अनंत अमुची ध्येयासक्ती

आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे या तरुणांना पक्कं ठाऊक होतं. हवं ते मिळवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, कष्ट केले, आणि निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवलं. पालकांनीही त्यांना साथ दिली. प्रामाणिकपणे काम करून, विचारांशी ठाम राहून हवं ते साध्य करता येतं, आणि त्याचा देशाला, समाजाला फायदाच होतो हे या तरुणांनी सिद्ध केलं आहे.

border2.JPG

आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे याचा शोध घेणं, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असावं. - गौतम बुद्ध

rainbow.jpg

का

ळानुरुप होणारे बदल हे स्वाभाविक असतात. या चांगल्यावाईट बदलांचा समाजावर परिणाम होतच असतो. या बदलाचा वेगही कमीजास्त होतो. बदलाचा वेग भोवंडून टाकणारा असेल तर स्वतःची ओळख शोधण्यासाठीही वेळ मिळत नाही. आपल्याला स्वतंत्र विचारशक्ती लाभली आहे, आपण आपली स्वतःची वाट शोधू शकतो, स्वतःचं वेगळं विश्व उभारू शकतो याचा मग आपल्याला विसर पडतो.

आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटातली पिढी याचं उत्तम उदाहरण आहे. केबल, मोबाइल, इंटरनेट, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यांच्याशी फार लवकर ओळख झालेली ही पिढी. त्यामुळे असेल कदाचित, पण वेग आणि स्पर्धा यांना तोंड देणं हे या पिढीचं एक महत्त्वाचं काम होऊन बसलं. पुढे जाताना श्वास घेण्यासाठी थांबणंही अवघड झालं. उत्तम इंग्रजी बोलणं, सफाईदार वावर असणं यांवर गुणवत्ता जोखली जाऊ लागली. 'रिझल्ट दाखवा आणि मोबदला मिळवा' हा गुरुमंत्र झाला. 'स्कोप' कशाला आहे आणि कुठल्या क्षेत्रात 'सॅच्युरेशन' झालं आहे, यावर कॉलेजातली मुलं आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवू लागली. यात कोणालाही काही गैर वाटलं नाही, कारण ही पिढी भरपूर पैसा मिळवत होती, आहे. वाढत्या मागणीमुळे हा भरघोस मेहनताना मिळतो, हे मात्र कुणालाच कळलं नाही. ती आपली कुवतच आहे, असा समज करून घेण्यात आला. त्यामुळे काहीशा उद्दामपणे या पिढीची वाटचाल सुरू राहिली. माहिती-तंत्रज्ञानाचं युग अवतरलं, बाजारीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली, आणि या वाढत्या ताणाला तोंड देण्यासाठी फावला वेळ मॉल, पार्ट्या यांत घालवला जाऊ लागला. कामाचं स्वरूप चाकोरीतलं असल्यानं आणि इतर क्षेत्रांचा विचार करायला पुरेसा वावच नसल्यानं एकांगीपणा, आत्मकेंद्रीपणा वाढत गेला. साचलेपणा आला. वैचारिक वाढ खुंटली. या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, आजच्या तरुणाईकडे मूलभूत अभ्यास करण्याची प्रवृत्ती आणि तीव्र सामाजिक जाणिवा यांचा अभाव राहिला. शाळा-कॉलेजांत प्रगती करणार्‍यांनी नोकरी-व्यवसायांतही प्रगती केली. पण या भौतिक प्रगतीच्या जोडीनं बौद्धिक प्रगती क्वचितच झाली. भौतिक उत्कर्ष आणि बौद्धिक र्‍हास हे आजच्या तरुणाईचं व्यवच्छेदक लक्षण बनलं.

तसंही भौतिक प्रगतीच्या मागे धावणारा समाज व्यक्तीतील उपजत गुणांचा विकास होऊ देण्यास घाबरतो. खेळ, साहित्य, कला यांच्यामुळे भौतिक प्रगती होत नसल्याच्या समजातून त्यांच्याकडे आपसूकच समाज दुर्लक्ष करतो. असा समाज एकांगी असतो. या समाजानं भौतिक प्रगती केली तरी त्या समाजाचं खुजेपण लपत नाही. या खुजेपणातून पुढच्या पिढीनंही वेगळी वाट धरू नये, यासाठी प्रयत्न केला जातो. आपल्याकडे खेळ, संगीत, नृत्य यांतल्या प्रावीण्यापेक्षा परीक्षेतले मार्क अधिक महत्त्वाचे समजले जातात. बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा मेडिकलला प्रवेश न घेता कलाशाखा किंवा विज्ञानशाखा निवडणारा विद्यार्थी निर्बुद्ध समजला जातो. स्थापत्यशास्त्र किंवा यांत्रिकी अभियांत्रिकीत रस असूनही सॉफ्टवेअरमध्ये 'काहीतरी' करण्याचा आग्रह धरला जातो. दुर्दैव असं की, बहुतेक तरुण या दबावाला बळी पडतात. लहानपणापासून स्वतंत्र विचार करण्याची शक्ती हळूहळू गमावलेली असतेच. त्यातच पैसा हे मोठं आकर्षण असल्यानं आपल्याला नक्की काय आवडतं, हा विचार केलाच जात नाही, करू दिला जात नाही.

अशा परिस्थितीत स्वतःचा मार्ग स्वतः शोधणारे, कळपातून बाहेर पडण्याचं धैर्य दाखवणारे तरुण समाजासाठी रोल मॉडेल ठरतात. महाराष्ट्रात अशा तरुणांनी अनेक क्षेत्रांत मूलगामी आणि फार महत्त्वाचे बदल घडवून आणले आहेत. हेमलकशाच्या जंगलात काम करणारे दिगंत, अनघा, अनिकेत, समीक्षा, किंवा 'निर्माण'चा अमृत बंग, आनंदवनातले कौस्तुभ आणि शीतल, कोकणच्या किनारपट्टीचं संरक्षण व्हावं म्हणून झटणारे, मराठी विज्ञान परिषदेचे सर्वांत तरुण अध्यक्ष डॉ. सारंग कुलकर्णी, ऊर्जाक्षेत्रात कार्यरत असणार्‍या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, अंजली भागवत, सुमा शिरुर या तरुण नेमबाज, 'सुला' हा ब्रॅण्ड जागतिक स्तरावर पोहोचवणारे डॉ. राजीव सामंत यांसारख्या तरुणांमुळे रूढ चौकट मोडण्याचं धारिष्ट्य अनेकांनी दाखवलं आहे.

अशाच काही ध्येयासक्त व यशस्वी तरुणांची मनोगतं या विभागात आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रांत यश मिळवणार्‍या या तरुणांनी क्वचित जाणीवपूर्वक प्रयत्न न करताही अनेकांच्या आयुष्यात फार मोठे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. या मंडळींच्या कामामुळे कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे पायंडे पाडले जात आहेत. श्री. अजित जोशी या तरुण सनदी अधिकार्‍यानं बिहारमधल्या मुसहेरी या गावाचं पुनर्वसन करून, हरयाणात वीटभट्टी शाळा सुरू करून संवेदनशील प्रशासनाच्या विधायक कार्याचा वस्तुपाठ निर्माण केला आहे. जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणार्‍या तेजस्विनी सावंतनं विलक्षण चिकाटीनं विश्वविक्रमाची नोंद तर केलीच, पण राही सरनोबतसारख्या तरुण नेमबाजाचा मार्ग सुकरही केला. वीणा जामकर या गुणी अभिनेत्रीनं सकस, दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली आहेत. अनेक महोत्सवांतून तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे. मोहित टाकळकरनं प्रायोगिक रंगभूमीचा चेहराच बदलला आहे. त्याच्या नाटकांना तरुणांची गर्दी तर होतेच, शिवाय जातीयवाद, बाजारीकरण, लैंगिकता यांसारख्या विषयांवर विचार करायला ही नाटकं तरुणांना भाग पाडतात. मोहितच्या 'आसक्त' या संस्थेमुळे सारंग साठ्ये, ओंकार गोवर्धन, राधिका आपटे, सागर देशमुख, आलोक राजवाडे, आशिष मेहता यांसारखे अनेक तरुण रंगकर्मी नावारुपाला आले आहेत.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात मूलभूत विज्ञान आणि संशोधन याकडे दुर्लक्ष झालं आहे. शालेय विद्यार्थ्यांना, तरुणांना विज्ञानाकडे आकृष्ट करण्याच्या महत्त्वाच्या कामात डॉ. अनिकेत सुळे याचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिंपियाडची जबाबदारी तर तो सांभाळतोच, शिवाय मूलभूत विज्ञानातील अनेक विषय लेखन, व्याख्यानं यांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. एपिलेप्सी या व्याधीनं ग्रस्त असलेल्यांच्या आयुष्यांत यशोदा वाकणकर हिनं सुरू केलेल्या संवेदना स्वमदत गटामुळे बराच सकारात्मक बदल झाला आहे. या मदतगटाच्या माध्यमातून सुरू झालेल्या समुपदेशन केंद्र, विवाह मंडळ यांसारख्या उपक्रमांद्वारे यशोदानं अनेक कुटुंबांचं आयुष्य सावरलं आहे. तेजस मोडक या चित्रकार-लेखकानं आपल्या ग्राफिक नॉव्हेलांद्वारे तरुण चित्रकारांना एक नवं दालन उपलब्ध करून दिलं आहे.

आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे या तरुणांना पक्कं ठाऊक होतं. हवं ते मिळवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, कष्ट केले, आणि निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवलं. पालकांनीही त्यांना साथ दिली. प्रामाणिकपणे काम करून, विचारांशी ठाम राहून हवं ते साध्य करता येतं, आणि त्याचा देशाला, समाजाला फायदाच होतो हे या तरुणांनी सिद्ध केलं आहे.

दिल्लीला झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये परमजीत समोतानं मुष्टियुद्धात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. एका मुलाखतीत तो म्हणाला - 'विजेन्दर, तेजस्विनी, साएना जैसे खिलाडी देश के लिए सिर्फ मेडल ही नहीं जीतते. उनका खेल देखकर और भी खिलाडी तैयार होते है। एक विजेन्दर को देखकर दो बॉक्सर, उन दो को देखकर बीस, उन बीस को देखकर दो सौं और उन दो सौं से दो हजार। ये सपना नहीं है, सर। आप लोक हमारी कामयाबी बस लोगों के सामने लाईये, फिर देखिये अगले दस साल में इंडिया और कितने मेडल जीतता है।'

या तरुणांची मनोगतं म्हणूनच खूप महत्त्वाची ठरतात.

श्री. अजित जोशी
वीणा जामकर
तेजस्विनी सावंत
मोहित टाकळकर
यशोदा वाकणकर
डॉ. अनिकेत सुळे
तेजस मोडक

- चिनूक्स

(लेखात वापरलेले चित्र चित्रकार श्री. श्याम देशपांडे यांच्याकडून साभार.)