ऋतू रडवा

"ते

रे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं....” हे गाणं लहानपणी पहिल्यांदा कानावर पडलं आणि फार भिडलं. थांबा, गैरसमज नको. ते भिडण्याचं कारण वाटतं तसं नसून माझं नुकतंच अभ्यासक्रमात सुरू झालेलं कच्चं हिंदी हे होतं. मला वाटायचं, 'शिकवा नही' याचा अर्थ “कृपा करून कुणी शिकवू नका प्लीज... “. एका शाळेची जन्मजात अॅलर्जी असलेल्या पोराला अजून काय अर्थ डोक्यात येणार? ब्रिटिशांनी सती वगैरे वाईट चाली बंद केल्या, पण शाळा ही संस्था आणि त्यात ठोठावला जाणारा अभ्यास हे प्रकार रुजवले आणि कित्येक बालकांना हा त्रास वर्षानुवर्षे निमूटपणे सोसायला लागला. आणि वर यातून ज्ञान मिळतं, माणूस शहाणा होतो वगैरे अंधश्रद्धा जन्माला घातल्या ते वेगळंच.

एकतर आपण कुणालाही सांगायला जात नाही की मी आता चालायला वगैरे लागलोय, मला शाळेत घाला म्हणून. माणूस ३ वर्षे वय आणि तितक्याच फूट उंचीचा असला म्हणून काय झालं, त्याला न विचारता, कल्पना न देताच या कोंडवाड्यात भरती करायचं? खरं शिक्षण लग्न झाल्यावरच चालू होतं म्हणतात. (तोपर्यंत गद्धेपंचविशी असते की नाही.) मग सज्ञान होण्याआधीच शाळेत का बरं? मताचा काही अधिकारच नाही? केवळ एका दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांनी समाजाच्या दबावाखाली येऊन हे अत्याचार सुरू करायचे हे माणुसकीला नक्कीच विसंगत.

मीही या प्रथेचा बळी ठरलोच. एके दिवशी मला गाणी, खेळ, मज्जा करु असं सांगून एका ठिकाणी फसवून नेण्यात आलं. तिथे पोहोचताच मला संशय यायला लागला, कारण माझ्यासारखेच काही लोक त्यांच्या आई किंवा बापाने तिथे आणलेले होते. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि काय समजायचं ते समजलो. पण काय करावं काही कळेना. एक जण शूर होता. त्यानं एकच नजर चौफेर टाकून डायरेक्ट भोकाड पसरायला सुरवात केली. त्याचं पाहून आपोआप बाकीच्यांना धीर आला आणि तेही मनापासून आणि मुळापासून रडायला लागले. आयुष्यातला व्यवस्थेविरुद्धचा पहिला लढा होता तो. प्राणपणाने आम्ही रडलो. घरी पाठ करून घेतलेली कोणतीही गाणी अजिबात म्हटली नाहीत. विमानाची चाकं आत ओढली जातात तसे जे पाय आईच्या कमरेवर बसल्या-बसल्या वर ओढून धरले की काहीही झालं तरी जबरदस्तीनं कुणी लँड करू नये. आता सांगायला खेद वाटतो की आमच्यात काही जण मात्र असे होते की ज्यांनी ऐनवेळी कच खाल्ली आणि चक्क शत्रूशी हातमिळवणी केली. आमच्या प्रखर सत्याग्रहानं काहींच्या पालकांना पाझर फुटायला आला होता. जाणवत होतं त्यांना आपण काय करतोय ते. पण नाही, तिथल्या निर्ढावलेल्या बायकांनी त्यांचं लक्ष आमच्यापैकी त्या फुटीर लोकांकडे वेधलं आणि म्हणाल्या ‘पहा, ती कशी शांत बसली आहेत, ही देखील काही वेळानं शांत होतील. तुम्ही काळजी करू नका, जा आता”. आणि तस्संच झालं, त्यांच्यावर विश्वास टाकून गेले की आमचे जन्मदाते आम्हाला त्या छळछावणीत सोडून.

हळूहळू अन्यायाची पण सवय होते म्हणतात, तशीच शाळेचीही झाली. पण माझ्या बाबतीत सहजासहजी नाही. प्रत्येक दिवशी मी शाळेच्या रिक्षात कोंबलं जात असताना कडकडून विरोध करायचो. किंबहुना सकाळी उठल्यावर शाळेचेच विचार माझ्या डोक्यात असायचे. अशावेळी आवडत्या गोष्टीतही मन लागत नाही. नाहीतर एरवी पाण्यात खेळायला आवडणारा मी, मला का बरे अंघोळीची भीती बसावी? अगदी आजदेखील बायको मला "दोन वेळा पाणी गार झालं, तुम्ही का जात नाही अंघोळीला?" असं कोकलते तेव्हा तिला यामागची पार्श्वभूमी लक्षात येत नाही. (तीही शाळेत गेलेली आहे पण बहुधा ‘फुटीर’ गटातली असावी.) बायका म्हणतात, "पोरगं छान ग्लासभर दूध एका दमात पिऊन टाकायचं हो, आताशा त्यात हे घाल, ते घाल केलं तरी तोंड लावत नाही". कसं लावेल? त्याच्या मेंदूत ‘दूध संपवलं की डबा, दप्तर भरणे आणि मग शाळा’ हे कोरलं गेलंय ना माते! ते कसं विसरतेस तू? असं विचारावंसं वाटतं.

इतर खोड्या जाऊद्या पण या शाळेच्या बाबतीत मला घरातल्या पुरुषांचाच आधार वाटत आलाय. त्यांचा मला उचलून रिक्षात कोंबणे वगैरे शारीरिक हालचालीत वाटा असेल पण ‘आज याला शाळा आहे, सुट्टी-बिट्टी काही नाही, वेळ होत आली, आटपा’ वगैरे धोरणी हालचाली आई / काकू / आत्याच करायच्या. वडील, काका या मंडळीनी बहुधा हे त्रास मनाविरुद्ध भोगलेले असल्यामुळे 'बायका जर आपोआप विसरल्या तर जाऊ दे' असा पवित्रा घेतलेला होता. आजोबा तर आठवड्यातून एकदा तरी ‘त्याचं पोट बरोबर नाही म्हणतोय गं, त्याला नका पाठवू’ असा व्हेटो वापरून माझी १ दिवस जामिनावर सुटका करायचे.

पुढे आम्ही बदली होऊन फक्त आई-बाबांबरोबर राहायला लागलो तेव्हा आईच्या मदतीला माझी धाकटी बहीण आली. ही जन्मजात फुटीर गटातील असून तिला शाळा प्रकारची भीती नसून प्रचंड आवड होती. किती भयानक! तर ही पोरगी आईला आठवण करून द्यायची "आज नै जैईचा शालेत?” विचारून. अस्सा राग यायचा तिचा. पण पालक मंडळी मात्र हे कौतुकानं सगळ्यांना सांगायची. भावंडांत द्वेषाचं बीज असं शाळेनेच पेरलं होतं.

अभ्यास या प्रकाराची नावड मी पहिल्यापासूनच जोपासली. तसा पहिलीत मी ओपन-माइंडेड होतो पण नंतर नंतर मला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा यायला लागला. सुरुवात 'शरद उठ, कमल चादर अंथर' अशी झाली ते ठीक होतं. पण नंतर प्रत्येक इयत्तेत त्यातच वरवर बदल करुन छळवणूक सुरू झाली. उदा. अंकगणितात 'शरदने कमलला ५ चादरी २५ रु. दराने विकल्या तर...', भूमितीत 'एका आयताकृती चादरीची लांबी त्याच्या रुंदीच्या तिप्पट होती, तर तिचे क्षेत्रफळ...', भूगोलात 'महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चादरीची निर्मिती होते..', मराठीत तर अक्षरशः वैताग. 'कवीने आकाशाला चादर का म्हटले आहे? (कवीस उद्योग नसावा.) स्वाध्याय – आपल्या घरातील चादरीवर बसून वर पहा. मनात काय कल्पना येतात ते टिपून काढा.' इत्यादी.

तरी एक जमेची बाजू म्हणजे त्याकाळी पहिली ४-५ वर्ष नुसतं पोरगं नियमित शाळेत गेलं आणि इकडे तिकडे चकाट्या न पिटता सरळसोट घरी आलं तरी पुरे असायचं. ते यथावकाश लोकलच्या डब्यात माणसं ढकलली जातात तसं आपोआप पुढच्या वर्गात जायचं. मलाही मेंदूचा जास्त वापर न करता, अभ्यासक्रमात स्वतःहून विशेष न वल्हवता, प्रवाहाबरोबर पुढच्या इयत्तेत जाता आलं. साधारण सातवीपासून बिकट वाट सुरु झाली. आईने जातीने ‘अभ्यास घेणे’ प्रकार चालू केला. कितीही मार्क मिळाले तरीही या आयांचं समाधान होत नाही. शिवाजी महाराजही याला अपवाद नसावेत. थोडं एका मोहिमेवरून येऊन टेकलं की जिजाऊंना गवाक्षातून पुढचा किल्ला दिसायचाच, की आठवड्याभरात निघालेच शिवराय स्वारीवर. आमच्या मातोश्रींचा मात्र पेशन्स फार लवकर जायचा. आपलं पोरगं मूर्ख वाटतंय असा संशय जरी आला तरी या आया कापरासारख्या पेटून उठतात आणि धपाटे घालतात. उदा. एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल तर काय करायचं? या प्रश्नाला मी उदाहरणाकडे लक्ष देण्याऐवजी तिची नजर कुठे आहे आणि तिचा हात किती अंतरावर आहे याचा अंदाज घेऊन कधी गुणाकार तर कधी भागाकार (आज पार्किंग समोर आहे) असं उत्तर देऊन हमखास मार खायचो. दोन वेळा सांगूनही तीच चूक झाली की मांडीवर फटका बसलाच. त्या वयात चड्डी असायची त्यामुळे सॉलिड लागायचं. आजही कॅलक्युलेटरवर भागाकार करताना मी डावा हात दुर्योधनासारखा मांडीवर झाकून ठेवतो.

मग दहावीचा धबधबा आला आणि संथ नदीचं चित्र बदललं. जंगली जमातीत श्वापद मारायचं असेल तर डबे वाजवत त्याला जंगलाच्या मध्यभागी आणतात, तसं परिचित मंडळी ९ वी पासूनच वातावरण निर्मिती करायला लागली. घरी आलं की आईवडिलांना याला किती ‘पाडणार’ तुम्ही दहावीला? असे प्रतिष्ठेला आव्हान देणारे प्रश्न विचारणे सुरू केले. त्यातही सातवीपासूनच आईने वडिलांना प्रगतीपुस्तक पाहण्याची शिस्त लावली होती. पूर्वी ते पुस्तक हातात घेऊन फार न पाहताच “अरे वा, वा” करुन सही करून द्यायचे. त्यांना मी पास होऊन पुढच्या वर्गात गेलो इतपत पुरे असायचं. आईच्या दृष्टीनं हे माझ्या भविष्यासाठी फारच घातक होतं.

त्यासाठी मग सातवीपासून तिनं त्यांची सही करण्यापूर्वी सेपरेट ‘शाळा’ घ्यायला सुरुवात केली. प्रगतीपुस्तक कसं वाचायचं, किती पडझड झालीये, किती मजल मारायची आहे, बाकीची पोरं किती पाण्यात आहेत आणि आपला बाळ्या त्या सूर्यमालेत कुठे भ्रमण करतोय हे ३ वेळा उजळणी घेऊन किती मात्रेत रागवायचं आहे वगैरे रिहर्सल झाल्यावर मला पुढे आणलं जायचं. कितीही प्रयत्न करून बाबांना तो अभिनय परफेक्ट जमायचा नाही. एकदा ते सांगितलेली वाक्यं विसरून ओरडले, “असाच आळशीपणा करत राहिलास तर आयुष्यभर चपराश्याची नोकरी करावी लागेल”. त्यांनी त्यांच्या ऑफिसमधलं वाईटात-वाईट उदाहरण आठवून ते धमकी म्हणून वापरलं. प्रत्यक्षात माझ्यावर उलटाच परिणाम झाला. कारण आमच्या शाळेत मुख्याध्यापकांच्या खालोखाल चपराशालाच मान होता हे आम्ही रोज बघायचो. शिवाय काम काहीच नाही. मस्त नारदमुनींसारखं सगळ्या शाळेत मुक्त संचार. शिवाय तास चालू, शाळा सुटणे इत्यादीच्या घंटांचे पॉवरफुल अधिकार याच्या हातात. त्यामुळे अभ्यास केला नाही तर चपराशी होणे हा प्रॉब्लेम नसून बोनस पर्वणी वाटायची. मग कधीकधी आईला स्टेजवर येऊन मूळ संहितेतली वाक्यं अभिनयासहित म्हणावी लागायची. तो प्रवेश मी आणि बाबा दोघांनीही काळजीपूर्वक पाहून आपापला बोध घ्यावा ही अपेक्षा असायची.

दहाव्या इयत्तेत मग मला अभिनयाची गोडी लागली. म्हणजे अभ्यास न करता तो चालू आहे असं दाखवायची कला. कारण तोपर्यंत अभ्यासाचं वातावरण अतीच तापवत नेलेलं होतं आणि तितका अभ्यास करणं माझ्या सहनशक्तीच्या पलिकडचं होतं. का कुणास ठाऊक, 'अमुक अमुक तुझ्या भल्याचं आहे आणि ते केलं नाहीस तर तुझं काही खरं नाही' हे जितकं मला ठसवण्याचा प्रयत्न होई, तितकं मला ते करूच नये असं ठामपणे वाटायचं. आईवडील घरात असताना ‘अभिनयावर’ काम भागायचं पण ते नसतानाही अभ्यासच केला याचे पुरावे देण्यात फार कल्पनाशक्ती खर्ची पडायची. त्यात बहिणी अभ्यासात कायम तत्पर त्यामुळे त्यांना लहान असूनही साक्षीदार म्हणून जास्त मान आणि पत असायची. संवाद साधारण असे,
“झाला अभ्यास?” रोखून विचारलेला प्रश्न.
“हो झाला.” नजर दुसरीकडे.
“काय काय केलं?”
“मराठीचे धडे वाचले.”
“मराठी हा काय अभ्यास आहे?”
“.....”
“गणित?”
“कालची उदाहरणं वाचली.”
“गणितं वाचतात? सोडवली का नाहीत?”
“उद्या सोडवतो.”
“तू काय केलंस गं?” मध्येच बहिणीकडे मोर्चा, उगीच कायदे सगळ्यांना समान दाखवण्यासाठी.
“मी सग्गळा अभ्यास केला”
“पहा, ती मुलगी असून किती व्यवस्थित आहे”, मुलगी असून म्हणजे काय? ते मला शेवटपर्यंत समजलं नाही. एकूण मी अभ्यासाचा एकाच अर्थ मनाशी घट्ट धरलेला होता. अभ्यास म्हणजे तो न करण्याबद्दल कुणालाही आणि कशालाही घाबरायचं नाही, जे होईल ते होईल.

परवाच माझी बहीण माझ्या भाच्याला रागावत होती. तिच्या घरातले सगळेच एकत्र बसून त्यावर बोलत होते. विषय तोच. हा अभ्यासच करत नाही. एव्हाना मी शांत बसलेला पाहून एकदम तिचे सासरे म्हणाले,
“मामा, तुम्ही सांगा की हो काही तरी उपाय”.
मी शांतपणे म्हणालो, “अभ्यास कर म्हणणं बंद करा”. सगळे अवाक् होऊन माझ्याकडे बघत राहिले. फक्त एकच व्यक्ती खुद्कन हसली. तिचं वय होतं ३ वर्षं आणि उंची ३ फूट.

- धनंजय दिवाण

प्रतिसाद

नेहमीप्रमाणेच.. खुदुखुदु हसायला लावलं !

मस्तच! मजा आली वाचताना.

दिनेशदा +१

मस्त जमलाय लेख! एकदम खुसखुशीत :) अजून थोडा मोठा असता तर अजून आवडले असते!

मजा आली वाचताना. गमतीशीर आहे.

मस्त लिहिलंय. ऋतूंवर लिहिताना अशा रडव्या ऋतूवर लिहायच्या कल्पनेला दाद :)
'कवीने आकाशाला चादर का म्हटले आहे? (कवीस उद्योग नसावा.) स्वाध्याय – आपल्या घरातील चादरीवर बसून वर पहा. मनात काय कल्पना येतात ते टिपून काढा.' इत्यादी. >> :हाहा:

मस्त जमलाय लेख :) आवडला.

मस्तच :)

:हाहा:

मस्त :हाहा:
चादरीचं उदाहरण सही आहे एकदम :)

तुमचा रडवा ऋतु चांगलं हसवून गेला.. मजा आली.

धनंजय, तुम्ही अगदी सर्वांवर लहानपणी झालेल्या अन्यायावर वाचा फोडली जणू :) शिक्षा ठोठावणे सारखे शाळा ठोठावणे तसेच चादरविषयी वाचून हहपुवा :)

सह्ही पंचेस...... मजा आली वाचून :-)

चादर... मुंगेरीलाल झक्कास जमलाय लेख.

वा ! छान, मजा आली. ऋतू रडवा हसवून गेला :)

'शिकवा नही' लै आवडलं. हिंदीतील 'शिक्षा' हा शब्द किती योग्य आहे याची प्रचिती पहिली ते दहावी जहाल, बंडखोर गटात असल्यामुळे घेतली आहे. :)

मग दहावीचा धबधबा आला आणि संथ नदीचं चित्र बदललं. जंगली जमातीत श्वापद मारायचं असेल तर डबे वाजवत त्याला जंगलाच्या मध्यभागी आणतात, तसं परिचित मंडळी ९ वी पासूनच वातावरण निर्मिती करायला लागली. घरी आलं की आईवडिलांना याला किती ‘पाडणार’ तुम्ही दहावीला? <<< भयंकर हसलो.. :हहगलो: मस्त खुसखुशीत लेख.

:D
ठोठावला जाणारा अभ्यास >>>> LOL

मस्त मस्त. लेखाचे नाव वाचुनच सर्वप्रथम वाचायचे ठरवले तोच लेखकाचे नाव दिसले, मग तर अजिबात उशीर केला नाही वाचायला. झक्कास लिहिलाय.

छान जमलाय ऋतू रडवा

:D एकदम खुसखुशीत लेख. आवडला.

मस्त!!
यात कॉलेजपर्यन्तचा/ व्यावसायिक पदवीपर्यन्तचा अभ्यासही यायला हवा होता असे वाटले.

:हहगलो:

फार फार छान लिहिलाय.. :)

धन्यवाद मित्रहो. लेख आवडल्याचे वाचून आनंद वाटला. :-)

खूप खुसखुशीत! :-)

सातवीपासूनच आईने वडिलांना प्रगतीपुस्तक पाहण्याची शिस्त लावली होती. >>> :खोखो:

छान जमलयं.. अगदी मनातलं :)

:हाहा: मस्त! मजा आली.

चादर परिच्छेद आणि शिवाजी महाराज - जिजाऊ वाक्य एक नंबर! :)

:हहगलो:

मस्तच! मजा आली वाचताना :)

एकदम खमंग, खुसखुशीत! खूप आवडलं.