडा
काठोकाठ भरे घडा मेघ शिंपतात सडा॥धृ॥
ध्वज आकाश गंगेचा झगमगते शिखर
लखलखते सौदामिनी तळपते गर्भागार॥१॥
दिसे निळाई माऊली झाला जीव माझा तान्हा
तिच्या कुशीत शिरूनी पिते अमृताचा पान्हा॥२॥
माझी निळाई हासली ऊन पडले पिवळे
दोन रंग एक जीव जन्मा मातीतून आले॥३॥
माता निळाई भेटली द्वैत सरले सरले
धरतीच्या देव्हार्‍यात अद्वैताचे पीक आले॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: