'बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी युवकाचा मृत्यू', 'बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात अघोषित संचारबंदी', 'जुन्नरमध्ये बिबट्यांचा हैदोस', 'आरे कॉलनीतला बिबट्या नरभक्षक?' अशा बातम्या आपण सगळेच गेली काही वर्षं वर्तमानपत्रांतून सतत वाचत असतो. 'बिबट्यांच्या समस्येला माणूस जबाबदार आहे का? एसएमएस करा तुमचे उत्तर..' असंही आपण टीव्हीवर अधूनमधून ऐकत असतो. जुन्नर, अकोले, ठाणे, संगमनेर या भागांमध्ये बिबटे विरुद्ध माणूस असा संघर्ष उभा राहिल्याचं चित्र प्रसारमाध्यमांमधून रंगवलं जातं.
वाढतं शहरीकरण, जंगलांची नासधूस अशी अनेक कारणं प्राणी-माणूस संघर्ष होण्यामागे दिली जातात. तोडगे अभावानेच सुचवले जातात. शिवाय आपण जे ऐकतो-वाचतो, त्यांतलं किती खरं आणि किती खोटं, जंगलांतून बिबटे खरंच बाहेर गावांकडे आले आहेत का, माणसांवर होणार्या रोजच्या हल्ल्यांमुळे बिबट्यांची शिकार करण्याशिवाय पर्याय नाही का, असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरं लोकांना देण्यासाठी, खरे प्रश्न काय आहेत, या प्रश्नांची उत्तरं कशी शोधता येतील, हे लोकांना समजवण्यासाठी आणि बिबट्यांचं जीवन अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यासाठी अनेक वर्षं डॉ. विद्या अत्रेय जिवाचं रान करत आहेत.
डॉ. विद्या अत्रेय या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या वन्यजीव-अभ्यासक आहेत. सध्या त्या सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीज, बंगळुरू आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी येथे संशोधन करत आहेत. बिबट्या हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय. 'बिबट्या-माणूस संघर्ष' या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच.डी.ची पदवी मिळवली आहे. २००३ सालापासून बिबट्यांशी संबंधित अभ्यासाला आणि कार्याला त्यांनी वाहून घेतलं आहे. बिबट्यांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या अभयारण्यांच्या बाहेरच्या जीवनाचा, त्यांच्या माणसाशी येणार्या संबंधांचा अभ्यास करणं, या प्रश्नांबद्दल जनजागृती करणं हे डॉ. अत्रेय अनेक वर्षं विलक्षण निष्ठेनं करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक राज्यांच्या वनविभागांबरोबर काम केलं असून २०११ साली बिबट्या-माणूस संघर्षावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयानं जारी केलेली नियमावली तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
डॉ. अत्रेय यांना वन्यजीवन व मानवीजीवन यांच्या सामाजिक-सांस्कृतिक पैलूंमध्येही रस आहे. अतिशय मोकळ्या, डोळस नजरेनं आणि करुणेनं त्या वन्यप्राण्यांच्या व माणसांच्या व्यवहारांकडे पाहतात. आजोबा, लक्ष्याई, सीता, शार्लेट, जय महाराष्ट्र या बिबट्यांचं आयुष्य अभ्यासताना डॉ. अत्रेय यांनी या प्राण्यांना दिलेला मान, त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा केलेला आदर बरंच काही शिकवून जातात. एरवी फारसा न आढळणारा, अतिशय दुर्मीळ असा हा पैलू आहे. एकांगी विचार त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग नाहीत. वनविभागाला पूर्णपणे दोषी ठरवणं, जंगलांजवळ राहणार्यांना नावं ठेवणं त्यांनी कधीही केलेलं नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रश्नांची उत्तरं शोधण्याकडे त्यांचा कल असतो.
डॉ. विद्या अत्रेय यांच्या अफाट कामाचा गौरव म्हणून त्यांना आजवर काप्लान ग्रॅज्यूएट अवॉर्ड, २०१२ सालचं टीएन खोशू मेमोरियल अवॉर्ड, महाराणा उदयसिंह अवॉर्ड असे अतिशय मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची आणि आजोबा या बिबट्याची गोष्ट लवकरच चित्रपटाच्या स्वरूपात सगळ्यांसमोर येणार आहे.
डॉ. विद्या अत्रेय यांच्याशी साधलेला हा संवाद -
वन्यजिवांच्या अभ्यासाकडे तुम्ही कशा आकृष्ट झालात?
मी अगदी लहान होते, तेव्हापासून मला प्राण्यांबद्दल जिव्हाळा होता. पण याच क्षेत्रात काहीतरी करायचं, असं काही तेव्हा ठरवलं नव्हतं, कारण त्यावेळी आजसारख्या संधी उपलब्ध नव्हत्या. वन्यजिवांच्या अभ्यासासंबंधीचे अभ्यासक्रमही भारतात नव्हते. मी बी.ए.च्या दुसर्या वर्षाला असताना आमच्या कॉलेजाची सहल गेली होती तमीळनाडूतल्या अण्णामलईच्या जंगलात. तिथे आमच्या कॉलेजातले विद्यार्थी वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडानं आयोजित केलेल्या एका वन्यजीव-अभ्यासाच्या शिबिरात सहभागी झाले होते. त्या वेळी जंगलानं मला खरी भुरळ घातली. मी अक्षरश: प्रेमातच पडले त्या जंगलाच्या. आपल्याला कायम जंगलांच्या, वन्यप्राण्यांच्या सान्निध्यात राहता येईल, असं काहीतरी करावं, असं मला प्रकर्षानं तेव्हा वाटलं. पण मी होते कलाशाखेची विद्यार्थिनी. कलाशाखेच्या विद्यार्थ्यांनी वन्यजीवविज्ञानाशी संबंधित अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची सोय तेव्हा फक्त पाँडिचेरी विद्यापीठात होती. अर्थात हेही मला माहीत नव्हतं. एका मित्रानं सांगितलं म्हणून कळलं. मग मी पाँडिचेरीला जाऊन वाईल्डलाईफ इकलॉजी या विषयात एम.एससी. केलं.
आणि त्यानंतर तुम्ही देहरादूनच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात रुजू झालात संशोधनासाठी.
त्या वेळी ही संस्था स्थापन होऊन फार काळ लोटला नव्हता. फारतर दहाबारा वर्षं झाली होती संस्थेला. त्या वेळची परिस्थिती आजपेक्षा वेगळी होती. आज वन्यजीवसंरक्षणाशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या विषयांबद्दल अभ्यासकांना माहिती आहे. त्या वेळी मात्र वन्यजीवनाशी संबंधित कायदे नुकतेच अस्तित्वात आले होते. या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक आणि विद्यार्थीही थोडे होते. प्रत्येकालाच माहिती मिळवण्यासाठी चाचपडावं लागत होतं.
मी वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात प्रवेश घेतला होता पीएच.डी करण्यासाठी. पण पीएच. डी. न करता मी दोन लहान शोधप्रकल्पांवर काम केलं. पहिला प्रकल्प होता आशियाई सिंहांशी संबंधित. या सिंहांच्या वसतीसाठी नवी ठिकाणं शोधण्याचा हा प्रकल्प होता आणि आमच्या चमूत मी सर्वांत लहान होते. खरं म्हणजे मी अंदमानला जाणं अपेक्षित होतं, पक्ष्यांशी संबंधित एका प्रकल्पावर काम करायला. पण हा भल्यामोठ्या मांजरांचा प्रकल्प मला जास्त आकर्षित करणारा होता कारण मांजर हा माझा अतिशय आवडता प्राणी. माझ्या आईचं मार्जारप्रेम माझ्यात उतरलं असावं. आईचं मांजरांवर खूप प्रेम होतं. मी लहान होते तेव्हापासून आमच्या घरी मांजरं असत. एका वेळी अगदी सहासात मांजरं कायम असायचीच. त्यामुळे अंदमानच्या प्रकल्पावर न जाता मी या सिंहांच्या प्रकल्पात काम करायला सुरुवात केली. गीरच्या जंगलात आशियाई सिंहाची लोकसंख्या फार वाढली होती. त्यामुळे तिथल्या सिंहांसाठी नवं वसतिस्थान शोधणं भाग होतं. म्हणून मध्य भारतात चारपाच ठिकाणं निश्चित केली गेली होती आणि या ठिकाणी आशियाई सिंहांना सोडल्यास ते वस्ती करू शकतील का, हे आम्हांला ठरवायचं होतं. डॉ. रवी चेल्लम यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम सुरू होतं. मी अगदीच नवखी असल्यानं आकडेवारी आणि इतर थोडीफार माहिती गोळा करण्याचं काम माझ्याकडे होतं.
नंतर मी गेले अरुणाचल प्रदेशात क्लाऊडेड लेपर्डचा सर्व्हे करायला. माझं तिथलं काम सोपं असलं, तरी काम करण्यासाठी परिस्थिती कठीण होती. हल्ली संशोधक सर्वत्र विमानानं हिंडतात, त्यांच्याकडे अत्याधुनिक साधनसामुग्री असते. त्या वेळी तसं काही नव्हतं. दादर-गुवाहाटी एक्सप्रेसनं तीन रात्री प्रवास करून मी गुवाहाटीला पोहोचायचे. मग तिथून अरुणाचल प्रदेश गाठायचा. बाहेर कुठे फोन करायचा असला तरी किमान पंचवीस किलोमीटर चालावं लागे. एवढं चालूनही त्या एसटीडी बुथावरून फोन लागेलच याची शाश्वती नसे. या अडचणी तर होत्याच, पण मला एकंदर भारतीय कार्यपद्धतीचाही जरा कंटाळा आला होता. पुढे शिकण्याची इच्छाही होती. म्हणून मी अमेरिकेत आयोवा विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. पण पीएच.डी.साठीचं संशोधन करण्याआधी मला अमेरिकेतलं पदव्युत्तर शिक्षण घेणं आवश्यक होतं. त्यासाठीचं संशोधन मी पनामात केलं. दीड वर्षं मी आयोवात होते आणि नंतरचं एक वर्षं मी पनामात काढलं. तिथल्या स्मिथसोनियन सेंटरमध्ये मी काम केलं. उष्ण कटिबंधीय प्रदेशातल्या वनस्पतींवर मी संशोधन करत होते. मी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आणि भारतात परतले. पीएच.डी.साठीचं संशोधन पूर्ण केलं नाही. मला अमेरिकेतलं वातावरण आवडलं नव्हतं. तिथे अजून काही काळ राहण्याची माझी तयारी नव्हती.
नंतर मणिपाल विद्यापीठाकडे मी भारतात केलेल्या कामावर आधारित थीसिस पीएच.डी.साठी सादर केला. बिबटे आणि माणूस यांचे संबंध, हा माझ्या अभ्यासाचा विषय.
तुम्ही ज्या वेळी भारतात परतलात, त्या वेळी इथे वन्यजीवसंरक्षणासाठी १९७२ साली तयार केलेले कायदे लागू होते. इंदिरा गांधींनी स्वत: लक्ष घालून हे कायदे लागू केले होते. त्यांच्या प्रभावामुळे ते पाळलेही जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र परिस्थिती खालावली, असं म्हटलं जातं.
माझं याबाबत जरा वेगळं मत आहे आणि हे मत वैयक्तिक अनुभवांच्या आधारे तयार झालं आहे. या मतांच्या पुष्ट्यर्थ मी कुठलीही आकडेवारी किंवा पुरावे देऊ शकत नाही किंवा याबद्दल एखाद्या संशोधकानं अभ्यास केला आहे, असंही मला वाटत नाही. इंदिरा गांधींनी वन्यजीवसंरक्षणासाठी कायदे लागू केले. त्यांच्यासारखी प्रभावशाली व्यक्ती जेव्हा अशा विषयाबद्दल आस्था दाखवते, कायद्याच्या बाजूनं ठामपणे उभी राहते, कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून स्वत: सतत लक्ष घालते, तेव्हा त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. भारतातही १९७२ सालानंतर काही चांगल्या गोष्टी घडून आल्याच. पण तरीही मला असं वाटतं, की अमेरिकेहून आलेल्या विचारसरणीचा इंदिराजींवर फार मोठा प्रभाव होता. वन्यजीवसंरक्षणाबद्दल आस्था बाळगणारे, धोरणं ठरवणारे अनेक एकतर संस्थानिकांच्या कुटुंबांतले होते किंवा त्यांच्या अमेरिकेतल्या संस्थांशी संबंध होता. अमेरिकेचं तेव्हाचं आणि आजचंही वन्यजीवधोरण काय? तर माणूस आणि प्राणी यांना एकमेकांपासून वेगळं ठेवणं. तिथे वसाहतवादी आले. जंगलं तोडली, मूळ नागरिकांच्या कत्तली झाल्या, त्यांना विस्थापित केलं गेलं. नंतर पार्क आणि अभयारण्य स्थापन केले गेले. त्यामुळे माणसं आणि प्राणी यांची क्षेत्रं कायम वेगवेगळी राहिली.
भारतात, किंबहुना भारतीय उपखंडात, असं कधीच घडलं नाही. भारतात माणूस, झाडं आणि प्राणी कायम एकमेकांसोबत राहत आहेत. जगात अन्यत्र हे फार क्वचित घडलं आहे. भारतात मात्र प्राण्यांना आपल्या जीवनात सामावून घेण्याची फार जुनी परंपरा आहे. अजूनही खेड्यांतल्या घरांमध्ये कुत्रीमांजरंगायबैलशेळ्यामेंढ्या असतात. त्यामुळे आपल्याकडे माणूस आणि प्राणी यांचा निकटचा संबंध आहे. एक रेष आखली आणि प्राण्यांना सांगितलं की, ही रेष ओलांडायची नाही, असं होऊ शकत नाही. जंगलाबाहेर येणार्या प्रत्येक प्राण्याला तुम्ही मारणार आहात का? नाही. तेही शक्य नाही. प्राण्यांना पूर्णत: वेगळं करण्याचं अमेरिकी धोरण आपल्याकडे म्हणूनच इतर समस्यांना जन्म देऊ शकतं. किंबहुना काही ठिकाणी अशा समस्या निर्माण झाल्याच.
तुम्ही भारतातल्या आणि अमेरिकेतल्या कार्यशैलीचा उल्लेख केलात. काय फरक वाटला तुम्हांला या दोन्हींमध्ये?
अमेरिकेतलं वातावरण हे बर्यापैकी व्यावसायिक होतं. भारतात मात्र तुमचे एखाद्या व्यक्तीबरोबर संबंध कसे आहेत, त्यावर तुमचं काम होईल की नाही, हे ठरतं. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना घरी जेवायला बोलावता का, किंवा दिवाळीत भेटवस्तू देता का, यांवर अमेरिकेत काहीही अवलंबून नसतं. भारतात मात्र तसं नाही.
तुमचं बिबट्यांविषयीचं संशोधन कसं सुरू झालं?
अमेरिकेहून परतल्यावर मी चिले देशात गेले. तिथे माझे पती पोस्ट-डॉक संशोधन करत होते. आम्हांला मुलगी झाली आणि ती दोन वर्षांची असताना आम्ही भारतात परतलो. ती लहान असल्यानं मी काम न करण्याचा तात्पुरता निर्णय घेतला होता. माझ्या नवर्यानं नारायणगावच्या जीएमआरटीतून पीएच.डी. केलं होतं आणि आता आम्ही तिथेच राहत होतो, कारण तो त्याच संस्थेत पुढचं संशोधन करत होता. त्यावेळी जुन्नर तालुक्यातले बिबटे सगळीकडे गाजत होते. आम्ही चिलेत असतानाही जीएमआरटीतले प्रोफेसर आणि त्यांच्या पत्नी मला इमेल पाठवून विचारायचे, की इथल्या बिबट्यांच्या समस्येबद्दल कोणी मदत करू शकेल का? नारायणगावला आल्यावर सगळी परिस्थिती माझ्या समोर होती. तिथे संजय ठाकूर नावाचा माझा एक मित्र होता. तो म्हणाला, की इथल्या मनुष्य-बिबट्या संघर्षाचा आपण अभ्यास करूया, मी सगळं फिल्डवर्क करतो, तू फक्त या प्रकल्पाचं व्यवस्थापन बघ. मग नंतर आमचे अजून दोन मित्र या प्रकल्पात सामील झाले आणि आमचं काम सुरू झालं. ही २००३-२००४ची गोष्ट.
या कामाचं स्वरूप काय होतं?
सहा महिन्यांचा हा लहानसा प्रकल्प होता. वनविभागाच्या अधिकार्यांशी बोलून मी माहिती घेत असे आणि मग संजय गावोगावी जाऊन बिबट्यांनी ज्यांची गायीगुरं मारली आहेत, अशांच्या मुलाखती घ्यायचा, बिबटे कुठे दिसले त्याची जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) वापरून यादी तयार करायचा. सगळं फिल्डवर्क त्यानंच केलं. मग या प्रकल्पाच्या शेवटी पिंजर्यात पकडून दुसरीकडे सोडायचे असलेल्या बिबट्यांमध्ये मायक्रोचिप लावण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळी मी डॉ. अनिरुद्ध बेलसरे या व्हेटरिनरी डॉक्टरांबरोबर काम करत होते. सर्वाधिक बिबटे वनक्षेत्रात राहतात, हा समज खोटा असल्याचं या सर्वेक्षणात आमच्या लक्षात आलं.
जंगलात खायला काहीच उरलं नाही म्हणून बिबट्या गावात येतो, असं तेव्हा वनाधिकार्यांचं आणि गावकर्यांचं मत होतं. बिबट्या राहतो कुठे, तर जंगलात आणि जंगलातून तो गावात येतो, असाच सगळ्यांचा समज. पण आमच्या सर्वेक्षणानं हा समज सपशेल खोटा ठरवला. बिबट्या गावाच्या आसपासच राहतो, फक्त तो गावकर्यांना दिसत नाही. शिवाय आमच्या असं लक्षात आलं की, बिबट्यांची ही जी समस्या होती, ती पूर्णपणे माणसामुळे निर्माण झाली होती. जुन्नरच्या परिसरात जे बिबटे हल्ले करत होते, ते वनविभागानंच कधीतरी तिथे आणून सोडले होते.
बिबट्यांनी त्या परिसरात दोन वर्षांत सुमारे पन्नास माणसं मारली होती. शंभर बिबट्यांना पकडण्यात आलं. हे बिबटे पुन्हा दुसरीकडे सोडण्यात आले. त्याच वर्षी यावल अभयारण्यात अवघ्या दोन महिन्यात बिबट्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या सहा बातम्या आल्या. यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात १७० चौरस किमी क्षेत्रात पसरलं आहे. अभयारण्याच्या सीमेवर आणि आतमध्येसुद्धा माणसाची वस्ती आहे. पण तिथे राहणार्या माणसाचा प्राण्यांशी कधीच संघर्ष झाला नव्हता. २००३च्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये मात्र माणसांवर बिबट्यांनी केलेल्या सहा हल्ल्यांच्या बातम्या आल्या. मग पिंजरे लावले गेले, दोन बिबटे पकडले, त्यांना जुन्नरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये आणण्यात आलं आणि हल्ले थांबले. पूर्वी कधीही न झालेले हल्ले २००३ सालीच का झाले? तर हल्ले करणारे हे दोन बिबटे जुन्नरहून वनविभागानं यावलला आणून सोडले होते. त्या बिबट्यांमध्ये बसवलेल्या चिपच्या मदतीनं ही ओळख पटवण्यात आली होती. म्हणजे बिबट्यांना दूर सोडून समस्या संपली नव्हती. उलट ती आता दुसरीकडेही निर्माण झाली.
बिबटे गावाशेजारी पूर्वापार राहत आहेत. अगदी १८८३ सालच्या नाशिक गॅझेटियरमध्येसुद्धा 'बिबट्या गावातली कुत्री उचलून नेतो आणि त्याला दाट जंगलांपेक्षा छोट्या झाडांमागे लपायला आवडतं', असा उल्लेख आहे. पण बिबट्यांनी गावाजवळ असू नये, अशी माणसाची अपेक्षा असते. त्यामुळे तिथले बिबटे पकडून दुसर्या जंगलात सोडले जातात आणि समस्या वाढते. बिबट्यांना जर त्यांच्या मूळ वसतिस्थानी राहू दिलं, त्यांना त्रास दिला नाही, तर त्यांच्यामुळे माणसाला अगदी नगण्य उपद्रव होतो. ते कुत्री खातात, कधीतरी एखादी बकरी मारतात. दिवसा लपून बसतात आणि रात्रीच बाहेर पडतात. माणूस झोपल्यावरच त्यांचा संचार सुरू होतो. मात्र त्यांना पकडून तुम्ही दुसर्या ठिकाणी सोडलं, तर मात्र ते माणसावर हल्ला करू शकतात.
बिबट्या आणि माणूस यांच्यात सर्वत्र संघर्ष आहे, असं चित्र रंगवण्यात येतं. पण बागायती क्षेत्रात राहणार्या बिबट्यांनी हा समज खोटा ठरवला आहे. बिबट्यांची संख्या आणि त्यांनी माणसावर केलेले हल्ले यांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे. हेच मी ठाणे जिल्ह्याबद्दलही म्हणेन. १९९१ ते २०१२ या काळात ठाणे वनविभागात, ज्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर अभयारण्य, तानसा अभयारण्य आणि ठाणे, डहाणू, शहापूर, जव्हार, अलिबाग व रोहा यांचा समावेश आहे, बिबट्यानं माणसावर हल्ला करण्याच्या सदुसष्ट घटना घडल्या. या सदुसष्ट घटनांमध्ये एकतीस माणसं मरण पावली. बिबट्यांची संख्या आणि माणसाची संख्या यांचं गुणोत्तर पाहिलं, तर या हल्ल्यांच्या घटना अगदी तुरळक आहेत, असं आपण म्हणू शकतो.
बिबट्यांना दुसरीकडे सोडल्यावर, म्हणजे ट्रान्सलोकेशन केल्यावर, हे हल्ले का होतात?
बिबट्यांना त्यांचं मूळ स्थान अतिशय प्रिय असतं. त्यांच्या सवयीच्या ठिकाणीच ते त्यांच्या पद्धतीनं जगू शकतात. उदाहरणार्थ, मला माझं हे घर अगदी नीट माहीत आहे. भूक लागली तर स्वयंपाकघरात कुठे काय ठेवलं आहे, तहान लागली तर पाणी कुठे आहे, माझ्यावर हल्ला झालाच तर लपायचं कुठे, हे मला ठाऊक आहे. उद्या जर मला तुम्ही एका नव्याच घरात नेऊन ठेवलं, तर तिथे मला अन्न कुठे मिळेल, लपण्यासाठी योग्य जागा कुठली, हे मला कळणार नाही. बिबट्यांच्या बाबतीतही असंच होतं. नव्या, अनोळखी जागी ते बावचळतात. शिवाय बिबट्या हा अतिशय समाजप्रिय प्राणी आहे. बिबट्याची पिल्लं बराच काळ त्यांच्या आईबरोबर राहतात. या पिल्लांना जर तुम्ही आईपासून वेगळं केलं आणि नव्या ठिकाणी सोडलं, तर शिकार कशी करायची, कुठे करायची, लपायचं कसं आणि कुठे, हे त्यांना कळणारच नाही. आणि मग त्यातून माणसावर हल्ले होतील. अगदी आपल्या घरातलं साधं मांजरही माणसाला बर्यापैकी गंभीर जखमी करू शकतं. अनोळखी माणसांवर मांजरं हल्ले करतातही. बिबटे तर मांजरांपेक्षाही मोठे. त्यांच्या हल्ल्यांतून वाचणं कठीणच.
दुसरं असं की, एखाद्या भागातून जितके जास्त बिबटे दूर सोडले जातील, तितका तो भाग तरुण किंवा लहान बिबट्यांना राहण्यासाठी मोकळा होत जातो. आईपासून वेगळे झालेल्या बिबट्यांना त्यांच्या अधिकार गाजवण्यासाठी स्वतंत्र जागा लागते. एरवी मोठे बिबटे अशा तरुण बिबट्यांना मारून टाकतात किंवा हुसकावून लावतात. एखाद्या भागातली बिबट्यांची संख्या मर्यादेत ठेवण्यासाठी निसर्गानं केलेली ही योजना असते. मोठे बिबटे नसतील तर तरुण बिबटे त्या जागी येऊन राहतात. त्यामुळे मोठ्या बिबट्याला पकडून, दूर सोडून आपण बिबट्यांची संख्या वाढवतो, शिवाय माणसाबरोबरच्या संघर्षाची शक्यताही मजबूत करतो. म्हणून मग या बिबट्यांना पकडून इतरत्र सोडू नका, अशी विनंती आम्ही वनविभागाच्या अधिकार्यांना केली.
या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पकडलेल्या बिबट्यांमध्ये मायक्रोचिप बसवत होतो. हे बिबटे तिथून दुसरीकडे सोडण्यात येणार होते. त्या वेळी दर महिन्याला डॉ. बेलसर्यांबरोबर मी संगमनेरला जात असे. संगमनेर हे जुन्नरच्या शेजारचं खोरं. तिथल्या अधिकार्यांनीही बिबटे पकडलेले असत आणि त्यांच्यातही मायक्रोचिप बसवायची असे.
बिबट्यांमध्ये मायक्रोचिप का बसवतात?
मायक्रोचिपमुळे बिबटे ओळखता येतात. ही चिप बिबट्याच्या शेपटीच्या वरच्या भागात बसवली जाते, कारण चिप लावताना समोरून एक व्यक्ती बिबट्याचं लक्ष वेधून घेऊ शकते. अगदी छोट्याशा असतात या चिप आणि स्कॅनरच्या मदतीनं बारकोडाप्रमाणे त्या वाचता येतात. एका ठिकाणाहून दुसरीकडे सोडलेल्या बिबट्यांच्या बाबतीततर ही चिप फार महत्त्वाची ठरते, कारण एखाद्या बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला पकडलं, तर तो बिबट्या मूळचा तिथलाच आहे की दुसरीकडून आणून सोडलेला, हे कळतं. जळगाव जिल्ह्यातल्या यावल इथे आणि राधानगरीत माणसावर झालेल्या हल्ल्यांच्या दोनतीन घटनांमध्ये या मायक्रोचिपमुळे बिबट्यांची ओळख पटली. हे बिबटे मूळचे तिथले राहणारे नव्हते. त्यांना तिथे सोडण्यात आलं होतं.
संगमनेरला बिबट्यांमध्ये मायक्रोचिप बसवत असताना आमच्या असं लक्षात आलं की, पकडलेल्या एकाही बिबट्यानं माणसावर हल्ला केला नव्हता. बिबट्या दिसला म्हणून, त्यानं बकरी किंवा कुत्रं मारलं म्हणून त्याला सापळा लावून पकडलं होतं. माणसाला इजा न करता मनुष्यवस्तीच्या जवळ वर्षानुवर्षं बिबट्यानं राहणं हे मला अद्भुतरम्य वाटलं. प्रोजेक्ट वाघोबाचा जन्म या घटनेतून झाला. २००७ ते २०१२ अशी पाच वर्षं मी संगमनेरच्या खोर्यात प्रोजेक्ट वाघोबावर काम केलं. कॅमेरा ट्रॅपिंग वापरून बिबट्यांच्या संख्या किती हे निश्चित करणं, त्यांची विष्ठा तपासून ते काय खातात हे बघणं, त्या परिसरात राहणार्या लोकांना बिबट्याचा उपद्रव कसा आणि किती होतो, त्यांचं किती नुकसान होतं, याचा आढावा घेणं, बिबट्यांना कॉलरी बसवणं, हे या प्रकल्पाचं स्वरूप होतं.
ट्रान्सलोकेशनला काही पर्याय नाही का?
नाही. कारण बिबटे सगळीकडेच आहेत. एखादा बिबट्या इकडून तिकडे नेला तरी बिबट्यांच्या संख्येत काय फरक पडणार आहे? हे वाटतं तितकं साधं नाही. भारतात वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये राहतात. बिबटे, कोल्हे, लांडगे, तरस, रानमांजरी असे प्राणी सगळीकडे सापडतात. बिबट्यांची संख्या एखाद्या ठिकाणी कमी असली, तर तिथे कोल्हे किंवा लांडगे जास्त असतील. पण वन्यप्राणी नाहीतच, असं होणार नाही. आता, उदाहरणार्थ, तुम्हांला अमूक एका ठिकाणी बिबटे नको आहेत. तुम्ही समजा दहा बिबटे पकडता आणि त्यांना मारून टाकता. या बिबट्यांनी मोकळी केलेली जागा आता तरुण बिबट्यांना खुणावते. ते तिथे येऊन राहतात कारण तिथे आता अन्न जास्त असतं. समजा या दहा बिबट्यांना तुम्ही दुसरीकडे नेऊन सोडलं, तर हे बिबटे पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी येतील. मधल्या काळात कदाचित त्यांची जागा काही तरुण बिबट्यांनी घेतली असेल, त्यामुळे तिथली बिबट्यांची संख्या वाढेल. म्हणजे बिबट्यांना मारून टाकणं किंवा दुसरीकडे नेऊन सोडणं हे पर्याय असू शकत नाहीत.
मग बिबट्यांचा मानवी वसाहतीत हस्तक्षेप कमी करण्यासाठी उपाय काय? तर बिबट्यांना उपलब्ध असणारं अन्न कमी करायचं. बिबटे जिथे दिवसभर लपून राहतात, ते उसाचे फड जमीनदोस्त करा, असं तुम्ही शेतकर्यांना सांगू शकत नाही. पण बिबट्यांना अन्न कमी मिळेल, अशी व्यवस्था करता येते. उदाहरणार्थ, अकोले गावात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड होती. ही कुत्री खाटकांनी उघड्यावर टाकून दिलेल्या कचर्यावर जगायची. उघड्या नाल्यांमुळे डुकरं भरपूर होती. यामुळे कुत्र्यांची आणि डुकरांची संख्या वाढत होती. मारलेल्या कोंबड्याबकर्यांच्या कचरा कुठे असतो, हे बिबट्यांना अचूक ठाऊक होतं. अन्न मिळवण्यासाठी त्यांना शंभर मीटरसुद्धा चालावं न लागल्यानं त्यांचं विनासायास पोट भरत होतं. त्यामुळे बिबट्यांची संख्याही वाढत होती.
बिबट्यांचं अन्न कमी करायचं असेल, त्यांची संख्या कमी करायची असेल, तर अगोदर स्वच्छता राखायला हवी. बिबट्यांची संख्या शून्यावर आणणं अशक्य आहे आणि तसं करणं ही घोडचूक ठरेल. पण त्यांच्या संख्येवर नियंत्रण मात्र ठेवता येतं. प्रत्येक बिबट्याचं स्वत:चं असं एक क्षेत्र असतं. हे साधारण चार किमी x चार किमीचं क्षेत्र असतं. त्यांना उपलब्ध असलेलं अन्न कमी केलं, तर ते आपल्या क्षेत्राचा विस्तार करतील अन्न मिळवण्यासाठी. त्यामुळे एखादा बिबट्या सहज अन्न मिळत असल्यानं एखाद्या जागी राहत असेल, तर अन्न कमी झाल्यानं तो आता विस्तारलेल्या जागेत फिरेल आणि परत त्याच ठिकाणी अन्न मिळवण्यासाठी जरा मोठ्या कालावधीनंतर येईल.
बिबटे बर्यापैकी लाजाळू असतात. अनोळखी परिसरात त्रास होणं, हे माणसावर हल्ला करण्यामागचं एक कारण आहे. पण तरी मूळ स्वभाव कसा बदलतो?
काय आहे, की बिबटे हे खरंच लाजाळू आहेत. ते माणसाशी सहसा स्वत:चा संपर्क येऊ देत नाहीत. पण कुत्र्याचा, कोंबडीचा पाठलाग करताना ते विहिरीत पडतात. आमच्याबरोबर अकोले परिसरात काम करणारे आमचे एक सहकारी शेतकरी होते. त्यांनी एकदा आम्हांला सांगितलं की, बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना समोर विहीर येते, कुत्रा तिथेच राहत असल्यानं त्याला विहिरीबद्दल ठाऊक आहे, तो ती विहीर चुकवून पुढे जातो, बिबट्या मात्र विहिरीत पडतो, मग लोक आत शिडी सोडतात आणि बिबटा बाहेर येऊन पळून जातो. तर, हे काही फार हिंसक वागणं नाही बिबट्याचं. अनेकदा अशा घटना घडतात. हिंसक घटना कुठल्या? ज्यांमध्ये माणसांवर हल्ले होतात आणि अशा घटना फार दुर्मीळ आहेत. माणसांवर हल्ले कधी होतात? बरेचदा माणसं उघड्यावर झुडपांमध्ये शौचास बसतात. मागून येणार्या बिबट्याला हा उकिडवा बसलेला माणूस कुत्रा वाटतो आणि तो त्याच्यावर झडप घेतो. किंवा बिबट्याला माणसांनी घेरलं की तो घाबरतो आणि कोणावरतरी उडी मारतो. पण याच घटना प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होतात, ही समस्या आहे. बिबट्यानं माणसावर हल्ला केला, एवढंच तुम्हांला बिबट्याबद्दल वाचायला मिळतं. पण अशा हल्ल्यांचं प्रमाण खूप कमी आहे.
खरं म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे बिबटे माणसाच्या इलाख्यात त्याला त्रास न देता राहत असतात. बिबटे दिवसा लपून राहतात, रात्री बाहेर पडतात आणि माणसाला सतत दिसतात. रात्री शेतकरी शेतात पाणी सोडायला जातो, तेव्हा त्याला बिबट्या दिसतो. एखाद्याच्या खाटेखालून कुत्रं उचलताना बिबट्या दिसतो. ’आमच्या समोरूनच गेला बिबट्या’ असं मला लोक फोन करून सांगतात. बिबट्यांना माणसाशी संघर्ष करायला आवडत नाही.
बिबट्याला माणसाशी संघर्ष करायला आवडत नसलं तरी ते माणसाचे पाळीव प्राणी मारतात. म्हणजे माणसाचं नुकसान झालंच.
हे खरं आहे. पण या नुकसानाची भरपाई वनविभागाकडून दिली जाते. महाराष्ट्र शासन या बाबतीत अतिशय जागरुक आहे. पूर्वी नुकसानभरपाई मिळायला दोनतीन वर्षं लागायची. पण आता दोन महिन्यांच्या आत संपूर्ण रक्कम चेकनं दिली जाते.
आपण बिबट्यांच्या हल्ल्यांबद्दल बोलतोय. अशा हल्ल्यांबद्दल बोलताना, लिहिताना मॅन-अॅनिमल कन्फ्लिक्ट, म्हणजे माणूस-प्राणी संघर्ष हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो.
सगळ्या हल्ल्यांबद्दल हा शब्दप्रयोग आपण वापरणं योग्य नाही. पण जुन्नरमध्ये मात्र २००३ साली असा संघर्ष झाला, हे खरंय. हे दुष्टचक्र आहे. एक बिबट्या पिंजर्यात पकडला जातो. त्यानं कोणालाही इजा केलेली नसते, पण तो पकडला जातो. मग त्याला दुसरीकडे नेऊन सोडलं जातं. या नव्या जागी बावचळल्यामुळे तो माणसावर हल्ला करू शकतो. मग ही बातमी पेपरात येते. टीव्हीवर यावर चर्चा होते. बराच गदारोळ होतो. मग पुन्हा तिथे पिंजरा लावला जातो. पण आधी एकदा पिंजर्यात अडकण्याचा अनुभव असल्यानं हा बिबट्या आता पिंजर्यात अडकत नाही. तो दोनतीन माणसांना मारतो, पण पिंजर्यात अडकत नाही. मग अजूनच गोंधळ उडतो. आता सगळीकडे या हल्ल्यांचीच चर्चा असते. या चर्चांमुळे दुसरीकडची माणसं घाबरतात. बिबटे तर त्यांच्याही परिसरात आहेत. त्यांनी अजून माणसावर हल्ला केला नाही म्हणून काय झालं? उद्या त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर, या भीतीनं आजवर माणसावर हल्ला न केलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात. हे बिबटे दुसरीकडे सोडले की अगोदरच्या घटनांची पुनरावृत्ती होते. या नव्या ठिकाणी माणसावर हल्ले सुरू होतात.
बरेचदा बिबट्यांशी संबंधित समस्यांमध्ये स्थानिक राजकारणाचा मोठा सहभाग असतो. वनाधिकार्याचे गावकर्यांशी असलेले संबंध, स्थानिक नेतृत्वाला गावकर्यांवर पाडायची असलेली छाप, असे अनेक मुद्दे यात येतात. आपला अधिकार किती मोठा, आपल्या म्हणण्याला किती वजन याचं प्रदर्शन इतरांसमोर करायला प्रत्येकजण उत्सुक असतो. मग एखाद्या गावात वर्षानुवर्षं बिबटे दिसत असले, तरी स्थानिक नेतृत्व लगेच फोन करून पिंजरे मागवतं. मॅन-अॅनिमल कन्फ्लिक्टपेक्षा मॅन-मॅन कन्फ्लिक्ट अधिक आहे हा.
मघाशी तुम्ही प्रोजेक्ट वाघोबाचा उल्लेख केला. या प्रकल्पाबद्दल सांगाल का?
मनुष्यवस्तीत वर्षानुवर्षं बिबटे काही त्रास न देता कसे राहतात, याचा अभ्यास करण्यासाच्या हेतूनं प्रोजेक्ट वाघोबाचा जन्म झाला. मी एकदा माझ्या कामानिमित्तानं अकोले तालुक्यात फिरत होते. जीपमधून जाताना मला रस्त्याच्या कडेला एक लहानशी वाघाची दगडी मूर्ती दिसली. मी माझ्याबरोबर असलेल्या एका सहकार्याला विचारलं, ही मूर्ती कसली? तो म्हणाला, हा वाघोबा आहे, इथले स्थानिक याची पूजा करतात. मग नंतर मी एका ठाकर महिलेशी बोलत होते. आता मी पडले शहरी. ग्रामीण चालीरीतींशी, तिथल्या मानवी भावभावनांशी माझा फारसा परिचय नाही. त्यामुळे फारसा विचार न करता मी तिला विचारलं की, वाघोबा तुमचं काय नुकसान करतो? ती चिडलीच. म्हणाली, वाघोबा आमचं कधीच नुकसान करत नाही, तो येतो आणि निघून जातो. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. मग माझ्या सहकार्यानं सांगितलं की, त्यांच्या समाजात या वाघोबाला पूजलं जातं. ते बिबट्यांनाही पूजतात. त्यामुळे त्या ठाकर स्त्रीला मी ’वाघोबा त्रास देतो का’, हे विचारणं म्हणजे 'तुमचा देव तुम्हांला त्रास देतो का', असं विचारण्यासारखंच होतं. मग थोडं शोधल्यावर माझ्या लक्षात आलं की, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या भागांमध्ये वाघोबा पूजला जातो. हा वाघोबा इतका सर्वदूर पूजला जात असूनही आम्हां शहरी अभ्यासकांना याबद्दल काहीही माहीत नव्हतं. प्रोजेक्ट वाघोबा या नावामागची ही गोष्ट.
तर, जुन्नर, अकोले अशा मानवाची सघन लोकसंख्या असलेल्या भागांत बिबट्यांची संख्या किती, ते काय खातात, ते कसे जगतात, त्यांच्यामुळे माणसाचं कसं आणि किती नुकसान होतं, हा प्रोजेक्ट वाघोबाचा आवाका होता. जुन्नर, अकोले अशा माणसाची प्रति वर्ग किलोमीटर तीनशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशात हा अभ्यास आम्ही केला.
बिबट्यांची संख्या मोजण्यासाठी तुम्ही कॅमेरा ट्रॅपचा वापर केलात. कॅमेरा ट्रॅप म्हणजे काय, हे सांगाल का?
कॅमेरा ट्रॅप जगभरात प्राण्यांची गणना करायला वापरले जातात. कॅमेरा एका हीट किंवा मोशन सेन्सराला लावला जातो. या कॅमेर्यासमोरून कोणी गेल्यास सेन्सर अॅक्टिव्हेट होतं आणि कॅमेरा फोटो काढतो. वाटेच्या दोन्ही बाजूला असे कॅमेरा ट्रॅप लावले जातात. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्राण्याचं चित्र मिळतं आणि प्राणी ओळखणं सोपं जातं. असे कॅमेरा ट्रॅप वापरून आम्ही बिबट्यांची अकोले भागात गणना केली. तिथे प्रति शंभर वर्ग किमी परिसरात पाच मोठे बिबटे आहेत, असं आम्हांला आढळलं. या प्रोजेक्टचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही बिबट्यांना कॉलरी बसवल्या. नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ नेचर रिसर्चनं या कॉलरी तयार केल्या आणि आम्हांला उपलब्ध करून दिल्या.
या कॉलरी बसवण्यामागचा उद्देश काय?
बिबट्यांची वागणूक नक्की कशी असते, त्यांच्या भ्रमणाचं क्षेत्र कुठलं हे समजून घेण्यासाठी आम्ही या कॉलरी बसवल्या. मी आधी सांगितल्याप्रमाणे हे बिबटे अगदी गावात किंवा गावाच्या अवतीभवती राहतात आणि कोणाच्या लक्षातही हे येत नाही. दिवसभर ते एकाच जागी लपून बसतात आणि अंधार पडल्यावर बाहेर पडतात. कुत्र्यांची, क्वचित डुकरांची आणि बकर्यांची शिकार करतात. आठवड्यात एखादं कुत्रं ते मारतात. पण हे बिबटे त्यांच्या आयुष्यभर त्याच भागात राहतात, की इतरत्रही फिरतात हे बघण्यासाठी आम्ही कॉलरी बसवायचं ठरवलं. नॉर्वेहून त्यासाठी माझे सहकारी आले होते. मी तोवर एकही कॉलर कधी बसवली नव्हती आणि पहिल्यांदाच हे काम करताना एखादा माहीतगार तिथे असावा, अशी इच्छा होती. आमच्याबरोबर मिलिंद बेल्लारे हा एक पत्रकार-मित्रही होता. पंधरा दिवस आम्ही बिबट्यासाठी सापळा ठेवला. एकही बिबट्या तिथे आला नाही. त्या भयानक उकाड्यात आम्ही दिवसरात्र बिबट्याची वाट बघत बसून होतो. पण बिबट्यासाठीचा पिंजरा रिकामाच राहिला.
पंधरा दिवसांनंतर त्या तिघा नॉर्वेजियन सहकार्यांपैकी दोघांना मायदेशी परत जायचं होतं. ते मुंबईच्या वाटेला लागले. थोड्या वेळानं मिलिंदचा मला फोन आला. तुला कळलं का? पारनेरजवळ टाकळी ढोकेश्वरला एका विहिरीत एक बिबट्या पडला आहे, असं तो मला म्हणाला. मी लगेच त्या नॉर्वेजियन मित्रांना फोन करून सांगितलं की, वाटेत टाकळी-ढोकेश्वरला थांबा, तिथे एक बिबट्या विहिरीत पडला आहे, तो बघा आणि मग पुढे जा. हा फोन झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, आपण या बिबट्याला कॉलर बसवू शकतो. माझ्याकडे त्यासाठी लागणार्या सगळ्या परवानग्या होत्या. मी ताबडतोब तिथल्या वनाधिकार्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की, मला या बिबट्याला कॉलर लावायची आहे. मग मी तिथे लगेच गेले. तोवर बिबट्याला बाहेर काढून एका पिंजर्यात ठेवलं होतं. रात्री अकरा-बाराच्या सुमारास आम्ही त्या बिबट्याला बेशुद्ध केलं. बेशुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी औषधं अगदी सुरक्षित असतात, पण त्या औषधांमुळे प्राण्याच्या शरीराचं तापमान वाढतं. तो मे महिना होता. वाढत्या तापमानामुळे बिबट्याला त्रास झाला असता. म्हणून आम्ही अगदी रात्री त्याला बेशुद्ध केलं. बिबट्याला बेशुद्ध करण्याचं काम करणारी मुलगी जुन्नरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये काम करायची. आसामची होती ती. अगदी लहानखुरी. बिबट्या बेशुद्ध झाल्यावर आम्ही दोघींनी त्याला नीट पाहिलं. भलंमोठं धूड होतं ते. हा बिबट्या तसा वयस्कर होता. अगदी जख्ख म्हातारा नव्हे, पण पोक्त म्हणावा असा. वयामुळे येणारं शहाणपण त्याच्या चेहर्यावर दिसत होतं. बेशुद्ध करण्याअगोदर तो खूप शांत होता. तो थकला असावा, शिवाय उष्माही खूप होता. बेशुद्ध करतानाही त्यानं अजिबात प्रतिकार केला नाही. त्याच्याकडे बघितल्यावर कोणालाही त्याच्याबद्दल आदर वाटावा, असं त्याचं एकंदर रुपडं होतं. या बिबट्याला नाव काय द्यायचं, या विचारात आम्ही होतो. मला एकदम नाव सुचलं - ’आजोबा’.
आजोबा एका कुत्र्याचा पाठलाग करताकरता विहिरीत पडला होता. तो कुत्राही विहिरीतच होता. गावकर्यांच्या लक्षात आलं तेव्हा आजोबा त्या कुत्र्याबरोबर एका कट्ट्यावर बसला होता. त्या विहिरीत तेवढीच एक जागा होती बसायला. गावकर्यांनी मग विहिरीत टोमॅटो ठेवायचा एक मोठा क्रेट दोरीला बांधून सोडला. त्या क्रेटात बसून तो कुत्रा बाहेर आला. आजोबानं त्याला एकही जखम केली नव्हती. पण तरी तो बिचारा कुत्रा दुसर्या दिवशी मेला. बिबट्याशेजारी अनेक तास बसून राहावं लागल्यामुळे त्याला कदाचित हार्टअटॅक आला असावा! आजोबा मात्र अनेक प्रयत्न करूनही बाहेर आला नाही. मग तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा त्याच्यासाठी शिडी सोडली आणि त्या शिडीवरून तो पुन्हा जमिनीवर आला.
मग पुढे काय झालं?
आजोबाला माळशेज घाटाच्या पायथ्याशी सोडण्यात आलं. त्याला तिथे सोडायला रात्री आम्ही गेलो होतो. त्याला सोडल्यानंतर तब्बल दहा दिवस आम्हांला त्याच्या कॉलरीकडून एकही सिग्नल मिळाला नाही. आज मिळेल, उद्या मिळेल असं म्हणत आम्ही वेड्यासारखी एखाद्यातरी सिग्नलची वाट बघत होतो. शेवटी दहा दिवसांनंतर आम्ही ठरवलं की माळशेजला जाऊन रिसिव्हरमध्ये एखादा संदेश येतो का, हे बघायचं. आजोबा हा आम्ही कॉलर लावलेला पहिला बिबट्या होत्या. तो खुशाल असावा, एवढीच आमची इच्छा होती. म्हणून आम्ही त्याला शोधायला माळशेजला जायचं ठरवलं. मला आठवतं, त्या दिवशी रविवार होता. माझ्या नवर्याला त्याच्या नारायणगावच्या दुर्बिणी खुणावत होत्या. तो तिकडे जायला निघाला होता. पण मी त्याला म्हटलं, आज तू घरी थांब, मला माळशेजला गेलंच पाहिजे आजोबाला शोधायला. तो घरी थांबला आणि मी माळशेजला जायला निघाले. माझ्या बरोबर माझा नॉर्वेजियन सहकारी आणि माझी एक विद्यार्थिनी असे होते. आम्ही गाडीत सामान भरलं आणि एकदा शेवटचं बघावं, म्हणून कॉम्प्यूटर सुरू केला, तर आजोबाकडून सिग्नल मिळाले होते.
हे सिग्नल एसएमएसच्या स्वरूपात मिळतात. त्यामुळे कनेक्टिव्हिटी नसली, तर वेळच्या वेळी एसएमएस मिळत नाहीत. ठाणे जिल्ह्यात ही मोठी समस्या आहे. त्यामुळे आजोबाकडून आम्हांला बरेच दिवस सिग्नल पोहोचायचे नाहीत, आणि मग एकदम एकावेळी सगळे एसएमएस यायचे.
या कॉलरी काम कशा करतात?
या कॉलरींना जीपीएस-जीएसएम कॉलर असं म्हणतात. या कॉलरीच्या वरच्या बाजूला एक लहानशी पेटी असते. या पेटीत एक चिप असते. या चिपच्या मदतीनं जीपीएस यंत्रणा काम करते. कॉलरीवर एक सिमकार्ड लावलेलं असतं. हे सिमकार्ड जीपीएस यंत्रणेकडून मिळालेली माहिती एसएमएसच्या रूपात नॉर्वेत असलेल्या सर्व्हरला पाठवतं. ज्या क्षणी ही माहिती सर्व्हरला मिळते, त्या क्षणी त्या सर्व्हरला लॉग-इन झालेल्या कोणालाही ती माहिती गूगल अर्थवर दिसू शकते. कॉलरीच्या खालच्या बाजूला एक बॅटरी बसवलेली असते. सहा हजार नोंदी होईपर्यंत ही बॅटरी टिकते. आजोबाच्या गळ्यात जी कॉलर होती, तिची बॅटरी चार महिन्यांतच बंद पडली होती. कॉलरीला एक ड्रॉप-आऊट यंत्रणाही बसवलेली असते. ही यंत्रणा बरोब्बर एका वर्षानंतर कॉलरीला बिबट्याच्या गळ्यापासून वेगळं करते. कॉलर खाली गळून पडते. कॉलर गळून पडल्यावरही सर्व्हरकडे व्हीएचएफ सिग्नल जातो आणि त्या सिग्नलच्या आधारे ही कॉलर आणून पुन्हा तिचा अभ्यास करता येतो.
बिबट्या कुठल्या दिवशी कुठे गेला, हे कॉलरीमुळे अगदी अचूक कळतं. आजोबा सव्वाशे किलोमीटर चालत माळशेजहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चालत गेला, हे या कॉलरीमुळेच कळू शकलं.
आजोबाला माळशेजजवळ सोडलं, तोपर्यंत तुम्हांला त्याचा लळा लागला होता का?
मला हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. खरं सांगू का, आजोबाशी काही नातं तयार होण्याइतपत वेळच मिळाला नाही. त्याच्या गळ्यात कॉलर बसवून आम्ही लगेच त्याला सोडलं. त्याला सोडल्यानंतर चारच दिवसांनी आम्ही दोन बिबटे पकडले. हे दोन्ही बिबटे आम्ही अकोले गावाच्या वेशीपाशी पकडले होते. भरवस्तीत ते राहत असल्यानं आम्ही अतिशय धास्तावलो होतो. त्यांच्या आजूबाजूला माणसंच माणसं होती. घाबरून त्यांनी माणसांवर हल्ला केला तर, या काळजीत आम्ही होतो. आजोबा आता जंगलात होता. तिथे फारशी लोकवस्ती नव्हती. तो सुरक्षित होता. पण हे दोन बिबटे मात्र गावात होते. त्यांच्या दृष्टीनं ते त्यांचं घर होतं, पण दुर्दैवानं तिथे माणसंही होती. या दोन बिबट्यांना आम्ही पकडलं आणि कॉलर लावली. मात्र या कॉलरींबद्दल गावात कोणालाही सांगितलं नाही. हे बिबटे गावात राहत होते आणि त्यांनी एखादी बकरी मारली, तर गावकरी सगळा दोष तुम्हांलाच देतील, असं वनविभागाची माणसं मला म्हणाली.
म्हणजे या दोन बिबट्यांना आजोबाप्रमाणे दुसरीकडे सोडलं नाही?
नाही, या दोन्ही बिबट्यांना कॉलरी लावून आम्ही जिथे पकडलं होतं, तिथेच गावाच्या वेशीजवळ परत सोडलं.
या बिबट्यांच्या बाबतीत अपवाद का केला गेला?
आजोबाला पकडणारे वनाधिकारी माझ्या तितक्याशा परिचयाचे नव्हते. पण या दोन बिबट्यांना पकडणार्या अधिकार्यांशी उत्तम ओळख होती. बिबट्यांना त्यांना अपरिचित असलेल्या भागात सोडलं, तर समस्या वाढतात, हे माझं म्हणणं त्यांना पटलं होतं. त्यामुळे आम्ही त्या दोन बिबट्यांना आजोबासारखं दूर नेऊन सोडलं नाही.
आजोबाला माळशेजला सोडल्यानंतर तो मुंबईच्या दिशेनं जातो आहे, हे कधी लक्षात आलं?
आजोबाला पकडलं होतं टाकळी ढोकेश्वरला. तो माळशेजहून परत टाकळी ढोकेश्वरला येईल, असं मला वाटत होतं. कारण आजोबा तितकासा तरुण नव्हता. तरुण बिबटे नव्या ठिकाणी राहतात. तिथे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. वयस्कर बिबटे मात्र आपल्या मूळ ठिकाणी परत येण्याचा प्रयत्न करतात. आजोबाला टाकळी ढोकेश्वरला पकडलं, म्हणजे तो मूळचा तिथलाच असावा, असं मला वाटलं आणि म्हणून त्याच्या परतीच्या मार्गाबद्दल मी अंदाज बांधला होता. पण आजोबा माळशेजहून उत्तरेकडे जायला निघाला. मला वाटलं, तो गुजरातेत जातोय, म्हणजे कदाचित तो मूळचा गुजरातेतला असावा. पण मग त्यानं कसारा रेल्वे स्टेशन ओलांडलं आणि तो पश्चिमेकडे वळला. मी ताबडतोब माझ्या एका मित्राला फोन करून सांगितलं, मी पैज लावते, आजोबा संजय गांधी नॅशनल पार्काकडे जातोय. आणि तो तिथे गेला.
पूर्वी मोठ्या प्रमाणात ट्रान्सलोकेशन व्हायचं. इकडचे प्राणी तिकडे, तिकडचे इकडे असं सतत सुरू असायचं. संजय गांधी नॅशनल पार्कातले अनेक बिबटे घाटमाथ्यावर सोडले जायचे, घाटमाथ्यावरचे बिबटे खाली दरीत सोडले जायचे. आमच्याकडे कसलाही पुरावा नाही, पण माझा अंदाज असा की, आजोबालाही असंच नॅशनल पार्कातून घाटमाथ्यावर कधीतरी सोडण्यात आलं असावं. आपल्याला कुठे जायचंय, हे आजोबाला पक्कं माहीत असावं. तो दोन पावलं पुढे, तीन पावलं मागे करत मार्गक्रमण करत नव्हता. त्याला आपला रस्ता व्यवस्थित माहीत असावा. हाही माझा अंदाजच, कारण मी काही आजोबाला जाऊन विचारू शकत नव्हते. पण आजोबा रस्ता चुकून नॅशनल पार्कात पोहोचला नाही, याबद्दल मला खात्री आहे. तरुण बिबटे इकडेतिकडे भटकतात. पण आजोबाच्या बाबतीत तसं नव्हतं.
बिबट्यांना आपल्या घराचे रस्ते पाठ असतात?
हो. अगदी व्यवस्थित. अनेक देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. आफ्रिकेत दोन बिबट्यांना कॉलरी बसवल्या होत्या. हे दोन्ही बिबटे चारशे किलोमीटरचं अंतर चालून पुन्हा आपल्या घरी आले. एक वर्षं लागलं त्यांना. पण बिबट्यांना आपल्या घराचा रस्ता सापडतो कसा, हे अजून निश्चित कोणालाच माहीत नाही.
आजोबा आपल्या घरी व्यवस्थित पोहोचेल की नाही, ही भीती तुमच्या मनात होती का?
तो पोहोचेल की नाही, ही भीती नव्हती. पण त्याच्या सुरक्षेबद्दल काळजी मात्र नक्की होती. त्याला इजा पोहोचू नये, अशीच माझी इच्छा होती. अशी काळजी मला सर्वच प्राण्याबद्दल वाटते. पण आजोबा नक्की काय करतो आणि कुठे जातो, हे पाहणं खूप रंजक होतं. आजोबाकडून येणारे सिग्नल मला खूप उशिरा मिळत होते. एक दिवस बघितलं, तर तो मला वसई औद्योगिक क्षेत्राच्या मधोमध दिसला. मी चरकले. पण तो सिग्नल तीन दिवस जुना होता आणि तोवर मला नवा सिग्नल मिळाला होता. औद्योगिक क्षेत्राचा पट्टा त्यानं व्यवस्थित ओलांडला होता. वसई औद्योगिक क्षेत्र आणि वसईची खाडी यांच्या मध्ये असलेल्या भागाला नागला ब्लॉक असं म्हणतात. हा नागला ब्लॉक संजय गांधी नॅशनल पार्काचा भाग आहे. आजोबा नागला ब्लॉकात पोहोचला. मग तो वसईची खाडी ओलांडून पलीकडे गेला आणि दोन दिवसांनी खाडी पोहून पुन्हा नागला ब्लॉकला आला. मग तो तिथेच राहिला. खाडी पोहून तो पलीकडे का गेला, तिथे तो दोन दिवस का राहिला आणि तो परत का आला, हे मला माहीत नाही. नंतर त्याच्या कॉलरीनं काम करणं बंद केलं. अडीच वर्षांनी त्याच भागात त्याचं शव सापडलं. एका वाहनाच्या धडकेमुळे त्याचा मृत्यू झाला होता. आजोबा तिथे अडीच वर्षं शांतपणे राहिला, याचा अर्थ तेच त्याचं घर असावं.
मधली दोन-अडीच वर्षं आजोबाकडून सिग्नल मिळत नव्हते. या काळात आजोबा कुठे असेल, कसा असेल याबाबत तुम्हांला उत्सुकता होती का?
आजोबाशी संपर्क तुटल्यावर त्याच्याबद्दल उत्सुकता वाटायचीच. पण त्याची खुशाली मला कळण्याची शक्यता नव्हती.
आणि तुम्ही कॉलर लावलेले इतर प्राणी?
अकोले गावात कॉलर लावलेले दोन बिबटे काय करतात, हे मला ठाऊक होतं. आईमुलाची जोडी होती ती. आईचं नाव आम्ही ठेवलं लक्ष्याई आणि मुलाचं जय महाराष्ट्र. लक्ष्याई आमच्याकडे काम करणार्या एका मावशींचं नाव होतं. बहुतेक 'लक्ष्मी'चं अपभ्रंश असावं हे नाव. अफाट होत्या लक्ष्याईमावशी! चेहर्यावर खूप सुरकुत्या. त्यांच्या नवर्याला त्यांच्याआधी सात बायका होत्या. या आठव्या. मूल होत नाही, म्हणून त्यांचा नवरा एका पाठोपाठ एक अशी लग्नं करत गेला. आपल्यातच दोष आहे, हे काही कधी त्याच्या लक्षात आलं नाही. मग मूल होत नाही म्हणून लक्ष्याईमावशींच्या नवर्यानं त्यांनाही सोडलं आणि दुसरं लग्न केलं. सत्तरपंच्याहत्तर वर्षांच्या लक्ष्याई अकोले गावात एकट्या राहत होत्या. सगळेजण त्यांना घाबरून असत. बाहेर वाघ होऊन फिरणारे पुरुषही त्यांच्यासमोर मान खाली घालून उभे असत. पण लक्ष्याईमावशी खूप प्रेमळही होत्या. आम्ही जेव्हा अकोले गावात राहणार्या त्या मादी बिबट्याला पकडलं, तेव्हा तिचं नाव लक्ष्याई ठेवायचं, असं मी ठरवलं. सगळ्यांना हे नाव आवडलं. लक्ष्याईच्या मुलाचं नाव जय महाराष्ट्र. त्याला 'महाराष्ट्र दिना'च्या दिवशी पकडलं, म्हणून तो जय महाराष्ट्र.
नाशिक वनविभागानं पकडलेल्या एका मादी बिबट्याला आम्ही कॉलर लावली. तिचं नाव सीता. हिमाचल प्रदेशात शार्लेट होती. सीता, लक्ष्याई यांच्या कॉलरी वर्षभरानंतर पडल्या. त्या आम्हांला सापडल्या. जय महाराष्ट्र नंतर एका घरात शिरला होता. त्याला पकडून आम्ही त्याची कॉलर काढली, कारण त्याला ती घट्ट होत होती. आजोबाची कॉलरही पडली, पण तीही बरीच घट्ट झाली असावी. त्याचा मृतदेह सापडला, तेव्हा त्याच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा होत्या. कॉलर पडली नसती, तर गळा आवळल्यानं तो मेला असता, कारण मधल्या दोन वर्षांत त्याचं वजन नऊ किलोंनी वाढलं होतं. आम्ही त्याला सोडलं, तेव्हा तो त्रेसष्ट किलोंचा होता. त्याच्या मृतदेहाचं वजन बहात्तर किलो होतं.
शार्लेटची कॉलर मात्र पडली नाही. त्यामुळे मी काळजीत होते. मी तिला शोधायला हिमाचल प्रदेशात गेले. शार्लेटकडून जीपीएस सिग्नल मिळणं आठ महिन्यांनंतर बंद झालं होतं. पण कॉलरकडून येणारा दुसरा व्हीएचएफ सिग्नल रिसिव्हरला मिळत होता आणि हा सिग्नल वेगवेगळ्या ठिकाणांहून येत होता. म्हणजे कॉलर अजून तिच्या गळ्यातच होती. पुढे तीनचार महिने तिथल्या व्हेटरिनरी डॉक्टरांना तिच्याकडून सिग्नल मिळत राहिले. नंतर कधीतरी ती कॉलर पडली.
सीता, शार्लेट, लक्ष्याई, जय महाराष्ट्र आता कुठे आहेत?
माहीत नाही. कॉलर लावल्यानंतर पुन्हा कधीही हे बिबटे पकडले गेले नाहीत आणि कॉलर पडल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा कळत नाही. जय महाराष्ट्राला आम्ही पकडलं होतं, पण कॉलर काढून टाकली. तो असेल अकोले भागातच कुठेतरी. किंवा दुसरीकडेही गेला असेल. नर बिबटे कहीवेळा आपलं घर सोडून दुसरीकडे जातात. मादी बिबटे कायम एकाच ठिकाणी राहतात.
आपण मघाशी बिबट्यांना इतरत्र सोडण्याविषयी बोलत होतो. आजोबालाही माळशेजच्या परिसरात सोडण्यात आलं. तुम्ही या निर्णयाला विरोध केला नाही का?
विरोध करणं ही माझ्या कामाची पद्धत नाही. मी कधीही विरोधाचा सूर लावत नाही. मी फक्त सल्ला देऊ शकते. तुम्ही काय निर्णय घ्यायचा, हे तुम्हीच ठरवायचं. ’अमूक करू नका, तमूक करू नका’, हे मी वनविभागाला सांगू शकत नाही. त्यांच्याही गाठीशी भरपूर अनुभव आणि ज्ञान आहे. माझे सल्ले त्यांना पटले, तर ते माझं म्हणणं ऐकतील. नाही पटले तर ऐकणार नाहीत. माझंच म्हणणं ऐका, हे मी सांगू शकत नाही आणि तसं सांगायलाही मला आवडत नाही.
वन्यजीव संरक्षणाबद्दल आस्था असणारे बरेच अभ्यासक अनेकदा वनविभागाच्या विरोधात लिहीतबोलत असतात.
सतत वाद घातल्यामुळे कोणी तुमचं ऐकेल, ही अपेक्षा करणं चूक आहे. मी माझ्या मुलीवर सतत ओरडले तर तीसुद्धा माझं ऐकणार नाही. माझं म्हणणं तिनं ऐकावं, असं मला वाटत असेल, तर मला ते योग्य पद्धतीनं तिच्यापर्यंत पोहोचवायला हवं. पण एका मर्यादेपर्यंतच तुम्ही लोकांना सल्ले देऊ शकता. जर तुमचं म्हणणं त्यांना ऐकायचंच नसेल, तर तुम्ही कितीही सांगितलं तरी त्याचा फायदा होणार नाही. म्हणून माझा संवाद साधण्यावर भर असतो. अनेकदा वनविभागानं घेतलेले निर्णय मला पटलेले नाहीत. पण मग मी वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला, त्यांच्या कानावर माझं म्हणणं घातलं. सर्व अधिकार्यांनी माझी बाजू व्यवस्थित ऐकून घेऊन चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
आपल्याकडे वन्यजिवांबद्दल असलेली सहिष्णुतेची परंपरा आता लोप पावते आहे, असं तुम्हांला वाटतं का?
मला माहीत नाही. सहिष्णुता ही जरा अवघड संकल्पना आहे. पण भारतात इतर देशांमध्ये नाही, असं ’काहीतरी’ वेगळं आहे. सर्व वन्यजीवअभ्यासक मान्य करतात की, भारतीय उपखंड इतर देशांपेक्षा वेगळा आहे. इतर अनेक देशांपेक्षा इथल्यापेक्षा अधिक श्रीमंती आहे, मोठी जंगलं आहेत, पण त्यांनी मांसाहारी प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली केल्या आहेत. आपल्याकडे लोकसंख्या भरपूर आहे. गरिबीही भरपूर आहे. पण चित्ता वगळता आपले मांसाहारी प्राणी अजून टिकून आहेत. ही सहिष्णुता आहे का, हे मला ठाऊक नाही. ही उदासीनता नक्की नसावी. वन्यजीवसंरक्षण कायदा १९७२ साली आला. त्या आधी आपण प्राण्यांच्या खुलेआम कत्तली करू शकत होतो. तसं आपण केलं नाही. लोकसंख्या भरपूर असूनही. हां, अरुणाचल प्रदेशात लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. पण तिथल्या जंगलांमध्ये प्राणी नाहीत. तिथले रहिवासी मुख्यत: शिकारी असल्यानं त्यांनी प्राण्यांचा नि:पात केला. भारतात इतरत्र मात्र तसं घडलं नाही. मी खेड्यापाड्यांमध्ये फिरते, तेव्हा मला तिथले लोक म्हणतात, ’राहू द्या त्या बिचार्या प्राण्याला इथे, त्याचंही पोट आहे आमच्यासारखं’. याला सहिष्णुता म्हणतात का? मला माहीत नाही.
मी नुकतेच आयर्लंडला जाऊन आले एका परिषदेसाठी. तिथे मला एका अमेरिकन अभ्यासकांनी विचारलं की, ’अमेरिकेत लोक वन्यप्राण्यांना खूप घाबरतात, अकोले भागातल्या मानवी वस्त्यांमधल्या बिबट्यांबद्दल त्यांना सांगितलं तर त्यांच्या विचारसरणीत काही फरक पडेल का?’ या प्रश्नाचं उत्तर तितकंसं साधं नाही, पण मी एक मात्र नक्की सांगू शकते, की भारतीय उपखंडातल्या लोकांना एकूणच इतर जीवसृष्टीची भीती वाटत नाही इतरांसारखी. त्यातही ग्रामीण भागातली जनता या जीवसृष्टीशी जवळचं नातं राखून असते.
असं असलं तरी शिकारीचं प्रमाणही वाढलं आहे. वाघांच्या घटत्या संख्येबाबत आपण सतत ऐकतवाचत असतो. अशावेळी वनविभाग आणि सामान्य जनता यांनी एकत्र प्रयत्न करणं अपेक्षित आहे, असं तुम्हांला वाटतं का?
इथे परत मी १९७२ सालच्या कायद्याचा उल्लेख करेन. प्राणी आणि माणूस यांना वेगळं ठेवण्यात अर्थ नाही, हे आता हळूहळू लोकांच्या लक्षात येत आहे. वन्यजीवनाशी संबंध येणारी अनेक खाती आता लोकसहभागाला महत्त्व देत आहेत. उदाहरणार्थ, पोलिसखातं. वनविभागही हळूहळू लोकसहभागाचं महत्त्व ओळखेल, यात शंका नाही. कारण स्थानिक जनतेवर केवळ पोलिसगिरी करून उपयोग नाही. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांना बरोबर घेऊन काम व्हायला हवं. कारण शेवटी जंगलात किंवा जंगलाशेजारी राहणार्या लोकांचं जीवन जंगलाशी निगडित आहे. माझा इतक्या वर्षांचा अनुभव असा आहे की, स्थानिकांना जर एखादा वनाधिकारी आवडत असेल, तर एखादी समस्या निर्माण झाल्यावर त्यांची प्रतिक्रिया वेगळी असते. हेच जर वनाधिकार्याबरोबर त्यांचे संबंध ताणलेले असतील, तर स्थानिक टोकाची भूमिका घेऊ शकतात. जगभरात आता स्थानिकांचा वन्यजीवसंवर्धनात सहभाग वाढला आहे. आपल्याकडेही इकोडेव्हलपमेंट-कमिट्या वगैरे स्थापन झाल्या आहेत. पण हे प्रयत्न पुरेसे नाहीत. यावर अजून बरंच काम व्हायला हवं. स्थानिकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, हे अगोदर प्रत्येकानं मान्य करायला हवं. तुम्ही ताडोबाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत असाल, तर आजूबाजूच्या खेड्यांकडेही लक्ष द्यायलाच हवं. नाहीतर ताडोबाचं संवर्धन योग्य प्रकारे होणं अशक्य आहे.
मी अनेकदा वनाधिकार्यांना सांगते, की आपण प्रतिक्रियावादी आहोत. बिबट्यानं शेतकर्याची शेळी मारली की आपण त्याला भरपाई देतो. बिबट्यानं शेळी मारायची वाट आपण का बघत बसायची? बिबट्यानं शेळी मारू नये, यासाठी आपण शेतकर्याला मदत केली पाहिजे. शेतकर्याचं नुकसान होऊ नये, म्हणून अधिक चांगल्या योजना तयार करायला हव्यात.
पण माणूस जंगलावर अतिक्रमण करतोय, वन्यप्राण्यांच्या निवासस्थानांवर आक्रमण करतोय, याचं काय करायचं?
तू जे म्हणतो आहेस, तो फक्त एक लहानसा भाग आहे. सध्या जगभरात रि-वाईल्डिंग चळवळ जोरात आहे. पूर्वी प्राण्यांचा उपद्रव होऊ नये, म्हणून शिकार केली जायची. माणसासाठी जमीन रिकामी व्हावी, म्हणून शिकार. प्राण्यांचा त्रास होतोय, म्हणून शिकार. प्राण्यांसाठी राखीव असलेल्या जंगलांमध्येच ते थोडंफार सुरक्षित असत. आता मात्र या राखीव क्षेत्राबाहेरसुद्धा प्राणी मारले जाण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे जंगलांवर अतिक्रमण होतं आहे, पण त्याचबरोबर प्राणी नागरी वस्त्यांबाहेर सुरक्षितपणे राहतही आहेत. शिवाय आपण हे लक्षात ठेवायला हवं की, भवताल बदलला की प्राणी आणि माणूस यांचं नातंही बदलतं. उदाहरणार्थ, पूर्वी जुन्नर आणि अकोले या भागांत फक्त कापूस व्हायचा थोडाफार. मग सिंचनामुळे ऊस व्हायला लागला. पण ओल्या जागेत लांडगे राहू शकत नाहीत. त्यामुळे लांडगे त्या भागातून बाहेर पडले आणि बिबट्यांची संख्या तिथे वाढली. कारण त्यांना पाणी आवडतं. हे असे बदल सतत घडतच असतात आणि आपण या बदलांशी जुळवून घेणंच इष्ट.
शहरी लोकांना असं जुळवून घेणं त्रासदायक वाटू शकतं.
हो, बरोबर. तू जुन्नरच्या एखाद्या शेतकर्याला विचारलंस, तर तो सांगेल की, इथे अगदी पूर्वीपासून बिबटे आहेत, पूर्वी लांडगे जास्त होते, आता बिबटे भरपूर आहेत. शहरी लोकांना हे पचवायला जरा जड जातं. प्राणी आणि माणूस एकत्र कसे राहू शकतात, हा त्यांना प्रश्न पडतो. आपल्याकडे कायदे करणारे शहरी, अभ्यासक शहरी, प्रसारमाध्यमं शहरी. त्यामुळे त्यांना खरी परिस्थिती काय आहे, हे समजून घेणं जड जातं.
मग आज ग्रामीण भागात खरी परिस्थिती काय आहे?
तू कुठल्या ग्रामीण भागाबद्दल विचारतो आहेस, यावर तुझ्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. आपला देश इतका वैविध्यपूर्ण आहे, की मी एका ग्रामीण भागाचं उदाहरण समोर ठेवून सार्वत्रिकीकरण करू शकत नाही. पण मी शहरी आणि ग्रामीण परिस्थितीतल्या फरकाबद्दल सांगू शकते. जीवसृष्टीच्या संदर्भात बोलायचं झालं, तर शहरी भागातले लोक कमी सोशिक असतात. वन्यप्राणी दूरची गोष्ट, जीवाणू, कुत्री यांचाही त्यांना त्रास होतो.
किंवा कबुतरं.
हो, कबुतरं. कुत्र्यांना, कबुतरांना रोज खायला घालणारेही आहेत. पण ही संख्या कमी होत आहे, असं मला वाटतं. पण ग्रामीण भागात इतर जीवसृष्टी अजूनही माणसापासून दुरावलेली नाही. मागे जुन्नर परिसरातला माझा एक स्थानिक सहकारी म्हणाला, ’माझ्या गाभण गाईला नीट खायलाप्यायला मिळालं तरच तिचं वासरू चांगलं निपजेल. बिबटिणीलाही चांगलं खायलाप्यायला मिळायला हवं तिचं पिल्लू जगवायचं असेल तर’.
पण हल्ली ग्रामीण भागही तितकासा ग्रामीण राहिलेला नाही.
मला नाही सांगता येणार याबद्दल. मला ग्रामीण भागातल्या लोकांबद्दल खूप आदर आहे, हे मात्र मी सांगू शकते. ते समजूतदार असतात. शहाणे असतात. तुम्ही त्यांच्याशी मुद्देसूद चर्चा करू शकता. शहरी भागातल्या, खूप शिकलेल्या लोकांना तुमचं म्हणणं ऐकूनही घ्यायचं नसतं.
आपल्याकडे ग्रामीण संस्कृतीत वनसंस्कृतीही सामावलेली आहे. शहरी भागांमध्ये वन्यजीवनाबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी आपण ग्रामीण भागातले अनुभव वापरू शकतो का? उदाहरणार्थ, आरे कॉलनी किंवा पवईच्या आयआयटीत बिबट्या दिसला की जी दहशत पसरते, ती कमी करता येऊ शकेल.
हो, नक्की. आरे कॉलनीबद्दल बोलायचं झालं, तर तिथले जे वारली आदिवासी आहेत, ते कधीच बिबट्याची तक्रार करत नाहीत. ते त्यांच्या कचरा जमिनीखाली पुरतात, रात्री जनावरांना घरात घेतात. बिबट्यांबरोबर कसं राहायचं, हे त्यांना माहीत आहे. अशा लोकांच्या अनुभवांचा वापर करून आम्ही शहरी जनतेला समजवण्याचा, जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो.
प्रसारमाध्यमांची या विषयाबाबत भूमिका महत्त्वाची आहे, असं मला वाटतं.
प्रसारमाध्यमं एखाद्या छोट्याश्या घटनेबद्दलही बरंच वाढवून लिहितात. अतिशय अतिरंजित असं चित्र ते उभं करतात. माणसानं प्राण्याला मारलं किंवा प्राण्यानं माणसाला मारलं, एवढ्याच बातम्या ते लोकांपर्यंत पोहोचवतात. माणूस आणि प्राणी एकत्र येतात तेव्हा ९९.९९% घटना या प्रसारमाध्यमांमध्ये छापून येणार्या घटनांसारख्या अजिबात नसतात. माणूस आणि प्राणी यांचं सौहार्दपूर्ण सहजीवन कधीच वर्तमानपत्रांत वाचायला मिळत नाही. मला आठवतं, मी अकोले भागात असताना मुंबईतल्या एका मोठ्या, मराठी वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला तिथल्या बिबट्यांबद्दल लिहायचं होतं. या पत्रकाराला तिचे संपादक म्हणाले, ’तिथे बिबट्यानं माणसाला मारलंय का? नाही ना? मग बातमी द्यायची किंवा लेख लिहायची गरज नाही. बिबट्यानं माणसाला मारलं तर मोठी बातमी दे’. त्यामुळे ’मॅन-अॅनिमल कन्फ्लिक्ट’ची भीती लोकांच्या मनात तयार करण्यामागे प्रसारमाध्यमांचा मोठा हात आहे. वर्षानुवर्षं बिबट्याला रोज पाहणारा शेतकरी जेव्हा पेपरात फक्त बिबट्यानं केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या वाचतो, तेव्हा तोही घाबरतो आणि मग साखळी प्रतिक्रिया तयार होत जाते.
असं असलं तरी आम्ही प्रसारमाध्यमांशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. मी रात्री फोन उचलत नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये काम करणार्या कोणाचा कितीही रात्री फोन आला, तरी मी त्या व्यक्तीशी बोलते. 'मुंबईकर्स फॉर एसजीएनपी’ या आमच्या नव्या प्रकल्पाअंतर्गत आम्ही साठ-सत्तर पत्रकारांसाठी तीन कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. या कार्यशाळांनंतर ते ज्या पद्धतीनं वार्तांकन करत होते, त्यात बदल झालेला आम्हांला दिसला. चुकीचं वार्तांकन काही ते मुद्दाम करत नव्हते. त्यांना विषयाची पुरेशी माहितीच नव्हती. कार्यशाळांनंतर ती झाली आणि बातम्या योग्य पद्धतीनं देण्याचा निदान प्रयत्न केला जाऊ लागला. आता वर्तमानपत्रांमध्ये फक्त हल्ल्यांच्या बातम्या छापून येत नाहीत. गावकर्यांनी काय करावं, काय करू नये, हेही पत्रकारांनी सांगितलेलं असतं. हल्ल्यांच्या बातम्याही अतिरंजित नसतात.
'मुंबईकर्स फॉर एसजीएनपी' या प्रकल्पाबद्दल सांगाल का?
श्री. सुनील लिमये हे संजय गांधी नॅशनल पार्कात नवे अधीक्षक म्हणून आले तेव्हा त्यांना नवे प्रकल्प सुरू करायचे होते. कुठलेतरी संशोधन-प्रकल्प हाती घेण्याऐवजी जास्तीत जास्त सामान्य लोकांना सामील करून घेता येईल, असा प्रकल्प सुरू करावा, असं आमच्या मनात आलं आणि त्यातून 'मुंबईकर्स फॉर एसजीएनपी' हा प्रकल्प उभा राहिला. 'एसजीएनपी' म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क. हा प्रकल्प पूर्णपणे लोकांसाठी आहे. लोकांना अगदी प्राथमिक माहिती देण्यापासून आम्ही सुरुवात केली. बिबटे कसे जगतात, काय खातात हे सांगितलं. २००६ ते २०१२ या काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एकही मृत्यू झाला नव्हता, हेही आम्ही त्यांना सांगितलं. दर आठवड्याला बिबटे लोकांना मारतात, असा त्यांचा समज होता, तो या निमित्तानं दूर झाला. पत्रकारांनाही अर्थातच या कार्यक्रमात आम्ही सामील करून घेतलं होतं. या प्रकल्पाअंतर्गत आम्ही उद्यानाभवतालच्या पोलीसस्टेशनांशी संपर्क साधला आणि त्यांच्यासाठीही कार्यशाळा आयोजित केल्या. कारण बरेचदा बिबट्या दिसला की पहिला फोन त्यांना जातो. बिबट्या दिसला की लोक त्याला घेरतात, मग बिबट्या बिथरतो. अशावेळी पोलिसांनाही परिस्थिती कशी हाताळावी, हे कळत नाही. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे, असं आम्हांला वाटलं. आम्ही पवईच्या आयआयटीत जाऊन कार्यशाळा घेतली. आदिवासी पाड्यांमध्ये गेलो. शाळाकॉलेजांमध्ये गेलो. अजूनही जातो. वन्यप्राण्यांबद्दलचे गैरसमज दूर होणं खूप महत्त्वाचं आहे, हे या निमित्ताने मला प्रकर्षानं जाणवलं.
हे असे प्रयत्न इतर राज्यांमध्येही सुरू आहेत का? कारण उत्तराखंडात बिबट्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत आहे. दिसला बिबट्या की घाल गोळी, असे प्रकार घडत असल्याचं वर्तमानपत्रांमधून वाचलं आहे.
ब्रिटिशकाळापासून उत्तराखंडात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची शिकार झाली आहे. बिबट्यांनीही अनेक माणसं मारली आहेत. तिथे या समस्येच्या गाभ्याशी न जाता बिबट्यांची फक्त शिकार सुरू आहे. जम्मू आणि काश्मिरात मात्र बिबटे-माणूस संघर्ष उभा राहताच सरकारनं ताबडतोब पावलं उचलली. वनमंत्री मियाँ अल्ताफ अहमद यांनी जातीनं लक्ष घालून याबाबत काय उपाय योजता येतील, याची तज्ज्ञांशी चर्चा केली. कुत्र्यांची वाढलेली संख्या, उघड्यावरचा कचरा ही हल्ल्यांमागची प्राथमिक कारणं दूर करण्यावर जोर देण्यात आला. प्रत्येक खेड्यात पाच तरुणांची नियुक्ती करण्यात आली. हे तरुण गावकरी आणि प्रशासन यांच्यातला दुवा असणार होते. गावकर्यांना समस्येबद्दल, काय करा व काय करू नका हे सतत सांगणं, हे या तरुणांचं काम. बिबट्याअस्वलासंदर्भात गंभीर परिस्थिती उद्भवल्यास या तरुणांनी परिस्थितीचा ताबा घ्यायचा, प्रशासनाला कळवायचं, भीतीपोटी माणूस किंवा बिबट्या-अस्वल यांच्यावर दुसरा हल्ला होणार नाही, याची काळजी घ्यायची या जबाबदार्या होत्या. अवघ्या दोन वर्षांत काश्मिरात परिस्थिती आटोक्यात आली आहे.
प्रत्येक बिबट्या हा नरभक्षकच असतो, हा गैरसमज आधी दूर व्हायला हवा. बिबट्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची आकडेवारी लोकांपर्यंत पोहोचायला हवी.
बहुसंख्य चित्रपटांमध्येही बिबटे, वाघ, सिंह हे नरभक्षक, आदमखोर, मॅनइटर असेच असतात.
'नरभक्षक' हा शब्द टीव्ही वाहिन्यांना, चित्रपटदिग्द्गर्शकांना सतत खुणावत असतो. मध्यंतरी 'ट्वेन्टी-फर्स्ट सेन्च्युरी कॅट्स्' नावाचा चित्रपट तयार केला गेला. अजून भारतात प्रदर्शित झालेला नाहीये तो. या चित्रपटाचा विषय भारतातले बिबटे हा आहे. त्यांच्या आधीच्या शीर्षकात ’नरभक्षक’ हा शब्द बघून मी चिडले. त्यांना पत्र लिहिलं की, तुम्ही वास्तवाचा विपर्यास काही भलतंसलतं दाखवलंत तर मी 'सेंट्रल टायगर अथॉरिटी ऑफ इंडिया'कडे तक्रार करेन आणि तुम्हांला इथे चित्रीकरण करू न देण्याची शिफारस करेन. त्यांना मी भारतातल्या बिबट्यांची माहितीही लिहून पाठवली. माझं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची पटकथा बदलली, शीर्षक बदललं आणि ’मॅनइटर’ म्हणजे नरभक्षक बिबटे ही अतिरंजित कल्पना असून वास्तव फार वेगळं आहे, बिबटे आणि माणसं एकत्र राहू शकतात आणि राहतात, हे चित्रपटातून समोर आणलं.
नरभक्षक प्राण्यांबद्दलची भीती जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन यांच्यासारख्यांमुळे समाजाच्या काही वर्गात पसरली असावी का?
हो. जिम कॉर्बेट आणि केनेथ अँडरसन हे शिकारी होते. त्यांनी प्राण्यांवर शास्त्रीय संशोधन केलं नव्हतं. त्यांचे अनेक दावे, अनेक कथाही अतिरंजित होत्या. मचाणावर बसलेल्या जिम कॉर्बेटला चंद्राच्या प्रकाशात खालून येणारा वाघ ओळखता येतो, हे प्रत्यक्षात शक्य नाही. इतकी वर्षं बिबट्यांबरोबर घालवूनही अजूनही मला भर उजेडात नुसत्या फोटोंवरून बिबटे ओळखता येत नाहीत. तसे ते ओळखणं जवळपास अशक्य असतं. पण जिम कॉर्बेट पुस्तकांमध्ये कायम असे प्राणी ओळखतो. जिम कॉर्बेट उत्तम लेखक आहे. त्याला अनेक भन्नाट अनुभव आले. पण तरी त्याची पुस्तकं ही फिक्शन आहेत आणि फिक्शन म्हणूनच ती वाचली जायला हवीत.
अशा पुस्तकांमुळे वन्यजीवनाबद्दल आकर्षण तयार होतं, तसे गैरसमजही पसरतात. दुसरा परिणाम मला जाणवलेला असा, की अभयारण्यांमध्ये, जंगलांमध्ये कसं वागावं, हे लोकांना कळत नाही. वाघाला वाहनांनी घेरून फोटो काढले जातात. अनेकदा तथाकथित वन्यजीवप्रेमीच अभयारण्यातले कायदे धाब्यावर बसवतात.
बरोबर आहे. मी एक उदाहरण देते. या वर्षी कर्नाटक राज्यात वाघांची गणना करायची होती. पाच वर्षांपूर्वी जेव्हा अशी गणना झाली तेव्हा हजारो अर्ज आले होते. नुसती झुंबड उडाली होती. यंदा शासनानं जाहीर केलं, की गणना करणार्या स्वयंसेवकांना कॅमेरे आणि कॅमेरे असलेले मोबाईल फोन वापरण्याची परवानगी मिळणार नाही. वनविभागाकडे फक्त पाच अर्ज आले. लोकांना वन्यजीवसंवर्धनासाठी काही काम करण्यापेक्षा आपण हे काम करत आहोत, हे जगापुढे मिरवण्यात अधिक रस असतो. आता फेसबुकामुळे तर परिस्थिती अजूनच वाईट झाली आहे. जंगलात काम करतानाचे फोटो तिथे टाकण्याची जणू चढाओढ असते.
लोकांमध्ये बिबट्यांबद्दल योग्य ती माहिती प्रसृत व्हावी, यासाठी तुम्ही उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्याबरोबर ’वाघाचा खटला’ हा लघुचित्रपटही तयार केला होता.
’वाघोबाचा खटला’ आम्ही बिबट्यांविषयीच्या प्रबोधनासाठी तयार केला होता. मला प्रचंड आवडतो तो! होतं काय, की वृक्षसंवर्धनाबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी शाळेतल्या मुलांशी तुम्ही संवाद साधू शकता. पण बिबट्यांच्या बाबतीत तसं करता येत नाही. कारण बिबट्यांशी संबंधित निर्णय घेण्याचं काम शाळकरी मुलं करत नाहीत. गावातले मोठे करतात. त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव करून देणं महत्त्वाचं. म्हणून त्यांना दाखवता येईल, असा लघुपट तयार करावा, असं माझ्या मनात आलं. माझ्याकडे त्यावेळी थोडे पैसे होते. नॉर्वेतल्या संस्थांनी थोडे पैसे दिले आणि मी उमेश कुलकर्णीला विनंती केली की, तू या विषयावर एक लघुचित्रपट तयार कर. त्यानं आणि गिरीश कुलकर्णीनं मिळून हा लघुचित्रपट लिहिला. एक वर्षं लागलं त्यांना या कामासाठी. आम्ही फर्गसन रस्त्यावरच्या वाडेश्वरला किंवा नळस्टॉपाजवळच्या समुद्र हॉटेलात भेटायचो. उमेश आणि गिरीश फ्रेंच फ्राईज मागवायचे कारण ते खायला बराच वेळ लागतो आणि मग बराच वेळ तिथे बसता येतं. वेटर उठवत नाहीत. तर, वर्षभरानंतर पटकथा तयार झाली आणि उमेश-गिरीशनं लगेच चित्रीकरण केलं. फार सुरेख लघुचित्रपट आहे तो. विषय गंभीर आणि महत्त्वाचा आहे, पण लघुपट धमाल विनोदी आहे. वगनाट्याच्या स्वरूपात विषय समोर येतो. विषयाची मांडणी ग्रामीण जनतेला समोर ठेवून केली आहे.
वाघोबाचा खटला : भाग १
वाघोबाचा खटला : भाग २
आजोबाची गोष्टही आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
आजोबाबद्दल वर्तमानपत्रांत वाचल्यावर मला दोघंतिघं भेटायला आले होते. बिबट्यांबद्दल बोलण्यासाठी मी कायमच वेळ देते, तसा मी त्यांनाही दिला. पण त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की, त्यांना बिबट्यांविषयी, बिबट्यांशी संबंधित समस्यांशी काहीच घेणंदेणं नव्हतं. त्यांना ’नरभक्षकां’वर अतिरंजित चित्रपट काढायचा होता. त्यामुळे मी त्यांना नकार दिला. मग एक दिवस सुजय डहाकेचा फोन आला. मला आजोबावर चित्रपट तयार करायचाय, असं तो म्हणाला. त्यावेळी मी ’शाळा’ बघितला नव्हता. त्यामुळे सुजयबद्दल मला माहीत नव्हतं. माझे काही मित्र उगाच कोणाचंतरी नाव सांगून माझी थट्टा करत असतील, असंही मला वाटलं. मग मी गूगल करून त्याच्याबद्दल माहिती करून घेतली. त्याला आणि गौरी डांगेला भेटले. त्यांना भेटल्यावर मला कळलं की, त्यांना खरोखर या विषयाबद्दल आस्था आहे. ते आजोबाला, मला अतिशय जिव्हाळा वाटत असलेल्या विषयाला न्याय देतील, असं मला वाटलं आणि म्हणून मी सुजयबरोबर काम करायला तयार झाले.
आम्ही ’वाघोबाचा खटला’ करत होतो, तेव्हा मी उमेशला विचारलं होतं की, बिबट्यांवर पूर्ण लांबीचा चित्रपट करायचा असेल, तर किती खर्च येईल? तो म्हणाला, निदान एक कोटी रुपये. तेवढ्या पैशात मी दहा वर्षंतरी आरामात संशोधन करू शकले असते. त्यामुळे मी चित्रपटाचा विचार सोडून दिला. पण आता सुजय आजोबाची गोष्ट मोठ्या पडद्यावर सांगतोय, याचा मला फार आनंद झाला आहे.
प्रोजेक्ट वाघोबाअंतर्गत तयार केलेलं 'वाघोबाच्या गोष्टी' हे पुस्तक इथे वाचता येईल.
प्रकाशचित्रांचा तपशील -
प्रकाशचित्र क्र. १ - डॉ. विद्या अत्रेय, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. २ - डॉ. विद्या अत्रेय, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ३ - यावलला पकडलेली बिबट्याची मादी, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ४ - वरच्या चित्रात बिबट्याच्या शेपटीच्या वर मायक्रोचिप बसवताना, खालच्या चित्रात काचेच्या कुपीत मायक्रोचिप. या चिपच्या आकाराचा अंदाज यावा म्हणून शेजारी हातसडीच्या तांदळाचे दाणे आहेत, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ५ - वाघोबा, © प्रोजेक्ट वाघोबा
प्रकाशचित्र क्र. ६ - कॅमेरा ट्रॅप बसवताना डॉ. विद्या अत्रेय, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ७ - विहिरीच्या कट्ट्यावर बसलेला आजोबा, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ८ - आजोबाच्या गळ्यात कॉलर बसवताना आपल्या सहकार्यांसमवेत डॉ. विद्या अत्रेय, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ९ - डावीकडे, लक्ष्याईला कॉलर लावताना, उजवीकडे, कॉलर लावल्यानंतर सीता, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. १० - शार्लेटला कॉलर लावताना डॉ. विद्या अत्रेय, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. ११ - 'बिबट्याप्रवणक्षेत्रा'तली एक सूचना, © पंकज सेखसरिया
प्रकाशचित्र क्र. १२ - बिबट्या पकडण्यासाठी सापळा तयार करताना डॉ. विद्या अत्रेय व त्यांचे नॉर्वेजियन सहकारी डॉ. जॉन लिनेल, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. १३ - तरुण बिबट्या, © डॉ. विद्या अत्रेय
प्रकाशचित्र क्र. १४ - अकोले भागातली एक मादी बिबट्या. हिला दोन बछडे होते आणि गावात विजेच्या झटक्यानं मरण पावलेल्या गायीला खायला ही निघाली होती, © डॉ. विद्या अत्रेय
ही सर्व प्रकाशचित्रं उपलब्ध करून दिल्याबद्दल, वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल, तसंच 'वाघोबाचा खटला' हा लघुचित्रपट व 'वाघोबाच्या गोष्टी' हे पुस्तक मायबोली.कॉमवर उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. विद्या अत्रेय यांचे मनःपूर्वक आभार.
काही प्रकाशचित्रं उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. पंकज सेखसरिया यांचे आभार.
- चिन्मय दामले
प्रतिसाद
उत्तम लेख. मला ह्या
उत्तम लेख. मला ह्या बिबट्यांची नेहमी काळजी वाट्ते पण लेख वाचून वाटले की दे आर इन गुड हँड्स. शहरी माणसांच्या सोशीक पणाबद्दल अगदी अगदी. ब्लेस द अॅनिमल्स
मुलाखत अतिशय आवडली. धन्यवाद
मुलाखत अतिशय आवडली. धन्यवाद :)
सुंदर मुलाखत. खूप आवडली.
सुंदर मुलाखत. खूप आवडली. धन्यवाद!
अवांतर: 'वाघोबाच्या गोष्टी' हे पुस्तक सापडले नाही.
सुंदर आणि विस्तृत
सुंदर आणि विस्तृत मुलाखत.
धन्यवाद!
ऊत्तम मुलाखत धन्यवाद चिनूक्स
ऊत्तम मुलाखत
धन्यवाद चिनूक्स
चिनुक्स अगदी उत्तम मुलाखत.
चिनुक्स अगदी उत्तम मुलाखत. विद्या अत्रेय यांच्याविषयी बहुतेक डिस्कव्हरीवर काही पाहिलं होतं.
मुलाखत आवडली.
मुलाखत आवडली.
मुलाखत आवडली. धन्यवाद.
मुलाखत आवडली. धन्यवाद.
छान अभ्यासपूर्ण मुलाखत! छान
छान अभ्यासपूर्ण मुलाखत! छान माहिती मिळाली.
चिन्मय, अत्यंत सुंदर आणि
चिन्मय, अत्यंत सुंदर आणि सर्वांगाने माहिती घेणारी मुलाखत आवडली!
मुलाखत आवडली.
मुलाखत आवडली.
खूप म्हणजे खूपच सुंदर मुलाखत
खूप म्हणजे खूपच सुंदर मुलाखत आहे.
या दिवाळी अंकातील मला आवडलेले सर्वोत्कृष्ट लेखन.
मस्त झाल आहे मुलाखत. वाचायला
मस्त झाल आहे मुलाखत. वाचायला घेतली तेव्हा खूप मोठी आहे असं वाटलं. पण इंटरेस्टिंग आहे. फोटो सगळे कातिल आहेत.
छानच आहे मुलाखत.
छानच आहे मुलाखत.
भलंमोठं धूड होतं ते. हा
भलंमोठं धूड होतं ते. हा बिबट्या तसा वयस्कर होता. अगदी जख्ख म्हातारा नव्हे, पण पोक्त म्हणावा असा. वयामुळे येणारं शहाणपण त्याच्या चेहर्यावर दिसत होतं. बेशुद्ध करण्याअगोदर तो खूप शांत होता. तो थकला असावा, शिवाय उष्माही खूप होता. बेशुद्ध करतानाही त्यानं अजिबात प्रतिकार केला नाही. त्याच्याकडे बघितल्यावर कोणालाही त्याच्याबद्दल आदर वाटावा, असं त्याचं एकंदर रुपडं होतं. या बिबट्याला नाव काय द्यायचं, या विचारात आम्ही होतो. मला एकदम नाव सुचलं - ’आजोबा’. >>
हे आणि बरच काही खुप आवडल.
अगदी ओघवती शैली, रोखठोक - सुस्पष्ट - विश्लेशणात्मक उत्तरं आणि आधिच्या उत्तरातुन आल्यासारखे पुढचे प्रश्ण , एकुणच दिर्घ मुलाखत मस्त झाली आहे. डॉ. अत्रेय यांची बिबट्या-माणूस संघर्षा बद्दलची भुमीका व्यवस्थित पोहोचली.
धन्यवाद चिन्मय.
'वाघोबाच्या गोष्टी'चा फाँट भलताच दिसतो आहे, फक्त मलाच की सगळ्यांना ?
उत्तम मुलाखत, चिन्मय! खूप
उत्तम मुलाखत, चिन्मय! खूप वेगळी माहिती व कार्यक्षेत्र!
अकोले गावात अनेकदा राहिलेली असल्यामुळे तेथील परिसरात हिंडणार्या बिबट्यांबद्दल गावकर्यांकडून बरेच काही ऐकले आहे. एकदा मध्यरात्रीनंतर अकोले येथून पुण्याला परत येत असताना वाटेत झाडीत दिसलेली आकृती व चमकणारे डोळे हे बिबट्याचे(च) होते असे माझ्या तेव्हाच्या सहप्रवाश्यांचे आजही म्हणणे आहे! :)
चांगली झाली आहे मुलाखत.
चांगली झाली आहे मुलाखत.
सर्वांचे आभार आरती, ते
सर्वांचे आभार :)
आरती,
ते पुस्तक या वरच्या लिंकेवरून डाउनलोड करून वाचता येतंय का बघ.
नाहीतर प्रशासकांशी बोलून खरेदीविभागात डाऊनलोड करता येईल का, हे बघतो.
अपेक्षेप्रमाणेच वेगळा
अपेक्षेप्रमाणेच वेगळा विषय.अंकाचा दर्जा उंचावणारी दर्जेदार मुलाखत.
थरारक. चिन्मय, मस्त मुलाखत.
थरारक. चिन्मय, मस्त मुलाखत.
उत्तम मुलाखत, चिन्मय !!!
उत्तम मुलाखत, चिन्मय !!!
मस्त मुलाखत. आजोबाची स्टोरी
मस्त मुलाखत. :)
आजोबाची स्टोरी अजुन नीट कळाली.
:)
गुगल अर्थ वरून नॉर्वे
गुगल अर्थ वरून नॉर्वे सर्वर्वरील नोन्दी कशा पहाव्यात ?
छानच झालीये मुलाखत!
छानच झालीये मुलाखत!
सुंदर आणि ओघवति मुलाखत,
सुंदर आणि ओघवति मुलाखत, आवडलीच!
उत्तम मुलाखतीबद्दल चिनूक्स
उत्तम मुलाखतीबद्दल चिनूक्स यांचे आभार. डॉ. विद्यांचा दांडगा व्यासंग ठायीठायी जाणवतो. त्यांच्या झोकून द्यायच्या वृत्तीस अभिवादन. बिबट्यांबद्दल बरीच नवी माहीती कळली.
आजोबाने कसारा स्थानक ओलांडलं तेव्हा मला वाटलं की तो जव्हार-त्र्यंबकच्या पट्ट्यात कुठेतरी विसावेल. किंवा दक्षिणेकडे वळलाच तर फारतर माहुलीच्या आसपास येईल. तसं न करता त्याने थेट नागलाबंदर गाठले. डॉ. विद्यांच्या या अचूक तर्काचं कौतुक करावंसं वाटतं. :-)
-गा.पै.