सजणीला भेटायाला, साजणाने यावं तसा...

त्या

चं बेभान कोसळणं
आणि तिने तो आवेग झेलणं
कोट्यवधी वर्षे चालू आहे
कोट्यवधी वर्षे चालूही राहणार आहे

पावसाळा आणि खास करून मुंबईतला पाऊस माझ्या खास आवडीचा. ते रस्त्यावरचे तुंबलेले पाणी, बंद पडलेली रेल्वे, ट्राफिक-जॅम, नरिमन पॉइंट/गेटवे/वरळी सी फेस इथले लाटांचे तांडव, छत्र्यांची लगबग, रानभाज्या सगळे सगळे म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. भारतात पावसाचा काळ आता थोडा मागेपुढे होतोय खरा, पण तो नियमित पडतोच. त्याच्या या नियमाने येण्याच्या सवयीमुळे आपण त्याला एक ऋतू मानला आहे. पण खरं सांगू, त्याचे हे असे नियमित येणे, भारताबाहेर राहिल्यावर मला जास्तच सतावू लागले. मुंबईत कशी, ७ जून ही तारीख म्हणजे आनंदाचे निधान असायचे. भारताच्या बाहेर, तो कधी पडेल, ते सांगता येत नाही अशी अवस्था. काही देशांत तर रोजच पाऊस, तर काही देशांत वर्षातून दोन-चार वेळा पडला तर 'डोक्यावरून पाणी' अशी गत. तर चला, तुम्हाला असेच भिजवून आणतो देशोदेशीच्या पावसातून....

SS-World-Map.gif

मस्कतमधे मी पहिल्यांदा उतरलो, त्यावेळीच तिथे पाऊस पडत होता. त्यामुळे पहिल्याच भेटीत तो देश आवडून गेला. पण तरी तिथे पाऊस नियमित असा पडत नाहीच. पावसाचे असे निश्चित महिनेही नाहीत. तिथल्या थंडीत, म्हणजे डिसेंबर/जानेवारीत तो दोनचारदा पडतो एवढेच. मस्कत म्हणजेच ओमान जरी आखाती प्रदेश असला, तरी मस्कतमधे वाळवंट नाही. तशी झाडेही फारशी नाहीत. शहरात उंच इमारतीही फारशा नाहीत. त्यामुळे कुठेही नजर टाकली तर दिसतात शुभ्र रंगाच्या इमारती आणि त्यांना खेटून असणारे डोंगर. हे डोंगरोबा म्हणजे निव्वळ खडक. त्यावर गवताचे पातेदेखील उगवत नाही, त्यामुळे हिरवाईचे नावच नको. त्या डोंगरावर, काय शोधायला कुणास ठाऊक, पण काही शेळ्या जाताना दिसतात आणि त्यांच्या मागे काही कोल्हेदेखील. हे डोंगरोबा तिथल्या उन्हाळ्यात तापमान नियंत्रण करतात. म्हणजे काय करतात तर दिवसभर तापतात आणि रात्री आजूबाजूची हवा गरम करतात. त्यामुळे तिथे उन्हाळ्यात चोवीस तास गरम होते. तरीही तिथे वाद्या म्हणजे नद्या आहेत. मस्कतजवळच्या रुवी भागात त्या वादीवर पूल आहे, पण त्या वादीला कधी पाणीच नसते. पाणीच नसल्याने, शहराबाहेरचे जे रस्ते आहेत, त्यांना जेव्हा या वाद्या आडव्या येतात, त्यावेळी त्यांच्यावर पूल बांधण्यापेक्षा रस्तेच खाली उतरून वाद्यांत शिरतात. संरक्षणासाठी म्हणून अशा ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाल-पांढरे खांब असतात.

साधारण सप्टेंबरपासून तिथे हवा निवळायला लागते. ओमानच्या राष्ट्रीय दिवशी, १९ ऑक्टोबरला तर हवा अतिशय ­प्रसन्न असते. सगळीकडे रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुलवलेले असतात. कधी नव्हे ते तिथला कोर्नीश (समुद्रकिनारा) माणसांनी भरून जातो. थंडी जरा गुलाबी होऊ लागते आणि एक दिवस, तो खास असा उजाडतो. खरं तर उजाडतच नाही! सकाळपासूनच गार हवे वाहू लागतात. एरवी भगभगणार्‍या प्रकाशाला गडप करत, चक्क अंधार दाटतो. आणि तो येतो...

त्याच्या प्रणयाचे चार शिंतोडे
आणि त्यात मिसळलेल्या
तिच्या उच्छ्वासाचे चार कण
आपल्यालाही लाभतात,
त्या चार कणांवर आपण तृप्त व्हावे.

तो येतो आणि अलगद सगळ्या परिसराला भिजवून टाकतो. तिथे मिळणारे खमंग पदार्थ, चहा असा बेत ठरतो. कोर्नीशवर जाऊन, बोचरे वारे आणि थेंब झेलत, मस्कतच्या शिवमंदिरापर्यंत चालत जायचे प्लान होतात. वाद्यांमधली रेती थोडी ओलावते, एरवीचा निळाशार समुद्र, किंचित करडा रंग धारण करतो. स्थानिक लोक आनंदाने बेहोष होतात. इतकं की ओल्या रस्त्यावर गाड्या भन्नाट वेगाने हाकून, गाड्या घसरून अपघात होतात याचंही भान त्यांना रहात नाही. एरवी डोळ्यांना दिपवणार्‍या पांढर्‍या शुभ्र इमारती, सौम्य रंगाच्या दिसू लागतात. जागोजागच्या खजूरी शहारतात. क्वचित खोलगट भागात डबकी तयार होतात. मुद्दाम लावलेल्या फुलांचा, बकुळीचा गंध तिथे हवेत भरून राहतो. असा सौम्य वाटणारा पाऊस कधी कधी मात्र तिथे उच्छाद मांडतो. डोंगरात कोसळलेल्या पाण्याने डोंगरावरचे दगड सुटे होऊन रस्त्यावर येतात. वाद्यांना पूर येतात. ते पूर इतके भयंकर असतात की त्यात मोठ्या गाड्यादेखील वाहून जातात. पण 'त्याचं' हे रूप मस्कतमधे क्वचितच दिसणारं.

SS-Kenya-Places.gif एकीकडे चार थेंबांनी सुखावणारं मस्कत, तर दुसरीकडे रोज चिंब भिजून निथळणारं केनयामधलं किसुमू. रिफ्ट व्हॅलीमध्ये सरोवरांची जी मोठी मालिका आहे, त्यापैकी लेक व्हिक्टोरिया हे आकाराने खूप मोठे सरोवर. याच सरोवराच्या काठी, केनयाचे किसुमू गाव वसले आहे. या भागाला 'लेक बेसिन' असेही म्हणतात. इथले हवामान वर्षभर जवळजवळ सारखेच असते. (पूर्वी असे होते, आता बदललेय.) रात्री व सकाळी सुखद थंडी, दुपारी जरा गरम आणि संध्याकाळी, साधारण साडेसहा वाजता पाऊस. असे एक-दोन कोरडे महिने सोडले, तर वर्षभर रोजच. या भागातली काकामेगा (ऐन विषुववृत्तावरचे गाव), केरिचो (चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध) ही गावे, साधारण अशाच हवामानाची. किसुमू हे अगदी सरोवराकाठाचे गाव.

त्याचाही राग मावळतो,
शुष्क कोरडा भाव विसरतो तो, मायेचा ओलावा दाटून येतो,
मग एक हळुवार मायेची फुंकर, आणि
त्याचं बेभान कोसळणं
आणि तिने तो आवेग झेलणं.

SS-ZakarandaKisumuKenya.gif इथली पावसाची वेळ संध्याकाळी साडेसहाची. त्यामुळे मस्त घरी यावं, दुधाचा चहा करावा आणि विशाल सरोवराकडे बघत चहाचे घुटके घ्यावे, हा रोजचा कार्यक्रम. एका रविवारी मात्र पावसासोबत धुंद करणारा गंध आला. मला घरी थांबवेना, पाऊस उघडल्यावर घराबाहेर पडलो. गावात नेहमीप्रमाणे सामसूम होती. मग गावाच्या मध्यवर्ती मैदानाकडे वळलो आणि जणू एका स्वप्ननगरीत जाऊन पोहोचलो. मैदानाच्या चारी बाजूंनी, मोठे मोठे झकरांदाचे वृक्ष होते आणि त्या दिवशी ती झाडे भरभरून फुललेली होती. निळीही नाहीत आणि करडीही नाहीत. एका वेगळ्याच जांभळ्या रंगाची ही फुले. बहरलेल्या झाडावर फुलेच फुले... झाडाखाली पडलेला फुलांचा सडा.. आणि झाडावरून निघालेली पण थेट खाली न उतरता, तरंगत तरंगत हवेत रेंगाळणारी झकरांदाची फुले. मला इथवर खेचून आणणारा तो सुगंध त्याच फुलांचा. 'तुम तो मुझको देख रहे हो, मुझको देते नही दिखाई...' असा मनात दाटलेला भाव. सारा आसमंत, जमीन-आकाश एका रंगात रंगून गेलेलं ... कृष्णरंगात रंगलेल्या मीरेसारखं.

SS-Lake-Narok.jpg याच रिफ्ट व्हॅलीतल्या अनेक सरोवरांपैकी एक सरोवर नारोक. इथे रिफ्ट व्हॅलीत नेहमीच आणि खासकरून दुपारची वादळे होतातच. हा एकूण परिसरच अतिशय रम्य आहे. उंच उंच वाढलेले अकाशिया, विस्तीर्ण सरोवर, त्याच्या काठावर माजलेले पॅपिरायस, रंगीबेरंगी पक्षी असा मस्त माहौल. पाणघोडे असलेल्या या नारोक सरोवराकाठी एकदा आम्ही काही मित्रमैत्रिणी तिथे मुक्कामाला गेलो होतो. दुपारची जेवणं आटपली आणि असेच गप्पा मारत बसलो होतो. तंबू ठोकून झाले होते. पण वार्‍याच्या झुळुका होत्या म्हणून कोंडाळे करून बाहेरच बसलो होतो. हळूहळू वार्‍याचा वेग वाढायला लागला. मग धूळ उडू लागली. दूरवर काही वावटळी दिसू लागल्या. आम्हाला नीट कल्पना आली नाही आणि आम्ही तसेच बाहेर बसून राहिलो. अचानक वार्‍याचा वेग प्रचंड वाढला. आत्तापर्यंत शांत असणार्‍या लेकवर लाटा उठू लागल्या. पॅपिरायस झुलू लागले. पावसाचे भलेमोठे थेंब बरसू लागले. आम्ही भराभर सामान आवरून तंबूत जाऊन बसलो आणि आणखीनच जोरात वारा वहायला लागला. तंबूचे दार किंचितही उघडे ठेवणे अशक्य झाले. जाळीदार खिडकीतून पावसाचा मारा होऊ लागला. तंबू उडून जातोय की काय, असे वाटायला लागले. आम्ही सगळे अवाक होऊन बघतच बसलो.

आपल्याला दिसतो तो केवळ त्यांचा आवेग,
पण जाणवत नाही, कणाकणाने त्याचे
तिच्यापासून दुरावणे,
तिचे सृजनात दंग होणे, त्याचे विरत जाणे
मग एके दिवशी तिला परत त्याची सय येते,
साद घालते मनापासून.

साधारण अर्धापाऊण तास हे नाट्य रंगले होते आणि अचानक पाऊस थांबला, ढग विरले. लेकचे पाणी शांत झाले, मावळतीला झुकलेला सूर्य पण दिसू लागला. थोड्याच वेळापूर्वी काही घडलेच नाही, असे वाटावे इतपत बदल झाले..... धरणीची साद आणि पावसाचा आवेग हे इथले रोजचेच नाट्य.

SS-Nairobi.gif याच रिफ्ट व्हॅलीच्या काठावर आणि बर्‍याच उंचावर वसली आहे केनयाची राजधानी नैरोबी. इथले हवामान बहुतांशी थंडच असते. वर्षातले आठदहा महिने पाऊस. आणि तो नसला तरी बहुतांशी हवामान ढगाळच असते. इथे माझे घर सहाव्या मजल्यावर होते. त्यामुळे बराच मोठा परिसर घरातूनही दिसायचा. घरासमोरच टेरेस आणि घरावर लाकडी छप्पर व त्यावर पत्रा. उंचावरून पाऊस 'येताना' चक्क दिसायचा. दूरवर ढग आणि त्यातून कोसळणार्‍या धारा. नैरोबीत खूपदा असे व्हायचे की एखाद्या भागात पाऊस पडायचा आणि एका भागात नाही. मला ढग आणि त्यातून पडत असलेला पाऊस बघून, आता कुठल्या एरियात पाऊस पडतोय, ते सहज सांगता यायचे. एरवी नैरोबीभर घिरट्या घालणारे भलेमोठे चंदन आणि चंदनेश्वर पक्षी, आपापल्या घरट्यावर बापुडवाणे बसलेले दिसायचे. कोंबडीएवढ्या आकाराची त्यांची पाढरीशुभ्र पिल्ले, त्यांच्या विशाल अंगाखाली चिडीचूप बसायची. टोकफळाच्या शेंगा आणि झकरांदाची चुकार फुले पण हवेत उडत असायची. मग येतोय येतोय असे वाटणारा पाऊस चक्क डोक्यावर यायचा आणि छपरावर थडाथड कोसळू लागायचा. दूरवर कडाडणार्‍या विजांनी सभोवतालचे आकाश झळाळून उठायचे आणि त्यानंतर गडगडाट आसमंत दणाणून टाकायचा. नैरोबीत खिडक्यांना छप्पर नसते त्यामुळे बसल्याबसल्याही, दूरवरचे आणि आभाळातले विजांचे नर्तन दिसायचेच. पण चुकून कधी खिडकी उघडी राहिली असेल तर घरातही पाणी! नैरोबीतली मूळचीच थंडी आणखीन बोचरी व्हायची.. मग खास केनया स्पेशल मारु भजियांचा बेत व्हायचा.

नायजेरियातला पोर्ट हारकोर्ट हा तेलसमृद्ध प्रदेश. इथे बर्‍याच तेल कंपन्या तळ ठोकून आहेत. बहुतांशी दलदल आहे, त्यातही फोरकार्डोस सारख्या गूढगंभीर नद्यांची खोरी आहेत. पण इथला पाऊस मजेशीरच. अगदी कडक ऊन असताना, अचानक जोरात पाऊस यायचा. याचा कोसळण्याचा वेग एवढा प्रचंड असायचा की दहापंधरा मिनिटांत सगळीकडे घोटाभर पाणी व्हायचे. त्याहून पाऊस लांबला तर चक्क वीतभर पाणी व्हायचे.

त्यालाही जुन्या वचनांची सय येते
मग बरसतोच, कसलाही विचार न करता
ती न्हाऊन निघते त्याच्या वर्षावात
तृप्त ओली होते, सुखावते, बहरते

माझ्या घराच्या छपरावरून जिथे जमिनीवर पाणी पडत असे, तिथे तर फूटभर खोल खड्डा व्हायचा. एकदा मी तो काँक्रीटने भरुन घेतला, तर लगेच आलेल्या पावसाने ते सगळे काँक्रीटच उखडून गेले. घरातून निघताना पावसाचे काही चिन्ह नसायचे आणि अर्ध्या तासावर असलेल्या ऑफिसपर्यंत पोहोचेपर्यंत एवढा पाऊस कोसळलेला असायचा की ऑफिसची एक पायरीच पाण्याखाली जायची. माझ्या ऑफिसमधले एक खाते जरा खालच्या बाजूला होते, तिथे तर अनेकदा अडसर ओलांडून पाणी यायचे आणि त्यातून बेडूक आणि सरडे ऑफिसमधे यायचे. नायजेरियात दर पन्नास पावलांवर एक सरडा असल्याने सवयीचा परिणाम म्हणून की काय, पण तिथल्या मुली त्यांना घाबरत नाहीत, हे कित्ती बरं ना!

या पावसाची एक आठवण मात्र माझ्यासोबत कायम राहिली. तिथे मला माझा पासपोर्ट रिन्यू करायचा होता आणि त्यासाठी फोटो काढायचा होता. तिथे वीज बेभरवश्याची त्यामुळे भर दुपारच्या उन्हात फोटो काढणे आवश्यक होते. मी आणि माझा चालक त्या मोहिमेवर निघालो. आणि काय? झाला ना पाऊस सुरु! स्टुडियोच्या बाहेर आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत उभे राहिलो. नेहमीप्रमाणे पाऊणएक तासाने पाऊस थांबला. गाडीचे दार उघडले तर बाहेर वीतभर पाणी. त्यात मी कसा उतरू? मग माझ्या चालकाने आणि फोटोग्राफरने एक लाकडी स्टूल पैदा केले. ते तसेच पाण्यात ठेवले. माझ्या चालकाचा आधार घेत मी त्या डगमगणार्‍या स्टुलावर उभा राहिलो. चेहर्‍यावर ऊन पडेल अशी दिशा पकडली तर तेवढ्यात कडक ऊन पडले. फोटो तसाच काढला. छान आलाय असे फोटोग्राफर म्हणाला. (त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता.) पण प्रिंट बघितली तर माझे डोळे चक्क उन्हामुळे बंद झालेले! माझ्या पासपोर्टवर पुढील दहा वर्षे तो बंद डोळ्यांचा फोटो झळकत राहिला आणि मला त्या पावसाची आठवण करुन देत राहिला.

SS-AgbaraNigeria.jpg लेगॉसजवळून थोड्या अंतरावर बदागिरी हे बंदर आहे आणि त्या मार्गावर अगबारा हे उद्योगधंद्यासाठी (त्यातल्या त्यात) प्रसिद्ध असलेले गाव आहे. तिथल्या अगबारा इस्टेटमध्ये मी रहात होतो. एरवी नायजेरियात, सुरक्षिततेच्या कारणासाठी अंधार पडल्यावरच काय दिवसाउजेडीही घराबाहेर नीट फिरता येत नाही. पण अगबारा इस्टेटमध्ये मात्र तसा काही धोका नव्हता. धोका नसण्याचे कारण म्हणजे त्या इस्टेटला एक नैसर्गिक संरक्षण होते. एक शेतजमिनीचा पट्टा, त्याच्या काठाने काही वेगळ्या आकृतिबंधाची, म्हणजे शंभरेक फूट सरळसोट बुंधा आणि त्यावर आडवा पसरलेला पर्णसंभार असणारी काही झाडे, त्यापुढे अंदाज येणार नाही अशी दलदल आणि त्यापुढे घनदाट जंगल. ही शेतजमीन पार करून त्या झाडापर्यंत आणि दलदलीच्या काठापर्यंत मी अनेकदा जात असे, पण त्यापुढे जायची मात्र हिम्मत होत नसे. त्या दलदलीत अनाकोंडा आहेत असे माझे मित्र म्हणायचे. पण ते शक्य नाही हे माहित असूनही मला तिथे अनामिक भीती वाटत असे. त्यापुढचे जंगल इतके घनदाट होते की भर दिवसादेखील दहा फुटांच्या पलिकडचे दिसत नसे. तर अशी ही नैसर्गिक सीमा पार करून इस्टेटमध्ये कुणी त्या बाजूने येणे शक्यच नव्हते. रात्रीचे जेवण झाले की मी इस्टेटमधून तीनचार फेर्‍या चालत असे. हवा मस्त असे. पण एके दिवशी हवामान वेगळेच भासत होते. पावसाची चाहूल लागत होती. पण तेवढ्यात आपले फिरणे होईल असे मला वाटले. मी त्या शेतापर्यंत आल्यावर, अचानक जोरात वारे वाहू लागले. ती वेगळ्या आकृतिबंधाची झाडे झुलू लागली. विजा कडकडू लागल्या. झाडावर थांबलेले पक्षी पण विचलित झाल्यासारखे वाटू लागले. एक भलेमोठे पांढरे घुबड माझ्या चेहर्‍यापासून दोन फुटांवरून उडत गेले. (ते घुबड होते ते मला नंतर कळले.) तिथे रस्त्यावर लाईट्स नाहीत. पण माझ्या रोजच्या सवयीचा रस्ता असल्याने तशी भीती नव्हती. उलट चमकणार्‍या विजांनी तो रस्ता उजळत होता, त्याचीच भीती वाटत होती. कधी नव्हे तो समोरून एक साप सळसळत आडवा गेला. उगाचच अनाकोंडा आठवला!

तरीही त्याला, तिला दुखावल्याची
खंत राहतेच, मग तो परत कधीतरी
अपराधांची भरपाई केल्यासारखा
कोसळतो, तीही मग त्याला झेलत राहते
वसने झुगारत, त्याच्या वर्षावात बुडून जाते

त्या जंगलातील झाडांतून येणारा वारा वेगळेच आवाज करत होता. मी आधीच भरभर असणारी माझी चाल वाढवली. तरी घरात पोहोचायच्या आत पावसाने मला गाठलेच. चारी बाजूने तो कोसळत होता. खरे तर वाट दिसत नव्हती. अंदाजानेच वळणे घेत मी घरी पोहोचलो आणि मग मोठे वादळ झाले. मला टपली मारून गेले होते ते!

न्यूझिलंडच्या ऑकलंड भागातही पावसाची अशी काही निश्चित काळवेळ नाही. अगदी अर्ध्या तासात तिथले हवामान बदलू शकते. आता मी जातो ते तिथल्या उन्हाळ्यात. कारण मोठ्या दिवसामुळे रात्री उशिरापर्यंत भटकता येते. पण पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळी तिथला हिवाळा चालू होता. ऑकलंडमधे बर्फ पडत नाही. (ख्राईस्टचर्चला भूकंप झाला होता, त्यावेळी पडला होता.) पण तिथली थंडी कडाक्याची असते. अंधारतेही लवकर, त्यामुळे हीटर लावून घरात बसण्याशिवाय पर्याय नसतो. पण असा घरात बसेन, तो मी कसला?
अशाच एका संध्याकाळी माझा आणि लेकीचा घरी पिझ्झा करायचा प्लान शिजला. पण त्यासाठी बेसपासून टॉपिंगपर्यंत सगळेच आणायचे होते. मग निघालो आम्ही दोघे. घराबाहेर पडल्याबरोबर पावसाची चाहूल लागली. मग छत्री घेऊनच निघालो. आणि पंधरावीस पावलांतच पावसाने आम्हाला गाठले. आम्ही तसेच पुढे निघालो. दोघांच्या गप्पा नेहमीप्रमाणेच रंगात आल्या. माझ्या हातात पिशवी आणि तिच्या हातात छत्री. रमतगमत आम्ही चालत होतो. पावसाने थंडी जास्तच बोचरी झाली होती. सगळे सामान घेऊन घरी आल्यावर माझ्या लक्षात आले; माझी लेक उंच असली तरी माझ्या डोक्यावर छत्री धरण्यासाठी तिच्या हातावर चांगलाच ताण पडला होता. एका बाजूने भिजलीही होती ती. केसही भिजले होते. तिने ते मला जाणवूही दिले नव्हते. त्या पावसाच्या आठवणी, तिच्या प्रेमाच्या आठवणीत भिजलेल्या आहेत.

माझ्या आयुष्यातला पहिला बर्फवर्षाव मी झुरिकमधे अनुभवला. लेगॉसहून माझे विमान जरा लवकरच आले होते. त्यावेळी उजाडलेही नव्हते. झुरीक विमानतळाहून ट्रेनने मी हॉटेलवर आलो. विमानात पुरेशी झोप झाल्याने, शिवाय लेगॉस ते झुरीक हा प्रवास एकाच टाईम झोनमधे झाल्याने प्रवासाचा थकवा वा जेटलॅग अजिबात नव्हता. मी फ्रेश होऊन, हॉटेलच्या रिसेप्शनवर आलो आणि आज कुठली टूर मिळू शकेल का त्याची चौकशी करू लागलो. तिथली गोड मुलगी हसली आणि म्हणाली, "तुझ्या उत्साहावर पाणी नाही टाकत, पण बाहेर बघितलंस का? हवामान चांगले नाही आज."
बाहेर बघितले तर चांगलेच अंधारले होते. माझा समज होता अजून उजाडायचे आहे. तिने मला तो दिवस टूर न घेता आरामात घालवायला सांगितला. मी तिथेच रेंगाळत होतो. हॉटेलमध्येच बसून रहायची कल्पना मला असह्य होत होती. मी रूमवर जाऊन एक जास्तीचा स्वेटर चढवला आणि बाहेर पडलो. जाताना त्या मुलीने मला हसून टाटा केले. किंचितच उजाडले होते. झुरिक अजून जागे व्हायचे होते. मी असाच तिथल्या रस्त्यांवरून मनमुराद भटकत होतो आणि अचानक नाकावर एक थंडगार स्पर्श जाणवला. बोटाने स्पर्श करुन बघितले तर एक फ्लेक. वॉव ! आयुष्यातला पहिला बर्फवर्षाव मी अनुभवणार होतो. थोड्याच वेळात हवेत अनेक स्नोफ्लेक्स घरंगळायला लागल्या. हात पुढे करुन बघितला. पण पावसाच्या थेंबासारख्या त्या सरळ थोडीच खाली येत होत्या? त्या तर मजेत हेलकावे घेत घेत, अगदी नाईलाज झाला तरच जमिनीवर येत होत्या. तेवढ्यात दोन लहान मुले जीभ बाहेर काढून त्या फ्लेक्स जिभेवर झेलण्याचा प्रयत्न करत पळापळी करताना दिसली. मग काय मलाही नवा खेळ मिळाला. आधी जरा लाज वाटत होती, त्यामुळे जीभ पूर्ण बाहेर काढलीच नव्हती. तर त्या मुलाने जीभ पूर्ण बाहेर काढून सरळ कशी धरायची याचा धडाच दिला. मग मीही माझं वय विसरून, कुणी बघतंय याची तमा न धरता, जीभ बाहेर काढून फिरू लागलो. अगदी तोंड दुखेपर्यंत हा खेळ मी अनुभवला. थोड्या वेळाने बर्फवर्षावाचा जोर वाढला, मग भराभर पावले टाकत मी हॉटेलवर परत आलो. तिथल्या दारात उभे राहून, केस आणि अंग झटकले. रूमवर जाणार एवढ्यात रिसेप्शनवरच्या गोड मुलीने बोलावून मला हॉट चॉकलेटचा कप दिला. "काय? आवडलं ना आमचं झुरिक?" या तिच्या प्रश्नाला मी हसून मान डोलावली. पुढे अनेकदा तिथे गेलो पण हा पहिला हिमवर्षाव काही वेगळाच अनुभव देणारा ठरला.

सिडनी एअरपोर्ट, ऑस्ट्रेलियाचा हा अनुभव मात्र अगदी वैतागवाणा. क्वांटासच्या ए ३८० विमानाने मी रात्री सिडनीला पोहोचलो. वाटेतील वादळे वगैरे लक्षात घेता, विमानाला बराच उशीर झाला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी मला ऑकलंड्ला जायचे होते. माझ्याकडे ऑस्ट्रेलियाचा ट्रांझिट व्हिसा होता, पण क्वांटासने हॉटेल बुकिंग दिले नव्हते. एअरपोर्टवर बसून रात्र काढू या माझ्या बेताला अनेक सुरुंग लागले, कारण तो एअरपोर्ट चक्क रात्री प्रवाश्यांना बंद करतात. माझी बॅग पण मला ताब्यात घ्यावी लागली. अगदी बाहेरच्या लॉबीत पण बसता आले नाही कारण तीही बंद झाली. एका कोपर्‍यात माझ्यासारखेच अडकलेले बरेच प्रवासी झोपले होते आणि काही "नको ते" उद्योग करत होते, त्यामुळे तिथेही बसणे शक्य नव्हते. म्हणून मी थेट रस्त्यावरच आलो. शहरात जायला ट्रेन होती, पण सकाळी माझ्या विमानाच्या वेळेआधी परत यायला नव्हती. त्यामुळे तो मार्गही बंद झाला. टॅक्सीवाल्यानेपण तिथेच थांबायचा सल्ला दिला. तर असा निर्मनुष्य जागी मी एकटा आणि हातात चाकांची मोठी बॅग मी ढकलत रस्त्यावर फेर्‍या मारत होतो. तिथल्या बाकड्यावर बसणे अशक्य होते कारण बाजूच्या डस्टबिनमधे सिगारेट्सच्या थोटकांचा महापूर आला होता आणि तो वास मला असह्य होत होता. 'आणि अचानक तोच हाय, कोसळल्या सरी' अशी गत! म्हणजे माझ्या फिरण्यावर बंधने आली. छप्पर असणारा भाग अगदी थोडा, हातात बॅग नसती तर मी भिजलोही असतो, पण बॅगेमुळे बंधने आली. आवारही मोकळे. पाऊस ऐन रंगात आला होता, त्यामुळे आडवेतिडवे वारे वाहत होते आणि माझ्या अंगावर झळा येत होत्या. असे दोनतीन तास नुसता उभा होतो. झोपायची काय, बसायचीही सोय नव्हती... 'इस रात की सुबह नही', असे वाटत होते. शेवटी जरा उघडीप झाल्यावर मी परत रस्त्यावर फेर्‍या मारायला सुरुवात केली आणि पहाटे एअरपोर्ट उघडल्याबरोबर आत शिरलो.

असा देशविदेशीचा पाऊस .. कधी सुखावणारा तर कधी वैताग आणणाराही.
पण तरीही मनातलं विचाराल तर 'आईची झोपडी प्यारी' असं म्हणत मला परत घराकडे बोलावतो गोव्यातला पावसाळा... माझ्या घरचा, 'आल्त पर्वरी'चा पावसाळा!
गोव्याला पर्यटक लोक जातात ते सहसा उन्हाळ्यात किंवा डिसेंबरमधे म्हणजे हिवाळ्यात. पण मला विचाराल तर मी म्हणेन, गोवा खरा अनुभवावा तो पावसाळ्यात!
इथली भातशेती, नद्या, घराभोवतीच्या बागा कसे मस्त ताजेतवाने दिसत असते. अशावेळी दोस्तांसोबत तामडी सुर्ला, काणकोण बीच, उबाळे सारख्या एखाद्या रम्य ठिकाणी जाऊन धमाल करावी हा शिरस्ता. पण बाहेरही न पडता मी अगदी घरात बसूनही, तिथला पाऊस मनमुराद अनुभवायचो. माझे घर होते, आल्त पर्वरीमधे. आल्त म्हणजे उंच. पणजीहून म्हापस्याकडे येताना मांडवी नदीचा पूल ओलांडला की रस्ता एकदम चढावाचा होतो. त्या चढावावर पर्वरी वसले आहे म्हणून ते आल्त पर्वरी. रस्त्याच्या पश्चिमेला एक तीव्र उतार आहे. तिथे वस्ती नाही. आणि त्याबाजूला कुणी फिरकतही नाही. पण पावसाळ्यात मोरांचा माग काढत मी त्या रानात अनेक वेळा गेलोय. मोरांचा एक थवाच असतो तिथे. त्यांचे फोटोही व्यवस्थित काढता येतात. पण जास्त जवळ जायचा प्रयत्न केला तर पंख पसरून दरीत झेप घेतात. अशावेळी पिसारा फुलवून नाचणारा मोर जास्त देखणा की पंख पसरुन उडणारा, असा प्रश्न पडायचा.

आता परत असे नाही करायचे,
वेड्यासारखे नाही वागायचे
तुटेल इतके नाही ताणायचे
बुडेल इतके नाही बरसायचे
अगदी शहाण्यासारखे वागायचे,
ठरते त्या दोघांचे,
आणखी कोट्यवधी वर्षांसाठी

SS-Porvorim-Goa.gif
गोव्यात ज्यावेळी जोरात पाऊस येतो त्यावेळी पर्वरीच्या समोरच्या दरीतून भन्नाट वारा वाहत वर येतो. माझ्या घराची बाल्कनी नेमकी पश्चिमेला होती आणि तिथे उभे राहिले की सचैल स्नान घडायचे. अंगणातली आणि रस्त्यावरची झुलणारी झाडे, अंग चोरून बसलेले पक्षी, लाल ओहोळ, पागोळ्या आणि चेहर्‍यावर बसणारे पावसाचे सपकारे... आजही अंगावर शहारा येतो, ते सगळे आठवले की.

मला आता विआना, अंगोला येथे येऊन चारच महिने झालेत. इथल्या पावसाची अजून ओळख व्हायची आहे. तसा बर्‍याच वेळा पडला चार महिन्यांत. पण त्याचे स्वरूप पहाटेच्या दवासारखेच होते. इथेही खूप पाऊस पडतो असे ऐकलेय. अगदी पूर येऊन जनजीवन ठप्प होते, वाळवंटात अनेक फुले फुलतात.. वाट बघतोय.

वाहत येईल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाईल बुडुन हा प्राण खुळा...

- दिनेशदा

प्रतिसाद

मस्त. वेगळाच लेख. आवडला.
तामडी सुर्लाचे नाव वाचुन मस्त वाटले.

--------/\--------

वाहत येईल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुने घर
जाईल बुडुन हा प्राण खुळा

अप्रतिम सौंदर्यानुभव..

वा छान आहे पावसळी लेख. अंगोल्याच्या पावसाचे अनुभव लिहाच नंतर.

दिनेशदा, भारीच लिहिलाय लेख!

झक्कास! 'पावसाची गोष्ट' खूप आवडली१
- बापू.

छान आहे लेख. जरासा लांबल्यासारखा वाटला. फोटो जरा मोठे चालले असते.

दिनेशदा, लेख आवडला हे सांगायलाच नको. सगळ्या पावसाच्या अनुभवांमधे पुन्हा पुन्हा "त्या" दोघांच्या लाघववेळा येत राहिल्या... त्यातून पुढे उलगडणारा लेख.. आवडलंच

छान लेख

दिनेशदा, फार फार आवडला लेख... मधल्या ओळीही खासच!

वा वा............मस्त भिजवलंस देशोदशीच्या पावसात :)
लेख फारच मस्त उतरलाय :)

मस्त आहे पाऊस. :)

मस्त!

दिनेशदा मस्त लिहिले आहे :)
आवडला लेख व तो देशी विदेशीचा पाऊसही :)

छान कल्पना आणि वर्णने! :)
फोटो अजून मोठे चालले असते.
...आणि मधेमधे त्या कवितेच्या ओळी नसत्या तरी चालल्या असत्या :फिदी:

मस्त लिव्हलय ..दिनेशदा :)
पावसाळा .. मला पण खुप आवडतो.

छान :-)

मस्त लिहीलय दिनेशदा....देशोदेशीचा पाऊस अनुभवल्या सारखा वाटला..छान!!

माझ्या आवडत्या पावसाचं वर्णन..खुप सुंदर, छान लेख...पुन्हा पुन्हा वाचावा असा :)

व्वा... मेजवानीच जणू :)

देशोदेशीच्या पावसाची छान ओळख... फोटो नक्कीच मोठे चालले असते...

व्वा! दिनेशदा..........सुंदर लेख! फोटोही सुंदर पण ....फोटो नक्कीच मोठे चालले असते....+१००

मस्त दिनेशदा. किसुमू मध्ये आयटी कंपन्या आहेत काय ;-) फोटो मोठे तर हवे होतेच पण आहेत त्यापेक्षा जास्तही हवे होते

छान लिहीलेय दिनेशदा...

माझ्या पासपोर्टवर पुढील दहा वर्षे तो बंद डोळ्यांचा फोटो झळकत राहिला>>> :हाहा:

मस्तच दिनेशदा :)

वा दिनेशदा ! पावसाचे मस्त वर्णन ! लेख खूप आवडला !
फोटो अजून मोठे असते तर अजून मजा आली असती !

दिनेशभाऊ,

अप्रतीम.. असे देश विदेशीचे पाऊस अनुभव लि।ईणे ही कल्पना खूप आवडली...
अजूनही फोटो चालले असते.

फारच सुरेख लेख.. हवेतला तो ओलसर गारवा आणि मनाची ती अर्धोन्मिलित अवस्था (पावसाळयात ढगाळलं की होते ती), दोन्ही लेख वाचता वाचता आपोआप अनुभवलं. ते सगळ्या देशांत सारखंच होत असणार..

वा छानच :) फोटो थोडे मोठे असते अन अजून असते तर अजून मजा आली असती.

:)

पावसात भिजायला मजा आली. फोटोंबाबत मात्र तक्रार आहे - इतरांसारखीच :)