बालगीत

टप टप टप टप थेंब वाजती

टप टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा
पाऊस आला, रे पाऊस आला

घरा-घरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी
अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा

काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आई आणखी बाबा यांतुन कोण आवडे अधिक तुला?

आशा : सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यांतुन, कोण आवडे अधिक तुला ?

उषा : आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला
आई आवडे अधिक मला

आशा : गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला
आवडती रे वडिल मला

आशा : घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन् चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला
आवडती रे वडिल मला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक होता काऊ

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला
मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ

एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला
तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट

एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली
तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस

एक होती गाय, तिने चिमणीला विचारले
तुझे नाव काय?, तुझे नाव काय?, तुझे नाव काय?

एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले
मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी?

चंदाराणी, चंदाराणी
का ग दिसतेस थकल्यावाणी?

शाळा ते घर, घर ते शाळा
आम्हां येतो कंटाळा
रात्रभर तू चाल-चालसी
दिवसातरी मग कोठे निजसी?

वारा-वादळ छप्पनवेळा
थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखसी?
पुढती पुढती पाय टाकिसी

काठी देखील नसते हाती
थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी? कशी उतरिसी?
निळ्या डोंगरी अखंड फिरसी

वाडा-घरकुल-घरटे नाही
आई नाही, अंगाई
म्हणूनच का तू अवचित दडसी?
लिंबामागे जाऊन रडसी?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झुक झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या ||धृ.||

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहून घेऊ या ||१||

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगू या ||२||

मामाची बायको सुगरण
रोजरोज पोळी शिकरण
गुलाबजामून खाऊ या||३||

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेवू या ||४||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चंदाराणी....

चंदाराणी...

चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी... चंदाराणी...

शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसातरी मग कोठे निजसी...चंदाराणी...

वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिसी...चंदाराणी...

काठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी, कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरसी...चंदाराणी...

वाडा घरकुल घरटे नाही, आई नाही अंगाई
म्हणूनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी...चंदाराणी...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू

टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ

भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात
गरगर गरगर त्यासंगे चल गिरक्या घेऊ

आकाशी गडगडते म्हातारी का दळते
गडड गुडुम गडड गुडुम ऐकत गे राहू

या गारा कश्या कश्या आल्या सटासटा
पट पट पट वेचूनिया ओंजळीत घेऊ

फेर गुंगुनी धरू भोवर्‍यापरी फिरू
ये पावसा घे पैसा गीत गोड गाऊ

पहा फुले लता तरू चिमणी गाय वासरू
चिंब भिजती मीच तरी का घरात राहू

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबलेला कुणाशी बोलले ना
चालले लुटुतुटु पाही ससा

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांजवेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गोड गोजिरी लाज लाजरी

गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
फुलाफुलांच्या बांधून माळा मंडप घाला गं दारी

करकमलांच्या देठावरती चुडा पाचूचा वाजे
हळदीहूनही पिवळा गाली रंग तुला तो साजे
नथनी बुगडी नाचेऽऽऽ
रूप पाहुनी तुझे ??? मनी मंगळ सरी

भरजरीचा शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी
लग्नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी
अंतरपाट धरीऽऽऽ
शिवा पार्वती वरी, लाडकी ही जाई ताई दुरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ठाऊक आहे का तुज काही

ठाऊक नाही मज काही
ठाऊक नाही मज काही
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई

मऊ जशी ती साय दुधाची
होती आई का तशी मायेची
बागेतील ते कमल मनोहर
आई होती का तशीच सुंदर
देवाघरी का एकटी जाई
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई

चिऊकाऊची कथा चिमुकली
सांगत होती का ती सगळी
आम्हांसारखी शुभंकरोति
म्हणे रोज का देवापुढती
गात असे का ती अंगाई
ठाऊक आहे का तुज काही
कशी होती रे माझी आई

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: