परतफेड

"स्व

तःसाठी काय कोणीही जगतं. आपल्यासाठी कोणीही शिक्षण घेतं. आपल्या परिवारासाठी कोणीही संपत्ती गोळा करतं. त्यात काय एवढे मोठे? प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःची आणि आपल्या परिवाराची परिसीमा छेदून जाऊ शकता? 'आयुष्यात तुम्ही किती शिकलात किंवा किती संपत्ती गोळा केलीत' ह्यावर तुमचे मोठेपण अवलंबून नसते तर 'तुमच्या शिक्षणाचा आणि गोळा केलेल्या संपत्तीचा समाजाला काय उपयोग झाला' हेच खरं तुमच्या मोठेपणाचं मोजमाप!"

बाबा खरंच, तुम्ही त्या दिवशी हे शब्द बोललात काय, जणू माझ्या जीवनाचा agenda च तयार केलात !

तो दिवस, ४ सप्टेंबर १९७६. मला परदेशात शिक्षण घ्यायला बर्लिन युनिवर्सिटी, जर्मनी मध्ये अॅडमिशन मिळाली होती. त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या जीवनात पै पै गोळा करून जमविलेली पुंजी माझ्या शिक्षणाकरिता लावून दिलीत.
Paratfed-BerlinUniversity.gif

तसं पाहिलं तर तुमचे सारे जीवन तुम्ही जणू समाजाकरिताच अर्पित केलेलं ! तुमची सामाजिक बांधिलकी एवढी की त्यापुढे जणू स्वतः आणि स्वतःचा परिवार जणू केवळ त्याकरिताच ! कदाचित तसे नसेलही ! पण मला मात्र त्यावेळेस तसं भासायचं. स्वातंत्र्य लढयाच्या जादूमयी वातावरणात तुमचं शैशव आणि तारुण्य गेलेलं. कदाचित तिथूनच तुम्हाला सामाजिक बांधिलकीचं बाळकडू मिळालं असावं. खरं सांगू बाबा, तुमचे हे समाजाकरिता झटणे मला माझ्या लहानपणी फारसे उमगलेच नाही.

पण ही तुमची वागणूक, ही तुमची सामाजिक बांधिलकीची शिकवण कुठेतरी माझ्या मनात खोलवर कोरली गेली होती. खरंच, ज्या मातीत आपण अंकुरलो, ज्या मातीत उगवलेले जीवनसत्व भक्षून आपले जीवन घडले, आणि ज्या सामाजिक संस्कारांनी आपले व्यक्तिमत्व घडले त्या मातीचे, त्या समाजाचे जन्मभर ऋणी रहाणे - किती सुंदर अभिव्यक्ती आहे नाही?

बाबा, एक गोष्ट सांगू? तुमचे हे संस्कार, गेल्या ३० वर्षात माझ्या वागणुकीत उतरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय मी !

आज सारे जग माझ्याकडे एक यशस्वी Industrialist म्हणून बघते. माझ्या Dynamic Technologies Ltd. ह्या उद्योगसमूहांचे जाळे आज साऱ्या जगभर पसरले आहे. इतकेच काय, ह्या वर्षी माझे नाव 'Forbes List of Billionaires' मध्ये पण आले आहे. पण हे सारे करताना तुम्ही माझ्या कानात सांगितलेले ब्रीदवाक्य अंमलात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय. माझ्या उद्योगसमूहाने सामाजिक बांधिलकीशी जणू जन्मोजन्मीचे नातेच जोडले आहे. मग त्या प्रत्येक उद्योगसमूहाला जोडलेल्या शाळा असोत, इस्पितळे असोत, क्रीडासंकुले असोत किंवा सौर उर्जा केंद्रे असोत. माझ्या संगतीत काम करण्याऱ्या माझ्या सहकार्‍यांबरोबर माझं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे. प्रत्येक उद्योगाचे संगोपन करताना त्याच्या आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव पण मी पूर्णतः ठेवली आहे. माझ्या उद्योगातून तयार होणारा प्रत्येक रोजगार हा एक माणूस आणि एक परिवार जोडण्याची सुवर्णसंधी असंच मी मानत आलो आहे. तुम्हीच तर शिकवलेत ना मला की स्वतःकरिता आणि स्वपरिवारकरिता धनसंचय करण्यापेक्षा समाजसंचय जास्त महत्वाचा. बाबा, तुम्ही दिलेल्या शिकवणीवर चालताना आज मला फार आनंद होतोय.

तुम्ही दिलेल्या संस्कारांची एक छोटीशी परतफेड म्हणा हवं तर ! गेल्या ३० वर्षे केलेल्या या अथक मार्गक्रमणाचा कळस, एक परमोच्च बिंदू मी लवकरच गाठणार आहे – ३० सप्टेंबर, २०१२ रोजी !

*****

२९ सप्टेंबर २०१२ रोजी जेव्हा बर्लिनला हॉटेल मध्ये चेक-इन केलं तेव्हाच मी ठरविले होते की उद्याच्या शेअरहोल्डर मिटींग मध्ये माझे मन मोकळे करायचे. मग ! उद्याचा दिवस होताच तसा - माझ्या आणि आमच्या Dynamic Technologies Ltd या उद्योगसमूहाच्या आयुष्यातील एक मोठा अभूतपूर्व दिवस ! खरंतर उद्याची वार्षिक शेअरहोल्डर मिटींग मुंबईला होती, आणि मी होतो बर्लिनला. एक जुनी परतफेड जी करायला हवी होती. उद्याची मुंबईची वार्षिक शेअरहोल्डर मिटींग मी बर्लिन मधूनच संबोधित करणार होतो - टेली कॉन्फरन्स मार्फत !

शेअर होल्डर्स मिटींग मुंबईला सकाळी ११ वाजता म्हणजेच बर्लिनला सकाळी ६ वाजता सुरु होणार होती. साधारण सात-आठशे शेअर होल्डर्स या मिटींगला येण्याची शक्यता वर्तविली जात होती. आजच्या मिटींगमध्ये एक महत्वाची घोषणा होणार आहे हे आधीच प्रकाशित झाल्यामुळे शेअर होल्डर्समध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच मी आणि आमचे CFO श्री उमेशचंद्र हॉटेलच्या टेली कॉन्फरन्स रूममध्ये तयार होऊन बसलो होतो. साधारण सहाच्या सुमारास मी माझे भाषण सुरु केले.

"माझ्या मित्रांनो आणि सहकार्यांनो, आजच्या या वार्षिक शेअरहोल्डर मिटींगमध्ये तुम्हांला संबोधताना मला फार आनंद होत आहे. आपली एकमेकांची सोबत तशी २२ वर्षे जुनी. याच दिवशी, २२ वर्षापूर्वी Dynamic Technologies Ltd चा IPO झाला होता - दहा कोटी रुपयांचा पब्लिक-इशू. तसा जास्त मोठा नव्हता, पण त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात. आणि त्या दिवसापासून आपला सहप्रवास सुरु झाला. तेव्हापासून तुम्ही माझ्या सुख-दुःखात, तसंच चांगल्या-वाईट काळात माझी पूर्णतः साथ निभावलीत. या २२ वर्षाच्या आपल्या संगतीत असेही काही दिवस आले की जेव्हा पुढे जाणे खूप अवघड होऊन बसले होते. पण अशाही परिस्थितीत तुम्ही माझी साथ सोडली नाहीत. तुम्ही मला केलेल्या सहकार्याची मला पुरेपूर जाणीव आहे. अशा माझ्या साथीदारांना मी गेल्या २२ वर्षात पुरेपूर मोबदला देण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो भागधारकांना दिलेला लाभांश असो किंवा कर्मचार्‍यांना दिलेला वार्षिक बोनस अथवा यथायोग्य पगारवाढ असो. त्याशिवाय आपल्या उद्योगसमूहाने "सामजिक बांधिलकी" हे ब्रीदवाक्य नेहमीच जपले आहे. सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवणाऱ्या आपल्या उद्योगसमूहाने समाजाकरिता भरभरून काम केले आहे - मग ते ती उद्योगसमूहाला जोडलेली इस्पितळे असोत, शाळा असोत, क्रीडासंकुले असोत किंवा अपारंपारिक ऊर्जा बनवणारे प्रकल्प असोत ! आपल्या उद्योगसमूहाचा समाजाबरोबर असणारा हा दुवा ही समाजाची सेवा करण्याची एक संधी असेच मी नेहमी मानत आलो आहे !

माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या उद्योगसमुहाच्या इतिहासातला एक अभूतपूर्व दिवस ठरणार आहे. कारण आज आपण घेतलेल्या साऱ्या लोन्सची परतफेड करणार आहोत. व्यावसायिक बँकांकडून घेतलेल्या लोन्सचा शेवटचा हफ्ता आज आपण भरणार आहोत. तसे पाहिले तर इंडस्ट्रीयल क्रेडिट बँकांकडून घेतलेले लोन हे कुठल्याही उद्योगसमुहाला जरुरीचे असते. पण त्याही लोनची परतफेड आज आपण करणार आहोत. मला खात्री आहे की ही आपल्या साऱ्यांकरिता एक फार आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरणार आहे.

आजच्या या शुभदिनी मी काही सामाजिक बांधिलकीच्या प्रोजेक्ट्सची घोषणा करतो आहे. त्यामध्ये दोन सौरऊर्जा केंद्रे, तीन पवनचक्या, तीन इस्पितळे आणि आठ प्राथमिक शाळा भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्याची आज मी घोषणा करीत आहे.”

“आता आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन.”

एव्हढे बोलून मी खाली बसलो आणि उपस्थितांच्या प्रश्नांची प्रतिक्षा करू लागलो.

"सर, माझे नाव रमेश. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचाय. आपल्या उद्योगसमुहाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उतरायचे का ठरविले? अस म्हणतात की अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात नफा कमी आहे. 'कमी नफा मिळविणे' हा तर आपल्या उद्योगसमुहाचा मूळ उद्देश नाही ना?"

"रमेश, तुम्ही म्हणता ते खरे आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात म्हणावा त्यामानाने नफा कमी आहे. पण ह्या क्षेत्रातील आपली गुंतवणूक ही भविष्याला अनुसरून केली आहे. पारंपारिक ऊर्जा खनिज तेलाच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. पण खनिज तेलाचा साठा एक दिवस संपणार आहेत. तसंच खनिज तेलाच्या वापरामुळे जो कर्बवायू तयार होतो त्यामुळे पृथ्वीचे वातावरण तापते आहे. ग्लोबल वार्मिंगबद्दल आपण ऐकलेच असेल. पण याउलट अपारंपरिक ऊर्जा - जसे सौर ऊर्जा किंवा वायू ऊर्जा - यांचे स्त्रोत अनंत काळापर्यंत टिकणारे आहेत. तसेच त्यांच्या वापराने कर्बवायूसुद्धा तयार होत नसल्याने ग्लोबल वॉर्मिंगला आळा बसेल. हीसुद्धा एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच आहे."

मी उत्तर दिले आणि पुढच्या प्रश्नाची प्रतिक्षा करू लागलो.

"सर, माझे नाव जान्हवी. मला तुम्हांला एक प्रश्न विचारायचाय. आजचा दिवस एवढा महत्त्वाचा आहे असे तुम्ही म्हणता आहात, तर मग आजच्या या मिटींगला तुम्ही उपस्थित कसे नाही? या महत्त्वाच्या दिवशी तुम्ही देशाबाहेर कसे काय?"

मी तो प्रश्न ऐकून काहीसा अवाक झालो. हा प्रश्न कोणी विचारेल याची मी कल्पनाच केली नव्हती. पण मी स्वतः ला सावरले आणि म्हणालो, "तुमचे म्हणणे बरोबर आहे जान्हवी ! मी माझ्या एका जुन्या राहून गेलेल्या कामासंदर्भात इथे जर्मनीत आहे. पण मी आज जरी तुम्हां साऱ्यांपासून दूर असलो तरी मनाने मी तुमच्याबरोबरच आहे.”

मला आता मिटींग संपवायची होती. मी म्हणालो, “बरं, एव्हढे बोलून मी आपली रजा घेतो. आता यापुढे आपले CFO श्री. उमेशचंद्र आपल्या कंपनीचा गेल्या १२ महिन्यांचा वार्षिक अहवाल सादर करतील."

उमेशचंद्रंनी पुढच्या २० मिनिटात कंपनीचा वार्षिक अहवाल सादर केला आणि भागधारकांना भरभरून लाभांशही घोषित केला.

माझे भाषण संपविल्यावर उपस्थित शेअर होल्डर्सनी एकच जल्लोष केला. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बाबांनी केलेल्या संस्काराची थोडीफार परतफेड करताना मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. आजची शेअर होल्डर्स मिटींग सफल झाली होती.

*****

दुपारचे १२ वाजत आले होते. आम्ही दोघांनी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन थोडेफार खाण्याचे सोपस्कार केले. आमची मुंबईची परतीची फ्लाईट रात्री आठला होती.

आता फक्त शेवटचे एक महत्त्वाचे काम उरले होते. मला साधारण चार तास होते ते काम पूर्ण करायला.

मी उमेशचंद्रांकडे वळून म्हणालो, "आपली परतीची फ्लाईट आठ वाजता आहे ना?"

"होय. आपण साधारण ६ वाजेपर्यंत तरी एअरपोर्टवर पोहोचले पाहिजे." उमेशचंद्र म्हणाले.

"तुम्ही असे करा उमेशचंद्र, ठरल्याप्रमाणे तुम्ही बर्लिन सिटी टूर वर जा." मी म्हणालो.

"म्हणजे?" उमेशचंद्रानी माझ्याकडे वळून आश्चर्याने विचारले, "तुम्ही येणार नाही सिटी टूरला?"

"नाही" मी म्हणालो, "मला एक जुने उरलेले काम करायचे आहे आणि माझे मलाच ते निस्तरले पाहिजे. सिटी टूर संपवून तुम्ही सरळ एअर पोर्टवरच जा. आपण तिथेच भेटू संध्याकाळी सहा वाजता !"

उमेशचंद्र माझ्याकडे 'आ' वासून पहातच राहिले. पण मी त्यांना उत्तर देण्याचे टाळले आणि तसाच पुढे निघून गेलो.

बस आता शेवटचे चार तास, फक्त माझ्याकरिता. याच क्षणाची वाट पाहत होतो मी गेले ३२ वर्षे !

*****

बर्लिन शहर ! ज्याने मला जडविले आणि घडविले, तेच हे शहर ! ३२ वर्षापूर्वी बर्लिन युनिवर्सिटीमध्ये घालविलेली ४ वर्षे मी पुढच्या ४ तासात पुन्हा जगणार होतो ! आज मला शोफर-ड्रिव्हन कार नको होती. मला हवी होती ती फक्त बर्लिनची अंडरग्राउंड रेल ! मला तर येथील रस्ते अन रस्ते माहित होते. मी पाय उचलला. समोरच अंडरग्राउंड स्टेशन होते - तेथे जाऊन रेल्वे पास काढला आणि थेट पोहोचलो युनिवर्सिटीमध्ये. तेथे मी पहिली गोष्ट काय केली असेल तर माझ्या केमिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटला भेट दिली. इथेच मी लहानाचा मोठा झालो. नंतर युनिवर्सिटी मेसमध्ये जाऊन चवीने 'फिश अँड चिप्स' खाल्ले आणि छान हॉट कॉफी घेतली - जशी ३२ वर्षापूर्वी मी नेहमी घेत असे !

पाहता पाहता तीन तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. बस्स - आता शेवटचे काम !

युनिवर्सिटीची मेन बिल्डींग आमच्या डिपार्टमेंटपासून चालत साधारण दहा मिनिटाच्या अंतरावर होती. मी भरभर पावले उचलली. मेन बिल्डींगला पोहोचल्यावर समोरच असणाऱ्या बाकावर क्षणभर विसावलो.

माझ्या नकळत माझा हात माझ्या खिशात गेला. खिशात असलेले पत्र मी बाहेर काढले - ३२ वर्षापूर्वीचे पत्र ! वर तारीख लिहिली होती, २७ सप्टेंबर १९८०.

माझे मन भूतकाळात गेले.

Paratfed-ManOnBench.jpg३२ वर्षापूर्वीचा तो दिवस ! १ ऑक्टोबर १९८० ला माझे ग्रॅज्युएशन होते आणि त्याच दिवशी, सोमवारी, मला माझी डिग्री मिळणार होती. मला हे पत्र शुक्रवारी, २८ सप्टेंबर १९८० रोजी सकाळी १० वाजता मिळाले होते.

मी वाचू लागलो. "आपल्याला वारंवार सूचना देऊनही आपण ट्युशनचा शेवटचा ५००० मार्कचा हफ्ता भरलेला नाही. आपण ही उरलेली रक्कम शुक्रवार २८ सप्टेंबर १९८० ला दुपारी ४ वाजेपर्यंत भरावी. अन्यथा आपल्याला १ ऑक्टोबर १९८० ला ग्रॅज्युएशनमध्ये डिग्री दिली जाणार नाही."

माझ्यावर जणू आकाशच कोसळले होते ! कुठून आणणार होतो मी एव्हढे पैसे? तेही ६ तासात? बाबांचे माझ्यावरचे कृपाछत्र तर ३ महिन्यांपूर्वीच निखळून पडलेले ! मला पुरेपूर कल्पना होती की मी ट्युशनचा शेवटचा हफ्ता भरलेला नाही. पण बाबा गेल्याच्या दुःखात मला काहीच सुचत नव्हते. मला उगाचच वाटत राहिले की काहीतरी चमत्कार होईल. पण कुठलाच चमत्कार घडला नाही. आणि शेवटी माझ्या हातात काय पडले तर हे पत्र !

माझी विचारचक्रे चालू होती. ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला मी अगतिक झालो होतो.

माझी पावले समोरच्या झू-गार्डन अंडरग्राउंड स्टेशनकडे वळली. मी अंडरग्राउंड रेल्वे पकडली आणि २ स्टेशन दूर असलेल्या कुडाम स्टेशनला पोहोचलो. जाताना मी डावीकडे वळून पाहायला चुकलो नाही. झू-गार्डनचे विकेंड मार्केट भरायला सुरुवात झाली होती. ३२ वर्षापूर्वी जसे भरायचे तसेच ! ५ मिनिटांत कुडाम आले. मी बाहेर पडलो आणि माझी पावले नकळत कुडामच्या कादेवे सुपरमार्केटकडे वळली.

कुडामचे कादेवे - युरोप मधले अत्यंत महागडे उच्चभ्रू लोकांचे सुपरमार्केट ! इथेच मी आलो होतो ३२ वर्षापूर्वी !

Paratfed-Rado.jpg
मी आत प्रवेश करून दुसऱ्या फ्लोअरवर असणाऱ्या घड्याळाच्या सेक्शन मध्ये पोहोचलो. मला थोडे आश्चर्य वाटले. ३२ वर्षांत इथे काहीच कसा फरक पडला नाही? डावीकडे साधारण ४० मीटरच्या अंतरावरच होती ती रॅडो घड्याळाची शो-केस. मी पटकन तेथे पोहोचलो अन प्रश्न केला,

"काय किंमत या रॅडो घड्याळाची?"

"१०,००० युरो !"

माझे मन पुन्हा भूतकाळात गेले.

*****

३२ वर्षांपूर्वी असाच आलो होतो मी इथे - दबकत दबकत ! आणि हाच प्रश्न केला होता.

"काय किंमत या रॅडो घड्याळाची?"

"१०,००० मार्क !" समोरून उत्तर आले होते. माझ्या समोर कोण आहे याकडे माझे बिलकुल लक्ष नव्हते. मला पाहिजे होते ते फक्त रॅडो घड्याळ ! ते घड्याळ चोरण्यासाठी मला त्या सेल्स लेडीची अनुपस्थिती जरुरी होती.

"जरा कमी किंमतीचे - ८००० मार्कचे नाही का?" मी विचारले.

"आहे, पण स्टोअर मधून आणावे लागेल !"

"मग प्लीज आणा की !"

"थांबा थोडे - दोन मिनिटात आणून देते !" इतके म्हणून ती सेल्स वुमन आत गेली.

मी डाव साधला. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली. पटकन शोकेसमधील ते रॅडो घड्याळ उचलले - १०००० मार्कचे रॅडो घड्याळ ! माझ्या फीचा उरलेला हफ्ता भरायला पुरेल इतकी रक्कम होती ही ! आणि मी पाहता पाहता तिथून नाहीसा झालो.

मी चोरी केली होती. कदाचित CCTV वर हे सारे टेप होण्याची शक्यता होती. पण आज मला त्याची परवा नव्हती. मला दिसत होता तो फक्त मी न भरलेला माझा ट्युशनचा हफ्ता !

मी माझ्याच मनाच्या कुठल्यातरी खोल दरीत कोसळलो होतो. छिन्न-विच्छिन्न ! हेच का होते बाबांचे माझ्यावरचे संस्कार ? पण पण माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता - Beg, borrow or steal
एव्हढेच काय ते शिल्लक होते ! त्यापैकी Beg तर शक्यच नव्हते आणि borrow करायला वेळ उरला नव्हता. उरले होते ते steal - आणि मी चोरी केली होती !

मी बाहेर आलो - माझ्या मागावर कोणी नाही याची खात्री करून घेतली. पाय उचलला आणि झटक्यात कुडाम स्टेशन गाठले. आज माझे नशीब मला साथ देत होते. खाली अंडर ग्राउंड ट्रेन उभी होती. जणू माझ्याकरताच ! मी आत चढलो अन ट्रेन चालू झाली. ५ मिनिटात झू-गार्डन स्टेशन आले. मी उतरलो आणि पळतच विकेंड मार्केट गाठले आणि थेट सेकंड-हॅण्ड विक्रीच्या विभागात पोहोचलो.

मी समोरच्या दुकानात शिरलो आणि म्हणालो, "मला हे रॅडो घड्याळ विकायचंय! काय किंमत?"

खरोखरच, आज माझे नशीब बलवत्तर होते !

दुकानदाराने माझ्याकडे आणि त्या घड्याळाकडे पाहिले, घड्याळ खरेच आहे याची खात्री करून घेतली आणि म्हणाला, "५००० मार्क !"

'फक्त?' माझ्या मनात विचार आला. पण मला त्याच्याशी हुज्जत घालायला वेळ नव्हता. नाही म्हटले तरी ती रक्कम मला पुरेशी होती - माझी फी भरायला !

"ठीक आहे !" मी म्हणालो. मी त्याला घड्याळ दिले. आणि त्याने ५००० मार्क माझ्या हातावर ठेवले ! मी पटकन तेथून काढता पाय घेतला.

मी पंधरा मिनिटांत युनिवर्सिटीत पोहोचलो आणि थेट गेलो ते फायनान्स सेक्शनला. दुपारचे ४ वाजायला अजून ५ मिनिटे बाकी होती. मी ट्युशन फीचे बिल काढले आणि माझी उरलेली फी भरली.

मी माझ्या रूमवर परतलो. हे मी काय केले होते? मी चोरी केली? माझ्या मनात विचारचक्रे चालूच होती. मी स्वतःच माझ्या मनातून पुरता उतरलो होतो. पुढचे २ दिवस मला संपता संपत नव्हते.

अन् शेवटी तो दिवस उजाडला - सोमवार, १ ऑक्टोबर १९८० ! माझ्या मार्गातले सारे अडथळे दूर झाले होते. ज्यासाठी एवढा अट्टाहास केला होता ती डिग्री मला अखेर मिळाली होती !

आणि रात्रीच्या फ्लाईटने मी भारतात परतलो देखील !

*****

"हॅलो, तुम्हाला हे घड्याळ विकत घ्यायचे आहे का? १०,००० युरो किंमत आहे त्याची." मी काहीच उत्तर देत नाहीये हे पाहून त्या सेल्स वुमनने मला खडसावून प्रश्न केला.

तो प्रश्न कानावर पडताच ३२ वर्षांपूर्वीच्या भूतकाळात गेलेलो मी खाडकन वर्तमानात आलो.

"नाही नाही, फक्त किंमत विचारायची होती ! नंतर घेईन कधीतरी !" मी उत्तरलो आणि तिथून काढता पाय घेतला. मी कादेवे मधून बाहेर पडलो.

संध्याकाळ होत आली होती. सहा वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचायचे होते. मी धडक टॅक्सी घेतली आणि एअरपोर्टला पोहोचलो.

उमेशचंद्र माझी वाट पाहत होतेच.

"झाले तुमचे काम?" त्यांनी मला विचारले.

मी त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना प्रतिप्रश्न केला.

"मला एक गोष्ट सांगा उमेशचंद्र. १०,००० युरो रकमेवर ८ टक्के दराने ३२ वर्षाचे किती चक्रवाढव्याज होते ? पटकन सांगा!" मी अधीर झालो होतो.

उमेशचंद्रनी लॅप टॉप काढला.

"१०७,३७० युरो" उमेशचंद्र उत्तरले.

"आणि टोटल रक्कम?"

"सर, एकंदर ११७,३७० युरो!"

"तुम्ही असं करा उमेशचंद्र, ११७,३७० युरोचा एक क्रॉस चेक फाडा कादेवे सुपर मार्केटच्या नावाने ! आणि त्यावर माझी सही घेऊन तो पोस्ट करा त्यांना आत्ता, लगेच ! त्यावर पत्ता लिहा 'कादेवे सुपर मार्केट, कुडाम, बर्लिन, जर्मनी' " मी उमेशचंद्रना आदेश दिला.

"आं? हे कसले पेमेंट आहे सर?" उमेशचंद्रनी आश्चर्याने विचारले.

"आहे - एका ३२ वर्षाच्या जुन्या कर्जाची परतफेड !"

उमेशचंद्र माझ्याकडे 'आ' वासून पहातच राहिले.

मी आज ३२ वर्षांनी माझ्या शेवटच्या कर्जाची परतफेड पुरी केली होती !

Paratfed-check.jpg

अशा पवित्र कर्जाची परतफेड की ज्यावर सारे जीवन उधळून टाकावे !!

-बिनधास्त

प्रतिसाद

छान आहे कथा. आवडली.

वेगळा विषय. छान आहे कथा.

छान ! जरुर वाचावी अशी कथा !

छान आहे.

कथा आवडली. छान आहे, मला वाटलेलं की तो तिथेच १०००० मार्क्स ठेवून परत येतो.:)

छान आहे कथा. आवडली.

ह्म्म्म वेगळा विषय.

ग्रेट कथा ! चित्रे पाहून मजा वाटली !
अभिनन्दन आणि दिवाळीच्या शुभेछा !!

छानच बिनधास्त, नेहमीप्रमाणे वेगळाच विषय, मांडणी.

मस्त आहे कथा. मला आवडली!!!!

प्रिय मोहना, सिंडरेला, साजिरी, सुनिधी, नंदिनी, अखी, नीधप, निशीकांत, भारती आणि मोकीमी,

आपणा सर्वांना कथा आवडल्याबद्दल आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! आपणा सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा !!

बिन्धास्त, आवडली कथा. वेगळी आहे... अन तुम्ही फुलवलीयेही सुरेख.

वेगळी कथा. आवडली :)

प्रिय दाद आणि अनघा,

आपल्याला कथा आवडल्याबद्दल आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! दीपावलीच्या शुभेच्छा !!

वेगळा विषय खुपच चांगल्या पध्दतीने मांडलाय!

विषय चांगला आहे. पण मांडणी बाळबोध वाटली.

सहकार्यांनो :अओ:

वॉव! कथा अतिशय सुरेख आहे गोष्ट, प्रचंड भावली.
चोरिच्या पैशांचा योग्य विनियोग आणि त्यामुळे आयुष्यात झालेल्या सर्व चांगल्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवणारा कथेचा नायक आवडला. शेवट अतिशय सुरेख.
खरंच कर्जाकडे सुंदर नजरेने पहायला लावणारी घटना. :)

*पुलेशु*

विषय वेगळा आहे त्यामुळे वाचायला मजा आली पण ...

दिनेशदांनी प्रतिक्रियेच्या धाग्यावर "चोरीची परतफेड करायला २२ वर्षे का लागली ? तीसुद्धा १०,०००/- ( डॉईश मार्क म्हणा वा युरो ) एवढी मामुली रक्कम फेडण्यासाठी. (माफिपत्र तरी लिहायचे होते, चेकसोबत. दुकानाने काय समजायचे ? )
त्या चोरीसाठी, त्या दुकानातल्या कर्मचार्‍यानेच कदाचित दंड भरला असेल. संस्काराच्या गप्पा मारणार्‍या, कथानायकाला अशी दिरंगाई, शोभली नाही." जे लिहिले आहे ते पटले. ह्या एका गोष्टीमुळे कथेतली believability गेली आणि कथानक थोडे 'फिल्मी' झाले.

माफ करा पण चोरीचे उदात्तीकरण केल्यासारखे वाटले.
कथानक थोडे 'फिल्मी' झाले>>>
अगदी. आपल्याकडे नाही का चित्रपटांत हिरो, आई आजारी आहे, बहिणीचे लग्न आहे, भावाची फी भरायची आहे म्हणुन चोर्‍या करतो, प्रसंगी खुनही करतो तसेच वाटले.

अगो +१
दुकानाला भरपाई मिळाली पण त्या सेल्स गर्ल/वुमनचं काय? तिचं कदाचित आयुष्य बरबाद झालं असेल.

कथा छान मांडलीय पण मला वरच्या प्रश्नानं चुटपुट लावलीय.

श्रुती + १
कादेवे मार्केटपेक्षा त्या सेल्सलेडीसाठी काहीतरी करायला हवं होतं. कथा पटली नाही, त्यामुळे आवडलीही नाही.

कथेसाठी निवडलेली कल्पना, म्हटले तर वेगळी आहे. पण कथा फारच फिल्मी वळणाने गेल्यासारखी वाटली.
अनेक प्रसंगांची वर्णने वाचताना 'हे असे होत असेल का?' असे वाटत राहिले. नाही आवडली.

कथा छानच आहे. पण कथेमध्ये त्या सेल्स गर्ल च पुढे काय झाल ते लेखकाला शोधावस नही वाटल का? हा प्रश्न अनुत्तरित च राहतो की.