नाहि कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने, आड येते रीत ॥ ध्रु ॥
नाहि कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी, जायचे न लांब ॥ १ ॥
नाहि कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी ॥ २ ॥
नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव ॥ ३ ॥
नाही कशी म्हणू तुला, मांडू सारीपाट
परी नको फार काळ, दूध उतूं जातं ॥ ४ ॥
नाहि कशी म्हणू तुला, जरा लपूछपू
परी पाया खडीकाटे लागतात खुपू ॥ ५ ॥
नाहि कशी म्हणू तुला, विडा दे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी ॥ ६ ॥
नाहि कशी म्हणू तुला, हिरव्या पदराचा शेव
परी हळु माप निळ्या डोळ्यांतला भाव ॥ ७ ॥
नाहि कशी म्हणू तुला, हाती घ्याया हात
आले वाटते भावोजी, घेऊनी गणित ॥ ८ ॥
नाहि कशी म्हणू तुला, लाविते मी दार
परी नाही दाराचा या नीट अडसर ॥ ९ ॥
नाही कशी म्हणू तुला, जाऊं चांदण्यांत
परी पहा दिसे चंद्र छान खिडकीत ॥ १० ॥
नाही कशी म्हणू तुला, पहाटमागणी
परी घालायचे आहे, तुळशीस पाणी ॥ ११ ॥