जास्वंदाच्या हिरव्यागर्द पानांना उलटसुलट करून चाचपून पाहताना निळूच्या सुरकुतलेल्या बारीक डोळ्यांत अगदी वैद्य किंवा डॉक्टर असल्याचे भाव उतरले होते. एक अन् एक पान मायेनं चाचपून बघताना बराच वेळ जात होता त्याचा. अंधारून यायला लागलं होतं. आज अंमळ जास्तच काळोखलेलं होतं आभाळ. सावळ्या ढगांची खलबतं रंगात आली होती... बरसावं, कोसळावं की सध्या हलकेच रिमझिमून जावं फक्त - सलामी दिल्यासारखं? विजांच्या मागण्या अजून गुलदस्त्यात धुमसत होत्या. वादळांचे नारे वार्यानं कसेबसे थोपवून धरले होते. एकूणच.... पावसाळी कारस्थानांनी अंधारून आलेलं होतं सगळंच. निळूला मात्र भान नव्हतं. निळू रंगला होता... हिरवाईत.
डोळ्यांना दिसणं अवघड वाटू लागलं, तसा निळू किंचित त्रासल्यासारखा भानावर आला. आभाळाकडे त्यानं वैतागून पाहिलं आणि आजचा दिवस संपल्याची जाणीव त्याला झाली. काहीसं हिरमुसूनच त्यानं एकवार बागेकडे पाहिलं आणि आपली अवजारं समेटू लागला. उकिडवं बसून एकेक अवजार हळूवार उचलून त्याच्या छोट्याश्या काळ्या कातडी पिशवीत जपून ठेवत असताना, त्याला अचानक जाणवली एक नजर! त्याला रोखून बघणारी! अगदी त्या नजरेच्या टपोर्या गोलाईसह! निळू हसला. अजिबात नजर वर न करता तो म्हणाला,
"काय बाळे? काय बघतीस?"
त्याच्या कपाळावरल्या त्रस्त आठ्या विरल्या होत्या आणि आवाज कमालीचा खट्याळ झाला होता. त्या नजरेची सगळी निरागस बडबड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. पण चिवचिवाटासारखा मधाळ शब्द काही आज त्याच्या कानी पडेना. अखेर त्यानं थरथरणारी मान उचलून मनीकडे पाहिलंच. तिच्या टप्पोर्या मोठ्या डोळ्यांत पाहणं कटाक्षानं टाळत तो म्हणाला, "काय गं बये.... आज वटवट बंद झालीया जनू? बोलायचं न्हाय व्हय? ह्ये काय.... त्येचं काय... आसं कसं.... कश्यामुळं... इचारायचं न्हाय व्हय?"
"मी नाही बोलणारे आज तुझ्याशी जा...." फणकार्यानं मनी म्हणाली.
हे फारच अनपेक्षित! निळू भलताच गोंधळला. मनीचे गोरे गोबरे गाल असे टम्म फुगलेले त्याच्या आत्ता लक्षात आले. ’आपलं काय चुकलं आसंल? लेकरू हाय तरी काय झालं... त्ये मालक, आपन चाकर...’ निळू कावराबावरा झाला.
"कशामुळं रुसला ताई? काय जालं सांगाकी पयलं."
"हूं!!" करून मनीनं मान फिरवली. निळू आणखीनच बुचकळ्यात पडला. उठून पुन्हा तिच्या पुढ्यात गुडघ्यावर बसत म्हणाला, "आगं पन काय झालं त्ये सांग की पोरी..."
"तूच आठव. तू वचन दिलेलंस मला. विसरलास ना?"
’हायला या पोरीच्या...’ निळू मनात उद्गारला. ’वचन? तसलं काय तर आपून कंदी कुनालाच कशाचंबी दिल्यालं नाय.... सवतालाबी नाय!’
"कसलं वचन बाई?" निळू आता काकुळतीला आला.
"असं कसं विसरतोस तू? माझी आई सांगते, कुणाला कधी प्रॉमिस केलं तर ते पाळावं. नाहीतर लोकांचा आपल्यावर विश्वास राहात नाही. तू बॅड बॉय आहेस का?"
"हां???" निळू आपादमस्तक गोंधळून गेला. आपण या चिमुरडीला कधी कसलं वचन दिलं ते त्याला काही केल्या आठवेना.
"आऽऽ गं पन...." तेवढ्यात घरातून मनीची आई बाहेर आली. तिची चाहूल लागताच मनी रुसवा अचानक विसरल्यासारखी निळूच्या मागे लपली. त्याच्या कानात हळूच कुजबुजली, "आईला सांगू नकोस हं, मी इथे आहे ते..."
"हं? आगं पन कश्यापाई???"
"शूSSSSSS"
मग निळू मुकाट्यानं मुकाट झाला. मनीची आई समोर येऊन उभी राहिली तेंव्हा निळूच्या चेहर्यावर ओढूनताणून आणलेले निरागस भाव, त्यातूनही डोकावणारा अभूतपूर्व गोंधळ आणि प्रश्नचिन्हांचं भलंमोठं जाळं... या सगळ्याचं विचित्र मिश्रण झाल्यानं सावळा, म्हातारा निळू अगदीच विनोदी दिसत होता. मनीची आई हसू आवरत आणि आपण रागावलोय हे आठवत म्हणाली, "मने... मुकाट्यानं बाहेर ये..."
काहीही हालचाल झाली नाही. निळूला मागे किंचित चुळबूळ जाणवली.
आईचा आवाज चढला. "मने.... समोर ये पटकन नाहीतर रात्रभर घराबाहेर ठेवीन तुला!"
"मी नाही येणार जा!!!" निळूच्या मागून ताठ्यानं आवाज आला.
"निळूकाका, उठा तिथून." आपलं नाव आल्यावर निळू वर्गातल्या हजेरीपटावरल्या मुलासारखा दचकला. मग गुडघ्यावर जोर देत मागे बघत उठू लागला. उठता उठताच एकदम थांबला आणि परत जागेवर बसला.
"बसलात काय निळूकाका? उठा तिथून!"
"हा... हा.... उठतो ताई. पन... पन त्ये.... छोट्या ताईनं... माजं धोतर धरून ठ्येवलंय..."
मनीच्या आईला यावेळेस हसू आवरणं फारच अवघड गेलं. चटकन तिनं निळूच्या बाजूनं त्याच्या मागे लपलेल्या मनीचा हात धरला आणि ओरडली, "मने, पाचकळपणा पुरे झाला हं. चटकन् बाहेर ये बघू. धोतर सोड ते आधी."
"मला नाही यायचंय ना पण..." मनी रडवेली होत म्हणाली.
"अगं पण का नाही यायचंय? घरीच जायचंय ना आपण आपल्या? बाबा येतील आता आपल्याला न्यायला. चल लवकर. धोतर सोऽऽऽऽ ड!!!"
धोतराची फारच ओढाताण व्हायला लागली, तसं निळूला काहीतरी करणं भाग होतं. त्यानं मागे वळून मनीच्या हातातून हळूहळू धोतर सोडवून घ्यायला सुरुवात केली.
"असं नाय वागू पोरी. आईचं आइकावं. सोड बगू त्ये...."
"तू तर काही बोलूच नकोस!" मनी एकदम निळूवर भडकून बोलली. "तू वाईट्ट मुलगा आहेस!"
"मने!!" मनीच्या आईचा आवाज चढला. "वय काय त्यांचं? अरे तुरे करतेस त्यांना? हे शिकवलं तुला? आजोबा म्हणायचं त्यांना. कळ्ळं???"
"नाही!"
"मने...." आईनं हात उगारला तसं मनीनं धोतर सोडलं आणि भोकाड पसरण्याच्या तयारीला लागली.
निळूनं तेवढ्यात आपलं धोतर स्थिरस्थावर करून मुद्द्याला हात घातला.
"आसूदे आसूदे ताई. लेकरू हाय. माजी दोस्त हाय म्हना हावं तर. चालंल मला तिनं कसंबी हाक मारल्यालं. येवड्या मोट्या देवास्नी आपन ’आरं-तुरं’ करतुया.... त्याच्यापरीस म्या आगदीच ल्हान. तवा आसूद्या."
आता त्यानं मनीकडे पाहिलं. टप्पोरे डोळे पाण्यानं भरून आले होते.
"काय पोरी... दोस्त हायस नवं माजी? सांग बरं आईस्नी."
डबडबल्या डोळ्यांनी मनीनं निळूकडे पाहिलं आणि कुणाला काही कळायच्या आत अचानक तिनं निळूला मिठी मारली. मनीची आई अवाक् होऊन बघत राहिली. मळकट फाटक्या कपड्यांत सुरकुतलेल्या सावळ्या निळूच्या मिठीत गोरीपान नाजूक मनी निवडुंगावरल्या फुलासारखी दिसत होती. मनीच्या आईला काही ही लगट फारशी आवडली नाही. निळू गोंधळला. पण नकळत त्यानं मनीच्या केसांतून हळूवार हात फिरवला. अचानक कसल्यातरी आवेगानं त्याचा घसा एकदम जडशीळ झाला.
"काय झालं त्ये हितं उभं र्हाउन सांग बरं पोरी तुज्या आईस्नी. आसं येड्यागत वागू नये शान्या पोरींनी. पर्यांची रानी रागवित असत्ये मग...."
"तेच ते..." मनी एकदम बाजूला झाली. "तू मला परीला भेटवणार होतास. लाल परीला. तू वचन दिलं होतंस. तू विसरलास. आता मला लाल परी दाखवेपर्यंत मी इथून जाणार नाही! नाही म्हणजे नाही!"
निळू एकदम गांगरला. मनीच्या आईकडे पाहू लागला. तीसुद्धा गोंधळली.
"लाल परी? ही काय नवीन भानगड काढलीयेस? काय हो निळूकाका?"
"मला.... ते...."
"मी सांगते. आई, या निळूकडे किनै एक मंत्र आहे, ज्याने तो पर्यांच्या देशातल्या सगळ्या पर्यांशी बोलतो. त्यातली एक सुंदर लाल परी आहे, जी अगदी माझ्यासारखी दिसते. तिलापण माझ्याशी बोलायचं आहे. हा आणणार होता तिला मला भेटायला. हो की नै रे? म्हणाला होतास ना? वचन दिलं होतं यानं मला. बोल ना...."
निळू गप्पच बसला. मनीच्या आईनं मनीला मग खेचून जवळ घेतलं.
"असं झालं होय? अगं पिलू, आजोबांनी अशीच एक गोष्ट सांगितली तुला. ते काही खरं नसतं काही... आई नाही का रोज रात्री गोष्टी सांगत तुला... त्या गोष्टी खर्या थोडीच असतात...."
"नाही गं आई... ती गोष्ट नव्हती. मी पाहिलंय तिला याच्यासोबत. मला बघून पळून गेली ती. लाल लाल छोटीशी परी. मला ती पाहिजे..." मनी मुसमुसू लागली.
"असा हट्ट करू नये बाळा. मी बोलते हं निळूकाकांशी."
"पण आई मला त्या परीला भेटायचंय. तिला भेटून मी तिला सांगणार आहे बाबांचं नाव. ती त्यांना बरोब्बर शिक्षा करील...."
"मनी!" आई एकदम ओरडली. मनीच्या दोन्ही गालांवरून घळाघळा पाणी वाहू लागलं. निळू आपला टकामका बघत होता. काही क्षणांतच आवाज पुन्हा पूर्ववत आणून मनीची आई बोलली,
"मने, आत जा आणि छान हात पाय तोंड धू बघू. बाबा येतील आता. जा बरं...."
"मला नाही जायचंय आई. मला माहितीये तुलाही...."
"मने पुरे हं आता. चटकन् आत जा."
मनीनं एकवार निळूकडे केविलवाणं पाहिलं आणि हळूहळू चालत घरात निघून गेली.
ती गेल्यावर मनीची आई तिच्या दिशेनं बराच वेळ पाहात राहिली. आणि निळू पाहात होता तिला.... मनीकडे बघताना. तिची गोर्याहूनही पांढरेपणाकडे जास्त झुकणारी कांती आणि एका मुलीची आई असूनही अत्यंत कृश राहिलेला तिचा देह. भरून येण्यासाठी, वाहण्यासाठी, बरसण्यासाठी आतूर असल्यासारखे अत्यंत कोरडे डोळे. ६-७ वर्षांपूर्वीची हीच ती उत्साहानं रसरसलेली, हसरी-नाचरी पोर यावर कुणाचाही अजिबात विश्वास बसू नये.
मनीच्या आईनं निळूकडे मोर्चा वळवला.
"असली कसली गोष्ट सांगितलीत निळूकाका हिला? पोरगी फारच हळवी आहे. कशाच्याही नादी लागते...."
"हं... चुकलंच माजं. असंच बोलता बोलता कायतरी सांगितलं तिला आन् ल्येकरानं मनात धरून ठ्येवलं. मला वाटलं विसरली आसंल ती. म्हंजे दिवसबी फार झालेत त्येला... मागच्या टायमाला आल्याला न्हवं तुमी हितं दोन दिवस र्हायला... तवा झाल्यालं ह्ये."
"अरे बापरे... म्हणजे गेले सहा महिने डोक्यात आहे हे तिच्या? आणि तिनं कुणाला पाहिलं तुमच्या सोबत?"
"त्ये... कुनीबी नाय ताई. म्हंजी... मला न्हाई म्हाईत."
"असो." मनीची आई म्हणाली. "यापुढे नका असं काही भरवू तिच्या डोक्यात. आज आमच्या घरी परत चाललोय आम्ही."
"लगेच चालला ताई?" निळू म्हणाला आणि चटकन् गप्प बसला.
"हं. झाले की २ दिवस. माहेरी तरी किती दिवस रहायचं? मनीची शाळा बुडतेय."
"..."
"तुमचंपण झालेलं दिसतंय. निघा तुम्हीपण. आईला सांगते मी."
"ती तेवढी फुलं न्येतो..."
"पारिजात ना? न्या की भरपूर. विचारता कशाला रोज?"
निळू हसला.
’ए बये... कित्तींदा सांगितलंय गं तुला. आशी समद्यांम्होरं माज्याकडं येत जावू नगंस. तुला वाटतं की तू कुनालाबी दिसत न्हाईस. पन त्या पोरीच्या नजरंला पडलीस बग त्या दिसाला. कसं कुनाला म्हाईत... पन दिसलीस खरी. कायबाय सांगून मनवलं प्वोरीला. म्हन्लं कुनाला कुनाला सांगायचं न्हाय हे गुपित. पन आता तुला भेटायचं म्हून हटून बसलीये प्वार. आता कसं करायचं? आज तर तिच्या आईस्नीबी सांगितलं तिनं तुज्याबद्दल. आता कसं करायचं तू सांग. आगं बोल की...’
लालचुटूक पायघोळ झग्याला गोल गोल गिरक्या देत ती मोती सांडल्यागत सुंदर हसली आणि निळूच्या खांद्यावर अलगद बसली. निळूनं काल रात्रीची सुकलेली फुलं अलवार बाजूला केली आणि ताज्या पारिजातकाची शेज तिच्यासाठी सजवून दिली. ती खिदळतच त्याच्या खांद्यावरून उतरून फुलांच्या शय्येत शिरली आणि सुगंधाने भारलेल्या जगात एकदम विलीन झाली.
फाटक्या गोधडीवर दमलेलं अंग टाकताना निळू आज जरा चिंतीत होता. मनीच्या घमघमणार्या मिठीच्या सुगंधात त्याला पारिजातकाचा लवलेशही कुठं जाणवेना.... हे काही खरं नाही!
"तुमच्या घरी कोणकोण असतं निळूकाका?"
निळू एकदम दचकला. तसा हा प्रश्न वरवर अगदीच सामान्य वाटत असला तरी निळूसाठी अनपेक्षितच. ’निळूचं घर!’.... कसं वाटतं ना ऐकायला....?
"आं?" हातातला चहाचा कप बशीतच किंचित थरथरला. बंगल्याच्या व्हरांड्यात मोठ्या लाकडी झोपाळ्यावर बसून देशपांडेबाई जाईच्या फुलांचे हार गुंफीत बसल्या होत्या. वेलीवरची शुभ्र चांदण्यांसारखी फुलं निळूनेच आणून त्यांच्या पुढ्यात ओतलेली. सगळा व्हरांडा घमघमणारा. पायरीवर बसून काहीसा निवलेला चहा बशीत ओतून पिताना निळू नकळत त्या पांढर्या शुभ्र फुलांच्या राशीत नजर गाडून बसला होता. देशपांडेकाकूंच्या प्रश्नाने निळूची तंद्री भंगली. त्याच्या चेहर्यावर उमटलेलं गोंधळाचं प्रश्नचिन्ह पाहून देशपांडेकाकू उगाचच काहीसं कृत्रिम हसल्या.
"निळूकाका, तुम्हांला या बंगल्यावर माळीकाम करायला लागून दहा वर्षं झाली. ही बंगल्यापुढची एवढी मोठी बाग त्यापूर्वी मी स्वत:च पोसायचे, निगा राखायचे. वय वाढलं तसं सगळ्यातूनच अंग काढून घ्यावंसं वाटू लागलं. हे गेले एकुलती एक लेक माझ्याकडे सोपवून. तेंव्हा या बागेनं मला पोरकं, एकटं वाटू दिलं नाही. मुलीचं लग्न करून दिलं आणि मग हा निवांतपणा, एकांतही मजेशीर... हवाहवासा वाटू लागला. म्हटलं आता फक्त उपभोग घ्यावा. कष्टांना पूर्णविराम मिळावा. कष्टानं फुलवलेल्या या बागेला तुमच्या हाती सोपवून निर्धास्त झाले. आज ही बाग माझ्यापेक्षा जास्त तुमची झाली आहे. इथली माती तुम्हांला ओळखते. या फुलांनाही स्वतःच्या गंधाइतकीच तुमच्या घामाच्या गंधाचीही सवय झाली आहे. ही बाग आता तुम्हांला माझ्याहून जास्त ओळखते. पण मी मात्र तुम्हांला अजूनही फारशी ओळखत नाही."
निळू भुवया वर करून देशपांडेकाकूंचं बोलणं ऐकत होता. त्याला अजूनही काहीच समजेना. त्यानं काय बोललं पाहिजे हे कळेना. खरंतर समोरासमोर बसून त्यांनी एकमेकांशी इतकं बोलण्याची ही त्या दोघांचीही पहिलीच वेळ असावी.
काही क्षण थांबून देशपांडेकाकू नजरही वर न करता पुन्हा बोलू लागल्या. "माझ्या बागेसारखंच माझ्या नातीला... मृणाललाही फार लळा लागलाय तुमचा. इथे आली की पहिल्यांदा बागेत धाव घेते तुम्हांला शोधायला. भीती वाटते कधी कधी. लहान आहे पोर... हळवी सुद्धा आहे. या वयात मुलं कसा, कधी, कुणावर किती जीव टाकतील सांगता येत नाही." काकू पुन्हा थांबल्या. निळू अजूनही फक्त ऐकत होता. मनातल्या मनात अंदाज घेत होता कसलेतरी.
काकूंनी हार गुंफण्यात गुंतलेली त्यांची नजर अखेर वर करून निळूकडे पाहिलंच.
"परवा मनू सांगत होती तिनं तुझ्यासोबत एक छोटी मुलगी पाहिली. लाल फ्रॉक घातलेली. ती भेटणारे म्हणाली त्या छोट्या मुलीला. तूच भेटवणार आहेस."
निळू गोंधळला. गार झालेल्या चहाचा हातातला कप त्यानं थरथरत्या हातानं खाली ठेवला. तो बोलणारच होता... पण...
"मनूचं मी काही फार मनावर घेत नाही हो. पण त्या निमित्तानं लक्षात आलं माझ्या... तुमचंही कुटुंब असेल... घरात कुणी असेल तुमच्या... म्हणून म्हटलं विचारावं तरी. कोणकोण असतं तुमच्या घरी?"
निळूनं नजर जमिनीत गाडली. पण लगेचच उसनं अवसान आणून त्यानं देशपांडेबाईंकडे पाहिलं आणि म्हणाला,
"कुनीबी न्हाई बाईसाहेब. म्या एकलाच र्हातो. म्हातारी आई व्हती तीबी ग्येली त्याला बरीच वरसं झाली. आता कुनीबी न्हाय."
"कुणीच नाही? लग्न नाही केलंस तू?"
"लग्न....त्ये..." निळूनं पुन्हा नजर जमिनीत घुसळली. "केल्यालं. पन बायको लवकर मेली माजी. पुन्यांदा लगीन न्हाय केलं."
"अरेरे...." देशपांडेकाकू विनाकारण चुकचुकल्या. "पोरबाळ नाहीच का मग काही? मग मनूनं पाहिलेली ती मुलगी... मला वाटलं तुझी नात वगैरे असेल."
निळूला एकदम असह्य झालं. कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. त्यात त्याला गुलाबाच्या ताटव्यात हालचाल जाणवली आणि निळू घाईघाईनं म्हणाला...
"आता लय वरसं झाली म्या येकलाच हाय बाईसाहेब. म्याबी पिकलं पान झालो आता. आता यवडं जुनंपानं आठवन्यात काय फायदा? मनूताईंनी कुनाला पायलं माज्यासंगत त्ये मलाबी कळंना जालंय."
निळूनं गारढोण झालेला कपातला चहा एका घोटात नरड्याखाली ढकलला आणि जागचा उठला.
"गुलाबाचं त्येवढं कटिंग र्हायलंय तेवडं करून जातो बाईसाहेब. आज जरा दुसरीकडं काम व्हतं."
"हं...." देशपांडेबाईंनी सुस्कारा सोडला. "ठीक आहे."
निळू लगबगीनं गुलाबांकडे निघाला. जाता जाता मध्येच थबकून त्यानं मागे पाहिलं आणि म्हणाला... "बाईसाहेब तेवढं त्ये जाताना..."
"पारिजातकाची हवी तेवढी फुलं घेऊन जा निळूकाका...." निळूचं वाक्य मधेच तोडत देशपांडेकाकू म्हणाल्या.
आज फुलं अंथरताना निळू शांत शांत होता. लाल लाल झग्याला गिरक्या देत ती मात्र त्याच्या अंगाखांद्यावर निर्धास्त बागडत होती. तिच्या चिमुकल्या पावलांच्या आघातांनी निळूचे खांदे काळेनिळे झाले होते.
"आज गुलाबाच्या ताटव्यात कश्यापाई धिंगाना घालत व्हतीस? कुनी पायलं अस्तं म्हंजी?"
ती टपोरं हसली. अगदी गुलाबासारखं. निळू गडबडला. त्याच्या मानेशी झोका घेणार्या तिचं अस्तित्व त्याच्या अंगावर पुन्हा शहारे उमटवून गेलं. ते काटे टोचल्यावर ती पुन्हा एकदा खिदळली आणि निळूनं सजवलेल्या पारिजातकाच्या शेजेवर अदृष्य होऊन गेली. एकवारही मागं वळून न बघता.
’हिनं एकवार तरी बोलावं माज्यासंगट.... मला माफी दिली का न्हाय त्येवडं तरी सांगावं....’ निळू पुन्हा एकदा सज्ज झाला - एका निद्राहीन अशांत रात्रीला भिडण्यासाठी. झरत राहणार्या डोळ्यांसह. त्याच्या मस्तकात, नसांत, रंध्रांत... अजूनही बागडत, नाचत होती ती. त्याच्या प्रत्येक विचाराला तुडवीत होती. त्याच्या मनात उमटणार्या प्रत्येक भावनेच्या तरंगाला घुसळून विद्रुप करीत होती. ती त्याला आतून बाहेरून अदृष्य जखमांनी पोखरून टाकीत होती.
ती.... एक अनाम, अबोध आत्मा...
ज्याच्या न संपणार्या, न दिसणार्या डोहासारख्या गडद काळोखी अफाट भयंकर दु:खाला आपण कारणीभूत ठरलो...
आणि हे समजण्याची, उमगण्याची, प्रतिकार करण्याचीही ज्याची क्षमता... आणि खरेतर जाणीवही नव्हती....
ज्याचं अथांग निष्पाप निरागसपण माझ्यातल्या हैवानालाही क्षणभरसुद्धा तळतळाट न देता डबडबत्या प्रश्नांकित डोळ्यांनी अशाश्वताच्या डोहात समिधा होऊन सांडून गेलं....
त्या आत्म्याच्या मूक, अनामिक, ठसठसणार्या दु:खानं निष्पाप हसू धारण करून त्याच हैवानासमोर आयुष्यभर बागडत राहावं... फक्त एका कोवळ्या हास्यानं त्याची एकएक जखम उकरत राहावं...
रात्र रात्र त्याला त्याच्याशीच भिडवत ठेवावं... यासारखी भयंकर शिक्षा असेल अजून कुठली?
अजूनही एक आंधळा, लुळा, पांगळा, अंगांग झडून गेलेला, मृत्यूची भीक मागणारा हतबल हैवान आतल्या आत क्षण क्षण जळतो आहे... संपतही नाही... मरतही नाही!
"बाईसाहेब... तुमच्यासंगट थोडं बोलायचं हुतं."
निळू देशपांडेकाकूंसमोर उभा होता. रात्रभर जागलेले त्याचे डोळे कुठल्याश्या निर्धारानं पेटलेले होते.
देशपांडेबाई काहीश्या दचकल्या निळूचा अविर्भाव बघून.
"काय झालं निळूकाका? काही मदत हवी आहे का?"
"मदत मला न्हाय बाई... तुमास्नी हवी हाय. तुमच्या जिवाभावाच्या मानसास्नी हवी हाय..." निळूच्या आवाजाला धार आली होती. त्याच्या नजरेत पाणी तरंगत होतं.
देशपांडेकाकू गोंधळल्या. "काय झालंय निळूकाका?"
"तुमच्या लेकीस्नी इच्यारा बाई... ज्याच्याशी तिची जल्माची गाठ घालून दिलीत त्यो मानूस कसा हाय त्ये... इच्यारा तिला ती सुखात हाय का त्ये... इच्यारा एक्वार प्रेमानं प्वोरीला की सर्गात र्हाते ती का नर्कात....’
"काय बोलतोयस निळू....?" देशपांडेबाईचा आवाज चढला आणि आवाजात कंप उतरला.
निळूनं एकदम देशपांडे बाईचे पाय धरले.
"आईच्यान सांगतो बाई... तुमची लेक बोलत न्हाई. धन्याच्या माघारी तुमी लय कष्टानं अन् जरबेनं ल्हानाचं मोटं क्येलं तिला. तुमच्या या भल्या थोरल्या घराचा वासा पोकळ हाय ह्ये ठाव हाय मला. तुमच्या जीवावर त्येचं घर भरलं... पन त्यो हैवान बी पोसला जातूय त्ये तुमच्याच जोरावर. तुमाला उतरत्या वयात दुक्क द्याया नगं म्हनून ती गप र्हातिया. आन सगळंच बोलायचं बी नस्तं ना बाईच्या जातीनं... तुमीच शिकिवलं आसन तसं...."
निळू वाहत्या डोळ्यांनी बाईंच्या पायाशी डोकं ठेवून भडाभडा बोलत होता.
देशपांडेबाई हतबुद्ध!
"पन त्या गाईचं बी एक ल्हानगं वासरू हाय. निष्पाप निरागस हाय त्ये... दुक्क काय त्येबी कळंना अजून त्यास्नी. त्या हैवानाच्या वावटळीत कुस्करन्यापास्नं वाचवा त्यास्नी. वाचवा बाई..." निळूनं एकदम हंबरडाच फोडला.
"म्या लई कटाळलो आता. मला मुक्त करा बाई... मला मुक्त करा.... पाय धरतो तुमचे!"
देशपांडेकाकू बधिर होऊन निळूचं भाषण ऐकत होत्या. त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्यासारख्या झाल्या आणि त्या मटकन् खाली बसल्या.
"अजून येळ गेल्याली न्हाय बाई... त्या गाय वासराला त्या नरकात्नं भाईर काडा. आपली लक्षुमी मानानं आप्ल्या घरी परत आना. तुमचा द्येव हाय नवं तुमच्या संगट.... येकदा आई व्हऊन ल्येकराला कुशीत घ्या बाई. माज्यावर इश्वास ठिवा. एकवार इश्वास ठिवा बाई...."
"तुला.... तुला हे सगळं कुठून कळालं निळू?"
"मला... मला सांगितलं.... लाल परीनं!"
मनी पारिजातकाच्या झाडापुढं उभी राहून एकटक पाहात होती. भान हरपून. तिची आई तिच्या मागे येऊन उभी राहिलेली सुद्धा तिला कळलं नाही.
"मने....काय पाहतेस गं?" आईच्या आवाजानं मनी भानावर आली.
"आई...." मनी आईच्या पायांना बिलगली. "निळू कुठं गेला असेल गं?"
आईनं मनीला उचलून कडेवर घेतलं आणि पारिजातकाच्या झाडावर अफाट पसरलेल्या आभाळाकडे बोट दाखवून मनीला म्हणाली, "त्या तिथं गेला निळू... वारा वाहतो ना, तेव्हा ही प्राजक्ताची फुलं घेऊन जातो सोबत निळूला द्यायला, त्या दूर आभाळात. निळूला प्राजक्त किती आवडायचा की नाही?"
"हो. निळू रोज आपल्याकडची फुलं घेऊन जायचा ना? मग मी निळूला एक पत्र लिहून या झाडावर ठेवलं तर वारा तेही पोचवेल निळूपाशी?"
आई हसली. "अगं मग तसं कशाला? तू नुसताच तुझा निरोप सांग ना या फुलांना. फुलं तो पोचवतील निळूपाशी."
"खरंच आई?"
"अगदी खरंच." आईनं हसून मनीचा गोड पापा घेतला.
"चल आता घरात. छान छान जेवायचंय ना?"
"तू जा. मी येतेच या झाडाशी जरा सिक्रेट बोलून."
आईनं पुन्हा हसून मनीचा पापा घेतला.
"बरं ये लवकर."
आई जायला वळली आणि मनीनं मागून आईचं बोट धरलं. आईनं वळून पुन्हा मनीकडे पाहिलं.
"आई... आता आपण परत नाही जायचं ना? कधीच?"
मनीच्या आईचे डोळे भरून आले. तिनं मनीला घट्ट कुशीत घेतलं.
"नाही बाळा... आता परत जायचं नाही. कध्धी कध्धी जायचं नाही. प्रॉमिस!"
प्राजक्ताच्या झाडाखाली मायलेकी एकमेकांच्या कुशीत मग बराच वेळ रडत राहिल्या.
पारिजातकाच्या सुकलेल्या फुलांच्या ढिगावर निश्चेष्ट पडलेला निळूचा देह दोन दिवसांनी दुर्गंधीमुळे लोकांच्या ध्यानी आला तेंव्हा संपूर्ण सडून गेलेल्या त्याच्या शरीरावर तो निळू असल्याच्या कुठल्याच खुणा शिल्लक राहिल्या नव्हत्या. चेहर्यावर पसरलेलं एक विलक्षण शांत हसू मात्र होतं. आणि त्याच्या छातीशी कवटाळलेला एक रंग उडालेला छोटासा झगा... सुकलेल्या काळपट रक्तानं माखलेला. लालेलाल.
अखेर निळूला मुक्ती मिळाली बहुधा!
प्रतिसाद
आवडली !
आवडली !
समजली नाही पण आवडली गोष्ट :)
समजली नाही पण आवडली गोष्ट :)
समजली नाही पण आवडली गोष्ट :)
समजली नाही पण आवडली गोष्ट :) >>>> +१
समजली नाही:(
समजली नाही:(
काहीच समजली नाही
काहीच समजली नाही
मानसी...सरसरून काटा आला
मानसी...सरसरून काटा आला वाचताना.... कसं लिहून जातेस ग...
____/\____
बापरे.... मुग्धमानसी...
बापरे.... मुग्धमानसी... अत्यंत सुंदर... सुरेख उतरलीये ही कथा.
मुग्धमानसी , खूप क्षमतेची
मुग्धमानसी , खूप क्षमतेची आहेस! अभिजात साहित्य वाचण्याचा आनंद अचानक मिळाला .
बापरे! कसली गुंफण करतेस तू
बापरे! कसली गुंफण करतेस तू भन्नाट. छान जमलेय कथा. अंदाज होता शेवटाचा पण वाचताना तरिही धस्स होत होतं
आवडली.
आवडली.
नीट नाही समजली..
नीट नाही समजली..
निळूने त्याच्या बायको-मुलीला मारलेल असत का?
धन्यवाद सर्वांच्या
धन्यवाद सर्वांच्या प्रतिसादाबद्दल. निळूने कधीतरी एका लहान मुलीवर अत्याचार केलेले असतात. त्यात त्या मुलीचा मृत्यू झालेला असतो.
निळूने कधीतरी एका लहान मुलीवर
निळूने कधीतरी एका लहान मुलीवर अत्याचार केलेले असतात. त्यात त्या मुलीचा मृत्यू झालेला असतो.
>>
हे अधे मधे कळालं पण शेवटच्या २ पॅरांचं काय? त्यांची लिंक लागली नाही
जाऊदे रिया. सोड.
जाऊदे रिया. सोड.
मनाला भिडली अगदीच!!!
मनाला भिडली अगदीच!!!
छान गुंफलिये कथा.
छान गुंफलिये कथा.
छान कथा, पण अपूर्ण वाटली.
छान कथा, पण अपूर्ण वाटली. म्हणजे एखादा धागा निसटून गेलाय का असं वाटतं कथा वाचून झाल्यावर. पण कथाबीज आणि मांडणी सशक्त आहे.
निळूने कधीतरी एका लहान मुलीवर
निळूने कधीतरी एका लहान मुलीवर अत्याचार केलेले असतात. त्यात त्या मुलीचा मृत्यू झालेला असतो.>>>>>>>>> हे कुठुन कळालं?
लिहिलय अगदी सुण्दर पण एखादा धागा निसटल्यासारखं वाटतंय.