मी जयवंत. मायबोली आयडी - पेशवा. मायबोलीचा गेले चौदाएक वर्षं सदस्य. आत्तापर्यंत मायबोलीवरच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या संयोजनात माझा सहभाग नव्हता. यावेळी दिवाळी अंक संपादक मंडळात काम करावं म्हणून नाव दिलं आणि प्रशासकांनी गुळाचा गणपती करत मुसंबुच्या खुर्चीवर बसवलं. मंडळातील इतर सदस्यांची नावं वाचून अंकाच्या संपादनकाळात काढल्या जाणार्या अनेक आरत्यांची मनोमन तयारी करून काम सुरू केलं. इतक्या तगड्या मंडळानं सगळी कामं आपापसांत वाटून घेतली आणि मला 'तू झोप, तुझे मंडळ जागे आहे' या मंत्राचा साक्षात्कारी अनुभव दिला. हा अंक पूर्ण होण्यामागे व तो उत्तम असावा यामागे मंडळाची व त्यांच्या मागण्या विनातक्रार पूर्ण करणार्या सगळ्या स्वयंसेवकांची अथक मेहनत आहे. मला खात्री आहे की, अंक आपल्या पसंतीस उतरेल. जर अंकात काही त्रुटी राहिल्या असतील, तर मुसंबु या नात्यानं त्याची जबाबदारी माझी आहे. त्रुटींमुळे होणार्या त्रासासंदर्भात 'कोतबो'मध्ये तुम्ही धागा उघडू शकाल, याची सोय केलेली आहे.
मी इरावती. मायबोलीवर मी अरुंधती किंवा अकु या नावानं जास्त ओळखली जाते. संपादक मंडळातले लोक मला मसुदाक्वीन, अष्टभुजा वगैरे नावांनी संबोधतात. संपादकाचं काम करायला लागल्यापासून मी मसुदे लिहितालिहिता इतकं छापील व औपचारिक मराठी बोलायला आणि लिहायला लागले की, मित्रमंडळींना माझ्या मराठीबद्दल अनावर चिंता वाटू लागली आहे! या दिवाळी अंकासाठी काम करताना मला बर्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तसंच लोकांच्या मनातला मायबोलीबद्दलचा स्नेह व सहकार जवळून अनुभवायला मिळाला. माझ्यासाठी हा एक वेगळा व संपन्न करणारा अनुभव आहे हे निश्चित!
माझे नाव तृप्ती. संपादक मंडळ मला 'गब्बर मावशी', तर मंडळेतर मायबोलीकर 'चिवट संपादिका मावशी' उर्फ 'चिमा' या नावानं ओळखतात. दिवाळी अंकासाठी साहित्य मागत वणवण फिरण्यात जोडे झिजवल्यानं एका जुन्या आयडीचा त्याग करावा लागतो की काय, अशी भीती वाटते आहे, त्यामुळे तो आयडी सांगत नाही. मायबोलीशी माझा गेली दहा वर्षं परिचय आहे. इथल्या अनेक उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. दिवाळी अंक म्हणजे सगळ्या उपक्रमांचा मानबिंदू. एखाद्या अम्यूझमेंट पार्कमध्ये असेल अशा सगळ्यांत मोठ्या रोलर कोस्टर राईडशीच याची तुलना होऊ शकेल. ही राईड घेताना खूप धमाल आली. तुम्हांलासुद्धा ही हितगुज दिवाळी अंक नामक वंडरलँडची सफर आवडेल, अशी आशा.
मी देवदत्त, मायबोलीवर देवा या नावाने वावर. गेली ९ वर्षे मी मायबोलीवर कमी आणि 'गटग'त जास्त दिसतो, असं लोक म्हणतात. नव्याची नऊ वर्षं संपल्यावर जुन्या(जाणत्या) लोकांमध्ये माझी गणती व्हावी, या उद्देशाने यावर्षीच्या संपादक मंडळात सहभागी झालो, आणि एक पोस्ट संपादित करणं ते अंकाचं संपादन करणं, यातील या ४-५ महिन्यांच्या प्रवासाचा अनुभव घेतला. त्या प्रवासातल्या गंमतीजमतींचं फलित तुम्हांला आवडेल, अशी अपेक्षा.
मी प्राजक्ती. मायबोलीकर (आता घरचेही) मला सुनिधी या नावाने ओळखतात. स्वतःबद्दल लिहिण्याची संधी मिळालीच आहे तर आत्मचरित्रच लिहिणार होते, पण थोडक्यात आटोपते. मला मायबोलीवर येऊन दहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे. काही उपक्रमांत काम केलं आहे, पण दिवाळी अंकाच्या उपक्रमात भाग घेण्याची हिंमत झाली नव्हती, ती यावर्षी केली. संपादक चमूबरोबर हे काम करताना मजा आली. एरवी गंभीर वाटणारे आयडी मजेशीर आहेत, हे कळलं. काम करताना समाधान मिळालं, खूप चांगला अनुभव पदरी पडला (आणि खरंच पवित्र झाला). संपादन करताना मी हजेरी लावलेला पहिला स्काईप कॉल (फक्त) पाच तास चालला, त्यामुळे घरचे काळजीनं विचारू लागले, 'काय झालं? सगळं ठीक आहे ना?' नंतर मात्र कॉल सुरू झाला की ते मला मोकाट सोडायचे. आता 'हा प्रवास दिवाळी अंक प्रसिद्ध झाला की संपला' या विचारानं हुरहूर लागली आहे. आशा आहे अंक तुम्हांला आवडेल.
मी योगेश कुळकर्णी. मायबोलीवर योकु. माझी अन् मायबोलीची गाठभेट जवळजवळ तीन वर्षांपूर्वी झाली. मग एका ठाणे दिवाळी गटगमध्ये सगळ्या ठाणेकरांची भेट झाली. तेव्हापासून वेगवेगळ्या गटगंना हजेरी, वर्षाविहार, टी-शर्ट समिती, बृममं अधिवेशन, माध्यम प्रायोजक असा प्रवास सुरू झाला. यावेळी हितगुज दिवाळी अंकात काम करण्याचीही संधी मिळाली. जसजसे दिवस पुढे सरकायला लागले तसतसे या कामाचा आवाका कळायला लागला. टीमवर्कचा एक खूप वेगळा अनुभव मिळाला, त्यासाठी मायबोलीचे आभार. मध्यंतरी वैयक्तिक कामांमुळे माझी गैरहजेरी होती त्याकरता संपादक मंडळाला मनापासून सॉरी...या अंकाकरता सगळ्याच संपादकांनी अन स्वयंसेवकांनी आपापले कामाचे व्याप सांभाळून मोलाची मदत केली आहे; तुम्हां सगळ्यांना हा अंक आवडेल अशी आशा आहे.
मी रूपा. मायबोलीवरची rmd किंवा रमड. १४ वर्षांपूर्वी मराठी वेबसाईट्स्चा शोध घेताना मायबोली सापडली. माझ्या कविता ऐकवायला (आणि लोकांना पकवायला) बरं ठिकाण मिळालं, म्हणून इथे आले आणि इथलीच झाले. एखाद्या उपक्रमाचा भाग होण्याची ही माझी दुसरीच वेळ. मायबोलीची जुनी मेंबर असले तरी संपादक मंडळात एकदम ज्युनिअर! पण टीममधल्या जुन्या-जाणत्यांनी छान सांभाळून घेतलं आणि ४ - ४.५ महिन्यांची ही सफर (इंग्रजीतली नव्हे!) कधी संपली कळलं नाही. आम्ही हे काम करताना जेवढं एंजॉय केलं तेवढंच तुम्ही हा अंक वाचताना एंजॉय कराल याची खात्री आहे.
मी शंतनू. मायबोलीवर व मायबोलीबाहेरही लोक टण्या नावाने जास्त ओळखतात. नोकरी करायला लागल्यापासून एकाही शहरात सलग एक-दीड वर्षांपेक्षा जास्त राहता आलं नाही. पण http://www.maayboli.com हे होम(पेज) आणि /user/396 हा पत्ता मात्र 'स्थायी' राहिला. मायबोलीच्या उपक्रमात सहभाग घ्यायची ही माझी पहिलीच वेळ. माझ्याबरोबर काम करण्याची शिक्षा त्यामुळे आजवर दुसर्या कुठल्या मंडळास मिळाली नव्हती. अॅडमिनच्या कृपेने यावर्षीच्या दिवाळी संपादक मंडळास माझ्याबरोबर 'सफर' करायला मिळाली. या सफरीचे फळ आता तुमच्या हातात आहे. मात्र तुमच्यासाठी ते सफरिंग न होता एंटरटेनिंग होईल ही आशा आहे.
मी सत्यजित, मायबोलीवरती आगाऊ. मला नक्की कसं संबोधावं, याबद्दल संपादक मंडळात मतभेद आहेत, मात्र मुख्य संपादक मला 'अहो आगाऊ' म्हणतात म्हणून मी त्यांचा आभारी आहे. मायबोलीवरचं हे माझे सातवं वर्ष. नात्याच्या सातव्या वर्षी वेगळे साहस करण्याची खाज येते, असे म्हणतात, ते संपादक मंडळात समावेश झाल्याने माझ्या बाबतीत सिद्ध झालं आहे. माझ्यासाठी गेल्या पाच महिन्यांचा हा प्रवास विलक्षण सुखावह आणि खूप काही शिकवून जाणारा होता. हा हितगुज दिवाळी अंक तयार करताना आम्हांला जी मजा आली तीच तुम्हांला तो अनुभवताना यावी, हीच मनापासून अपेक्षा.
'मंजूडी' हे नाव मायबोलीच्या अनेक उपक्रमांमध्ये वाचून तुम्हांला खरंतर कंटाळा आला असेल. अनेक ठिकाणी माझ्या पोस्टी वाचून माझ्याबद्दल बरेच आडाखेही तुम्ही बांधलेले असतील. तेव्हा माझी ओळख नव्याने करून द्यायला नको. दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो मायबोलीच्या उपक्रमांचा मानबिंदू म्हणजे हितगुज दिवाळी अंक. त्यासाठी गेल्या वर्षी काम करताना जो अनुभव गाठीशी बांधून घेतला, ती गाठ म्हणजे एक ट्रंकच झाली आहे. वैयक्तिक आयुष्यात गरज भासेल तेव्हा ती ट्रंक उघडून त्यातली शिदोरी खाल्ली जाते आणि नेमके त्यानेच पोट भरते. गेल्या वर्षी डोक्यावर बर्फाची लादी ठेवून संपादकपदाचे झगे मिरवल्याने ते गिच्च ओले झाले होते. यंदाच्या वर्षी ते झगे चांगले स्वच्छ धुऊन, वाळवून, इस्त्री करून या संपादक मंडळाकडे हवाली केले आणि मी काठावर बसून 'हे बटण लावा, ती नाडी बांधा', असे पोकळ सल्ले दिले. या मंडळींनी ते झगे दुमडून, नाड्या आवळून, बाह्या सरसावून दरवर्षी काहीतरी नवे देण्याचे काम अतिशय धडाडीने आणि समर्थपणे पार पाडले आहे. त्यांनी केलेल्या कामाची तुम्ही प्रशंसा कराल याची मला पूरेपूर खात्री आहे. तुम्हां सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतिसाद
ओळख मस्त आहे सर्वांची :-)
ओळख मस्त आहे सर्वांची :-)
ओळख, आणि त्याहीपेक्षा चित्रं
ओळख, आणि त्याहीपेक्षा चित्रं / कॅरिकेचर्स फारच आवडली.
संपादक मंदळातल्या सदस्यांची या प्रकारे ओळख करून देण्याची कल्पना भारी आहे.
मस्त ओळख आहे सर्वांची.
मस्त ओळख आहे सर्वांची. चित्रंही झकास.
ही ओळख करुन द्यायची कल्पना भारी आहे.
मृ +१ .. अतिशय उत्तम कल्पना
मृ +१ .. अतिशय उत्तम कल्पना प्रत्येकाची ओळख देण्याची .. कॅरीकेचर्स एकदम बोलकी .. :)
झकास ओळख आहे सर्वांची. चित्रे
झकास ओळख आहे सर्वांची. चित्रे मस्तच. इतक्या छान अंकाबद्दल अभिनंदन सगळ्यांचे :)
मस्त ओळख करुन दिलीये ....
मस्त ओळख करुन दिलीये ....
सगळ्या टीमचे हार्दिक अभिनंदन .. :)
ओळख करून देण्याची कल्पनाही
ओळख करून देण्याची कल्पनाही सुंदर, एखाद्या वाचनीय लेखासारखी ही ओघवती ओळख झाली आहे. दिवाळी अंकाच्या,त्यातून एका ऑनलाईन दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम किती जिकिरीचं असतं हे ''जावे त्याच्या वंशा ..'' अंकाचं प्रथमदर्शन आणि रूपरेषा दर्जेदार आहे.अभिनंदन टीम !
ही कल्पना, माहिती व
ही कल्पना, माहिती व रेखाचित्रे आवडली. जबरी आयडिया आहे. मुख्य सल्लागारांचे चित्र इतरांपेक्षा वेगळ्या स्वरूपात का आहे? :)
ओळख परेड मस्त.. सर्वांची
ओळख परेड मस्त.. सर्वांची चित्र एक नंबर...!!!
ओळख आणि ती देण्याची कल्पना
ओळख आणि ती देण्याची कल्पना उत्तम!
ओळख मस्त आहे सर्वांची :-)
ओळख मस्त आहे सर्वांची :-)
लै भारी, लै भारी.
लै भारी, लै भारी.