या छंदावर जपुनी प्रेम करावे...

छं

द म्हटलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी काय येतं? छंद म्हणजे स्वानंदासाठी, मनोरंजनासाठी जी गोष्ट आपण आवडीने करतो, तो आपला छंद. व्यक्ती तितक्या प्रकृतीच नव्हे, तर व्यक्ती तितके छंद असंही म्हणता येईल. आज माझ्या छंदाची मी तुम्हाला ओळख करुन द्यायचं म्हणतोय. माझ्या छंदाची गंमत म्हणजे, त्यावर मी वेळ घालवला की नुसताच वेळ जात नाही, तर मी बरोबर घेऊन जातो त्यातली एक महत्त्वाची गोष्ट संपून जाते आणि दाखवायला उरतं काय? तर भोकं पडलेले कागद!

आला लक्षात माझा छंद? इथे अमेरिकेत हा छंद जोपासणारे बरेच जण आहेत, त्याचं कारण म्हणजे अमेरिकन घटना. होय, माझा छंद आहे हँडगनने शूटिंग. मायबोलीवर काही एअर रायफल शूटिंगचा/पेलेट गनने शूट करण्याचा छंद बाळगणारे आहेत. पण मी ज्या हँडगन वापरतो, त्या खर्‍या बंदुका असतात, खर्‍याखुर्‍या गोळ्या वापरून मी गोळीबार करण्याचा सराव करतो. होय, खर्‍या बंदुका आणि खर्‍या गोळ्या! तेव्हा अर्थातच हे खेळणं नाही. तुमच्या मनात हा प्रश्न येणं अगदी साहजिक आहे की ज्या छंदात जराशी जरी चूक झाली, थोडंसं दुर्लक्ष झालं तर फार मोठा अनर्थ संभवतो, असा छंद हवाच कशाला? त्यापेक्षा काहीतरी निर्माण करण्याचा आनंद देणारा छंद जास्त चांगला नाही का? तर मी असं म्हणेन, की एकतर कुठलाही छंद चांगला किंवा वाईट नसतो. तुम्ही तो कसा जोपासता आणि त्यातून तुम्हाला काय मिळतं ते जास्त महत्त्वाचं आहे. छंद म्हटल्यावर सर्वसाधारणपणे जे आपल्या डोळ्यांसमोर येतात त्यातल्या कितीतरी छंदांना शिस्त, थोडं-फार का होईना प्रशिक्षण लागतंच की! शिवाय गिर्यारोहण, सुतारकाम या आणि अश्या इतर कितीतरी छंदांतही काळजी घ्यावी लागतेच - थोडीशी बेपर्वाई, चुकून झालेलं दुर्लक्ष महागात तिथेही पडू शकतंच. त्यामुळे हँडगन शूटिंग हा काहीतरी भयानक प्रकार आहे, त्यामुळे उठसूठ कोणीही त्याचा गैरवापर करुन कोणाचा जीव घेऊ शकतो हे काही मला पटत नाही. कदाचित लेख वाचून संपेतो तुमच्यापैकी कोणाला पटेलही की हा छंद जोपासण्यासाठी जितका वेळ, पैसा, शिस्त, कष्ट खर्च करतो, त्याच्या कितीतरी पटींनी मजा, एक नवी गोष्ट शिकण्याचा आनंद मिळतो. शिवाय, सततच्या सरावाने आपण आपले स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.

अमेरिकेत कायदेशीररीत्या राहणार्‍या कोणालाही इथल्या घटनेने शस्त्र बाळगण्याचा अधिकार दिलेला आहे. वरती म्हटलं तसं इथे हा छंद बरेच जण जोपासतात- अगदी मनापासून! पण त्यातही दक्षिणी राज्यांत हे जरा जास्त प्रचलित आहे. पुरुषच नव्हे तर स्त्रियाही अगदी हौसेने, शिस्तीने सराव करतात, गन बरोबर बाळगतात. ज्या लोकांना वेळी-अवेळी कामानिमित्त बाहेर पडावं लागतं, त्यांना स्वसंरक्षणासाठी बरोबर गन आहे याचा मोठा आधार वाटतो, हे आता मला सहज समजू आणि पटू शकतं.

करमणुकीसाठी माझा ओढा अगदी पहिल्यापासून हाणामारीच्या चित्रपटांकडे. इकडे आल्यावर जेव्हा इथले टि.व्ही. शो पाहायला लागलो, तेव्हापासून जास्त आवडतात ते Top Shot, 3 Gun Nation, Sons of Guns, Weaponology, Future Weapons हे आणि या प्रकारचे कार्यक्रमच! विशेषतः Top Shot आणि 3 Gun Nation पाहताना दर वेळेस वाटायचे- कसे वाटत असेल बंदूक हाताळायला? शूटिंग करायला? साधारण चार वर्षांपूर्वी माझे दोन-तीन सहकारी बंदुकींबद्दल बोलताना कानावर पडले- शनिवारी शूटिंग रेंजवर किती मजा आली आणि परत कधी जायचे याबद्दल बोलत होते ते. केव्हातरी शूटिंग करून पाहायचे डोक्यात होतेच तेव्हा शेवटी न राहवून त्यांना विचारले की मी बरोबर आलो तर चालेल का? सुदैवाने त्यांनी अगदी पटकन आणि उत्साहाने होकार दिला. त्यानंतर एका शुक्रवारी त्यांनी मला विचारलं, ''खरंच तुला आहे रस जाण्यात? असेल तर उद्या आम्ही जाणार आहोत तेव्हा येणार का आमच्याबरोबर?'' मी तर एका पायावर तयार होतो पण एका बाबतीत त्यांची अगदी सक्त ताकीद होती की रेंजवर गेल्यापासून परत यायला निघेपर्यंत ते सांगतील ते सगळे मी शब्दशः पाळले पाहिजे. मी ताबडतोब मान्य केले. त्यांनी ९ मि.मी. च्या गोळ्यांचे दोन बॉक्स घेऊन यायला सांगितले. ठरल्या वेळेस मी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेलो. सुरुवातीला ते काय करताहेत ते पाहिले आणि मग धीर करुन एका गनने शूट करुन पाहिलं. अर्थात सगळ्या गोळ्या काही मला वाटलं होतं तिथे नाही लागल्या, पण फारच मजा आली! इतकी, की आलेल्या सगळ्यांकडे ज्या बंदुका होत्या त्या सगळ्या मी वापरून पाहिल्या. त्यात चार-पाच वेगवेगळ्या कंपन्या आणि कॅलिबरच्या हँडगन होत्या, दोन रायफल होत्या- आणि पहिलं काय जाणवलं असेल तर ते हे की 'हे आपल्याला आवडतंय!' तिथून निघालो आम्ही आणि नेमका गाडीने टाकीत खडखडाट होण्याच्या बेतात असल्याचा इशारा दिला. दिसलेल्या पहिल्या गॅस-स्टेशनकडे गाडी वळवली आणि खिशात हात घातला आणि एकदम चमकलो! खिसा रिकामा… आधी बायकोला फोन केला, पाकीट घरी राहिलंय का विचारायला. तर ती म्हणाली, 'अरे, मी केव्हाची फोन करतेय तुला सांगायला, तुझं पाकीट घरीच राहिलंय, पण तू फोन उचलतंच नव्हतास! मला कळतंच नव्हतं काय करावं…' मग पाहिलं तर खरंच बरेच फोन घरून, तिच्या सेलफोनवरून आले होते पण मला ऐकूच नाही आलं. कसं येणार? आम्ही गेलो होतो ती नेमकी Indoor Range होती, शिवाय कानावर संरक्षणासाठी हेडफोन होते…शेवटी बरोबर असलेल्या मित्राने गॅसचे पैसे दिले आणि माझी शूटिंगशी झालेली ही पहिली-वहिली ओळख सगळ्या 'अर्थी' अविस्मरणीय ठरली!

खरोखर, त्या दिवशी घरी पोहोचेतो माझं मनाशी पक्कं झालं होतं की मला स्वत:ची हँडगन घ्यायची, अगदी नक्की, कारण मला मनापासून आनंद देणारा छंद सापडला होता. शिवाय, एकदा शूटिंग करायला आवडतंय म्हटल्यावर आपली स्वत:ची गन असणं जास्त बरं; कायम तर काही मी दुसर्‍या कोणाची तरी गन वापरून माझा छंद जोपासू शकत नव्हतो आणि ते योग्यही नाही. पण केवळ एक दिवसाच्या अनुभवावर लगेच जाऊन गन घेण्याइतकी माहितीही नव्हती. तेव्हा मी आपलं सरळ जवळच्या गन विकणार्‍या दुकानात गेलो. सुदैवाने दुकानात गर्दी नव्हती जास्त आणि माझ्याशी बोलणार्‍या, तिथे काम करणार्‍या माणसाला उत्तम अनुभव आहे हे काही मिनिटांतच माझ्या लक्षात आलं. माझा उत्साह आणि ज्ञान यांचं व्यस्त प्रमाण त्याच्या लगेच लक्षात आलं असावं कारण मला पहिला सल्ला काय मिळावा? 'जर तुला हा छंद मनापासून जोपासायचा असेल तर रीतसर त्याचं शिक्षण घे- केवळ परमिट काढण्यासाठी आवश्यक असते म्हणून नाही, तर मुळात गन वापरायची असेल तर तिच्याबद्दल प्राथमिक माहिती तरी इत्यंभूत असायलाच हवी. गन विकत घ्यायला या शिक्षणाची गरज नाही पण गन वापरणार्‍या कोणालाही गनची माहिती, ती साफ कशी आणि का करायची आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ती सुरक्षितपणे कशी हाताळायची हे माहिती असायलाच हवं.' त्याने असे समजावून सांगितल्यावर मलाही पटले की कोणतीही नवीन गोष्ट करताना/वापरताना त्याचं मूलभूत शिक्षण घेणं हेच शहाणपणाचं आहे. अगदी आपण दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवायच्या आधी त्याचे थोडेतरी धडे माहीतगार व्यक्तीकडून घेतो तसेच थोडे-फार! तेव्हा मग मी लगेचच पुढच्या वर्गासाठी नाव दाखल केले. तसा एक दिवसाचाच कोर्स होता. पहिले चार तास गनबद्दल माहिती आणि पुढचे चार तास ती कशी हाताळायची, साफ करायची आणि मी ज्याची सगळ्यांत जास्त आतुरतेने वाट पाहत होतो ते, म्हणजे प्रत्यक्ष गनने शूट करण्याचा सराव. त्यासाठी माणसाचं चित्र असलेले कागद टार्गेट म्हणून वापरले. त्यावर ३ यार्डांवरून (एक यार्ड म्हणजे तीन फूट), ७ यार्डावरून आणि १५ यार्डांवरून शूटिंग केले. नंतर दिवसाच्या शेवटी परीक्षा झाली. लेखी परीक्षेत निदान ८०% उत्तरे बरोबर यावी लागतात आणि ३, ७ आणि १५ यार्डांवरून कमीत कमी ७०% टार्गेट शूट करावी लागतात - तरच कोर्स पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मिळतं. अर्थातच मी तिकडून बाहेर पडलो ते प्रमाणपत्र मिळवूनच. ते प्रमाणपत्र घेऊन मी आमच्या DMV (Department of Motor Vehicles - थोडक्यात आपल्याकडचे RTO) कार्यालयात गेलो आणि गन कन्सील कॅरी करण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला. इथे अमेरिकेत काही ठिकाणी तुम्हाला गन कन्सील कॅरीच करावी लागते, म्हणजे तुमच्याजवळची गन उघडपणे दिसता कामा नये; तर काही राज्यांत गन कन्सील कॅरी करता येत नाही - ती पाहणार्‍याला पटकन दिसेल अश्या रीतीनेच बाळगावी लागते. बोटांचे ठसे घेऊन आणि माझ्या पार्श्वभूमीत काही गुन्हा, अटक वगैरे नाही यासाठी 'background check'चे सोपस्कार पार पडल्यावर एकदाचे माझ्या हातात परमिट आले! त्या दिवशीचा माझा आनंद काय वर्णावा!

लगेचच्या शनिवारी मी परत त्याच दुकानात हजर! कोर्स पूर्ण झाला, माझं गन हा प्रकार हाताळायचं टेन्शन थोडं कमी झालं, बरीच थिअरी समजली; पण दुकानात गेल्यावर माझी अवस्था काही फार वेगळी नव्हती. कारण कितीतरी निर्माते - प्रत्येकाच्या गनमध्ये थोडे-फार फरक, शिवाय जवळपास सगळ्या गन वेगवेगळ्या कॅलिबरमध्ये येतात (म्हणजे गोळीचा आकार), एकाच कॅलिबरच्या गन वेगवेगळ्या आकारात येतात - तुम्ही कश्या तर्‍हेने बाळगणार आहात त्यादृष्टीने बदल असतात. हे सगळं पाहून मी इतका गोंधळून गेलो! त्या आधीच्या फेरीतलाच माणूस मला मदत करायला आला होता. पण माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीचा वेग मशीनगनमधून सुटणार्‍या गोळ्यांच्या वेगापेक्षा जास्तच असावा. थोड्याच वेळात एकतर तो गनमागून गन दाखवून कंटाळला तरी किंवा थोडी तरी माहिती माझी मी मिळवावी (कारण काही गोष्टी - जसे गनचा आकार - या प्रत्येकावर अवलंबून असतात) म्हणून त्याने मला एका रेंजचा पत्ता दिला, जिथे गन भाड्याने घेता येते (अर्थात, तिथेच वापरण्यासाठी - घरी नेता येत नाही…) आणि मला सांगितले की तिथे जाऊन तुला वापरून पाहाव्याश्या वाटतील त्या गन भाड्याने घे आणि प्रत्यक्ष शूट करुन पहा. मलाही हे बरं वाटलं - कारण बाकीच्या बहुतेक गोष्टी जश्या अमेरिकेत पसंत पडल्या नाही तर परत करता येतात किंवा बदलून घेता येतात, तसे गनचे नाही. त्यामुळे घेण्यापूर्वी वेगवेगळ्या कॅलिबरच्या, आकाराच्या, निर्मात्यांच्या गन वापरुन पाहता येत असल्या तर अजून काय हवे? मी आणि माझ्याबरोबरच कोर्स केलेला माझा मित्र - आम्ही दोघे त्या रेंजवर गेलो आणि दोघांनी प्रत्येकी दोन गन भाड्याने घेतल्या. दोघांनीही चारी गनने शूट करुन पाहिले. प्रशिक्षण, थोडे वाचन, टि.व्ही. वरच्या कार्यक्रमांतून मिळालेली माहिती आणि आतापर्यंत थोडे-फार केलेले शूटिंग याच्या आधारे एकदाचं ठरलं कोणती गन घ्यायची ते. आणि शेवटी एकदाची मी बरेटा PX4 Storm ही ९ मि.मी. ची गन विकत घेतली - त्याबरोबर दोन मॅगझिनही आली. अर्थात, परमिटसाठी तुमची पार्श्वभूमी तपासून झाली असली तरी प्रत्येक वेळी गन खरेदी करताना ही तपासणी परत होते. त्याशिवाय कोणालाच कायदेशीररीत्या गनची खरेदी करता येत नाही. गन खरेदी करतानाच ती तुमच्या नावावर रजिस्टरही होते. बरोबर गोळ्या, गन साफ करण्याचे किट अशी सगळी खरेदी करुन मी अगदी उत्साहात घरी पोहोचलो!

YaChhandavar-Gun1.gifYaChhandavar-Gun2.gif

त्यानंतरचा किस्सा मला आज जवळपास चार वर्षांनंतरही अगदी काल घडल्यासारखा आठवतोय! घरी गेल्या-गेल्या सगळा पसारा घालून बसलो. सगळ्यात आधी मॅगझिनमध्ये गोळ्या भरल्या, मॅगझिन गनमध्ये घातलं आणि गनची स्लाईड रॅक केली. (कधी-कधी नुसतंच गन रॅक करणं असंही म्हटलं जातं - या कृतीमुळे मॅगझिनमधली गोळी गनच्या चेंबरमध्ये येते. सेमी-ऑटोमॅटिक गनमध्ये आधीची गोळी झाडली जाते तेव्हा जी ऊर्जा निर्माण होते, ती ऊर्जा वापरुन झाडल्या गेलेल्या गोळीचे केसिंग बाहेर फेकले जाते आणि मॅगझिनमधली पुढची गोळी चेंबरमध्ये येते.) गन रॅक केली खरी आणि क्षणार्धात माझ्या लक्षात आलं की चेंबरमध्ये गोळी आहे आणि हॅमरही मागे आहे- थोडक्यात गन शूट करण्यासाठी तयार आहे. हे मनात आलं आणि मला दरदरुन घाम फुटला! अगदी हे माहीत होतं की मी जोपर्यंत काही करत नाही तोवर काही होणार नाही, प्रशिक्षणातही हे आमच्या डोक्यात पक्कं घुसवलं होतं. पण पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या गनमध्ये गोळी आहे म्हटल्यावर त्या क्षणापुरतं तरी सगळं विसरायला झालं होतं! मला त्या क्षणी तरी भीती वाटली की चुकून माझ्या हातून ट्रिगर दाबला जाईल किंवा हॅमर चुकून गनवर आपटून गोळी सुटेल - ही कल्पनाही भयानक होती! मी कसंबसं स्वतःला सावरलं आणि प्रशिक्षणात गन लोड-अनलोड करण्याबद्दल काय सांगितलं होतं ते आठवायचा प्रयत्न करु लागलो. मग आम्हाला शिकवलं होतं तसं हळूच मॅगझिन काढलं आणि स्लाइड परत रॅक केली - लगेच गोळी बाहेर पडली. तरी खात्री करुन घेण्यासाठी मी सगळ्या गोळ्या दोनदा तरी मोजून खात्री करुन घेतली असेल! आता जेव्हा हा किस्सा आठवतो, तेव्हा मी इतका हसतो! पण त्याचा एक फायदाही झाला- त्या प्रसंगाने माझ्या प्रशिक्षणाच्या काळात गन सुरक्षितपणे कशी हाताळावी हे शिकलेलं सगळं मनावर कायमचं कोरलं गेलं.

YaChhandavar-GunParts.gifYaChhandavar-Bullets.gif

आतापर्यंत मी बर्‍याच कंपन्यांच्या, बर्‍याच कॅलिबरच्या गन वापरल्या आहेत; रायफल आणि शॉटगनने शूटिंग करून पाहिले आहे. शॉटगनने सराव करताना बहुतेक वेळा एका मशीनमधून थोड्या-थोड्या वेळाने केशरी-तपकिरी रंगाच्या मातीच्या तबकड्या फेकल्या जातात, त्या हवेत असतानाच टिपायच्या असतात. हौशी लोक शॉटगन बहुतेक वेळा हंसासारखे उडते पक्षी टिपायला वापरतात, तर जंगली जनावरे, जसे की हरणे यांची शिकार करायला रायफल. (अमेरिकेत ठराविक काळात ज्या पक्ष्यांची / प्राण्यांची संख्या मुबलक असते त्यांची शिकार परमिट काढून करता येते.) शॉटगन एका खांद्याला टेकवून शूट केली जाते आणि त्याच्यातून गोळी सुटली की त्याचा आपल्या खांद्यावर होणारा प्रत्याघात जोराचा असतो. रायफलने शूटिंग करताना किमान पन्नास यार्डावर टार्गेट (म्हणजे एकच मध्यबिंदू असलेली वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळे रंगवलेला कागद किंवा पुठ्ठा, ज्याला 'बुल्स आय' म्हटले जाते) लावले जाते. रायफलला बर्‍याच वेळा छोटीशी दुर्बीण जोडलेली असते किंवा लाल रंगाचा लेझर डॉट असतो; कधी-कधी दोन्ही जोडलेले असते.. रायफलसाठीचे टार्गेट बर्‍याच अंतरावर असल्यामुळे रायफल बहुतेक वेळा टेबल, जमीन अश्या, कुठल्यातरी कॅमेर्‍याचा ट्रायपॉड असतो तसे काहीतरी पृष्ठभागावर ठेवून, त्यावर ठेवून झाडली जाते.

हँडगन, रायफल, शॉटगन या सगळ्या प्रकारच्या गन्सनी शूट करुन पाहिल्यावर मला स्वतःला हँडगनने शूटींग करायला सगळ्यात जास्त आवडले. त्यामुळे बघता बघता माझ्या पहिल्या गनच्या जोडीला आणखी दोन आल्या. हँडगनने शूटिंग करताना बुल्स आय टार्गेटच वापरले जाते, पण वर लिहिले तसे अंतर रायफलपेक्षा खूपच कमी असते. हँडगनलाही बर्‍याच वेळा लाल किंवा हिरवा लेझर डॉट असतो त्यामुळे लक्ष्यवेध करणे सोपे जाते. हँडगनच का? एकतर ती बरोबर बाळगायला सोपी असते. पँटच्या आतल्या बाजूने पट्ट्याला अडकवता येईल अशी होलस्टर खास बनवली जातात. वेळप्रसंगी पाठीशी नुसतीच पँटमध्ये खोचूनही भागते. शिवाय हँडगन बनवतातही कितीतरी वेगवेगळ्या आकाराच्या. अगदी स्त्रियांच्या छोट्या पर्समध्ये मावतील एवढ्या छोट्या आकाराच्या गनही मिळतात. शूटिंग करताना छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आणि उपयोगाचे असते. गन हातात धरताना ती फार घट्ट धरुन चालत नाही कारण त्यामुळे शूट करताना आपला हात हालण्याची शक्यता वाढते - शेवटी आपला हात ठराविक जोराने एखादी गोष्ट किती वेळ धरू शकेल याला शारीरिक मर्यादा असतात. पण गन हलक्या हाताने धरूनही उपयोग नाही, नाहीतर गोळी बाहेर पडताना जो प्रत्याघात होतो त्याने गन हातातून निसटून पडायची! दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रिगरवर बोट कसे आणि किती ठेवता. बोटाने ट्रिगर जास्त पकडला तर गोळी थोडी डावीकडे जाते, तर जेमतेम बोट ट्रिगरवर टेकवले ते फारच उजवीकडे. आणि या सगळ्या गोष्टी, शिवाय गन बनवणारी कंपनी, गनचा आकार याप्रमाणे आपल्या आपल्याच जुळवून घ्याव्या लागतात.

आता मी सरावासाठी जातो तेव्हा साधारणपणे काय-काय करतो (किंवा करत नाही) ते बघू. मी ज्या रेंजवर जातो, ती उघड्यावर आहे. रेंजच्या एका बाजूला हँडगनने सराव करण्याचा भाग आहे आणि दुसर्‍या बाजूला रायफल, शॉटगन आणि तत्सम लांब नळीच्या बंदुकांच्या सरावासाठी भाग आहे. यातल्या कुठल्याही भागात काही साफ-सफाई करायची असली किंवा निर्माण झालेला धूर कमी होणे गरजेचे असले- खरं तर कोणत्याही कारणासाठी थोडा वेळ थांबावे लागणार असेल तर दोन्ही भागातला सराव थांबवला जातो. ज्या कारणासाठी सगळे थांबले असतील ते दूर झाले की कोणीतरी ओरडून रेंज परत 'हॉट' असल्याचे, म्हणजेच फायरिंगसाठी तयार असल्याचे सांगते की परत सगळे आपापला सराव सुरू करतात. आणि या गोष्टी तिथे असलेला प्रत्येकजण अगदी कसोशीने पाळतो. नवीन व्यक्तीला माहीत नसेल तर कोणीतरी सांगते. मी सरावासाठी जाताना बहुतेकवेळा दोन वेगवेगळ्या गन घेऊन जातो. बरोबर गोळ्या, टार्गेटसाठी जे वापरायचे असेल ते, कान आणि डोळे यांचे संरक्षण करण्यासाठी अनुक्रमे हेडफोन (हे वेगळे noise-cancelling headphone असतात) आणि सेफ्टी-गॉगल; शिवाय बरोबर पाणी - प्यायला आणि हात धुवायला, ऋतू असेल त्याप्रमाणे कॉफी/ ज्यूस असे काहीतरी अश्या प्रत्यक्ष शूटिंगशी संबंध नसलेल्या पण उपयोगी पडणार्‍या गोष्टी असतातच. (टार्गेट म्हणून दर वेळी माणसाची आकृती असलेला कागद वापरायलाच हवे असे काही नाही; कित्येक वेळा तर मी साध्या पेपर प्लेट सुद्धा वापरतो कारण नेमबाजीचा सराव करताना शेवटी आपल्याला अपेक्षित ठिकाणी नेम लागणे सगळ्यात महत्त्वाचे असते - तुम्ही टार्गेट म्हणून काय वापरता ते नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे पोलीस, मिलिटरी यांतले लोक कायम माणसाची आकृती असलेले कागदच वापरतात कारण त्यांच्यासाठी माणसाच्या शरीरावर योग्य ठिकाणी नेम लागणे फार महत्त्वाचे असते, शिवाय कमीत कमी वेळात हे साधणेही.) नेलेल्या गनने किमान ५०-६० गोळ्या झाडायचा सराव दर वेळेस करतो. साधारण ३ यार्डापासून सुरुवात करून १० यार्डापर्यंत वेगवेगळ्या अंतरावरून गोळीबार करण्याचा सराव करतो. त्याहून जास्त अंतरावरून मात्र अजूनही माझा तितका अचूक नेम लागतोच असं नाही. तिथे सरावासाठी आलेले लोक काही अलिखित नियम न चुकता पाळतात. वर उल्लेख केलेल्या काही कारणाने कुठल्याही भागात सराव थांबवायचा असला तरी आख्खी रेंज थांबते आणि आतापर्यंत जिथे अखंड वेगवेगळ्या बंदुकांमधून गोळ्या सुटल्याचे आवाज येत होते तिथे क्षणार्धात पूर्ण शांतता पसरते. पण कोणीही कुरकूर करत नाही किंवा आपल्या भागात काही कारण नाही थांबण्याचे तर मी का थांबू? असे म्हणून चुकूनही कोणी एकही गोळी झाडत नाही. तसेच हँडगनच्या विभागात एखादी व्यक्ती सराव करीत असेल तर दुसरे कोणी सराव करत नाही.

सराव करून संपला की बरोबर नेलेल्या सोप पेपरने एकदा तिथे हात धुतोच, पण रेंजवरून निघाल्यावर तडक घर गाठायचे आणि पहिली गोष्ट काय करतो तर अक्षरशः अभ्यंगस्नान! कारण सोप पेपरने हात धुतले तरी ते तेवढ्यापुरते कामचलाऊ असते. हातावर, अंगावर जो गन शॉट रेसेड्यु (GSR) म्हणजे गोळी झाडल्यावर आपल्या अंगावर, हातावर, कपड्यांवर दारुगोळ्याचे कण उडतातच आणि ते जास्त वेळ अंगावर राहू देणे किंवा पुरते स्वच्छ झाल्याशिवाय काहीही करणे प्रकृतीच्या दृष्टीने अजिबात शहाणपणाचे नसते. तेव्हा आंघोळ करणे, घातलेले कपडे धुवायला टाकणे, गन सेफमध्ये ठेवणे, बाकीचे सामान सहज मध्ये येणार नाही अश्या रीतीने आणि उष्णतेपासून, इलेक्ट्रिकच्या वायर्सपासून दूर ठेवणे ही आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबीयांसाठी आवश्यक सावधगिरी आहे. जमले तर त्या दिवशीच दुपारी नाहीतर निदान दुसर्‍या दिवशी नेलेल्या गन पूर्णपणे उघडून तिचे सगळे भाग स्वच्छ करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते करताना सगळ्यात आधी गनमधून नुसतंच मॅगझिन नाही तर चेंबरमधली गोळीही बाहेर काढली आहे हे बघायचंच! या बाबतीत हलगर्जीपणा केल्याने गन स्वच्छ करताना कितीतरी वेळा अपघाताने गोळी सुटल्याच्या बातम्या वाचायला-ऐकायला मिळतात. गन वापरल्यावर स्वच्छ करण्याची शिस्त पाळली की बंदूक वर्षानुवर्ष व्यवस्थित काम करत राहू शकते.

आतापर्यंत मी वापरून पाहिलेल्या आणि कधी ना कधी विकत घेतलेल्या गन म्हणजे -

Beretta (Italy)
Glock (Austria)
Heckler and Koch (Oberndorf am Neckar, Germany - ही नुसतीच H&K म्हणूनही ओळखली जाते)
Ruger (Southport, Connecticut)
Sig Sauer (Eckernforde, Germany)
Smith and Wesson (Springfield, Massachusetts)
Springfield Armory (Springfield, Massachusetts)
Walther (Ulm, Germany - हीच ती जेम्स बाँडने प्रसिद्ध केलेली गन)

चार वर्षांनी मी मागे वळून जेव्हा हा सगळा प्रवास आठवतो, तेव्हा साहजिकच मनात विचार येतो की या छंदाने मला काय दिलं? कोणताही छंद देतो तो निखळ आनंद तर अगदी भरपूर दिला. सर्वसामान्यपणे ज्या गोष्टीची भीती वाटते, तो प्रकार सुरक्षितपणे कसा हाताळायचा याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळालं. नवीन गन वापरताना तिची आधी माहिती वाचणे, तिच्या खाचाखोचा माहिती करुन घेणे, यामुळे हे शिक्षण वाचनाद्वारे अद्ययावत राहते. सततच्या सरावाने आपण आपलं, आपल्या कुटुंबाचं, वेळ पडली तर संरक्षण करू शकू हा विश्वास तर नक्कीच वाढला आणि त्याची किंमत करणं शक्य नाही! गमतीचा भाग म्हणजे टि.व्ही. किंवा चित्रपट पाहताना एखाद्या पात्राच्या हातात गन असेल तर त्याची पकडच कशी चुकीची आहे, या गनमधून इतक्या गोळ्या कश्या झाडल्या, त्याने ट्रिगरवर बोट का ठेवलंय अश्या गोष्टी नकळत पण पटकन लक्षात येतात आणि मग त्या बेपर्वाईने चिडचिड झाली की बायको वैतागते! पण ती चिडचिड खरंच प्रामाणिक असते कारण वापरणार्‍याला हे बारकावे माहीत नसले तर एखादेवेळी अनर्थ होऊ शकतो. शूटिंग हे पोहण्यासारखे किंवा सायकल चालवण्यासारखे नाही- एकदा शिकले की कधी न विसरायला. अर्थात मसल मेमरी असते, पण त्यासाठी भरपूर आणि सतत सराव करणं अत्यंत गरजेचं आहे- नाहीतर छोट्याछोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी विसरायला होऊ शकतात. त्यासाठी हे सोपे नियम कायम लक्षात ठेवा -

१. कोणाच्याही हातात गन दिसली तर हे गृहीत धरा की तिच्यात गोळ्या भरलेल्या आहेत.
२. तुमच्या हातातली गन अगदी सहज म्हणून जरी एखाद्या दिशेला धरून पाहणार असाल तर याची खात्री करुन घ्या की गनच्या समोर किंवा जवळपास कोणी नाही.
३. शूट करायचं नसेल तर अगदी चुकूनही तुमचं बोट ट्रिगरवर असता कामा नये.
४.जर प्रवासात तुम्ही गन बरोबर बाळगणार असाल- म्हणजे मोटारीने प्रवास करताना (सार्वजनिक वाहनातून- विमान, रेल्वे, वगैरे- गन बाळगण्यास किंवा कोणत्याही स्वरुपात नेण्यास बंदी असते), तर नुसते तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणचेच नव्हे तर तुमच्या मार्गावरच्या सगळ्या राज्यांतले गन बाळगण्याचे नियम माहीत करुन घ्या आणि सगळे नियम काटेकोरपणे पाळा.

या काही गोष्टी एकदा पक्क्या लक्षात राहिल्या की शूटिंग हा नुसता छंद न राहता जवळपास सवय आणि व्यसन यांच्या सीमारेषेवर घुटमळतो! शिवाय हा छंद असा आहे की जोवर तुमचं शरीर साथ देत आहे तोवर तुम्हाला तो सतत आनंद देतच राहील!

(तळटीप : ही सगळी माहिती इथल्या, अमेरिकेतल्या अनुभवांवरून लिहिली आहे. प्रत्येक देशातले, राज्यातले, शहरातले नियम वेगळे असतील. तेव्हा सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही राहता तिथले नियम नीट समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

- प्रमोद पाळंदे

प्रतिसाद

प्रमोद, वाचून मजा आली. बरीच नवीन माहिती कळली.

मस्त लिहिले आहे तुम्ही. काहीच कल्पना नव्हती हे वाचण्याआधी.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद. :-)

माझा छंद आहे हँडगनने शूटिंग. मायबोलीवर काही एअर रायफल शूटिंगचा/पेलेट गनने शूट करण्याचा छंद बाळगणारे आहेत. पण मी ज्या हँडगन वापरतो, त्या खर्‍या बंदुका असतात, खर्‍याखुर्‍या गोळ्या वापरून मी गोळीबार करण्याचा सराव करतो. >>

अगगं ! साला खर्‍या बंदूकांच्या गोळ्या मारण्याची सर पॅलेटला येत नाही. मी रायफल चालवतो. पण अमेरिकेत असताना मात्र हॅण्डगन आणि डेझर्ट इगल आपले प्रिय हत्यार होते.

माझ्या गन्स --

मॅग्नम शॉटगन्स
डेझर्ट इगल
कोल्टच्या पिस्तोल
Beretta
आणि आवडती व रोज वापरतो ती वॉल्थर

प्रमोद, छंद म्हणून खर्‍याखुर्‍या बंदुकांनी शूटींग केलं जातं हे ठाऊक नव्हतं याआधी. चांगली माहिती मिळाली तुमचा लेख वाचून.

मस्त माहिती मिळाली. (मी डरपोक त्यामुळे ह्याची भिती दुर होणार नाही).

पहिलांदाच असा छंद ऐकला. छान लिहीले आहे. मला लहानपणी दिवाळीच्या टिकल्यांची बंदुक हातात चालवायला भिती वाटायची. :हाहा:

एकदम प्रामाणिक लिखाण. खूप नवीन माहिती मिळाली लेख वाचून.

नवीन माहिती मिळाली. छंदही वेगळा आहे!

वेगळाच छंद आणि छान माहिती.. इथे वाचायला मिळाले, नाहीतर या क्षेत्राबद्दल मुद्दाम वाचलेच नसते.

बापरे! वेगळाच छंद! छान माहिती मिळाली.
हिंदी सिनेमे (त्यातही जुने) पाहायला अवघडच जात असेल!
तुम्हाला बंदुक छंदापुरतीच चालवायला लागुदे ही शुभेच्छा!
त.टि.: कालच टिकल्यांची बंदुक उडवली :)

खुपच छान माहिती मिळाली.

मस्त माहिती :)

मस्त लिहिलंय - खूप आवडलं.

उत्तम माहिती आणि आगळाच छंद..

Wow, it was fun reading this article. मजा आ गया म्हणतात ना तसे वाटले हा लेख वाचून. एकदम बंदूक घेऊन आपण दोन चार तरी फैरी झाडाव्यात रेंजवर जाऊन असे वाटून गेले.

वा! उत्तम लेख आणि माहिती! (माझ्या मुलाला देणार हे वाचायला. त्याला फार आवडेल.)

खरंच असाही एखादा छंद असू शकतो हे स्वप्नातही वाटलं नसतं!

अरे वा! ईथे सर्व माहिती व्यवस्थित लिहील्याबद्दल आभार... या छांदाचे मलाही वेड आहे पण अजून योग आला नाहीये.

निराळा छंद .. :)

फोटोग्राफी हा जसा महागडा छंद समजला जातो तसा हाही महागच असेल असं वाटतंय ..

(पण मला मात्र अजिबात कधी ह्या वाटेला जावं असं वाटणार नाही .. भितीच कारण असावी ..)

प्रमोद पाळंदे यांचा निरोप -

मंडळी - मनापासून आभार. कामाव्यतिरिक्त काही लिहिण्याचा आयुष्यात पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी इतक्या आपुलकीने वाचून प्रोत्साहन दिलेत; खरं तर भांबावलो आहे, कारण या कशाचीच सवय नाही. पण छंद विषय होता, म्हणून प्रियानेच मागे लागून लिहायला लावले. विषय जवळचा असल्यामुळेच हे धाडस करायची हिंमत केली. सुदैवाने संपादकांना आवडला आणि तुम्ही मंडळींनीही आवर्जुन प्रतिक्रिया दिल्यात - खरंच तुमचे मनापासून आभार.

केदार - तुम्ही रोजच्या वापरातली वॉल्थर असे लिहिले आहेत; केवळ उत्सुकता म्हणून विचारतो - तुम्ही LEO/ Military किंवा तत्सम कार्यक्षेत्रात आहात का? उत्तर देणे काही कारणाने (किंवा open forum असल्यामुळे) शक्य नसले तर मी समजू शकतो. कोणती वॉल्थर?

हा लेख लिहिल्यानंतर आणखी एक गन घेतली Springfield Armory ची XDS.

ज्यांना भीति वाटते त्यांची भीति मी समजू शकतो कारण घरात तीच परिस्थिती आहे! प्रियाने आजतागायत एकाही गनने एकदाही शूट करुन पाहिलेले नाही. फक्त माझा छंद जोपासायला प्रोत्साहन मात्र मनापासून देते.

ल य झ् का स इन फोर्मेसन दिलि कि साहेब तुमि......