लिंगनिरपेक्षता आणि फ्रॉईडचा सिद्धांत

"मला जर फ्रॉईडला भेटणे शक्य असते, तर तो भेटताक्षणी मी त्याच्या एक थोबाडीत ठेऊन दिली असती..." काय? दचकलात ना मंडळी हे वाचून? मी ही अशीच दचकले होते. मीच काय आम्ही सगळेच... पण हे उद्गार काही अगदीच अनाठायी नाहीत. सिग्मंड फ्रॉईड या जगद्विख्यात मानसशास्त्रज्ञाने / 'मनोविश्लेषणाच्या' (सायकोअ‍ॅनॅलिसिसच्या) जनकाने जो एक सिद्धांत अनेक वर्षांपूर्वी मांडून ठेवला आहे, तो कितीही प्रसिद्ध झालेली असला, त्याच्यातून कितीही नवनवीन विचारधारा जन्माला आल्या असल्या, तरीही मन त्याचा स्वीकार नाहीच करु शकत. मग आमचे सरच त्याला कसे अपवाद असतील? त्यांच्या मनातला उद्वेग त्यांनी फ्रॉईडच्या स्मृतिदिनानिमित्त भरवलेल्या परिषदेत हा असा व्यक्त केला.

आता तुम्हांला नक्कीच उत्सुकता वाटत असेल की मी हे का सांगतेय? फ्रॉईडने असा काय सिद्धांत मांडून ठेवलाय, ज्याचा ह्या परिसंवादाच्या विषयाशी काहीतरी संबंध असू शकेल? आहे, आहे! फार मोठा संबंध आहे. मनोलैंगिक विकसन (सायकोसेक्श्चुअल डेव्हलपमेन्ट) हे त्याच्या सिद्धांताचे नाव.

फ्रॉईडच्या मतानुसार माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या वयाच्या सुमारे पहिल्या पाच वर्षांत आकाराला येते. ह्या पाच वर्षांत त्याने जे अनुभव घेतलेले असतात, ते अनुभव त्याच्या नंतरच्या आयुष्यातील जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्या वागणुकीवर सातत्याने प्रभावही पाडत राहतात. ह्याचे स्पष्टीकरण तो असे देतो की, माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या बाल्यावस्थेतील अनेक टप्प्यांवर घडत जाते. ज्याला सहाय्यीभूत ठरतात दोन ऊर्जा. १. 'इड' म्हणजेच सुखाचा शोध घेणारी ऊर्जा - जी काही विशिष्ट भागांवर केंद्रित होते आणि २. 'लिबिडो' म्हणजेच आपल्या वागणुकीला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा देणारी मनोलैंगिक ऊर्जा.

जर ह्या दोन्ही ऊर्जांनी आपापले काम चोख बजावले आणि सगळे मनोलैंगिक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले, तर निरोगी असे व्यक्तिमत्त्व जन्माला येते. पण जर काही टप्पे योग्यप्रकारे नाही पूर्ण झाले, तर मात्र 'फिक्सेशन' होऊ शकते. म्हणजेच ज्या टप्प्याची जी गरज आहे, ती वेळीच पूर्ण नाही झाली तर आपण त्याच अवस्थेत अडकून पडतो आणि ती गरज पूर्ण होईपर्यंत तसेच अडकून राहतो, कितीही वय झाले तरीही! उदा. 'ओरल स्टेज'. ह्या टप्प्यात अडकून पडलेली व्यक्ती इतरांवर अती अवलंबून राहू शकते आणि मौखिक सुखाची गरज धूम्रपान, मद्यपान किंवा अतिअन्नसेवन इत्यादी अन्य मार्गांनी पूर्ण करायचा प्रयत्न करते.

विचित्र वाटतंय ना हे वाचायला? ह्याहून विचित्र 'टप्पा' तर पुढेच आहे! (फ्रॉईडच्या सगळ्या मनोलैंगिक टप्प्यांची ओळख शब्दमर्यादेमुळे इथे करुन देऊ शकत नाही. ती आंतरजालावर अथवा पुस्तकांतून करुन घेता येईल. तेव्हा आपण एकदम आपल्या परिसंवादाशी संबंधित टप्प्याकडे वळू.) तो म्हणजे 'फॅलिक स्टेज'. ह्या टप्प्यावर असणारी मुले म्हणजे साधारण ३ ते ६ या वयोगटातली. ह्या टप्प्याच्या दरम्यान लिबिडोचे प्राथमिक केंद्रस्थान लैंगिक अवयव हे असते. ह्याच वयात मुलांना स्त्री आणि पुरुष यांतील फरक समजायला लागलेला असतो.

फ्रॉईडच्या मते ह्या वयातली मुले ('मुलगा'चे अनेकवचन) आपल्या वडलांना आपल्या आईच्या प्रेमातला वाटेकरी / स्पर्धक समजायला लागतो. आई फक्त आपल्यापुरतीच हवी, ह्या इच्छेतून वडलांची जागा घेण्याची ईर्षा निर्माण होण्याच्या ह्या भावनेला फ्रॉईड 'इडिपस कॉम्प्लेक्स' असं संबोधतो. एकीकडे ही ईर्षा मनात आकार घेत असतानाच मुलाला सतत एक प्रकारची भीती वाटत असते की, वडलांना आपले हे विचार कळले तर ते आपल्याला जबरदस्त शिक्षा देतील. ह्या भीतीला फ्रॉईडने 'कॅस्ट्रेशन अ‍ॅन्गझायटी' (खच्चीकरणाची भिती) असे संबोधले आहे.

हीच गोष्ट मुलींच्याही बाबतीत अगदी उलट्या तर्‍हेने घडते. म्हणजे त्यांना आपल्या वडलांविषयी अशाच तर्‍हेची भावना वाटते. जिला फ्रॉईड (/ युंग) 'इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स' असे संबोधतो. त्यांना वडलांविषयी एक सुप्त आकर्षण आणि त्यातून आईशी स्पर्धा हे तर वाटत असतेच, शिवाय एक अवयव त्यांना मिळालेला आहे आणि आपल्याला नाही, याविषयीची आसूयाही त्यांच्या मनात घर करायला लागते आणि त्यातून मुलींमध्ये 'पीनस एन्व्ही' निर्माण होते.

ज्यांचा 'फॅलिक' हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण होत नाही, त्यांच्यात बरेच व्यक्तिमत्त्वदोष निर्माण होऊ शकतात. उदा. जी मुले इडिपस कॉम्प्लेक्समधून बाहेर येत नाहीत, ती एकतर वाया गेलेली (स्वतःच्या कर्तृत्वावर कमी विश्वास असणारी) किंवा अगदीच अतिमहत्त्वाकांक्षी (स्वतःच्या कर्तृत्वावर खूप विश्वास असणारी) होऊ शकतात. तर ज्या मुली इलेक्ट्रा कॉम्पेक्समधून बाहेर येत नाहीत, त्या वर्चस्व गाजवणार्‍या (पीनस एन्व्ही असल्याने), किंवा इतरांना मोहित करणार्‍या (जास्त अस्मिता असणार्‍या), किंवा अगदीच गरीब अशा - इतरांचे वर्चस्व सहन करणार्‍या (कमी अस्मिता असणार्‍या) बनू शकतात.

त्यांच्यात इतर व्यक्तिमत्त्वदोषांबरोबरच समानलिंगी तसेच भिन्नलिंगी व्यक्तींकडे बघण्याचा एक विचित्र दृष्टीकोन तयार होतो. मग समाजात योग्य तर्‍हेने न मिसळणे, भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास नाकारुन समलिंगी व्यक्तींसोबतच राहणे, अशा कृती घडू शकतात. समलिंगी संबंध हाही त्याचाच परिपाक. (हा सिद्धांत खोलात वाचल्यास तो अधिक योग्य प्रकारे समजू शकेल.)

अशी व्यक्तिमत्त्वं घडू नयेत, मुले या टप्प्यात अडकून राहू नयेत म्हणून फ्रॉईडने सुचवलेले उपाय म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य पद्धतीने हाताळणे. म्हणजेच त्यांच्याशी सुसंवाद साधणे. त्यांच्या वर्तणुकीतल्या समस्या योग्य पद्धतीने हाताळणे. त्यांच्या मनात शिक्षेविषयी भीती असेल तर ती काढून टाकणे.

लहान मुलांच्या मनातले सुप्त विचार मोठ्यांना कळणे कठीण असते, त्यातून मुलांना त्या वयात आपल्या भावना योग्य पद्धतीने शब्दबद्ध करणंही जमत नसतं. ह्या सिद्धांताला अनेकांचा जोरदार विरोधही झालेला आहे. शिवाय हा सिद्धांत नंतर अनेकांनी यशस्वीरित्या खोडलेला पण आहे. तेंव्हा फ्रॉईडचा हा सिद्धांत स्वीकारणे, नाकारणे, त्याचा राग करणे, हा वेगळा भाग झाला. पण त्याने सुचवलेले उपाय मात्र सहज पटण्याजोगे आहेत. त्याने अप्रत्यक्षपणे एक फार वेगळी गोष्ट यातून सुचवलेली असू शकते, असं मला वाटलं आणि म्हणूनच त्याचा हा सिद्धांत इथे लिहिण्याचे धाडस मी करु शकले.

त्यातून मला उमगलेला एक विचार म्हणजे निरोगी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आपल्या लैंगिकतेविषयक विचारांचा, अनुभवांचा फार मोठा वाटा असतो. आपण जितके ते विचार दाबून टाकू, त्यांना नाकारु, तितके ते वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने उफाळून वर येऊ शकतात. मग या विचारांना निर्मळ आणि निरोगी पद्धतीने कसे व्यक्त करता येऊ शकेल? सुरुवातीचा मार्ग म्हणजे समानलिंगी आणि भिन्नलिंगी व्यक्तीच्या शरीराची पूर्ण ओळख. ती झालेली असेल, त्यांच्या शरीराविषयीची उत्सुकता पूर्णपणे नष्ट झालेली असेल, तरच आपण समोरच्या व्यक्तीकडे निव्वळ एक व्यक्ती म्हणून पाहू शकतो. एक स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही. ज्याला खरी लिंगनिरपेक्ष दृष्टी असे संबोधता येईल. म्हणजेच लिंगनिरपेक्षतेची शारीरिक पातळी ओलांडल्यावरच नंतर मानसिक / वैचारिक पातळी गाठता येईल. अशा टप्प्यांनी घडत गेलेली लिंगनिरपेक्ष ओळखच नंतर लिंगनिरपेक्ष मैत्री ह्या टप्प्यावर जाऊ शकते.

ही गोष्ट समजवण्यासाठी एक उदाहरण देते. जर्मनीतले बरेचसे पालक आपल्या मुलांसोबत एकत्र अंघोळ करतात. यामुळे मुलांची आपल्याहून भिन्न लिंग अथवा समान लिंग असणार्‍या भावंडांच्या आणि पालकांच्या शरीराविषयीची उत्सुकता पूर्णपणे नष्ट झालेली असते. शिवाय येथील मुलांना कमी वयातच जोडीदार निवडीचे मिळालेले स्वातंत्र्य, ज्या वयात लैंगिकसुखाची आस निर्माण होते, त्याच वयात ते उपभोगण्याची मुभा मिळते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून एक मोठी उत्सुकता संपून जाते. म्हणजेच पोट भरलेलं असेल तर आपण अन्नाचा सतत विचार करु का? नाही ना? तसंच हे! त्यामुळेच कदाचित ट्रेनमध्ये त्यांच्यासमोर प्रचंड अंगप्रदर्शन करणारी तरुणी आली तरीही ते पुरुष तीळमात्रही विचलित होत नाहीत. त्यांचे पेपरमध्ये खुपसलेले डोळेही बाहेर येत नाहीत आणि इतर स्त्रियाही 'काय बाई हिने कपडे घातलेत', म्हणून नाकं मुरडत नाहीत... आणि स्वतः ते अंगप्रदर्शन करणारी स्त्रीसुद्धा आपण काही विशेष करतोय, अशा अविर्भावात नसते. अगदी सहजता असते या सगळ्यांत...

एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाहीये. आमच्या प्रोफेसरांनी आमची एकदा ट्रिप नेली होती. एका तळ्याकाठी आम्ही थांबलो. माझ्या सहकार्‍यांनी स्विमिंग कॉश्च्युम्स् आणले होतेच. त्या तळ्यात प्रोफेसरांसकट बाकी सहकार्‍यांनी (माझा अपवाद वगळता) एकत्र स्विमिंग वगैरे केलं. माझी एक सहकारी वेगवेगळे स्विमिंग स्ट्रोक्स दाखवून सर्वांना आश्चर्यचकित करत होती. कपडे बदलायला काहीच आडोसा नसल्याने तिकडेच एका कोपर्‍यात त्यांनी कपडे बदलले. कोणीही कोणाकडेही 'तशा' दृष्टीने पहात नव्हतं. सगळे आपल्याच विश्वात होते. मीच काय ती एकटी एकदम अन्कम्फर्टेबल झालेले होते. नग्नता - तीही भिन्नलिंगी व्यक्तींची - अशाप्रकारे जवळून पाहण्याचा पहिलाच अनुभव होता ना! हीच गोष्ट इथल्या स्विमिंगपूल अथवा सौना बाथ वगैरे ठिकाणची. या सार्वजनिक ठिकाणी लोक खुशाल एकमेकांसमोर मोकळेपणाने वावरतात - सार्वजनिक बाथरुममध्ये एकत्र अंघोळ करतात. कोणीही कोणाहीकडे पाहत नसते.

अशा पार्श्वभूमीवर लहानाची मोठी झालेली मुलं मग शिकत असतांना, मुलंमुली एकत्र एखादा प्रोजेक्ट करत असतांना, त्यांच्या मनातही आकर्षण वगैरे विचार येत नाहीत. पूर्ण फोकस हा त्या प्रोजेक्टवर असतो. लेक्चर्सनासुद्धा सगळे समरसून उपस्थित राहतात. बौद्धिक, तार्किक वादविवाद हे सगळं मनापासून चालतं आणि समजा, वाटलंच एखाद्याविषयी आकर्षण, तर ते सरळ बोलून दाखवलं जातं. होकारनकार दोन्ही बाजूंनी खेळकरपणे स्वीकारला जातो. कामाच्या ठिकाणीही त्याहून वेगळी परिस्थिती नसते. स्त्री असो वा पुरुष, त्यांच्या नात्यात एक प्रकारची सहजता असते, मोकळेपणा असतो. शारीरिक / मानसिक सुखांच्या गरजेच्यावेळी त्या त्या गरजा पूर्ण झालेल्या असातात, त्यामुळे शिक्षणाच्यावेळी शिक्षण, कामाच्यावेळी काम हे सूत्रही सहजतेने पाळलं जातं. त्यामुळे चांगले विद्यार्थी, दर्जेदार काम, असं चित्रंही दिसून येतं. वखवखलेल्या नजरा, चोरटे स्पर्श, हे काहीही नाही. हो! मात्र, जे जोडीदार म्हणून आवडले, त्यांच्यासोबत राहून, कम्फर्ट लेव्हल पडताळून पाहून लग्न करणे, हेही दिसून आले. असे हे निकोप समाजजीवन घडण्यामागे हा लैंगिक पातळीवरचा मोकळेपणा कारणीभूत असेल का?

ही शारीरिक आणि मानसिक पातळीवरची सहजता समाजात रुजावी, म्हणून काही प्रगत देशांनी 'खुलेपणा' हा पर्याय निवडला असेल का? मात्र आपल्या देशाची सांस्कृतिक / धार्मिक / वैचारिक / नैतिक बांधणी पाहता या गोष्टी आचरणात आणणे प्रचंड अशक्यप्राय वाटू शकते. अनेकांना अमान्यही असू शकते. पचायलाही जड जाऊ शकते, मलासुद्धा जाते. त्यामुळे अशी शब्दशः लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री आपल्या देशात कशी रुजेल? ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे का?

- सानी

प्रतिसाद

लेख आवडला. विचार करण्यासारखा.
याचा प्रिंटआउट घेतला तर चालेल का सानी?

अत्यंत सुंदर व्यक्तिकरण झालय सानी तुमच्या विचारप्रवाहाचं. शब्दनशब्द पटला.

लेख आवडला सानी. छान सोप्या पद्धतीने फ्रॉईडचा सिद्धांताबद्दल लिहीले आहे.

लैंगिकदृष्ट्या (तुलनेने) खुले = निकोप समाजजीवन = आदर्श इतका सहज निष्कर्ष निघू शकेल का असे वाटुन गेले मात्र.

फक्त लैंगिकदृष्ट्या खुले आणि म्हणुन निकोप, इतकाच अर्थ अभिप्रेत असावा असे वाटत नाही. पुरक नक्कीच ठरु शकेल मनात मुळात गुंताच न निर्माण होण्यासाठी.

लेख खूप आवडला!!

लेख वाचला. फ्रॉईडच्या सिद्धांताचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे असेल बहुतेक, लेखातले काही मुद्दे पटले नाहीत.

'लैंगिकदृष्ट्या खुलं समाजजीवन' आणि 'लिंगनिरपेक्षता' यांचा संबंध प्रयत्न करूनही लावू शकलो नाही. असं 'खुलं' समाजजीवन असलेल्या देशात कोणत्या पद्धतीची 'लिंगनिरपेक्षता' सापडेल- याचा विचार मनात आला. "त्यांच्या मनातही आकर्षण वगैरे विचार येत नाही.... समजा, वाटलंच एखाद्याविषयी आकर्षण, तर ते सरळ बोलून दाखवलं जातं." अशा वाक्यांनी गोंधळात आणखीच भर टाकली. आकर्षण वाटत नाही, म्हणजेच लिंगनिरपेक्षता- असं काहीतरी म्हणायचं असल्यागत वाटलं. आणि शिवाय / तसं असेल तर मग- 'ज्या क्षणी समजा, वाटलंच एखाद्याविषयी आकर्षण', तर तिथून अचानक 'लिंगसापेक्षता'- हा प्रवास कसा, तेही कळलं नाही.

सुंदर लेख

या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तरे देण्याचा काहीच अट्टाहास नाही

कोणाच्याही सिद्धांताबाबत काहीच म्हणायचे नाही

मात्र जे काही त्या सिद्धांताबाबत सांगितले गेले आहे ते मला माझ्या जडणघडणीनुसार कमी पटले

शारिरीक उत्सुकता संपल्यानंतर खरी ओळख (किंवा मानसिक ओळख) होते हे विधान पटले नाही. मात्र ते सानी यांनी केलेले विधान नसून त्या सिद्धांतातील आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या तत्ववेत्त्याबद्दल आपण काय बोलणार. पण तरी असे वाटले की एका विशिष्ट व्यक्तीबाबतची शारिरीक उत्सुकता संपली की फक्त तिच्याशी मानसिक ओळख होऊ शकेल, पण त्याचा अर्थ असा होणार नाही की इतर त्याच लिंगाच्या सर्व व्यक्तींबाबतची ती उत्सुकता संपेल. याचे कारण ते नैसर्गीक आहे असे वाटते.

अभिनंदन सानी

-'बेफिकीर'!

एवढ्या मोठ्या तत्ववेत्त्याबद्दल आपण काय बोलणार >> का नाही बोलायचं? :)

एका विशिष्ट व्यक्तीबाबतची शारिरीक उत्सुकता संपली की फक्त तिच्याशी मानसिक ओळख होऊ शकेल >> हेच मुळात चुकीचं वाटतं. शारिरिक उत्सुकता एकदाची संपवून टाकायची, कारण ते वाईट, आणि मानसिक ओळख म्हणजे उच्च अध्यात्मिक प्रकरण- असा याचा अर्थ होतो. याउलट शारिरिक उत्सुकता ही निखळ, नैसर्गिक आणि सुंदर असू शकते; आणि एकमेकांची 'मानसिक ओळख' होणं हे अनेकदा कटकटीचं, घाणेरडं, अनेक प्रकारच्या विषांची बीजं पेरणारं, अनैसर्गिक असू शकतं. एखाद्याची संपूर्ण 'मानसिक ओळख' झाली आहे, म्हणजे नक्की काय? असं काही असतं यावर माझा तरी विश्वास नाही.

मन आणि शरीर दोन्ही माणसानं तयार केलेली नाहीत. त्या दोघांना (बर्‍यावाईट- कुठच्याही) मार्गाने जाऊ देणं, हेच नैसर्गिक आहे. त्यावर 'लिंगनिरपेक्षता' सारखी लेबलं लावणं चुकीचं आहे.
***

अवांतर-
व्यवसाय-धंदा-नोकरीतली 'लिंगनिरपेक्ष ओळख' हा एक वेगळा, मोठा विषय होऊ शकतो. पण संपादकांनी म्हटल्याप्रमाणे फारसं कुणी त्यावर लिहिलेलं दिसत नाही. पण त्या विषयावर लिहिलेलं लिखाणही लौकिकार्थातल्या 'स्त्रीवादा' कडे झुकेल की काय, असंही वाटून गेलं. म्हणजे शेवटी 'सापेक्षता' हेच अंतिम सत्य!

एका विशिष्ट व्यक्तीबाबतची शारिरीक उत्सुकता संपली की फक्त तिच्याशी मानसिक ओळख होऊ शकेल >> हेच मुळात चुकीचं वाटतं>>

अहो ते फ्रॉईडने म्हंटलंय असं सानी म्हणतायत

मी नाही म्हंटलेलं

:फिदी:

स्मायली येत नाहीत म्हणूनही हसू आलं

हो फ्रॉईडनेच म्हटलंय की. तुम्ही म्हणलंय म्हणून विरोध करतोय असं का समजता? जरा व्यक्तीनिरपेक्ष विचार करा. :फिदी:

नाय राव, माझं वाक्य कोट केलंत आणि तो फ्रॉईड एवढा मोठा, म्हंटलं लेकी बोले असे काही आहे का :फिदी:

स्मायली तुमचाही येत नाहीये, असे का?

स्मायलीतरी लिंगनिरपेक्ष असावेत

सानी लेख आवडला. या पहिल्या ५ वर्षातील वाढीचे, इतर अनेक परीणाम आहेत.
(अर्थातच ते सर्व इथे येणे शक्य नव्हते. ) पण नग्नता आणि मैत्री, वेगळे आहेत असे
मला वाटते.
भिन्नलिंगी व्यक्तीच्या देहाचे आकर्षण पूर्णपणे नष्ट होऊन कसे चालेल ? ते राहणारच.
पण त्यापलिकडे बघायला शिकण्यासाठी, हाच एक उपाय आहे. हे मात्र नाही पटले.

असे हे निकोप समाजजीवन घडण्यामागे हा लैंगिक पातळीवरचा मोकळेपणा कारणीभूत असेल का? >>>

लैंगिक पातळीवरच्या मोकळेपणामुळे निकोप समाजजीवन घडते - हे आपण आपल्या देशाच्या बाबतीत ठामपणे म्हणू शकतो का? इथे सापेक्षता मैदानात उतरते.

लेख आवडला.

(अवांतर - फ्रॉईड म्हणजे एक अचाट प्रकरण आहे. प्रत्यक्ष त्याचे सिध्दांत खूप खोलात वगैरे जाऊन वाचलेले नाहीत, पण अनेक विषयांसंदर्भातल्या त्याच्या सिध्दांतांचे सविस्तर विवरण वाचनात आलेले आहे.
२००० साली टाईमतर्फे 'ग्रेट पीपल ऑफ ट्वेंटिएथ सेंच्युरी' असा एक मोठा, जाडजूड खंड प्रकाशित झाला होता. जगभरातल्या अनेक व्यक्ती होत्या त्यात. त्यातलं फ्रॉईडवरचं प्रकरण मला २-३दा वाचावंसं वाटलं होतं.)

लेख आवडला.

>>>फ्रॉईडच्या मतानुसार माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या वयाच्या सुमारे पहिल्या पाच वर्षांत आकाराला येते. ह्या पाच वर्षांत त्याने जे अनुभव घेतलेले असतात, ते अनुभव त्याच्या नंतरच्या आयुष्यातील जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्या वागणुकीवर सातत्याने प्रभावही पाडत राहतात.>> हे बरेचसे पटतयं.

आवडला लेख .. ..!!!

भोग- विरक्ती आणी मग समरसता असे समिकरण स्विकारणे कोणालाच परवडणारे नाही... याचे फक्त फायदेच आहेत का?... तोट्यांचाही विचार करावा लागेल.. नाही का?

लेख आवडला, नवीन काहीतरी वाचायला मिळालं. काही वैचारिक गोंधळ पेटलेत डोक्यात...

लेख छान झाला आहे. लहानपणी लैंगिक कुतूहल शमले तर नंतरचा चोरटेपणा कमी होईल हा विचार एकदम पटला. लैंगिकतेचा (स्त्री/पु/इतर) आणि नग्नतेचा सहज स्वीकार जर्मनांमध्ये आढळतो तितका इतर युरोपियनांतही दिसून येत नाही.

लहानपणी लैंगिक कुतूहल शमले तर नंतरचा चोरटेपणा कमी होईल हा विचार एकदम पटला. >>> मृदुला, अगदी हाच हेतु होता ह्या लेखामागचा.

लैंगिकतेचा (स्त्री/पु/इतर) आणि नग्नतेचा सहज स्वीकार जर्मनांमध्ये आढळतो तितका इतर युरोपियनांतही दिसून येत नाही.>>> हे ही खरंच आहे. जर्मनीतली ह्या बाबतीतली सहजता इतर युरोपीयन देश आणि अमेरिकेतही नाहीये, असं जाणवलं...

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. खोलवर विचार केल्यावर ह्या विषयाचे अनेक पैलू उलगडतात. चहूबाजूंनी केलेल्या विचारातूनच ह्या विषयाची अधिक ओळख होईल, तो अजून उमगत जाईल, असं वाटतं.

मंदार, तू नक्कीच प्रिन्टआऊट काढू शकतोस या लेखाची. माझी काहीच हरकत नाही.

लहानपणी लैंगिक कुतूहल शमले तर नंतरचा चोरटेपणा कमी होईल >>> मला अजिबात नाही पटले.

लहाणपणी म्हणजे कधी कारण लैगिक ओळख आणि लैंगिक आकर्षणाची वये वेगवेगळी असतात.. शिवाय लैंगिक विकास ही एकावेळी घडणारी गोष्ट नाही मग नेमेके केव्हा आणि कसे आपण लैगिक कुतूहल शमवू शकतो. फक्त एकत्र अंघोळ करण्याणे हे साधता येईल??

>>>>>ही शारीरिक आणि मानसिक पातळीवरची सहजता समाजात रुजावी, म्हणून काही प्रगत देशांनी 'खुलेपणा' हा पर्याय निवडला असेल का? मात्र आपल्या देशाची सांस्कृतिक / धार्मिक / वैचारिक / नैतिक बांधणी पाहता या गोष्टी आचरणात आणणे प्रचंड अशक्यप्राय वाटू शकते. अनेकांना अमान्यही असू शकते. पचायलाही जड जाऊ शकते, मलासुद्धा जाते. त्यामुळे अशी शब्दशः लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री आपल्या देशात कशी रुजेल? ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे का?<<<<< या परिच्छेदाबद्दल थोडेसे मनातले:

मला वाटते अशा प्रकारे आपल्या समाजात खुलेपणा आज नाहीये हे विधान थोडे सांभाळूनच करायला हवे. "पूर्वी"खजुराहो शिल्पे,व तत्सम शिल्पे, पौराणिक संदर्भ इतर गोष्टी पाहता हे नक्की की लैंगिक बाजू समाजात आयुष्याचा एक इक्वली महत्त्वाचा व खुलेपणाने चर्चिण्याचा भाग होता. गणिकांनाही मान होता. दूर कशाला, साधारण तीसेक वर्षांपूर्वी कोकणात माझ्या लहानपणीदेखील एकत्र कुटुंबपद्धतीच्या अनेक घरांत घरातील मुलीच्या मासिक पाळीबद्दल इतर भावंडांच्या ("मुलग्यांच्या") समोर घरातील मोठ्या स्त्रिया खुलेपणाने बोलताना मी पाहिल्या आहेत. आडनिड्या वयामुळे तेवढ्यापुरतं अवघडलेपण वाटायचं पण नंतर इतर व्यापात असताना "तो" विचारही डोक्यात यायचा नाही...........

दुर्दैवाने आपल्याकडे इतर देशांबद्दल प्रत्येक बाबतीत थोडे अधिकच कुतुहलाने पाहिले जाते. माझ्या मते ब्रिटिश राजवटीतील गुलामी वृत्तीचा (आपण कोणालातरी इतर शक्तीला जबाबदार आहोत अशा भावनेचा) अजूनही आपल्या मनात वावर उरला आहे....... खरेतर स्वातंत्र्यपूर्व काळात याच आपल्या विसरलेपणाबद्दल समाजसुधारकांनी, समाजधुरिणांनी समाजाला धारेवर धरले होते, विचारमंथन घडवून आणले होते..............

विषयांतर होतेय, पण या मनोवृत्तीचा परिणाम भारत देश आजही मानसिक गुलामगिरीतच असण्यात होतो आहे......... मनमोहनसिंगांसारखा उत्तम आर्थिक व्यवस्थापक म्हणूनच एक राष्ट्रीय व्यवस्थापक
म्हणून कमी पडतो आहे, स्वतःची (असलेली) बुद्धी न वापरल्यामुळे. असे अनेकानेक गोष्टींबद्दल लिहिता येईल..........

अन्यथा, सानी तुम्ही मनोविष्लेषणात्मक लिखाण चांगले केले आहे.............. फ्रॉईडची तुलना आईनस्टाईन बरोबर करता येईल. ज्याप्रमाणे न्यूटन नंतर आईनस्टाईन च्या थिअरीलाही आज चॅलेंज करण्यात येते आहे, त्याप्रमाणे फ्रॉईडलाही आज विरोध होतो आहे. याचे कारण प्रयोगशीलतेमुळे नवनवीन कंगोरे उघडकीला येतात...... दुसरे म्हणजे यामुळे मूळ व्यक्तीचे कर्तुत्व कमी ठरत नाही.

खुपच छान लेख! काही मुद्दे खुपच छान मांडले आहेत. :)

तुमचा लेख आवडला.

बहुतेकदा अगदी बरोबर असे आपसूक आले वाचताना.

बाकी, तुम्ही सायकोलॉजी विषयाशी संबधि काम करता का? मी चाईल्ड सायकोलॉजी संबधित काम केलेय.(मी ही पीडी शिकवताना हेच सांगितलेले/शिकवलेले मुलांना फ्राईडचा सिद्धांत). असो

लेख आवडला सानी.

सुंदर लेख सानी!
अतिशय सहजपणे मांडलंत...

फ्रॉईडचे वरचे काही तर्क नाही पटले, पण ते पटावेत हा तुमचाही आग्रह नाहीये.. हे आवडलं..

एका विशिष्ट व्यक्तीबाबतची शारिरीक उत्सुकता संपली की फक्त तिच्याशी मानसिक ओळख होऊ शकेल >> हेच मुळात चुकीचं वाटतं. शारिरिक उत्सुकता एकदाची संपवून टाकायची, कारण ते वाईट, आणि मानसिक ओळख म्हणजे उच्च अध्यात्मिक प्रकरण- असा याचा अर्थ होतो. याउलट शारिरिक उत्सुकता ही निखळ, नैसर्गिक आणि सुंदर असू शकते; आणि एकमेकांची 'मानसिक ओळख' होणं हे अनेकदा कटकटीचं, घाणेरडं, अनेक प्रकारच्या विषांची बीजं पेरणारं, अनैसर्गिक असू शकतं. एखाद्याची संपूर्ण 'मानसिक ओळख' झाली आहे, म्हणजे नक्की काय? असं काही असतं यावर माझा तरी विश्वास नाही.
मन आणि शरीर दोन्ही माणसानं तयार केलेली नाहीत. त्या दोघांना (बर्‍यावाईट- कुठच्याही) मार्गाने जाऊ देणं, हेच नैसर्गिक आहे. त्यावर 'लिंगनिरपेक्षता' सारखी लेबलं लावणं चुकीचं आहे.>> पटले.कारण मनोशारीर व्यापार एकत्रच आणि सतत चालत असतो. त्या मनोशारीर व्यापारावर आसपासच्या अनेक गोष्टी जसे की पैसा,मित्र-नातेवाइक,संस्कार(conditioning),त्या त्या वेळची आयुष्यातली ध्येये, सतत परिणाम/प्रभावित करत असतात.
.

पण इथे लेखात शारीरिक उत्सुकता संपवुन टाकायची हे चोरटेपणा संपवुन टाकायचा या अर्थानी म्हंटले आहे असे वाटते.

छान !

पण इथे लेखात शारीरिक उत्सुकता संपवुन टाकायची हे चोरटेपणा संपवुन टाकायचा या अर्थानी म्हंटले आहे असे वाटते. <<<
सहमत

लेख आवडला सानी!

छान लेख, सानी. आवडला.

शारिरीक उत्सुकता संपणे ह्याचा थोडा वेगळा अर्थ अभिप्रेत आहे इथे. वर त्यांनी हे सुद्धा लिहीलय

"त्यातून मला उमगलेला एक विचार म्हणजे निरोगी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आपल्या लैंगिकतेविषयक विचारांचा, अनुभवांचा फार मोठा वाटा असतो. आपण जितके ते विचार दाबून टाकू, त्यांना नाकारु, तितके ते वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने उफाळून वर येऊ शकतात""

शारिरीक उत्सुकतेच्या पलिकडे गेल्या शिवाय मानसिक ओळख नीट होत नाही, ह्याचा अर्थ ती उत्सुकता वाईट असा मला तरी वाटत नाही. मानसिक ओळखीची सुरवात व्हायच्या आधी जी बेसिक (हा शब्द महत्वाचा आहे)उत्सुकता किंवा आवेग म्हणता येइल तो शमला पाहिजे. हे अगदी छान शब्दात आगाऊंनी त्यांच्या ह्याच परिसंवादाचाच भाग असलेल्या त्यांच्या लेखात मांडलय.

"या मुलीशी एकतर लग्न करायचे किंवा कसलेच नाते नको ('जस्ट फ्रेंड्स्'तर अजिबात नाही!) हे मी जेव्हा पक्के केले, त्यावेळी ती एक स्त्री म्हणून सर्वार्थाने मला भावली होती आणि हवी होती हे खरेच. आम्ही आधी मित्र नव्हतोच, होता ते फक्त प्रेमाचा आवेग, अत्यंत शारीर आणि पूर्णपणे लिंगसापेक्ष. मैत्री हळूहळू झाली, वाढत्या जबाबदार्‍या, निर्णयाचे प्रसंग यातून नात्याची समज आणि उमज आली""

साजिरा, तू म्हणतोयस ती निखळ, नैसर्गिक, शारिरीक उत्सुकता ह्या बेसिक आवेगा पेक्षा वेगळी असते. ह्यापुढे जाऊन मी तर म्हणेन की ती उत्सुकता टिकून राहावी ह्या करता समोरच्या व्यक्तीची चांगली मानसिक ओळख असणे आणि ती ओळख आपल्याला पटणे/रुचणे हे अनिवार्य आहे. साध्या शब्दात सांगायचे म्हणजे माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आवडतच नसेल तर त्या व्यक्तीविषयी तू म्हणतो ती निखळ शारिरीक उत्सुकता वाटणं शक्य नाही.
माझ्या दृष्टिनी तरी हा मुद्दाच एकंदरित खुप महत्वाचा आहे. आपल्या मुलांबाबतीत हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यांनी समोरच्या माणसाला मुख्यतः भिन्नलिंगी व्यक्तीला एक व्यक्ती/माणूस म्हणून वागवणे ह्याकरता आधी लैंगिकतेचे बेसिक्स, त्याअंतर्गत असलेल्या बेसिक उत्सुकता ह्या समजून घेऊन त्या पलिकडे पाहणे जमले पाहिजे. :)