"प
हाट झाली, उठा स्वामी हो !
पूर्व दिशा उजळली "
पहाटेच्याही आधी अती शांत वातावरणात ते भूपाळीचे सूर असे तरंगत होते, की जणू त्या गौतमी नदीवरील रेशमी धुकेच.
१९८३ चा जानेवारी - फेब्रुव्रारी महिना, स्थळ - पावसचे स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर.
स्वामी स्वरुपानंदांच्या समाधीच्या दर्शनाला आलेला आम्हां साताठ मित्रांचा एक ग्रूप.
उजाडायच्याही एवढ्या आधीच कोण इतकं मधुर आणि भावभरलं गातंय हे पहात मी मंदिरात केव्हा शिरलो, माझे मलाच कळले नाही.
आत समाधीपाशी एक मध्यम उंचीची, कृश व्यक्ती उभी होती. हीच व्यक्ती त्या शब्दांशी, त्यातील भावाशी एकरूप होत, ही भूपाळी आळवीत होती. प्रौढशा त्या व्यक्तीच्या चेहर्यावर एक शांत, समाधानी पण जरासे निरागस असे भाव होते.
वातावरणात गारवा भरून राहिलेला असतानाही त्या व्यक्तीच्या अंगावर लपेटलेले एक साधे खादीचे उपरणेवजा वस्त्र व खाली गुडघ्यापर्यंत नेसलेले एक धोतर एवढेच काय ते होते. अतिशय अलगदपणे समाधीवरील वस्त्रे ती व्यक्ती उतरवत होती - न जाणो ती वस्त्रे उतरवताना स्वामींची निद्रा मोडेल की काय अशी काळजी घेत जणू ! मग हळूहळू समाधीच्या आसपासचा भाग स्वच्छ करण्यात ती व्यक्ती दंग झाली. नंतर आसपास चौकशी करताना कळले की हे श्री. वैकुंठराव उर्फ मामा पडवळ - खुद्द स्वामी स्वरुपानंदांनी अनुग्रहीत केलेला भाग्यवान महात्मा.
मामांच्या हालचाली न्याहाळताना लक्षात आले की यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक हळुवारपणा व्यापून आहे, कुठेही धसमुसळेपणाचा लवलेश नाही. ते मग फुले वेचण्याचे काम असो वा मंदिर साफसफाईचे वा अजून काही. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुखात वसलेले "नारायण, नारायण!"
ते ऐकताना 'नामःस्मरण' शब्दाचा अर्थ जणू जिवंत होत होता. अगदी श्वासोच्छ्वासाइतकं सहज होतं ते. कामापुरतेच मामा बोलत, एरव्ही 'नारायण, नारायण!' बाकी ना काही चर्चा, ना काही संवाद. स्वामीप्रेमात दंग होऊन राहिले होते ते पुरेपूर.
मला व इतर काही मित्रांना मग छंदच लागला. मामांच्या हालचाली न्याहाळण्याचा, त्यांच्या सर्व कृती निरखण्याचा.
समाधीची सकाळची पूजा चालू होती. मामा अलगदपणे समाधीवरचे निर्माल्य उतरवत होते. त्यानंतर ओलसर पंचाने ते गंध टिपत होते. असे वाटत होते की त्यांच्या दृष्टीला समोरची समाधी जाऊन प्रत्यक्ष स्वामीच दिसत होते. स्वामींच्या सुकोमल शरीराला चुकूनही काही इजा होऊ नये, अशी काळजी जणू ते घेत होते. आम्ही काहीजण आसपास उभे असलेले पाहून त्यांनी नुसती हातानेच आम्हाला खाली बसण्याची खूण केली. तो पूजाविधी आम्ही सगळे मनात साठवतोय हे त्यांच्या लक्षात आलं असावं, कारण त्या समाधीवरील गंधाच्या गोळ्या व फुलं-तुळस (निर्माल्य) हे सगळं त्यांनी तशाच हळुवारपणे आमच्या प्रत्येकाच्या हातावर ठेवलं, अगदी सहजपणे, निर्हेतुकवृत्तीने. आम्ही सगळे पूर्ण नि:स्तब्ध.
मग यथासांग पूजेचे विधी सुरु झाले. जलप्रक्षालन, दुग्धस्नान, पुन्हा जलप्रक्षालन, पंचामृतस्नान, पुन्हा जलप्रक्षालन. हे करत असताना त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे पुरुषसूक्ताचे स्वर. असे काही भक्तिमय वातावरण तयार झाले होते, की सगळे कालचक्र इथेच थांबून रहावे, निदान काहीकाळ तरी. समाधीवरील तीर्थ डोळ्यांना लावणे, मग कोरड्या वस्त्राने समाधी टिपणे, मग गंधलेपन. अती मृदुतेने हे सगळं चाललं होतं.
"का कमळावरी भ्रमर | पाय ठेवीती हळुवार | कुचुंबैल केसर | इया शंका ||" ही माऊलींची ओवी मूर्तस्वरुपात साकारत होती जणू.
मग पुढे फुले, तुळस अर्पण करताना त्यांची सहज सुंदर आरास साकारली जात होती. अशी की कोण्या उत्तम चित्रकाराने सहज फुलांची रांगोळीच मांडावी. अतिसुबकपणे. आणि मग तो नैवेद्य दाखवणे.. नव्हे, नव्हे, आईच्या हाताने स्वामींना घास भरवणे. डोळे नकळत केव्हा वाहू लागले व केव्हा मिटले गेले हे माझे मलाच कळले नाही.
एकदम आरतीच्या घंटानादानेच जाग आली. जणू आतापर्यंत जमून आलेल्या त्या परम शांतीचा भंग कोणी व्रात्य पोरं करताहेत असं वाटू लागलं, कवायतीसारखी आरती करतो आहे मी, असं वाटू लागलं.
दुपारी जेवण\प्रसाद घेतानाही मामा आवर्जून आम्हा सर्वांच्या जवळ येउन "सावकाश जेवा, काय हवं अजून ?" असं मृदू आवाजात विचारत होते. जोडीला 'नारायण'स्मरण तर चालूच.
कुठल्या मुशीतून भगवंताने यांना घडवले आहे, असा विचार मनात दाटत होता.
माझ्या स्वामीजींच्या घरी आवर्जून आलेली ही सर्व मंडळी म्हणजे निस्सीम स्वामीभक्तच, माझे भाऊ-बहीणच. मग त्यांना सर्व काही व्यवस्थित मिळतंय ना, हे मी पहायला नको का? असाच विचार त्यांच्या ठायी असणार, त्यामुळे हे सगळे पहाण्यातच ते गुंग होते. त्या जेवणाच्या गदारोळात मामांना जेवताना शेवटपर्यंत पाहिलंच नाही मी तरी.
"सदा देवकाजी झिजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा||" असे वर्णन आतापर्यंत फक्त ऐकले होते, त्या सर्वोत्तमाच्या दासाचे असे प्रत्यक्ष दर्शन घडेल असे कधी वाटलेच नव्हते. त्यांच्या विषयी आसपासच्या मंडळींकडून जाणून घेताना फक्त आश्चर्य व आदरभावच दुणावत होता मनात.
तसं पहाता, स्वामी स्वरुपानंद हे सोऽहं ची दीक्षा देणारे सत्पुरुष. पण गंमत अशी सांगतात, की जेव्हा स्वामींनी मामांना सोऽहं ची दीक्षा दिली, तेव्हा पुढे हेही सांगितले लगेचच, की त्या "नारायणाला" सोडायचं नाही हं! असे भाग्यवान हे मामा.
मामा वेंगुर्ल्याला रहात, पण सहा महिने पावसलाच मुक्काम असे. वेंगुर्ल्याहून एकटेच खांद्यावर पताका घेऊन पायी पायी पावसची वारी करत येत असत. मुखात "नारायणाच्या" जोडीला स्वामींचे अभंग. हे ऐकल्यानंतर ते काय उद्योगधंदा करतात अन् त्यांना मुलंबाळं किती असले काही प्रश्नच मग उद्भवले नाहीत मनात. स्वामीप्रेमाने पुष्ट झालेला हा महात्मा ज्ञानेश्वरी, दासबोधात सांगितलेली सगुणभक्ती प्रत्यक्ष आचरत होता. मामांचे जगच निराळे होते. केवळ भगवंताच्या व स्वामीजींच्या भरवशावर एका वेगळ्याच मस्तीत ते वावरत होते. व्यावहारिक जगात ज्या परमात्मभावाला काडीचीही किंमत नसते त्या भावाला अंतरात प्राणापलिकडे जपत ते एक अलौकिक भावजीवन जगत होते. पण तेही अगदी सहजपणे, त्याचा देखावा न करता, त्याचा दंभ होऊ न देता.
परममहंसपदी आरुढ झालेले स्वामी स्वरुपानंद, जे आता चैतन्यमय अवस्थेत तिथे वास्तव्य करून होते, ते आम्हा शहरी, तार्किक व बुद्धिमानी (?) व्यक्तींना सगुणभक्ती कशी करावी, हा जणू पाठच देत होते या महात्म्याकरवी.
संध्याकाळी पुन्हा आरती निमित्ताने मंदिरात जाणे झाले. सकाळच्या त्या भावभरल्या आठवणी मनात साठवताना मी जरा बाहेरच थांबलो मग! आरतीचा गदारोळ पुन्हा सगळ्या शांतीचा भंग करेल की काय या भीतीने! रात्री जेवणानंतर शतपावली करायला आम्ही काहीजण बाहेर पडलो, तर मामा मंदिरात जाताना दिसले. कुतूहलाने आम्हीही त्यांच्या पाठोपाठ. पुढचे जे दृश्य मी पाहिले, ते माझ्या ह्रदयावर असे काही कोरले गेले आहे की मी ते आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही. समाधीच्या मागच्याच भिंतीवरील एका कोनाड्यात श्री विठ्ठल रखुमाईच्या उभ्या मूर्ती आहेत - छोट्याशा. मामा त्या मूर्तींचे दर्शन घेऊन चक्क त्यांचे पाय दाबून देत होते. जसे आपण एखाद्या जिवंत माणसाचे दाबून देतो तसे. डोळ्यात असे आर्त भाव की देवा, किती असे तिष्ठत उभे रहाता आम्हा क्षुद्र जीवांसाठी? जरा विसावा घ्यावा ना आता.
माझी संपूर्ण खात्री आहे की हे पहायला कितीही नास्तिक, शंकेखोर माणूस जरी तिथे उपस्थित असता तर, त्यानेही लोटांगणच घातले असते. त्या विठ्ठलाला आणि या महाभागवतालाही. लौकिक-भौतिक गोष्टीत लडबडलेल्या या विसाव्या शतकात एवढे मोठे आश्चर्य माझ्यासमोर घडत होते, की क्षणभर आपण याच युगात आहोत ना? की चुकून कुठल्या सत्ययुगात वगैरे पोहोचलो की काय हे कळेना झाले. आम्ही तिथे असूनही मामा त्यांच्या पादसेवनभक्तीत दंग होते. ना तिथे कुठली कृत्रिमता ना काही विशेष आविर्भाव. हे नक्कीच त्यांचे दररोजचे, नित्याचेच भक्तिकर्म असणार. हे देवदुर्लभ दृश्य पाहताना आम्ही सगळे जागीच खिळल्यासारखे व आता पुढचा काय चमत्कार पहायला मिळणार या उत्सुकतेत.
मामा शांतपणे समाधीशेजारी बसले, मुखात स्वामींचेच भावभरले अभंग. समाधीवरील सगळ्यात वरची फुले (निर्माल्य) हळुवारपणे उचलून त्यांनी बाजूला ठेवली व अतिशय प्रेमाने थोपटल्यासारखा असा हात समाधीवर फिरवत राहिले.
माझ्या अंतःकरणातला दगड फुटून केव्हाच पाझरायला लागला होता. डोळे मिटून शांतपणे मी ते अभंग आत साठवत होतो.
किती काळ गेला कोण जाणे. मित्रांनी खांद्यावर अलगद हात ठेवत जागे केले. अर्धवट जागा, अर्धवट ग्लानीत बाहेर पडताना मी पाहिले , समाधीवरील उबदार पांघरुण मामा सारखे करत होते. स्वामी स्वरुपानंदांच्या कृपेनेच ही यात्रा अशी "सुफलित" होणार होती तर.
पुढे बर्याच वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये पावसला जाण्याचा योग आला. मंदिरात शिरण्यापूर्वी सहज लक्ष गेले, मंदिराच्या पहिल्याच पायरीवर, एका कोपर्यात एक पितळी पत्रा लावलेला. त्यावर काही मजकूर व एक दोन फुले वाहिलेली.
कुतूहलाने मी जवळ जाऊन निरखून पाहिले तर, स्वामी कृपांकित वैकुंठराव पडवळ असा नामनिर्देश पाहून तिथेच गुडघ्यावर बसलो. त्या पाटीवरुन हात फिरवताना कानात गुंजत राहिले ते भावभरले "नारायण, नारायण".
माझ्या मनात आलं - "या इथेच, श्री स्वामींच्या चरणांपाशीच सदैव रहायला आवडेल मला. स्वर्गसुख तर नकोच, पण ते अतिदुर्लभ वैकुंठसुखही नको मला." याशिवाय या महात्म्याची दुसरी इच्छा तरी काय असणार ?
स्वामीप्रेमात अखंड डुंबणारा हा अतिप्रेमळ महात्मा काय अन् विठ्ठलप्रेमाने वेडे झालेले ते श्री नामदेवराय काय ?
दोघांची जातकुळी एकच की.
"नारायण, नारायण"
- पुरंदरे शशांक
प्रतिसाद
सुंदर लेख..सगळं समोर घडत
सुंदर लेख..सगळं समोर घडत असल्यासारखं वाटल..
नामस्मरणाचा महिमा अगाधच
नामस्मरणाचा महिमा अगाधच असतो.
डोंबिवलीला भाजपाच्या कार्यालयात एक गृहस्थ असत. ते नेहमी हरी-हरी म्हणत असायचे. त्यांना हरी-हरी म्हणूनच ओळखत असत. घरी आले तरी हरी-हरी म्हणणार जातांना पुन्हा हरी-हरी.
आम्हीही घरी त्यांचा उल्लेख "हरी-हरी" आले होते का? असाच करायचो. मला तर आजही त्यांचे नाव माहीत नाही.
खुपच सुरेख!!!! मनाल अगदी
खुपच सुरेख!!!!
मनाल अगदी स्पर्शुन गेलं. :-)
अतीव सुंदर. समोर घडतय असं वाटतय, शशांक.>>>>>दाद +१
एकदम सात्विक आणि सुरेख लेख.
एकदम सात्विक आणि सुरेख लेख. मामांची भक्ती ह्या लेखात अगदी पुरेपुर उतरली आहे. शशांक खुप मस्त.
अतिशय ह्रुदयस्पर्शी. फार
अतिशय ह्रुदयस्पर्शी. फार आवडले. :)
वा खुपच छान लिहीले आहे. अशा
वा खुपच छान लिहीले आहे. अशा भक्तांना साष्टांग नमस्कार.
अप्रतिम!!! खरेतर शब्द नाहीत
अप्रतिम!!! खरेतर शब्द नाहीत माझ्याकडे!!! वाचता वाचता माझेही डोळे कधी भरुन आले ते कळले नाही.
भक्तिचा असा तेजोमयी अनुभव घेणारे फार थोडेच भेटतात जगात. बाकी सगळे ढोंगीच जास्त. प्रपंच आणि परमार्थात गल्लत करणारेच खुप. माझे आबा (आजोबा) लहानपणी सांगायचे... 'प्रपंच करता करता परमार्थ केला पाहीजे हे खरेच! पण बरेच जण परमार्थ करता करता प्रपंच करतात... हे निव्वळ ढोंग!' तेव्हा या वाक्यांचा अर्थ नीटसा कळला नाही. पण पुढे अनुभवांची शिदोरी साठत गेली आणि या वाक्याचा सखोल गहिरा अर्थही उलगडत गेला!!!
हा धागा विपूत पाठवल्याबद्दल धन्यवाद शशांकजी. आणि उत्तम लेखाबद्दल अभिनंदन!!!
छान लिहीले आहे ! मी कधी
छान लिहीले आहे ! मी कधी पावसला गेलेलो नाही - पण लेखातील वर्णनाने तेथे जाऊन आल्यासारखे वाटले. मामांचे सात्विक व्यक्तिमत्व आणि त्यांची भक्ती मनाला भावली !
सुरेख लिहिलय.
सुरेख लिहिलय. :स्मित:
छान लिहिलंय !
छान लिहिलंय ! :)
भक्तिरसात आकंठ बुडालेल्या
भक्तिरसात आकंठ बुडालेल्या व्यक्तिचे यथार्थ चित्रण!
आवडले
पावसला बर्याचदा जाणे झालेय,
पावसला बर्याचदा जाणे झालेय, ती पहाटेची पुजाही केली आहे. त्यामुळे तुम्ही केलेले वर्णन वाचताना देउळच डोळ्यासमोर उभे राहीले. :)
मस्त. अशी व्यक्तीमत्व फारच कमी असतात समाजात. ____/\____
रैना +१ कुठल्यातरी कार्यात
रैना +१
कुठल्यातरी कार्यात बुडुन गेलेल्या, आयुष्य तिथे वाहिलेल्या माणसांना अनुभवायला मिळणं ही सुद्धा माझ्यामते मोठ्ठी मिळकत आहे. इतका सुंदर अनुभव आम्हालाही दिल्याबद्दल कृतज्ञ. सुरेख उतरलय.
आपले हे व्यक्तीचित्रण विलक्षण
आपले हे व्यक्तीचित्रण विलक्षण जिवंत ,सुंदर आणि प्रत्येक्ष भेट घडवणारे आहे.ह्या सुंदर भेटी बद्दल आभार .
सुंदरच... वर्णन आणी
सुंदरच... वर्णन आणी व्यक्तिरेखा दोन्हीही सुरेख!
शब्दकळाही छान!
खूप छान! मनात चित्रफीत तयार
खूप छान! मनात चित्रफीत तयार झाली. अजून पावसला जाण्याचा योग आला नाही. तुम्हाला मामांना बघण्या-भेटण्याचा योग आला आणि तो अनुभव थेट आमच्यापर्यंत इतक्या सुंदररितीने पोचवल्याबद्दल धन्यवाद!
मस्त! आवडले. सुंदर वर्णन ,
मस्त! आवडले.
सुंदर वर्णन , छान लेखन.
धन्यवाद.
छान माहिती. हे नाव आईकडुन
छान माहिती. हे नाव आईकडुन ऐकलंय पण बाकी काहीच माहिती नव्हती...ती ओघवत्या शब्दात मिळाली.
शशांक, कधीच न पाहिलेले मामा
शशांक,
कधीच न पाहिलेले मामा डोळ्यासमोर उभे केलेत.
शब्दांनी फक्त शब्दच पोहोचतात असे नाही तर व्यक्ति त्याच्या व्यक्तिमत्वासकट पोहोचवता येते याची प्रचिती आली. यालाच कदाचित ये हृदयीचे ते हृदयी घालणे म्हणत असावेत. आपल्या शब्दसामर्थ्याला व आपल्याला साष्टांग दंडवत.
नाम जपो वाचा नित्य,श्वासातही
नाम जपो वाचा नित्य,श्वासातही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म ...
या सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अशोकजी परांजपे यांच्या भक्ती रचनेची
आर्ततेने आठवण झाली. अप्रतिम लेख व सुरेख शब्द चित्र.
अतीशय भावपूर्ण आणी सुंदर
अतीशय भावपूर्ण आणी सुंदर लिहीलय तुम्ही. स्वामींच्या कृपेने अनेकांचे जीवन तरलेय. मी पावसला अजून गेले नाहीये, आता हे वाचुन अजून उत्सुकता वाढलीय मात्र. जाण्याचा योग लवकर यावा हीच ईच्छा.
अचानक आजच तुमचे लिखाण वाचले .
अचानक आजच तुमचे लिखाण वाचले . जशि द्रुष्टि तशि सृष्टि. तसे कितितरि लोकांनि त्यांना तसे पाहिले असेल.पण त्यांच्या मनाचा थांग फक्त तुमच्यांसारख्यांच्या मनाला कळला हि केव्हडि मोठि गोष्ट.असेच डोळ्यांनि वाचा व मनापासुन लिहा.
खुप दिवसांनी माबोवर येता आले.
खुप दिवसांनी माबोवर येता आले. आल्या आल्या इतकं नितांत सुंदर आणि भावस्पर्शी ललित वाचुन
मन प्रसन्न झाले. खुप छान लिहिता तुम्ही पुरंदरे ! :स्मित:
खुप छान शशांक जी
खुप छान शशांक जी :स्मित:
शोभनाताई +१
शोभनाताई +१ :)
खरोखरच चित्रदर्शी,
खरोखरच चित्रदर्शी, प्रत्ययकारी.
कधी पावसला जाण्याचा योग आलाच
कधी पावसला जाण्याचा योग आलाच तर आधी त्या पितळी पायरीचेच दर्शन घेईन आणि मगच आत जाईन.
या इथेच, श्री स्वामींच्या चरणांपाशीच सदैव रहायला आवडेल मला. स्वर्गसुख तर नकोच, पण ते अतिदुर्लभ वैकुंठसुखही नको मला. >> भक्तीचे वर्म किती सहज उलगडून दाखवलय तुम्ही शशांक! लेख अप्रतिमच!
श्रीगुरु:
श्रीगुरु:
अप्रतिम लिहीले आहे. मी
अप्रतिम लिहीले आहे.
मी यापुर्वीच वाचले होते. तेव्हा काही काळ माझे नेट खंडीत होते त्याला १० ते १२ दिवस लागले प्रतिसाद राहुन गेला होते.
अप्रतिम लिहिलंत!
अप्रतिम लिहिलंत!