उत्तर



इच्छा आणिक पूर्ती इतके अपुल्यामधले अंतर आहे
कळून चुकले आहे अन् हा प्रवासही जीवनभर आहे!

वाटेवरच्या खुणेऐवजी तुझे नि माझे नाते ठेवू
साथ सोडता चुकण्याचे भय पदोपदी वाटेवर आहे

जगण्यामध्ये सदा असावे दु:ख पुरेसे सुखावणारे
सुखी बनविण्याची ताकद या सुखात अगदी कणभर आहे

स्पर्शामध्ये नाहित आता भास मुलायम स्मरणांमधले
स्मरणांमध्ये अजून हळव्या स्पर्शामधली थरथर आहे

पहाल बाहेरून मनाला, दिसेल पडक्या गढीप्रमाणे
आत शिरा, मग कळेल तेथे, कुणाकुणाचा वावर आहे!

जाता जाता प्राणांसोबत प्रेमच माझे ने बेलाशक!
कळेल तुजला साथ तुला माझ्या प्रेमाची कुठवर आहे!

नकोस घेऊ शपथा आता, नकोस देऊ जुने दाखले
तुझे वागणे उत्तर होते, तुझे वागणे उत्तर आहे

काळाने फाडून टाकली स्पर्शांनी बनलेली झालर
स्पर्श न होताही बसलेला पीळ अजुनही कणखर आहे

चवीचवीने जगता जगता आयुष्याला गोडी आली
मला खातरी झाली की मृत्यु याहुनही रुचकर आहे!

- नचिकेत जोशी

प्रतिसाद

क्या बात है :)

स्पर्शामध्ये नाहित आता भास मुलायम स्मरणांमधले
स्मरणांमध्ये अजून हळव्या स्पर्शामधली थरथर आहे

काळाने फाडून टाकली स्पर्शांनी बनलेली झालर
स्पर्श न होताही बसलेला पीळ अजुनही कणखर आहे
>>> आवडेश

मस्त रे!!

सगळेच शेर कमी अधिक फरकाने आवडले!

mast mast mast !!

काळाने फाडून टाकली स्पर्शांनी बनलेली झालर
स्पर्श न होताही बसलेला पीळ अजुनही कणखर आहे >> kadak ekdam

वा! काय सही गझल आहे! सगळ्याच द्विपदी उत्तम. वावर, उत्तर खूप आवडल्या. आणि सादरीकरण तर खासच!

कमाल शब्द, कमाल सादरीकरण.

छान! पहाल बाहेरून मनाला....खूप आवडला!

मस्त.

जबरदस्त नचिकेत :)
खूप आवडेश :)

शेवट अप्रतिम.

कमाल शब्द, कमाल सादरीकरण. >>> +१००..

प्रचंड आवडली रे ही गजल.

सगळेच शेर आवडले
नेहमीप्रमाणेच मस्त!

धन्यवाद दोस्तहो :)

छानच रे आनंदयात्री :)

खूप खूप आवडली गजल, नचिकेत. सगळेच शेर आवडलेत पण... मन, पीळ आणि मृत्यू... आरपार.

गझल सुंदरच रे, पण सादरीकरणात गझलेची लय मध्येच पकडल्यासारखी पण मध्येच थोडी सुटल्यासारखी वाटली..

शिवाय आवाजातील चढ ऊतार शब्दाचे वजन, फेक हेही देखिल सुधारायला भरपूर वाव आहे.

सुंदर!!!

मस्त :)
मैफल विभागातींल सादरीकरणांत ह्या कवितेतला 'आवाज' सर्वात जास्त ऐकायला आवडला. हेडफोन लावून ऐकताना बर्‍याच शब्दांना ब्लो मात्र येत होता, तसा आला नसता तर अजून मजा आली असती.

सर्वांचे आभार :)

अगो, ब्लो आलाय, खरं आहे. मी स्वतःही या सादरीकरणाबद्दल फारसा समाधानी नाहीये. पुढच्या वेळी प्रयत्न करेन. :)

गझल + सादरीकरण आवडले.

नचि, जबरी सुंदर रे ! बेफाम आवडली मला. प्रत्येक ओळ अन ओळ सुंदर आहे.

जाता जाता प्राणांसोबत प्रेमच माझे ने बेलाशक!
कळेल तुजला साथ तुला माझ्या प्रेमाची कुठवर आहे! >>> हाउ रोमँटिक ! :)

वाटेवरच्या खुणेऐवजी तुझे नि माझे नाते ठेवू.. भारी!
स्मरणांची थरथर पण आवडली.

सादरीकरणात थोडा पॉज हवा मध्येमध्ये. तसेच खातरी, नाहित हे जरा शुध्द आवडले असते.
बाकी यु रॉक अ‍ॅज अल्वेज :)

सर्वांचे आभार :)

आनंदयात्री,

नेहमीप्रमाणेच गझल आवडेश!

इच्छा आणिक पूर्ती इतके अपुल्यामधले अंतर आहे
कळून चुकले आहे अन् हा प्रवासही जीवनभर आहे!

>>
ओहो! :-( ही वेदना जीवघेणी आहे. आजच माबोवर मी मुक्ताची 'समजूतदारपणा..' वाचली. मतला त्या भावनेशी रीलेट होतोय. जणु तुझ्या ह्या मतल्याचे उत्तर तिने तिकडे दिलेय.

स्पर्शामध्ये नाहित आता भास मुलायम स्मरणांमधले
स्मरणांमध्ये अजून हळव्या स्पर्शामधली थरथर आहे
>>
सुरेख शेर!