दिव्यांचे माहेरघर - शाम जोशी

मी

गेले ४५ वर्षे दिव्यांचा संग्रह करतो आहे. आता हे सुरू कसं झालं तर..पुण्यात एक जुना बाजार भरतो, त्याला चोरबाजार असंही म्हणतात. मला तिथे एक ब्रिटिशांच्या काळातला दिवा मिळाला. तो घासून पुसुन स्वच्छ केला. ही गोष्ट आहे साधारणपणे १९७० मधली. खरं म्हणजे जुन्या वस्तू अशा स्वच्छ करायच्या नसतात, त्यांची अँटिक्विटी जाते. त्यामुळे तो स्वच्छ केला, त्याला रंग दिला आणि एके दिवशी लाईट गेले असताना रियाज करत असताना लावला. बाबासाहेब पुरंदरे तेव्हा आले होते. तेव्हा ते सहज तो दिवा पाहून म्हणाले, तुम्ही दिव्यांचा संग्रह का नाही करत? त्यानंतर मी विचार केला की आपण करुन तरी बघूयात. शोध घेणं, अभ्यास करणं अशी एक दृष्टी असल्यामुळे यापुढे जुन्या बाजारात गेल्यावर दिवेच बघूयात असा विचार केला. तेव्हापासून बुधवारी आणि रविवारी भरणार्‍या चोरबाजारात मी जाऊ लागलो. त्यानंतर ज्या ज्या गावी कामासाठी म्हणून गेलो तिथले बाजार धुंडाळायला लागलो. इतकं की नंतर नंतर ज्या वारी बाजार असतात त्याच वारी त्या गावात जायला लागलो. अशी माझ्या छंदाची सुरुवात झाली.

DSC_4157 (1).JPG मुळात वस्तू जितकी जुनी, तितकी ती मोडकीतोडकी. पत्र्याची असेल तर चेपलेली, त्याचा मोढ्या किंवा वाती नसलेली अशी. जितकी जास्त बिघडलेली, तितकी जुनी आणि म्हणूनच तितकीच जास्त महत्त्वाची. कारण ती आपल्यासमोर काहीतरी इतिहास उभा करते. असे मिळेल तिथून दिवे गोळा केले. जिथे मिळू शकेल अशा ठिकाणी लोकांचा पिच्छा पुरवून घेतला. बरेच दिवे विकत घेतले. मनात आलं की एखाद्या ठिकाणचा दिवा चोरून नेला तर काय होतं? चोरी केली नाही, पण वाटायचं. छंदाचं वेड असण्याची ही लक्षणं. तुम्हाला चोरी करावीशी वाटावी पण संस्कारामुळे करता येऊ नये. एखाद्या दिव्यासाठी चोरी करावीशी वाटणं हे उत्तम छंदाचं लक्षण आहे. या छंदामुळे इतक्या प्रकारच्या कडू- गोड आठवणी मिळाल्या. सबंध देशभरातले अनेक बाजार या निमित्ताने बघायला मिळाले.

मला बाकी काही व्यसन नसल्यामुळे यासाठी खर्च करु शकलो. आपल्याकडे असं म्हटलं जातं की त्या माणसाला अमुक गोष्टीत नजर प्राप्त झाली. जसं रत्नपारख्यांना रत्न हाताळण्याची नजर प्राप्त झालेली असते. त्यासाठी शिक्षणाची अट नसते. पण गुरूच्या नजरेतून घेतलेला अनुभव महत्त्वाचा. अशा प्रकारे कलेची देणगी असणार्‍याला हळूहळू नजर प्राप्त होते. पहिली काही वर्षं मला दिवा ओळखताना खूप त्रास झाला. एखाद्या दिव्याचं वय ओळखण्यासाठी बरीच साधनं उपल्ब्ध आहेत. आजकाल इंटरनेटावर प्रतिकृतींचा शोध घेता येतो. हा एक मार्ग आहे. दुसरं, पुरातन काही दिवे असले तर ते दगडीच जास्त करून असतात. आणि मग ते दिवे जिऑलॉजिस्टला दाखवणं, किंवा पुरातत्व विभागामध्ये जेथे विविध पद्धतीनं त्यांचं पृथक्करण करतात, तिथे नेऊन दाखवणं. म्हणून जिथे जिथे दिव्याच्या वयाची पडताळणी करण्याची सोय होऊ शकेल अशा प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक दिव्यासाठी हा प्रयत्न मी केला. आणि हे करत असताना, हळूहळू त्यातली नजर प्राप्त झाली. आणि आता मला प्रत्येक वेळेला ते तपासायला घेऊन जायला लागत नाही. आता कुणी दिवा हातात आणून दिला तर सहजपणानं म्हणून जातो, की अरे हा दोनशे वर्षापूर्वीचा आहे. याची तपासणी करून बघितली तर तो २००, २०५, २१० वर्षापूर्वीचा निघतो. तरीही मी नेहेमी सांगतो की शेवटी हा एक अंदाज आहे. पक्का दावा नाही करता येणार. १५०० वर्षापूर्वीचा म्हणजे १५०० वर्षापूर्वीचाच असेल, थोडा इकडे तिकडे असू शकेल पण फार फरक पडणार नाही. पण हा शेवटी अंदाज आहे. पण भोंगळ नाही. अभ्यासातून, अनुभवातून, अनुभूतीतून व्यक्त झालेला अंदाज आहे.

DSC_4148 (1).JPG खरं म्हणजे माझ्याकडे जो सर्वात जुना दिवा आहे तो पंधराशे वर्षांपूर्वीचा आहे. परंतु दिव्याच्या इतिहासात, पहिला दिवा सत्तर हजार वर्षांपूर्वी आलेला आहे. ओबडधोबड, छोटयाश्या दगडाला खड्डा पाडलेल्या अवस्थेत, प्राण्यांच्या चरबीवर चालणारा हा दिवा आहे. आदिमानवाच्या काळातला आहे. त्याला असं लक्षात आलं की यातून प्रकाश मिळतोय. प्रकाशाचं मूळरूप अग्नी आहे. अग्नीपासून उजेड मिळतो. पण अग्नीला दाहकता असते. ती कमी होऊन उजेड मिळावा, म्हणून ती वात. तर तो सत्तर हजार वर्षांपूर्वीचा दिवा, ज्वलनशील पदार्थामधून माणसाला सापडला. आणि मग पुढे उत्क्रांती होत होत, मेंदू ही मोठी गोष्ट असल्याने आणि माणूस हा अनेक पटीने बुद्धीमान असल्यामुळे विविध प्रकारचे प्रयोग माणसाने केले. आणि यामधून काही गोष्टी करत करत, चुकत चुकत, चटके बसत बसत, ज्ञानही मिळायला लागलं.

मग प्रकाश दिव्यांच्या रूपामध्ये उत्क्रांत होत गेला.पंधराशे वर्षांपूर्वीचा दिवादेखील पुरातन आहे, दगडी आहे. पण पुढे लोकांच्या मनात असं आलं की अरे, आपल्याला प्रकाश तर सापडला, पण हा प्रकाश मिळवण्यासाठी इंधन म्हणून काय काय वापरता येईल? इंधनात बदल होत गेले. माध्यम कुठले वापरता येईल. ज्वलंत रूपात जे प्रकाश देईल ते. मग वेगळी वेगळी माध्यमं सापडली. इथपर्यंत प्रकाश मिळायला लागल्यावर मग माणसाला वाटलं, की अरे, रुपात्मक काही बदल करता येतील का? म्हणजे खूप ओबडधोबड आहे, त्यावर नक्षीकाम करता येईल का? आकार देता येईल का? यात जो ज्वालाग्राही पदार्थ आहे तो टिकून राहावा म्हणून काही करता येईल का? तो झाकून ठेवता येईल का? कारण मिळवणं, टिकवून ठेवणं आणि पुरवून पुरवून वापरणं, या तीन गोष्टी, माणसाच्या बुध्दिमत्तेच्या कक्षेत असल्यामुळे जीवनाकडे बघताना, माणसाने या तीन दृष्टींनी सगळीकडे बघितले. तसंच दिव्यांच्याकडेही बघितले. दिव्याची माध्यमं चरबी, मेण, तेल, केरोसीन, पेट्रोलियम, गॅस , अशी रूपं बदलत गेली. मग माणसाने, नक्षीकाम, जाळी इत्यादी गोष्टींनी दिव्याला व्यक्तिमत्व, सौंदर्य दिले. निरनिराळ्या कापडाच्या वाती, वातींचे आकार, यात विविधता आली. ४० मेणबत्त्यांची पॉवर येईल अशी वात. याच्यावरचा विचार, प्रक्रिया आणि सौंदर्यदृष्टी ही ऑस्ट्रिया, अमेरिका आणि मुघल राजे यांच्या काळात झाली. आणि मग विविध रंगांच्या अनेक प्रकारच्या, आकाराच्या, प्रकाश वाढवू शकतील अशा काचा आल्या. जशा उघड्या बोडक्या माणसाला टोप्या आल्या, तशाच दिव्यांना काचा आल्या, जाळया आल्या. जाळी गोल वातीमध्ये खोचून ठेवली तर प्रकाशाचे फ़ूल होईल अशा स्वरूपाचे काही दिवे आले. हा दिव्याकडे बघण्याचा सौंदर्याचा दृष्टीकोन आहे. खोलीभर प्रकाश वाढवण्याचे प्रयोग झाले. भिंतीला लावायचे, उभे करायचे स्टँड आले. अमेरिकन, ब्रिटीश लोकांनी यासाठी खूप काम केलं. मुस्लिम राज्यकर्त्यांनी भोगवादी रूपात दिव्याला बघितलं. भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांना त्यागाचं रूप मानलं जातं. परंतु पुढे पुढे भोगवादी संस्कृतीमध्ये ते बदललं. म्हणून मग त्यांच्या सावल्या, नक्षीकाम, जाळ्या, त्यातून मिळणारी प्रतिबिंब अशा सगळ्या गोष्टींचा विचार पाश्चात्य जगात झाला, जो भारतीय संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. आपल्याकडे अग्नीकडे, प्रकाशाकडे मादक, भोगवादी सौंदर्य म्हणून बघितलं जात नव्हतं. या गोष्टीचा आपल्या लोकांना, भारतीय तत्वज्ञान , विचारसरणीत याचा अभिमान आहे. कुठलीही गोष्ट भोगाकडे नेऊन मिरवणं ही आपली वृत्ती नाही आहे. म्हणून ते दिवे आणि हे दिवे असा एक वृत्तीमधला फरक आहे.

DSC_4153 (1).JPG मुळात कसं आहे की, एकाच संस्कृतीमधल्या बनावटीचे फारतर तुम्हाला १०० ते १२५ वर्षं या कालावधी म्हणजे एक युनिट असे धरले, तर दहा दहा ते बारा वगैरे दिवे मिळतील. परंतु जगाच्या दृष्टीने विचार केला तर, जगात जिथे जिथे संस्कृती आली, त्या प्रत्येक संस्कृतीने आपापल्या दिव्यांचा विकास, हा आपापल्या परीने केला. आणि म्हणून आपल्या संग्रहात साडेतीनशे दिव्यांमध्ये बहुतेक सर्व प्रकारच्या संस्कृती आहेत. भारतीय दिवे आहेत, ब्रिटीश दिवे आहेत, फ्रेंच दिवे आहेत, ऑस्ट्रियन दिवे आहेत, ऑस्ट्रेलिया, मुघल राजांच्या काळातले दिवे आहेत, वेगवेगळ्या जाळ्या, काचा आहेत, वाती आहेत, ज्या बघायलाही मिळत नाहीत.

DSC_4155 (1).JPG या सगळ्या प्रवासात अभ्यास तर सुरू होताच. आणि वर पाच- पंचवीस दिव्यांमध्ये एक दिवा त्याचा बर्नर, वात यांच्यासकट मिळाला. म्हणजे बरेच दिवे मोडतोड झालेले, आजारी आणि हॉस्पिटलाईझ झालेले असे मिळाले. पण काही दिवे परिपूर्ण दिवे मिळाले, त्याच्यावरून वातीच्या अभ्यासाला मदत मिळाली. पुण्यामध्ये ७० ते ८० च्या दशकांमध्ये, अशा प्रकारच्या पडून असलेल्या जुन्या भंगार मालाच्या दुकानांमध्ये. तर मग काही दिवे परिपूर्ण मिळाल्यामुळे अभ्यास झाला तो स्वस्तात झाला आणि तुम्हाला फार गंमत वाटेल की दिवे जसे माझ्याकडे आहेत तशाच माझ्या खूप मोठ्या दोन ट्रंका भरून त्याचे स्पेअर पार्टस ही जमा केले .

असे खूप प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे छंद जोपासत राहावे याची स्फूर्ती मिळत गेली. म्हणजे लोकांनी येऊन बघणं समजावून घेणं, कौतुक करणं हा आपण भाग थोडा वेगळा ठेवू कारण कौतुक मिळवण्यासाठी ही गोष्ट केलेली नसते. परंतु या निमित्ताने या विषयांमधले अनेक छंदिष्ट, अनेक जाणकार, अनेक तत्त्ववेत्ते येऊन गेले माझ्याकडे. त्यांनी तो विषय तर समजावून घेतलाच, शिवाय या एका वेगळ्या माणसालाही समजावून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांची एकंदर प्रतिक्रिया होती ती खूप बळ देणारी होती. अहंकार निर्माण होणं किंवा फुगून जायला होणं असं कधी घडलं नाही. जर असं मला कुणी विचारलं की दिव्याबद्दल काय वाटतं तर मी सांगेन की माझं प्रेम आहे.आणि गंमत अशी आहे की आज कुठलाही एखादा दिवा कोपर्‍यात पडून असला तरी तो मला छ्ळतो. अगदी मोठ्या बंगल्याच्या माळ्यावर किंवा मुंबईत चोरबाजारामध्ये शोकेस पडलेत, फॅन्स पडलेत, कॉम्प्युटर्स पडलेत तर त्यात एखादा दिवा असेल तर तो तिथून मला खुणावतो की - मी इथे आहे आणि मी चार गोष्टी बाजूला करून तो दिवा शोधतो. हे घडणं आहे, घडवणं नाही.

DSC_4143 (1).JPG

फार अवघड आहे हे सांगणं की आवडता दिवा कुठला ते. कारण कुठल्याही दिव्याला स्पर्श करायला मिळाल्यापासून तो घरी येईपर्यंत हे आईच्या लेकरांसारखंच आहे की तिच्या लेकरांपैकी तुला कुठलं लेकरू आवडतं असं विचारलं तर सांगता येणं कठीण असतं तसंच ते आहे. पण काही दिवे मिळवताना प्रचंड त्रास झाला म्हणून त्यादृष्टीने पाहिलं तर त्या दिव्यांची जवळीक अधिक असू शकते. म्हणजे बोटीवरचा दिवा मुंबईला मी चोरबाजारामध्ये घेतला, त्या दिव्यामध्ये नऊ ते दहा किलो तांबं आहे, ही दीड इंच जाडीची काच आहे. साधारणपणे हा सव्वादोनशे वर्षांपूर्वीचा आहे. आतली वात पेटवली की तो प्रकाश बोटीवर पसरत जातो. अशी त्याची रचना आहे. हा दिवा ९ किलोचा आहे पण तो दिवा मी जेव्हा घेतला तेव्हा मी मुंबईला एस.टी. बसमध्ये बसलो. दिवा शेजारच्या सीटवर ठेवला. कंडक्टर तिकीट द्यायला आले तेव्हा ते म्हणाले "हे काय आणलंय तुम्ही दुधाच्या बरणीसारखं?" "दिवा आहे" सांगितल्यावर, "ठीक आहे" म्हणाला. पण नंतर प्रवाशांची गर्दी झाली तसा तो म्हणाला की,"हा दिवा कुठे ठेवणार तुम्ही? गाडीच्या टपावर टाकायला सांगा." म्हटलं, "अहो काच आहे त्याला. फुटेल." मग ते एवढं वजन मी माझ्या मांडीवर घेऊन बसलो आणि त्याला कुठेही धक्का लागू न देता मी तो घेऊन आलो.

काय आहे की पुरातन वस्तूंची दुकानं असतात. आणि मग सवयीने, नजरेने तुम्ही चांगल्या गोष्टी ओळखू शकता. पुढे मग अनेक दुकानदारांनी, कारागिरांनी या दिव्याचे मोल्डस् बनवून घेऊन त्या पद्धतीचे दिवे तयार केले जे आता सर्रास मिळतात. पण नजर तयार झाली की नव्या-जुन्यातला फरक ओळखता येतो. अमोल पालेकरांनी ‘अनाहत’ नावाचा सिनेमा काढला होता तेव्हा ते माझ्याकडे दिवे मागायला आले होते. पण मी त्यांना देऊ शकत नव्हतो. तेव्हा अशाच प्रकारच्या मोल्डच्या दिव्यांचा वापर करण्याचा मी त्यांना सल्ला दिला.विजयाबाईंनी ‘रावसाहेब’ सिनेमातही दिवे वापरले. परत देताना नेमकी एका दिव्याची काच फुटली .पण विजयाबाई एकदा गोव्याला गेल्या असताना गारेच्या काचेचा दिवा माझ्यासाठी घेऊन आल्या. परंतु त्याक्षणाला मी असं ठरवून टाकलं की कुणालाही कुठेही सिनेमासाठी हे दिवे द्यायचे नाहीत. कारण विजयाबाईंइतकी काळजी घेणारी प्रत्येक व्यक्ती असेलच असे नाही.

DSC_4141.JPG सुरुवातीच्या काळामध्ये 'हा बुवा एक अत्यंत विक्षिप्त माणूस आहे आणि थांबवा हा छंद आता' अशा दृष्टीने काही लोक ह्याकडे पाहत होते. आणि घरामध्ये ते आणून ठेवले तरी जमिनीवर ठेवलेले असायचे. त्याची काही ठेवायची मुद्दाम सोय केली होती असे नाही. छंद इतका वाढेल, असं काही होईल अशी कल्पना येत नाही आपल्याला. पण हे एका प्रकारचं भरकटत जाणंच असतं आणि त्याला छंद तेव्हाच म्हणतात जेव्हा तुम्ही भरकटता. तुम्ही जर गणिती विद्येने करत बसलात तर तो छंद राहत नाही. घरचे म्हणायचे की घरही नीट झाडता येत नाही , शिवाय तुमच्या दिव्याला दुसर्‍या कोणी हात लावला तर चालत नाही . हळूहळू सवय होत गेली घरातल्या लोकांना की हा माणूस काही ऐकणार नाही. हे असंच चालत राहणार. मित्रमंडळींच्या मध्ये सुरुवातीलाच तो एक चेष्टेचा विषय सगळ्याच बाबतीत असतो. 'हे काय दिवे आहेत? ते केवढयाला आणले? ते निम्म्या किंमतीत ताबडतोब विकून का नाही टाकत?' इथपासून ते 'दुसरं काहीतरी बरं करावं ना आयुष्यामध्ये' असं सुचवणारी माणसं सुद्धा भेटली आहेत. तिसरं, दिवे विकत देणारी किंवा दिवे देणारी जी माणसं होती ती सुरुवातीच्या काळामध्ये त्यातून जास्त पैसे कसे मिळवता येतील अशा दृष्टीकोनातून देणारी होती. पुढे मग त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की 'अरे नाही, तळमळ आहे या माणसाला' तेव्हा ते पैशाकडे न बघताच द्यायला लागले.'तुमच्याचसाठी ठेवलंय ' म्हणून द्यायला लागले. काहींना तर व्यावहारिक मंडळी अशी भेटली की ही आमच्या घराण्यातली ही एक खूण आहे. तर ती आम्ही देऊ नाही शकणार तुम्हाला, पण तुम्हाला बघायला यायचे असेल तर या. काही लोक म्हणाले," आमच्याकडे आहेत माळ्यावर दिवे. ते सगळं कोण शोधणार चढत?" तर मी असे अनेक लोकांचे अनेक माळे धुंडाळलेले आहेत. त्यांची परवानगी घेऊन. कोणी असे दिवे दिलेत आणि चार दिवसांनी त्यांचे कोणीतरी कान भरल्यामुळे त्यांनी 'आम्हांला नाही दिवा द्यायचा माघारी द्या' म्हणून परत मागितले आहेत. काही लोकांनी खूप स्फूर्तीस्थान मिळावं अशा दृष्टीने 'चालू द्या हे' असं म्हणून प्रोत्साहन दिलं. तर अशा दृष्टीने अनेक प्रकारचे लोक भेटले.

एक दिवस तर माझ्याकडे एक व्यापारी आलेला, 'हे सगळं देऊन टाका मी तुम्हाला तुम्ही सांगाल ती रक्कम मी देतो.' सात लाखांपासून ते काही कोटीपर्यंतच्या ऑफर्स लोकांनी येऊन केल्या. तेव्हा त्यांना हे सांगितलं की,"विक्रीसाठी उपलब्ध नाही."शेवटी कुणाच्या तरी छंदातून, वेडातून जपलेली ह्या देशाच्या संस्कृतीची ही एक देणगी आहे. ही या देशाची मातब्बरी सांगते आणि ती या देशामध्येच टिकली पाहिजे. ती सुरक्षित राहायला पाहिजे. टिकून राहायला पाहिजे. आणि आजचं बघता प्रश्न असा आहे की माझ्या मागे या गोष्टीचं काय होणार? तेव्हा ह्याचं पुढं काय करायचं यावर विचार करतो आहोत. मला याचं वेड आहे. ते चांगलं आहे की वाईट तेही मला माहित नाही. परंतु असंच काही वेड घरातल्या कोणाला किंवा दुसर्‍या कोणाला असेल असा सांगता येणार नाही. त्यामुळे उद्या कोणी भरपूर पैसे मिळताहेत म्हणून विकून टाकले, मोकळं केलं असं होऊ नये अशी एक इच्छा आहे. माझी अशी इच्छा आहे की याचं एखादं म्युझियम व्हावं, पण यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी यातलं कळणारा माणूस पाहिजे, त्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, ते पुढे चालत राहिलं पाहिजे आणि हे सगळे दिवे वर्षातून ३-४ वेळा प्रज्वलित करून ते लोकांना दाखवले पाहिजेत. मला विश्वास आहे की असं होईलही.

शब्दांकन - अनीशा
टंकलेखन साहाय्य - नेत्रा अग्निहोत्री, नंद्या

छायाचित्रे - श्री. शाम जोशी
छायाचित्रे संस्करण - नंद्या

हितगुज दिवाळी अंक २०१२ छंदमग्न सदरासाठी

प्रतिसाद

सुरेख लेख आणि फोटो. छंदाबद्दलची पॅशन अगदी पुरेपूर पोचली.

माझी अशी इच्छा आहे की याचं एखादं म्युझियम व्हावं, पण यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी यातलं कळणारा माणूस पाहिजे, त्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, ते पुढे चालत राहिलं पाहिजे आणि हे सगळे दिवे वर्षातून ३-४ वेळा प्रज्वलित करून ते लोकांना दाखवले पाहिजेत. >>> ह्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

अनीशा, नेत्रा आणि नंद्या ह्यांनाही धन्यवाद.

अशा छंदिष्ट लोकांमूळेच तर इतिहास जपला जातो. तूमचा हा संग्रह पुढच्या पिढीसाठी उत्तम वारसा आहे. त्याला उत्तम संग्रहालय लाभो, अशी शुभेच्छा.

अशा छंदिष्ट लोकांमूळेच तर इतिहास जपला जातो>>> +१
तुमचा संग्रह असाच वाढत राहो :)

तुमचा संग्रह असाच वाढत राहो +१.
धन्यवाद अनीशा, नेत्रा, नंद्या

ग्रेट!! हॅट्स ऑफ सर! :)

सुंदर!

<< मी चार गोष्टी बाजूला करून तो दिवा शोधतो. हे घडणं आहे, घडवणं नाही.>>... खूप आवडलं हे. अतीव इच्छा, कळकळ असल्याविना हे होत नाही...
तुमच्या संग्रहाचं म्युझियम होण्याची तुमची इच्छा सफल होवो... देवानं अगदी तसं करावं.

याचं एखादं म्युझियम व्हावं ह्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमच्या या छंदाला, परिश्रमांना अभिवादन.

>>माझी अशी इच्छा आहे की याचं एखादं म्युझियम व्हावं, पण यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी यातलं कळणारा माणूस पाहिजे, त्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, ते पुढे चालत राहिलं पाहिजे आणि हे सगळे दिवे वर्षातून ३-४ वेळा प्रज्वलित करून ते लोकांना दाखवले पाहिजेत. मला विश्वास आहे की असं होईलही.

खरच असं व्हायला हवं... याच नाही तर ईतरही अनेक अमूल्य, अनेक वर्षांची परंपरा दाखवणार्‍या सर्वच छंदांचं..

अप्रतिम छंद जोपासलाय तुम्ही! खूप आवडला लेख! शुभेच्छा!

नुसते दिवे जमवणंच नाही तर त्या प्रत्येक दिव्यामागे असलेला संस्कृतीचा विचार यामधून दिसला.

छंद इतका वाढेल, असं काही होईल अशी कल्पना येत नाही आपल्याला. पण हे एका प्रकारचं भरकटत जाणंच असतं आणि त्याला छंद तेव्हाच म्हणतात जेव्हा तुम्ही भरकटता. तुम्ही जर गणिती विद्येने करत बसलात तर तो छंद राहत नाही.>>> आवडलं.

मस्त !! म्युझियमसाठी शुभेच्छा ! :)