एका किन्नराची ट्रान्सफर.

"बाबा, बेड नंबर टूवरची आज्जी साडेअकराच्या आत वॉर्ड नाईन्टीनमध्ये जायला हवी, विदाऊट फेल. कल सुबह एक डेअरी मिल्क पक्की", सीतेने विनवणीपूर्वक बाबाला म्हणजे वॉर्डमधल्या शिकाऊ नर्सला बजावले. आज पोस्ट इमर्ज दिवस. काल चोवीस तास जागून आज पुन्हा दोन वाजेपर्यंत काम असणार. दुपारी किमान दोन तास झोप हवीच. आज दुपारी वीकली जर्नल मीट आहे. मागच्या वेळी जायला जमलं नव्हतं. यावेळीतरी जमतं का बघायला हवं. पुढच्या वीकमध्ये तर आपल्याच युनिटची टर्न आहे.

म्युनिसिपल टिचिंग हॉस्पिटलमधला एक पोस्ट इमर्जन्सी दिवस. इथे मेडिसीनचे एकेक युनिट आठवड्यातला एक दिवस २४ तास मेडिसीनमध्ये अ‍ॅडमिट होणारे सगळे नवीन रुग्ण बघते. मेडिसीनप्रमाणेच सर्जरी, गायनॅक, पिडिअ‍ॅट्रिक्स, ऑर्थो अशा प्रमुख शाखांची प्रत्येकी सहा युनिट. प्रत्येक युनिट त्या त्या युनिटच्या बॉसच्या, म्हणजे मुख्य डॉक्टरच्या आद्याक्षराप्रमाणे ओळखले जाते. सीतेच्या बॉसचे नाव डॉ. आशालता सौरभ चट्टोपाध्याय. म्हणून तिचे युनिट एएससी. सगळे गमतीने आस्क युनिट म्हणतात. प्रत्येक युनिटचे दोन उपविभाग. एक काम करतो मेल वॉर्डात. एक फिमेल वॉर्डात. अशीच नावे असत वॉर्डांना. सवयीने काही इंग्रजी शब्द अगदी न शिकलेल्या सफाई कामगारांसह सगळ्या हॉस्पिटलच्या तोंडात बसलेले. हॉस्पिटलची परिभाषाच ती. प्रत्येक युनिटमध्ये बॉस, एक सेकंड बॉस, मग प्रत्येक उपविभागाला एक लेक्चरर, त्याच्यानंतर एक रजिस्ट्रार म्हणजे एम. डी. करणारा सिनीयर विद्यार्थी आणि या उतरंडीच्या सगळ्यांत खालच्या पायरीवर एम. डी. करणारा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी डॉक्टर अशी रचना असते. या ज्युनिअरला हाऊसमन किंवा हाऊस ऑफिसर म्हणतात. म्हणजे वॉर्ड हेच त्याचे हाऊस. जवळपास चोवीस तास वॉर्डात काम करत राहावे लागते. वॉर्डातल्या सिस्टरपण त्यांना ज्युनियरसारखी वागणूक देतात.

"देखो सीता, तीन महिने आपण एकत्र असू. वन थिंग आय वाँट टू मेक व्हेरी क्लिअर. मला वॉर्डात स्टॅग्नेशन अजिबात नकोय. एका इमर्जला अ‍ॅडमिट झालेला पेशंट पुढच्या इमर्जला वॉर्डात दिसायला नको. अ‍ॅज अर्ली अ‍ॅज पॉसिबल प्रत्येक पेशंटचं वर्क-अप पूर्ण व्हायला हवं आणि अ‍ॅज मेनी अ‍ॅज पेशंट्‍स्‌ची पाळंमुळं पहिल्याच दिवशी खणून काढायची. दुसर्‍या युनिटचा पेशंट आहे याचा स्लाइटेस्ट पुरावा मिळाला तरी पोस्ट इमर्ज बाराच्या आत तो पेशंट त्या त्या युनिटच्या अंडर ट्रान्सफर व्हायला हवी. मला या तीन महिन्यांत माझ्या थीसिसचं मॅक्सिमम काम करायचंय. अँड आय डोंट वाँट टू रुईन इट बिकॉज ऑफ सम लेझी हाऊसमन. " तिच्या रेजने - रजिस्ट्रार प्रकाशने तिला या युनिटमधल्या पहिल्याच दिवशी बजावले होते.

" बेचारी सीता का वनवास शुरू हुआ है अब", वॉर्डमधली एक स्टाफ खिदळत म्हणाली होती तिला.

टिचिंग हॉस्पिटलमधला 'ट्रान्सफर' हा एक मजेशीर प्रकार आहे. दोन प्रकारचे ट्रान्सफर असतात. एखादा रुग्ण समजा इमर्जन्सीत एखाद्या विभागात अ‍ॅडमिट झाला आणि पहिल्या काही तपासण्यांनंतर त्याला वेगळ्या स्पेश्यालिटीच्या उपचारांची गरज लागणार असेल तर होणार्‍या इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर. म्हणजे सर्जरी ते मेडिसीन, मेडिसीन ते गायनॅक अशा. दुसर्‍या इंट्राडिपार्टमेंटल ट्रान्सफर. एखादा रुग्ण एका युनिटमधून एकदा डिसचार्ज कार्ड घेऊन बाहेर पडला की तो तहहयात त्या युनिटचा झाला. मग पुन्हा कधी तो त्या हॉस्पिटलात अ‍ॅडमिट झालाच, तर इमर्जन्सी रात्रीपुरतं त्या त्या दिवशीचं युनिट त्याची काळजी घेतं आणि मग दुसर्‍या दिवशी बॉसच्या राऊंडनंतर तो पेशंट त्याच्या मूळ युनिटला म्हणजे पॅरेंट युनिटला ट्रान्सफर होतो. रात्रभर काय काय उपचार केले ते व्यवस्थित ट्रान्सफर पेपरवर लिहून, ऑफिसमधून नविन युनिटचा स्टँप मारून बाराच्या आत नर्सने तो पेशंट पॅरेंट युनिटमध्ये हलवायचा.

या प्रकाराचा एक हेतू म्हणजे पेशंटना एकच मुख्य डॉक्टर कन्सल्टंट म्हणून मिळावेत. दुसरा हेतू म्हणजे इंटरेस्टिंग पेशंट त्या त्या युनिटकडेच राहावेत. काही रोग फारच दुर्मिळ असतात. असे रुग्ण आल्यास त्याचे डायग्नोसिस आणि उपचार करण्याकरता पेरेंट युनिटने फार श्रम घेतलेले असतात. हे रुग्ण त्यांच्या केसस्टडीसह मेडिकल जर्नल्समधून त्यांच्या युनिटच्या नावाने झळकतात. मग एका युनिटने केलेल्या परिश्रमांचे श्रेय दुसर्‍या युनिटने लाटू नये म्हणून ट्रान्सफर.

सीतेसारख्या ज्युनियर हाऊसमनसाठी मात्र ट्रान्सफर म्हणजे आपल्यावरचा कामाचा बोजा कमी करणे. जितके जास्त ट्रान्सफर तितकं दुसर्‍या दिवशी काम कमी. त्यामुळे 'ट्रान्सफर पेशंट फ्रॉम ए एस के युनिट टू एक्स वाय झेड युनिट' अशाप्रकारचं शेवटचं वाक्य पेशंटच्या ट्रान्सफर शीटवर सगळ्यात शेवटी लिहिताना सीतेला भलताच आनंद व्हायचा. त्यादिवशी बारा वाजेपर्यंत शेवटची या आजीची ट्रान्सफर उरकून सीतेने उरलेली कामाची लिस्ट काढली. 'अरेंज एफ एफ पीज -फ्रेश फ्रोजन प्लाज्मा- फॉर जमीला'. जमीलाचं नाव काढताच परत एक मोठ्ठीशी आठी तिच्या कपाळावर आली.

२.

काल इमर्जन्सी रूममध्ये ती आणि तिचा मेल वॉर्डातला सहकारी सुभाष दोघंच धडाधड इ आरमध्ये येणार्‍या पेशंटच्या मार्‍याला तोंड देत होते. इतक्यात एका बेडवर जमीलाला घेऊन चारपाच लोक सरळ आत घुसले.
सगळ्या बायकाच. कुणी पंजाबी ड्रेस घातलेल्या, तर कुणी साडी नेसलेल्या सुंदर्‍या. सगळ्यांचे कपडे एक जात भडक चमचमणारे. चेहर्‍यावर पावडरचा थर आणि डार्क लिपस्टिक. नाकांत चमक्या, केसांत पिना, चेहरे राकट. हे लोक कोण हे तिला सांगायची गरज नव्हतीच. बेडवरची रुग्ण बेशुद्ध. तिचा अवतारही असाच. पण हातापायाच्या काड्या, सुरकुतलेली कातडी आणि पोटाचा नगारा.

''क्या हुवा है इन्हे?" सीतेने विचारलं.
"सुबहसे दो खून की उल्टीयां हुई और अभी एक घंटेसे बेहोश है", एक सुंदरी म्हणाली.
"एक काम करो, एक कोई तो इधर रुको. बाकी लोग बाहर जाओ और इमर्जन्सी का पेपर बनाके लाओ कॅजुअल्टी ऑफिसरके पास से. तब तक मैं इन्हे चेक करती हूं", सीता म्हणाली.
तिला तपासत असतानाच जीन्स, टी-शर्ट घातलेला, पोनी टेलवाला एक तरूण तिथे आला.
"यू हॅव टू अ‍ॅडमिट हर डॉक्टर. वी विल स्टेज अ प्रोटेस्ट इफ यू डोंट डू इट", तो बायकी आवाजात म्हणाला.
"हे, हू आर यू? अँड व्हाय आर यू रशिंग टू प्रोटेस्ट अँड ऑल?" सीताने वैतागून विचारले.
"वी आर फ्रॉम सहेली- द रेप्युटेड एन जी ओ फॉर सेक्शुअल मायनॉरिटीज.शी इज अवर मेंबर. अँड वी विल नॉट टॉलरेट एनी पार्शियालिटी विथ हर ट्रीटमेंट ओन्ली बिकॉज शी इज वन ऑफ अस", तो तडकत बोलला.
"अरे बाबा, तुम लोग लडाई पे क्यों उतर आये? इसकी कंडिशन देखके इसको अ‍ॅडमिट तो करनाही है, चाहे मायनॉरिटीवाली हो या मेजॉरिटीवाली. लेकीन इसके साथ कौन रहेगा? इसकी जिम्मेदारी कौन लेगा?" सीतेने विचारले.
" हम है ना!" त्या मगाचच्या सुंदर्‍या आत येता येता म्हणाल्या. "हम सब इसकी बहनें है,"
"ठीक है. मै ट्रीटमेंट शुरू करती हुं. आप बाहर रुको. पहलेही देर हुई है."
आत्तापर्यंत तो अ‍ॅजिटेटेड पोनीवाला निवळला होता. "थँक यू डॉक. सॉरी फॉर माय बिहेवियर. आय विल लीव नाउ. आय विल ड्रॉप माय नंबर विथ माय सिस्टर्स. आस्क देम टू कॉल मी इन केस."
" या आता", सीता मनात म्हणाली आणि पेशंटकडे वळली. एकंदर लक्षणांवरून पेशंट लिवर फेल्युअरची वाटत होती. हे पेशंट बेशुद्ध व्हायची दोन कारणे. एक हिपॅटिक एनसेफॅलोपथी. लिवरचं काम बंद पडल्याने काही विषारी द्रव्ये तयार होऊन मेंदूचं काम बंद पाडतात किंवा दुसरं कारण म्हणजे हायपोग्लायसेमिया - रक्तातली साखर लिवरचे काम नीट न चालल्याने अतिशय कमी होणे. तिने पेशंटची ब्लड शुगर चेक केली. पस्तीस. लगेच तिला शुगर सोल्यूसन शीरेतून चढवलं. १०० मिली जाताच पेशंट हलायला लागली. तिला जरा वेळाकरता सिस्टरच्या ताब्यात देऊन सीतेने कॅज्युअल्टी पेपर हातात घेतला. नाव जमीला, वय-२५, लिंग - स्त्री. स्त्री? म्हणजे ही आपल्या वॉर्डात अ‍ॅडमिट होणार? तिने आपला मोर्चा बाहेर सीओ म्हणजे कॅज्युअल्टी ऑफिसरकडे वळवला.

"सर, जरा हे सेक्स चेंज करा ना. फिमेलचे मेल", तिने सीओला विनवले.
सीओ म्हणजे उगाच फ्रस्टू लोक असत. कुठे स्पेश्यालिटीला अ‍ॅडमिशन न मिळाल्याने कॅज्युअल्टीत बसून सगळ्या स्पेश्यालिटी विद्यार्थ्यांवर जळणारे.
"हॅ,हॅ,हॅ. मै इतना बडा प्रोसिजर कैसे करु? मै क्या कोई स्पेश्यालिटीवाला हुं?"
"तसं नाही हो सर, पेपरवर चेंज करा. शी इज नॉट अ फिमेल", सीतेने म्हटलं.
"हाऊ कम यू नो? " ऑफिसरने विचारलं.
"अरे, उन्होने देखा रहेगा", सिओसमोर बसलेला सर्जरीचा सिनीयर चेहरा अगदी गंभीर करत म्हणाला आणि सगळे हसू लागले.
चडफडत सीता परत इआरकडे वळली. पेशंट कॉन्शस झाली होती. सीतेने वैतागून तिच्या रेजला फोन केला. इथे हा प्रॉब्लेम सॉल्व करायला ये, म्हणून. तो आल्यावर परत सीओशी थोडी बोलाचाली झाली.
तिथली सिस्टर हसत म्हणाली "पेशंटलाच विचारा, कोण आहेस तू म्हणून".
आणि तिने विचारलेही पेशंटच्या सगेवालींना. "देखिए, हम ना मेल है ना फिमेल. हम तो किन्नर है", एकजण ठसक्यात म्हणाली. किन्नर हा शब्द सीतेने पहिल्यांदाच ऐकला होता. छक्के, हिजडे असे शब्द ऐकले होते.
"आपल्या हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे हे लोक फिमेल वॉर्डातच जातात", सीओने नियमांवर बोट ठेवत सांगितले आणि पेशंट योग्य ती कागदपत्रे बनवून फिमेल वॉर्डात शिफ्ट झाली.

त्यांच्या हॉस्पिटलात असेच चालायचे. एकदा इआरमध्ये पेशंट थोडा सेटल झाला की वॉर्डात जायचा. तिथे रजिस्ट्रार पुन्हा एकदा व्यवस्थित तपासायचा. काही शंका असल्यास लेक्चररला दाखवायचा. सकाळी पुन्हा एकदा लेक्चररचा राऊंड. मग बॉस लोकांचे राऊंड. प्रत्येकवेळी पेशंटच्या वर्कअपमध्ये एकेक भर पडत जायची. ती सगळी कामे हाऊस ऑफिसरला धावतपळत करावी लागायची.

सकाळी नऊपर्यंत सगळे इमर्जन्सी रिपोर्ट आले होते. सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जमीलाला एचआयवी आणि हिपॅटायटिस बी हे दोन्ही आजार आले होते. तिचा आय एन आर म्हणजे रक्त गोठायला लागणारा वेळ खूप वाढला होता म्हणूनच तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या. एंडोस्कोपी करून ब्लिडींग थांबवायचे तर त्या आधी आय एन आर नॉर्मल व्हायला हवा. त्यासाठी तिला रक्तातील प्लाज्मा नावाचा घटक चढवायला हवा. बॉसच्या राऊंडनंतर हे ठरले होते. बॉसला ती मेल आहे की फिमेल की आणखी काही यात काही रस दिसत नव्हता, असे सीतेला वाटले. त्यांच्या दृष्टीने ती एक हिपॅटिक फेल्युअरची केस होती बस्स! ती कुठल्याही वॉर्डात असली काय, एचआयवी पॉजिटिव असली काय, बॉस फक्त तिच्याकडे एक पेशंट म्हणून सहानुभूतीने बघणार होत्या.

"वैताग च्यायला", सीता मनात म्हणाली आणि मग सिस्टरला म्हणाली "बाबा,जरा जमीलाके सगेवालोंको बुलाना, एफ एफ पी अरेंज करना है."
"अरे, वो तो सुबह बॉसके राउंड के बाद भाग गये."
"वा, मग प्लाझ्मा अरेंज कोण करणार?" पेशंटच्या नातेवाइकांनी ब्लड डोनेट केलं तर बदली ब्लड / ब्लड प्रॉडक्टस् द्यायची हॉस्पिटलची व्यवस्था होती.
"कोण म्हणजे? सीतामैया. उद्यापर्यंत हिची स्कोपी आणि असायटिक टॅपिंग झाली नाही तर प्रकाश तुला कच्चा खाईल."
वैतागून सीता जमीलाकडे गेली. नाकातून एक नळी पोटात घातलेली, सलाईन ड्रिप चालू असलेली जमीला थोडी बरी दिसत होती कालपेक्षा.
''ए, तुझे नातेवाईक कुठे गेले? काल तर खूप बाता मारत होते", सीता म्हणाली.
"मॅडम, मेरे बहनोंको कुछ मत बोलिए. वे मेरा खयाल रख्खेंगी. आज शुक्रवार है ना, तो आज हमारे गुरुमाता के घर देवीमां की बडी पूजा रहती है. सब उधरही गयी है. कल आ जाएगी."

अरे वा, मराठी बोललेलं कळतंय की हिला चांगलंच. विचार करत सीता बाहेर पडली. कँटिनमध्ये चार घास पोटात ढकलून परत कुणाचे रिपोर्टस् घेऊन ये, कुणाचा इमर्जन्सी सीटी स्कॅन करून घे, रेडिऑलॉजीच्या रजिस्ट्रारला मस्का मारून कुणाचं अर्जंट सोनोग्राफी करून घे, असं चाललं होतं. मध्येच सोशलवर्करला गुळ लावून जमीलासाठी चार प्लाझ्मा बॅग सँक्शन करून आणल्या आणि नातेवाईक नसल्याने ती पॅकेटस् स्वतःच आणून सिस्टरच्या हातात दिली.
"घ्या! च्यायला, इंजिनीयर व्हायचं सोडून इथं मरायला आलोय. आमच्या बरोबरचे लाखोंची पॅकेजेस घेतायत आणि आम्ही बसलोय इथे लोकांसाठी रक्ताच्या पॅकेजेसची हमाली करत", सीता म्हणाली.
नेहमी पोस्ट इमर्ज दिवशी सगळे हाऊस ऑफिसर असेच थकून फ्रस्ट्रेट असायचे. सिस्टरने तिला चहा पाजला.
सीता तरतरीत होऊन पुढील कामांना लागली.

सात वाजता प्रकाश झोप काढून आला. सगळ्या पेशंट्सच्या वर्कअपमधल्या राहिलेल्या कामांबद्दल छत्तीस तास न झोपलेल्या सीतेला झापण्याचा कार्यक्रम यथासांग चालला होता. जमीलाचा बेड येताच "हिची स्कोपी आणि असायटिक टॅपिंग उद्या झाले पाहिजे. मोबिलाईज हर फास्ट. टिल नेक्स्ट इमर्ज शी शूड बी आऊट ऑफ अवर वॉर्ड. आयदर वेज-व्हर्टिकल ऑर ट्रान्सवर्स."

दिवसभर तिने मरमर केलेल्या कामाचा टोट्टल अनुल्लेख! सगेवाल्यांना शोधून काढ अशा सूचना आणि हजार बारीकसारीक कामे सांगून रेज गेला. सीतेने कसेबसे रात्री बारापर्यंत काम संपवले आणि झोपायला हॉस्टेलवर गेली.

३.
जमीला म्हणाल्याप्रमाणे तिचे नातेवाईक शनिवारी आलेच. मग तिचे काम व्यवस्थित मार्गी लागले. स्कोपी करून फुटलेल्या रक्तवाहिन्यांचे लायगेशन झाले. पोटात जमा झालेले पाणी असायटिक टॅपिंगची प्रोसिजर करून काढून झाले. कन्सेन्ट फॉर्मवर सही करताना नातेवाईक आणि जमीला सगळ्यांनी बजावून सांगितले, "कुछ भी करना लेकिन पेशाब की नल्ली नही लगाना. हमारी वो जगह बहुत पवित्र रहती है. किसीको दिखाते नही."
"ठिक है", सीता म्हणाली. गरजच नव्हती. पेशंट पूर्ण शुद्धीत होती.

पुढची औषधयोजना चालू झाली. जमीला सध्या आयसीयुत होती. हे आयसीयु म्हणजे पण एक गंमत होती. दोन भिंतींना लागून पेशंटचे बेड होते आणि त्यांच्या मधोमध खांबांच्या मध्येमध्ये काही कॉट होत्या. शक्यतो एचआयवी, हिपॅटायटिस बीचे पेशंट इथे ठेवायचे. महापालिकेच्या रुग्णालयांत प्रत्येक रुग्णाला इंजेक्शन द्यायला वेगळ्या सिरींज असल्यातरी वेगळे ग्लोवज मिळत नाहीत. त्यात अशा पॉजिटिव केसेसना डबल ग्लोवज लागतात. मग बाकीच्या पेशंटना रांगेत इंजेक्शने देऊन आधीच्या ग्लोववर एक ग्लोव चढवून यांना इंजेक्शने देत. किंवा डॉक्टर लोक ब्लडवगैरे चाचणीसाठी घेत. वॉर्डातल्या सिस्टर आणि ज्युनियर डॉक्टरांनी केलेली पेशंटची व्यवस्था. पूर्वी म्हणे पॉजिटिव लोक लांब व्हरांड्यात ठेवत. आता मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून असे करता येत नाही. मग बरोब्बर दोन रांगांच्या मध्येच ठेवतात. म्हटलं तर वेगळे, म्हटलं तर सगळ्यांच्या अगदी मधोमध. मानवाधिकारांची ऐशी की तैशी! इम्युनो कॉम्प्रमाईज्ड युनिट म्हणून आयसीयू.

वॉर्डात क्रॉनिकली पडून असणारे इतर आजारांचे पेशंटही या आयसीयुत असल्याने बॉस लोकांना ही आयसीयुची भानगड समजत नसे. किंवा माहितीही असेल आणि दुर्लक्ष करत असतील कोण जाणे! हळूहळू जमीला बरी होऊ लागली. नातेवाईक कधी असत कधी नसत. तो पोनीवालातर परत कधी दिसलाच नाही. मग एक दिवस तिचे नातेवाईक अचानक गायब झाले. आता हिला डिसचार्ज करायचं तर कसं ते सीतेला कळेना. एकएक दिवस वाढला तशी तिच्या रेजची तगमग वाढली. तिच्या बॉसच्या ते लक्षात आलेच.
"प्रकाश, प्रत्येक पेशंट ही नवेनवे शिकण्याची एक संधी असते. आता तू सांग, या पेशंटवरून तू कायकाय शिकलास?"
हिपॅटिक फेल्युअरची ट्रीटमेंट, त्यातले नवेनवे शोध डिस्कस झाले. लेक्चरर आपापल्या परीने भर घालत होते. ए एस सी मॅडम आणि उप बॉस ए बी जोशीसर राऊंडवर इतके छान शिकवायचे की बाकीच्या युनिटची पोरंपण वेळ मिळताच सीतेच्या युनिटचे राऊंड ऐकायला यायचे.
बरं, आता "डिसऑर्डर्स ऑफ सेक्शुअल डिफरंसीएशनविषयी सांग."
यानंतर मग गर्भधारणेनंतर गर्भाचे लिंग कसे ठरते, कितव्या आठवड्यात ओळखू येते, गुणसूत्रांच्या सदोष विभागणीमुळे होणारे टर्नर सिंड्रोम ,क्लाईनफेल्टर सिंड्रोम असे दोष यांवर चर्चा झाली. त्यानंतर मानवात लिंगनिश्चितीच्या चार टप्प्यांविषयी जोशीसरांनी माहिती दिली. गर्भधारणेच्यावेळी होणारी गुणसूत्रीय निश्चिती, मग टेस्टीज/ओवरीज अशा अंतर्गत अवयवांची निश्चिती, स्त्री-पुरुष फरक करणार्‍या बाह्यांगांची निश्चिती आणि त्यानंतर मानसिक स्तरावर होणारी लिंगनिश्चिती. यातील प्रत्येक टप्प्यावर काहीना काही बाधा येऊन लिंगनिश्चितीत संदिग्धता निर्माण होते आणि मग तयार होतात हे अर्धनारीनर. समाजाची अवहेलना झेलणारे, आईवडिलांकडूनही दुस्वासिले जाणारे.

यातला बराच भाग एम. बी. बी. एस. करताना गायनॅकमध्ये त्या त्या वेळी अभ्यासून विसरलाही गेला होता. मात्र सीतेच्या दोन्ही शिक्षकांनी मेडिसीनच्या दृष्टिकोनातून यांना हार्मोन्सचे आणि इतर आजार कसे होतात, हेसुद्धा शिकवले.
"देन अ‍ॅट व्हॉट स्टेज हर प्रोग्रेस हॅज स्टॉप्ड?" सरांनी प्रकाशला प्रश्न विचारला.
प्रकाशला उत्तर देता आले नाही. किंवा त्याने दिले नाही.
मग सरच म्हणाले, "शी ईज नॉट अ हर्मॅफ्रोडाईट, शी ईज अ कॅस्ट्रेटेड मेल. यू मे एक्झमिन अँड कन्फर्म."
"शी ईज नॉट अलॉविंग एनी एक्झामिनेशन", सीतेने सांगितले.
"देन लीव्ह ईट अँड रिड अबाऊट कॅस्ट्रेशन फॉर अवर नेक्स्ट राऊंड". असे म्हणून ए एस सी मॅडम गेल्या.

सीतेने वेळात वेळ काढून मोठ्या उत्सुकतेने कॅस्ट्रेटेड मेल्सबद्दलची माहिती वाचून काढली.
भारतात रस्त्यांवर पैसे मागत फिरणारे बहुतांश तृतीयपंथी एकतर दिखावा करणारे खरेखुरे पुरुषच असतात किंवा अंडकोष/ वीर्यकोष काढून टाकलेले पुरूष. शक्यतो मुलगा वयात येण्याआधीच ही अंडकोष काढण्याची क्रिया करतात. बहुतेक वेळा निर्जंतुक उपकरणे वगैरे न वापरता. त्यासाठी अशा तृतीयपंथी टोळ्यांचा खास हजाम असतो. हे सगळे सहन करणारा वाचलाच तर आयुष्यभर मेल हॉर्मोन्स - पुरुषी संप्रेरकांची उणीव त्याच्यात राहते. स्त्री हार्मोन्स काही प्रमाणात स्त्री पुरूष सगळ्यांच्यातच स्रवत असतात. पुरुषी हार्मोन्सचा प्रभाव गेल्याने मग केवळ स्त्री हार्मोन्स शिल्लक असणार्‍या या व्यक्तीचे शरीर हळूहळू स्त्रीसारखे दिसू लागते. आवाजही बदलतो. वाईट संगतीच्या नादाने लैंगिक मार्गाने पसरणारे आजार, एडस्, हेपॅटायटिस बी या लोकांना गाठतात. बाकी या लोकांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयीही खूप संदर्भ होते, पण सीतेला ते सगळे वाचायला एवढ्या धावपळीत वेळ नव्हता.

बर्‍याच दिवसांत जमीलाच्या नातेवाईकांचा पत्ता नव्हता. 'आजकाल ती गायनॅक वॉर्डजवळ जाऊन बसते आणि लेबररुममध्ये कुणाची डिलीवरी झाली की नव्या बाळाला आशीर्वाद देऊन पैसे, खाऊ घेऊन येते', अशी तक्रार वॉर्डाच्या सिस्टर इनचार्जनी सीतेकडे केली. सीतेने जमीलाला याविषयी चांगलेच खडसावले.
" तो क्या मै खुद जाती हुं? वो लोगही बुलाके लेके जाते है, हम लोगोंका आशीर्वाद बहोत किंमती होता है ना इसीलिए." इति जमीला.
''जमीला, तुला एक विचारू? तुला कधी कळलं गं तुझ्या दैवी शक्तीबद्दल?"
"लहानपणीच. पण घरात कुणाला माहिती नव्हतं. मग मला माझे गुरू भेटले. ते मला नागपूरहून मुंबईला घेऊन आले."
"अय्या, तू नागपूरची आहेस? मला एक सांग, तू तर म्हणतेस तुम्ही देवीची पूजाअर्चा करता. मग तुझं नाव जमीला कसं?"
"आमच्यात दिक्षेनंतर नाव बदलतात."
"मग तुझं खरं नाव काय गं?"
एक दोन क्षण जमीलाच्या चेहर्यावर चलबिचल झालेली सीतेला स्पष्ट दिसली.
"श्यामला! श्यामला भालेराव."

वॉर्डातली इतर कामे करताकरता जमीलाशी सीतेच्या अशा गप्पा चालत. आपण कसे ग्रेट, आपल्या शक्तीने कुणाला कशी मदत केली अशी कायकाय बडबड जमीला करत असे. पण स्वतःच्या आजाराविषयी काही बोलत नसे. आपण अगदी पवित्र आहोत, असा तिचा दावा होता. 'चार वर्षांपूर्वी आजारी पडले तेव्हा मला कुठेतरी रक्त चढवले, त्यातून हा काविळीचा आजार मला झालाय', अशी तिची तिच्या आजाराविषयी थिअरी असे. एचआयवीविषयीतर ती बोलतच नसे. आजकाल सगळे जमीलाला सीतेची मैत्रीण म्हणू लागले.
"या आठवड्याच्या शेवटी जमीला घरी गेली नाही तर तुझ्या रूमवरच ट्रान्सफर करेन तिला', अशी धमकी सीतेच्या रेजने गमतीने तिला दिली. प्रकाश हल्ली निवळला होता. अधूनमधून नीट गप्पाही मारू लागला होता सीतेशी. कदाचित सीता आता पुरेशी जुनी झाली होती म्हणून किंवा प्रकाशच्या थीसिसचं काम जरा नीट मार्गी लागलं होतं म्हणून.

नंतर मात्र दर सहा आठवड्यांनी येणारी डबल इमर्जन्सी ड्यूटी सीतेच्या युनिटवर आली. जास्तीत जास्त बेड नवीन येणार्‍या रुग्णांकरिता रिकामे करावे लागणार होते. आता जमीलाला बॅकयार्डात शिफ्ट करायचे .

जिजामाता रुग्णालयाचा एक उपविभाग त्याच शहराच्या दुसर्‍या टोकाला होता. इथे अगदी शेवटच्या स्टेजचे रुग्ण ठेवले जात. ज्यांना फक्त देखभालीची गरज आहे काही विशेष औषधयोजना करायची नाही असे रुग्ण. शिकाऊ डॉक्टरांनी या विभागाचे नाव बॅकयार्ड ठेवले होते. एक दिवस सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून जमीलाला त्या बॅकयार्डात हलवले गेले. डबल इमर्जचे रुग्ण मार्गी लावायच्या नादात सगळे जमीलाला विसरूनही गेले.
एके सकाळी सीता कँटीनमध्ये नाश्ता करत असताना, "सीता, तुम्हारे लिए आज स्पेशल तोहफा है", असे बुधवारच्या युनिटचा हाऊसमन तिला मोठ्या उत्साहाने सांगत आला.
"कौन?''
"और कौन? जमीला."
"ती कशी काय?"
"अगं, ती परत तिकडे बॅकयार्डात अनकाँशस झाली होती. तिथल्या सिस्टर्सनी रात्रीच उचलून इथे आणले तिला. यावेळीही हायपोग्लायसेमियाच होता. सकाळपासून नीट उठून बसलीय आणि तुझीच आठवण काढतेय."
पुन्हा एकदा ट्रान्सफर होऊन जमीला सीतेच्या वॉर्डात आली. यावेळी मात्र प्रकाश इतकीच सीताही तिच्यावर वैतागली होती.
"कुठे त्या म्हातार्‍याकोतार्‍यांच्यात मला पाठवलंत मॅडम? मी जेवलेच नाही तीन दिवस. सलाईनही लावून घेतले नाही."
"धन्य आहेस. तुझ्या त्या सगेवाल्या कुठे गेल्या? आणि तो पोनीटेलवाला?"
"तो शर्टपँटवाला आमचा कुणी नाही. सरकारी कामं असली की हे लोक मदत करतात म्हणून गरज पडल्यास त्यांचे मेंबर होतो आम्ही. ते काय आमच्यासारखे नाहीत. ते कपडेपण कसे पुरुषांचे घालतात बघितलं का?"
"हो का? पण आता तू पळून तरी का जात नाहीस इथून? "
"मला माझी गुरुमाऊली स्वतः न्यायला येईल तेव्हाच जाईन मी", जमीला निग्रहाने म्हणाली.
न बोलता सीतेने पुन्हा एकदा सगळी कागदपत्रे गोळा केली आणि जमीलाला बॅकयार्डात धाडून दिले.

दोनच दिवसांनी, "अरे तुम्हारी जमीला बॅकयार्डसे भाग गयी", अशी आनंदाची बातमी वॉर्डच्या सिस्टरांनी तिला दिली. तिकडच्या वॉर्डच्या सिस्टर या सिस्टरांच्या ओळखीच्या होत्या. त्यांनीच फोन करून सांगितले होते.
जमीलाला घेऊन जायला कोणीतरी तिच्यासारखेच दोघे आले होते म्हणे. काही कागदपत्रं, डिस्चार्जची औषधे न घेताच निघून गेले ते लोक.
"बरं झालं. एकदा अगेन्स्ट मेडिकल अ‍ॅडवाईस गेली की आपला तिचा संबंध संपला. मग ती परत आली इथे तरी तिला ट्रान्सफर घ्यायची जबाबदारी आमच्या युनिटची नाही", सीता आनंदाने म्हणाली.

४.
सीतेची या युनिटमधली हाऊसमनशीप संपत आली होती. आता दोनतीन इमर्ज फक्त. मग ती दुसर्‍या युनिटमध्ये जाणार होती. आजकाल प्रकाशही अगदी चांगला वागत होता. तिला शिकवत होता. हल्ली कामे पटापट उरकत असल्याने इमर्जन्सीच्या आदल्या दिवशी कमी पेशंटस वॉर्डात असतील, तर तिला एका तासावरच असलेल्या आपल्या घरी जाउन यायला परवानगीही द्यायचा. आलटूनपालटून ती आणि सुहास दर पंधरा दिवसांनी एका रात्रीसाठी आपापल्या घरी जात.

अशीच एक इमर्ज. तशीच पेशंटची गर्दी. आणि अगदी त्यादिवशीसारख्याच काहीजणी झगमगीत कपड्यात कुणालातरी उचलून घेऊन आल्या. होय. ती जमीलाच होती.
"बघ हिला आपल्याच नशिबात लिहिलंय. नाहीतर पळून जाऊनही ही आपल्याच इमर्जच्या दिवशी कशी टपकली इथे?" प्रकाश जमीलाच्या पेपरवर नोट्‍स्‌ टाकताटाकता सीतेला म्हणाला.
यावेळेस मात्र जमीलाची तब्येत फारच बिघडली होती. हिपॅटिक कोमातच होती ती. तिच्या मैत्रिणींनी तिला आत आणून टाकलं आणि गायबच झाल्या त्या. बहुतेक काहीच औषधपाणी केलेलं नव्हतं तिने इतके दिवस.
सलग तीन दिवस बेशुद्ध होती ती. चौथ्या दिवशी चमत्कार व्हावा तशी शुद्धीवर आली. यावेळी मात्र तिची रक्त गोठण्याची प्रक्रिया पूर्णच बिघडली होती. किडन्याही फेल होत चालल्या होत्या. एकदा संध्याकाळच्या राऊंडला सीता तिला तपासत असताना अचानक जमीला म्हणाली, "मॅडम, मला एक फोन लावून द्याल?"
"कुणाला?"
"माझ्या भावाला, आत्तेभावाला," तिने एक लँडलाईन नंबर सांगितला.
नुकताच हिपॅटिक एनसेफॅलोपथीतून उठलेल्या व्यक्तीला एखादा नंबर इतका सुस्पष्ट आठवतोय हा दुसरा चमत्कार होता.
"माझा भाऊ आहे. जीवन. चेंबूरलाच घर आहे. मागच्या वेळी हॉस्पिटलमधून पळून गेले तेव्हापासून कित्येकदा त्याच्या घराजवळ जाऊन आले. पण ओळख दाखवायची हिंमत झाली नाही. पण आता घरच्या कुणाशी तरी बोलावंसं वाटतंय हो", ती व्याकुळ होऊन म्हणाली.
सीतेने फोन लावला.
"हॅलो, मी डॉक्टर सीता बोलत्येय जिजामाता हॉस्पिटलातून. मि. जीवन आहेत का?"
"हो बोलतोय ,काय काम आहे?" चक्क तोच होता फोनवर.
"तुमची बहिण श्यामला भालेराव अ‍ॅडमिट आहे आमच्या हॉस्पिटलात वीस नंबर वॉर्डात. तिला बोलायचंय तुमच्याशी", सीतेने सांगितलं.
"श्यामला....माझी तर अशी कुणी बहिण...ओह, द्या फोन तिला", तिकडून आवाज आला.
'तुम्ही जा आता' अशी खूण करत जमीलाने फोन घेतला आणि सीता पुरेशी लांब जाताच फोनवर बोलायला सुरुवात केली.
सगळे पेशंट तपासून सीता परत जमीलाजवळ आली तेव्हा फोन बाजूला ठेऊन जमीला रडत होती.
"काय झालं?"
"मी तुमच्याशी खूप खोटं बोलले हो मॅडम, मी श्यामला नाही, श्याम आहे मुळात."
"माहित्येय."
"तुम्हांला कळलं? कसं?"
"तू तीन दिवस बेशुद्ध होतीस गं. लघवीसाठी कॅथेटर घातलाय तुला. तसेच दिवसातून दोनदा एनिमा दिला गेलाय. तुला ग्लानीत लक्षात नाही आलं", सीतेने सांगितलं.
"अरे देवा, सगळंच कळलं तुम्हा<ला. खरंय ते. मी श्यामच आहे. श्याम भालेराव. ज्युनिअर कॉलेजात जायला लागल्यावर वाईट संगतीला लागलो. त्या लोकांनी फसवून हे हाल केले माझे. मला जमीला केलं. मीसुद्धा वाहावल्या गेले होते म्हणा. आता भोगतेय आपल्या कर्माची फळे."
"तुझ्या घरच्यांना कळवायचंय का?"
"नको नको, त्यांना बिचार्‍यांना आधीच मान खाली घालायला लागलीय माझ्यामुळे, अजून त्यांना त्रास नको.
माझा हा भाऊ माझा जवळचा मित्रंही होता म्हणून त्याला कळवतेय फक्त."

दुसर्‍या दिवशी सकाळी सीता वॉर्डात जायच्या आधीच जमीलाचा भाऊ भेटून गेला होता तिला. सीताला भेटलाच नाही. मात्र वॉर्डच्या सिस्टरांना हिच्या घरच्यांना घेऊन येतो, असे सांगून गेला होता. घरचा पत्ता मात्र काही केल्या दिला नव्हता. कदाचित घरचे जमीलाला श्याम म्हणून कसे स्वीकारतील याबद्दल त्याला स्वतःलाच खात्री नसावी. जमीलाची प्रकृती हळूहळू खालावत गेली. तिला ठिकठिकाणांहून रक्तस्राव होऊ लागला आणि एके दिवशी ती परत कोमात गेली.

५.
आज सीतेचा घरी जायचा दिवस. आज तिच्या लग्नाची पक्की बैठक होणार होती घरी. दोन्ही घरचे ठळक नातेवाईक येणार होते. आज ती घरी जाणार हे जवळपास सगळ्यांनाच माहिती होते.
"तीनही है पेशंट. कुछ लोड मत लो. जमीलाके बारेमें सुभाष को बोलकर जाओ. कुछ हुआ तो डिक्लेअर कर देगा. वैसे भी मॉर्गमें शिफ्ट करना पडेगा. रिलेटिवही नही है. तुम एंजॉय करो. कौन है आपका खुषनसीब राम, उसकी फोटो तो लेके आओ", असे म्हणून प्रकाश गेला.
ती जाण्यापूर्वीची एकेक कामे निपटत होती.
इतक्यात शुभ्र पांढर्‍या कपड्यातले टिपीकल गावच्या राजकारण्यांसारखे दिसणारे तीनचार लोक आले तिथे.

"कुठे आहे माझा श्याम?" एकजण म्हणाले.
'ओह, जमीलाचे नातेवाईक दिसतायत', सीतेने विचार केला.
"डॉ.सीता कोण आहेत?"
"मी आहे,बोला"
"आमच्या श्यामची भेट घडवून आणलीत तुम्ही मॅडम्, खूप आभारी आहे मी."
श्याम डीप कोमात होता. कुणाचीही भेट घ्यायच्या पार पलीकडे गेला होता तो. त्याची अवस्था बघून ते प्रौढ गृहस्थ धाय मोकलून रडू लागले.
"श्याम, काय केलंस हे तू श्याम?"
जीवनने श्यामचे लहानपणीचे फोटो, तरुणपणीचे फोटो आणले होते. श्याम अगदी वयात यायच्या वेळचे. चेहरा जवळपास तोच, मात्र जास्त पुरुषी. सगळ्या सिस्टर लोकांना अगदी भरून आलं ते बघताना.
जीवनने चाणाक्षपणे रेशनकार्ड, श्याम घर सोडून गेला तेव्हा पेपरात दिलेली 'हरवला आहे'ची जाहिरातही आणली होती.
"मॅडम, माझ्या लेकाला इथे बायकांच्या वॉर्डात काय ठेवलंय? पहिलं त्याला पुरुषांच्या वॉर्डात हलवा", त्याच्या वडिलांनी विनवणी केली.
'आता काही तासच उरलेत याचे आणि काय सुचतंय या लोकांना?' सीता विचारात पडली.
जणू तिच्या मनातलंच ओळखलंय असं जीवन म्हणाला, "आत्ता काही झालं तर सर्टिफिकेट द्याल ना...गावाला घेऊन जायचंय श्यामला. नाव श्याम असं हवंय आणि पुरुष असं हवंय सर्टिफिकेटात."

सीता काय करावं या बुचकळयात पडली. हे सगळं निस्तरून घरी जायला फार वेळ होत होता. त्याततर जाणे पुढे ढकलूनही चालणार नव्हते. तिला एक कल्पना सुचली. 'डीन्स चेंबरकडे ये', असा प्रकाशला फोन करून ती ऑफिसकडे वळली. जाताजाता एएससी मॅडमना फोन करून सगळा वृत्तांत त्यांच्या कानावर घालून त्यांची परवानगी घेतली.
"या सीताबाई, आज काय काम?" डीनसरांनी विचारलं. अधूनमधून वॉर्डातल्या तक्रारी मिटवण्यासाठी सगळ्या ज्युनियर डॉक्टरांना डीन चेंबरमध्ये बोलावणे आणि उपदेश असेच.
सीतेने सगळा प्रॉब्लेम कथन केला. इतक्यात प्रकाशही आला तिथे. सगळं ऐकल्यावर आणि श्यामच्या वडिलांशी बोलल्यावर मात्र डीनही हेलावले. त्यांच्या एकादोन फोन्सनी इतकी पटापट कामे झाली की जमीलाला नाव बदलून मेल वॉर्डात ट्रान्सफर करायचे ठरले.
जिजामाता हॉस्पिटलच्या इतिहासात प्रथमच कुणी पेशंट फिमेल वॉर्डातून मेल वॉर्डात ट्रान्सफर झाला. स्वतः सीतेने आणि वॉर्डच्या मुख्य सिस्टरांनी जमीलाला आता श्यामला मेल वॉर्डात सोडले. सुभाषला सगळ्या सूचना देऊन आणि सगळी सिच्युएशन थोडक्यात सांगून सीता त्या रात्रीपुरती घरी गेली. आता तिला आपल्या मागे वॉर्डात काय होतंय याची चिंता नव्हती. सगळ्यात सिरीयस केसतर सुभाषकडे ट्रान्सफर झाली होती.

६.
शुक्रवारी सकाळी घरून येताच सीता वॉर्डकडे निघाली. हॉस्पिटलच्या लॉबीत प्रवेश करताच श्यामचे बाबा आणि मंडळी स्ट्रेचरसह येताना दिसली. श्यामचे बाबा धावतच तिच्याकडे आले आणि सर्वांसमोर तिचे पाय धरून म्हणाले, "नशिबानेच भेट घडवली आपली मॅडम. हे बघा आम्ही घेऊन चाललो श्यामला. या शेवटच्या पहा त्याला."
वॉर्डबॉयने एका हातात डेथ रजिस्टर पकडून एका हाताने श्यामच्या चेहर्‍यावरची चादर उचलली.
श्याम गेला होता. वेगळाच दिसत होता.
"कालच रात्री हजाम बोलवून केस कापून घेतले पोरी याचे. घरी न्यायचंय त्याला."
''ओह.."
''तुझे खूप उपकार झाले पोरी.. तुझ्यामुळेच भेट झाली आमची श्यामशी. देव तुला सुखात ठेवो पोरी", रडतरडत श्यामचे बाबा म्हणाले.
वॉर्डबॉय शववहिनीच्या दिशेने स्ट्रेचर ढकलू लागला.

सीता ओलावल्या डोळ्यांनी एका किन्नराची अखेरची ट्रान्सफर पाहत राहिली.

- साती

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

साती!!!!!!!!!!!!!!!!!!!

आवडली कथा. परिणामकारक झालीय.

आवडली असं म्हणावत नाही खरंतर. छान लिहिलि आहे कथा

छान लिहिली आहे कथा. लेखिका स्वतः डॉक्टर असल्याने तपशील अर्थातच एकदम 'ऑथेंटिक'.

आवडली कथा.

सुरेख. मनाला भिड्ली.

कथा आवडली.

सिंडरेला +१००

गोष्ट आवडली.

भाषा, कथेचा ओघ सारेच आवडले

सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडताहेत असे वाटत राहिले ! खुप आवडली.

छान लिहीली आहे कथा. आवडली.

साती, कथा आवडली.

सगळ्यांना धन्यवाद.

छान कथा!

Sati, eka vegalyach vishaya varachi katha. Farach bhavali. Tuzi lihinyachi shaili dekhil mast vatali.

लिखाण आवडेश :)

कथा सुरेखच रंगवलीये...

या तृतीय पंथींबद्दल कायमच सहानुभूती वाटते. का आपला समाज यांच्याकडे फक्त "याच" नजरेने बघतो हे कळत नाही. आणि हे अशा प्रकारचे "कॅस्ट्रेटेड मेल" असू शकतात हे पहिल्यांदाच कळले. अक्षरशः काटा आला अंगावर हे सगळे विचित्र प्रकार वाचताना ...

पण ...
इतक्यात शुभ्र पांढर्‍या कपड्यातले टिपीकल गावच्या राजकारण्यांसारखे दिसणारे तीनचार लोक आले तिथे. >>>> राजकारणी मंडळी एवढी संवेदनशील असतात का ?? (माझा प्रश्न अजागळही असू शकेल..) राजकारण, इभ्रत इ. करता नातीगोतीही पणाला लावतात तिथे एका मृत व्यक्तिसाठी एवढा खटाटोप करतील का ? (वै. मत, कृ गै नसावा.)

शशांक, ती राजकारण्यांसारखी दिसणारी मंडळी म्हणजे श्यामचे काका, बाबा इ. होते.
लोकल लेवलचे त्यांच्या गावचे राजकारणी.
इथले मुंबईचे नव्हते.

सुंदर लिहिली आहे. सुरुवात थोडी क्लिष्ट वाटली मला, माझा ऑल्मोस्ट धीर सुटला होता पण दुसर्‍या प्रकरणापासून मस्त ग्रिप आली. पुढे काय याची उत्सुकता ताणली गेली. सीता सर्वतोपरी मदत करत होती पण पेशंट मध्ये गुंतली नव्हती हे छान लिहिल्यामुळे, मला पण त्रयस्थपणे वाचता आली. मृत्युची अटळता प्रेडिक्टेबल असून सुखांत शेवट केल्याबद्द्ल धन्यवाद. मेडिकल बॅकग्राऊंड असणार्‍या कथा मोस्टली वाचकाला येनकेनप्रकारे रडवण्यासाठी लिहिलेल्या असतात असा माझा ठाम समज आहे. त्याला अपवाद केल्याबद्द्ल धन्यवाद.

चांगली लिहिली आहे कथा.. 'डोमेन' नॉलेज अगदी ऑथेंटीक आणि भारी !

या तृतीय पंथींबद्दल कायमच सहानुभूती वाटते. पण भीतीही वाटते. साती - सत्य घटना आहे का?

मस्त कथा! खूप आवडली.

राजसी, सुरूवातीला थोडा मेडिकल कॉलेजचा वर्किंग पॅटर्न लिहायचा प्रयत्न केला.
तो खूप वैतागवाडी झालाय असं मला माझ्या घरच्यांनीपण सांगितलं.
तरिही पेशंस ठेऊन वाचल्याबद्दल धन्यवाद.
सत्यकथा आहे का हे बर्‍याच जणांनी विचारलंय.
हो. नावे बदलली आहेत.
सीतेच्या नावातल्या काना आणि वेलांटी यांच्या जागा बदलल्या आहेत.
;)

मस्त लिहिली आहे कथा !!

साती, खूप छान लिहिले आहे. गोष्ट आवडली.

छान लिहीली आहेस कथा साती. :)

कथा आणखी फुलवता आली असती असं वाटतं. सुरूवातीच्या, मेडिकल कॉलेजचा वर्किंग पॅटर्नमधे आणखी थोडा पोत दाखवता आला असता. रंग, वास, चवी, असे काही उल्लेख कदाचित!

सीतेच्या लग्नाचा उल्लेख येतो, प्रकाशच्या थिसीसचा. असे धागे आणखी वाढवता आले असते. (पण मग कदाचित 'निरामय' सदराखाली येण्यापेक्षा कथांमधेच जास्त शोभली असती.)

आणि एवढी कटकट कथा(बीज) आवडल्यामुळे.

खुपच सुंदर लिहीलय!

साती, कथा भाकीतेय आहे. जमीला मरणार हे लगेच कळतं. तरीपण मन सुन्न होतंच. प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा त्यावेळचं वातावरण अधिक सर्द असतं. ते वातावरण अचूकपणे शब्दांत उतरलं आहे.
आ.न.,
-गा.पै.