जन पळभर म्हणतिल हाय हाय

जन पळभर म्हणतिल 'हाय हाय'
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचे काय जाय?

रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?

अशा जगास्तव काय कुढावे?
मोहि कुणाच्या कां गुंतावे?
हरिदूता कां विन्मुख व्हावे?
कां जिरवुं नये शांतीत काय?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: