टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू

टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ

भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात
गरगर गरगर त्यासंगे चल गिरक्या घेऊ

आकाशी गडगडते म्हातारी का दळते
गडड गुडुम गडड गुडुम ऐकत गे राहू

या गारा कश्या कश्या आल्या सटासटा
पट पट पट वेचूनिया ओंजळीत घेऊ

फेर गुंगुनी धरू भोवर्‍यापरी फिरू
ये पावसा घे पैसा गीत गोड गाऊ

पहा फुले लता तरू चिमणी गाय वासरू
चिंब भिजती मीच तरी का घरात राहू

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: