ओ
गॉड, उठवत नाहीये. तरीही जड हातांनी पांघरूण सारून ती उठते. शील चार दिवस तिच्या आजीआजोबांकडे आहे. ती नसली तरी आपलं आपलं करायचा इतका कंटाळा येतो. ती असताना कसं जमवते मी हे? कुठून आणते तेवढा स्टॅमिना? आज मस्त सुट्टी घ्यावी आणि आरामात दिवस काढावा असं तिच्या मनात आलं पण ही लक्झुरी आपल्यासाठी नाही. सुट्ट्या फ़ार मौल्यवान आहेत माझ्या. शीलसाठी, आईबाबांसाठी आणि स्वत:च्या अगदी हलणं शक्य नाही अशा चुकार आजारपणांसाठी.
शील गेलीय भांडून. हल्ली हे असंच होतंय. काही पटेनासं झालंय आमचं एकमेकींना. आणि आता तरी तिची सुट्टी चालू आहे म्हणून गेलीये निघून. नाहीतर चिडचिडत, गुरगुरत, एकमेकींना टाळत आम्ही अशाच राहतो. व्हॉट द... जाऊ दे. आय ओ मायसेल्फ अ कॉफी अॅटलिस्ट. ती किचनच्या दिशेनं चालायला लागते. हातपाय हलवायचाही कंटाळा आलाय. मी आजारी आहे का? थर्मॉमीटर काखेत खुपसून ती ब्रश करत राहते. आपल्यालाही माहितीय की ताप नाहीये. असावा अशी इच्छा आहे मात्र. म्हणजे स्वत:ला फारशी एक्सक्युजेस न देता आणि अजून एक अपराधी संध्याकाळ पदरात न घेता एक अख्खा दिवस तिचा तिला मिळाला असता. ताप नाही हे कन्फर्म झालं. मग उत्साह का नसतो हल्ली? वेजिटेशन करावं नुसतं. खाओ, पियो, पडे रहो. अवयवच नाही, डोकं सुद्धा चालवायला नको. श्वासोच्छवास सोडला तर कुठली क्रियाच नको शरीराची. जिवलग दोस्त आणि कलीग्जनी सांगितल्या म्हणून तिनं बर्याच टेस्ट्स करून घेतल्या. थायरॉईड, हॉर्मोन्स, हेप बी, वगैरे. कम्प्लीट चेकप्स केले. सगळं नॉर्मल. मग घोडं नक्की अडतं कुठं? निर्मला म्हणते,"बाई गं, तुला कंटाळा येतो म्हणून इतका जीव खालीवर करतेस. मला मायग्रेन आहे. तुझं डोकं दुखतं कधी? त्याचा आजोबा आहे हा." शुभ्राचं बिपी शूट होतं मधूनच. क्रितिकाला फायब्रॉईड झालाय. पाठीचा कणा सरळ ठेववत नाही तिला. या सगळ्या ऑफिसात येत रहातात. मला यातलं काहीही होत नाही. हे आईला म्हटलं तर तिचं म्हणणं "सुखं दुखतात गं तुम्हा लोकांची हल्ली. सगळं आहे. इतका पैसा, चांगलं काम, सुरक्षित कामाच्या जागा, सुशिक्षित आणि सुसंस्कृत सहकारी. आमच्या वेळी यातली प्रत्येक गोष्ट विरुद्ध होती. शिवाय घरून पहारे आणि 'नोकरी करतेयस म्हणून यात सूट नाहीये हं!' अशा सूचना. कुळाचार, देवधर्म..." "बास गं आई!" पुढचं मी ऐकून घेत नाही. तेंव्हा आई म्हणते,"आणि याची काडीची कदर नसलेली नतद्रष्ट मुलं. तू अशी. समर तर सरळ सांगतो, "आई पाऊंडस मधे टेलिफोनची बिलं भरून, हे ऐकायला फोन नाही करत गं मी." 'कदर नसलेली नतद्रष्ट मुलं’ हे मात्र आपल्या दोन्ही पिढ्यांत सारखं बरं का आई, तिला म्हणावंसं वाटतं. पण हे ती बोलत नाही.
फरगेट. सुट्टी नाही ना मिळत आहे तर निदान शक्य आहे ते तरी टाळू या आज. कॉफी करायचा प्लॅन कचर्याच्या डब्यात आज. मस्त तयार होऊन ती बाहेर पडली. शहराच्या ट्रॅफिकमधून गाडी जितकी जमेल तितकी सुसाट पळवत ऑफिसकडे निघाली. गाडी जोरात चालवणं हा एक स्ट्रेसबस्टर. मधेच तिला एक अतिशय क्यूट कॉफी शॉप दिसलं. हे होऊन कितीतरी दिवस झाले होते. पण आज खरंच आणि नीटंच दिसलं. कॉफी ही गरज असल्यामुळं असावं. पहिल्यांदा क्रश झाला होता तेव्हा नाही का त्या मुलाच्या नावाच्या पाट्या असलेली किराणा दुकानंही ठळकपणे दिसायची. तसंच. कॉफी हा पर्मनंट क्रश. बाकी सगळं बदलणारं. गाडी त्या कॅफेसमोर थांबवून ती आत शिरली. नेहमीची नको म्हणून आफ्रिकन ट्रॅडिशनल फ्लेवरची कॉफी मागवून तिनं डोकं मागं टेकवलं. डोळे मिटले. नक्की काय काय खुपतं आपल्याला? त्या स्पा मधल्या बायका कसा शरीराचा एक एक पॉईंट दाबत सगळं मोकळं, हलकं करून टाकतात. तसं मनात शिरावं आणि एकेक कोपरा दाबत दाबत शोधत फिरावं नक्की कुठं दुखावलं गेलंय़ आणि किती तीव्र आहे ते. उपचारांचं पुढं बघता येईल.
१.
आई बाबा : इतकं छान लहानपण घालवलं त्या छोट्याशा शहरात. आईबाबांनी सगळं केलं. मी आणि समर हुशार आणि अभ्यासू म्हणून स्वत:च्या नोकर्या सांभाळून आमची तंत्रं सांभाळली. लाड केले. अभ्यास घेतले. मित्रमैत्रिणींना जीव लावला. स्वत:चे मित्र, छंद बाजूला ठेवले. मग तरी माझ्यात हे दुखरे कोपरे त्यांच्याही बाबतीत आहेत. का? त्यांनी ज्या गोष्टींत स्वत:चं म्हणणं चालवलं त्या बाबतीत मी माझ्या मनासारखं केलं नाही म्हणून त्रागा करणार. आणि जेव्हा स्वत:ला हवं ते करायची सूट दिली आणि माझे निर्णय चुकले त्याला त्यांनी मला अडवलं नाही म्हणून हातपाय आपटणार. हा कसला स्वार्थीपणा आहे? शी! आणि गेली कित्येक वर्षं हे छोटे छोटे कोपरे मी असेच अनट्रीटेड ठेवलेत.
२.
समर : भाऊ आणि सगळ्यात जवळचा मित्र. याला अजूनही मी बोललेलं सगळं कळतं. याच्यामुळं माझं लहानपण अजून छान झालं खरंतर. तो माझ्यापेक्षा लहान असूनही मी त्याच्यावर ताईगिरी केली नाही याचं ऋण असल्यासारखं त्यानं मला मैत्रीण करून टाकलं. त्याचे मित्र मैत्रिणी माझेही झाले. मला आहे त्यापेक्षा तीन वर्षांनी तरूण ठेवलं या सगळ्यांनी. तरीही ’पूर्वी’ सारखी नटवी, मठ्ठ आणि अॅरोगंट मुलगी त्याची गर्लफ्रेंड असावी याचा मला फार त्रास झाला. आणि याबाबतीत मी प्रयत्न करूनही समरनं अजिबात दाद दिली नाही. "तुला हवं तर ताई म्हणतो, लग्न न करताही पूर्वीला तुला वन्सं म्हणायला लावतो." असले जखमेवर मीठ चोळणारे विनोद करून त्यानं मला दुखावलंच होतं. पुढंही तो पूर्वीबरोबर तुटत गेला तेव्हाही त्यानं कधीच काही बोलू दिलं नाही मला. त्याला तिच्यामुळं ते एकत्र असताना आणि नंतर होणारा त्रास मी पाहत राहिले. पण हे तो, तिच्यात खूप गुंतला होता, येऊच शकत नव्हता बाहेर, म्हणून करत होता. इतकी सूट तर त्याची जुळी मैत्रीण म्हणून मला द्यायला हवी ना. मला होणार्या त्रासापेक्षा त्याची घुसमट खूप खूप जास्त होती. मग मी तिच्याबद्दल काही न बोलता त्याला सपोर्ट करत राहिले.
३.
अभी : हं.. आता हा अख्खा माणूसच एक मोठ्ठा दुखरा कोपरा आहे. आम्ही प्रेम केलं, लग्न केलं, शीलला जन्म दिला. वी वर अ कम्प्लिट हिट. खूप तीव्र आणि फायरी होतो आम्ही एकमेकांबरोबर. माझ्यातल्या टॉमबॉयची त्यानं एक व्यवस्थित बाई करून टाकली. त्याचं बोलणं, हसणं, त्याचे विचार, सेन्स ऑफ ह्युमर, त्याचे चॉईसेस, त्याचे पर्फ़्युम्स्, गंध. सगळ्यासगळ्यानं माझं आयुष्य व्यापलं होतं. शील तीन-चार वर्षांची झाल्यावरही, तो गाडी चालवताना खिडकीत एक हात ठेवायचा आणि तो हात मधेच केसांतून फ़िरवायचा तेंव्हा मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडायचे. शीलला दोन्ही आजीआजोबांकडे सोडून आम्ही मस्त फिरायचो. प्रणयाच्या आणि सहजीवनाच्या किती अनवट वाटा मी त्याच्यासोबत धुंडाळल्या असतील. मग हळूहळू हे सगळं बदलत गेलं. म्हणजे आमच्यातलं अंडरस्टॅंडींग तसंच राहिलं पण अभी बदलत गेला. विझत गेला. बाकीच्यांना जाणवला नाही तरी मी त्यातला फरक पाहत राहिले. प्रयत्न करत राहिले त्याच्या कोषात शिरून त्याला मदत करण्याचा. मग हळूहळू कळत गेलं. त्याच्या एका कलिगमधे इन्वॉल्व झालाय म्हणून. म्हणजे ते एकत्र होते असं नव्हतं. पण तो गुंतला होता पूर्ण. ती खूपच इन्डिसायसिव होती. निर्णयच घेता येत नव्हता तिला तो आवडतो की नाही याचा. आणि अभी, आम्ही आणि ती अशा विवेकाच्या लढाईतच आधी सापडलेला. त्यानंतर तिला त्याच्याबद्दल नक्की काय वाटतं ते वेगळंच. हे त्यानं कबूल केलं तो दिवस, जागा, वेळ सगळं इतक्या वर्षांनंतरही नीट आठवतंय मला. गावाबाहेरच्या एका टेकडीवरच्या क्लबच्या रेस्तोबार मधे आम्ही बसलो होतो. शनिवारची संध्याकाळ. आम्ही बसलो होतो त्या हटच्या समोर सोनेरी उन्हं पाझरत होती. समोर एक जोडपं हातात हात, डोळ्यात डोळे घालून बसलेलं. त्यांच्या मागे दोन माणसं एक बिझनेस डील आणि दोन ग्लासेस हातात घेऊन. अभीचा चेहरा मला पाहवत नव्हता त्यामुळं इतर गोष्टी निरखणं चाललं होतं. कितीवेळा विचारून झालं होतं. शेवटी त्यानं सांगून टाकलं. मला शॉकच बसला नाही. किती वेळा मी या प्रसंगाची तालीम केली असेल. सुरुवातीला तर खूपच. तो होताच असा की माझ्या मनात खोल खोल ही भिती सतत होती की हे असं काहीतरी होणार आहे. पण त्या स्त्रीला याच्याबद्दल निर्णय घेता येत नाहीये हे मात्र अवघड होतं. माझ्या अभीबद्दल असं दुमत असूच कसं शकत कुणाचं? असो. मी त्याला सांगितलं, की तिचं ते तू निस्तर. मी माझ्या आणि शीलकडून तुला मोकळं करून टाकते. तो अजूनच खचत गेला मग. मला म्हणायचा, "भांड ना माझ्याशी, मला जाब विचार, नको जाऊ देऊस मला. मी स्वत:च्या नजरेत जरा तर उभा राहू शकेन गं मग. किती कॅज्युअली घेतेयस सगळं. जरा तरी तमाशा कर". आहा! हे नव्हतं बरंका शक्य मला. ज्या माणसाला माझ्याबरोबर राहून त्रास होतोय त्याच्याबरोबर मी तरी का राहू? आणि वर त्याला त्याच्या अपराधीपणातून सुटका हवी होती म्हणून मी स्वत:चा कचरा करून घ्यावा?ओ इथं माझ्यातला आधीचा टॉमबॉय कामाला आला. अहंकारानं शॉकअॅबसॉर्बरचं आणि ढालीचं काम केलं. तो जाईपर्यंत माझ्या डोळ्यातून एक टिपूस सुद्धा काढला नाही मी. मग जेव्हा मला कळलं की तिचा निर्णयही झालाय अभीच्या बाबतीत, तेव्हा मी त्याला सांगून टाकलं की प्लीज दुसरीकडं जाऊन रहा. शील दहा वर्षांची होती तेव्हा. त्याला हेही सोडवत नव्हतंच. शील म्हणजे जीव होता त्याचा. त्याला म्हटलं तुला हवं तेव्हा तिला भेट. इथं येऊ नकोस फक्त. तिला घेऊन जा आणि आणून सोड. आता त्याच्या डोळ्यात फक्त ते अबोल, करूण भाव होते. तो गेला आणि मग कित्येक दिवस मी रात्री जागवल्या, उश्या ओल्या केल्या, तडफडत राहिले. वाटलं सगळा अहं झुगारून त्याला सांगावं की "तुला हवं तेंव्हा इथं ये. माझ्यापेक्षा जास्त तुझं आहे हे घर." पण नाहीच बोलले. शीलला तो घेऊन जात राहिला. सुरुवातीला शील मला सांगायची आई अॅबी तुझ्याबद्दल विचारत होता, "तू ठीक आहेस का म्हणून?" मी दुर्लक्ष करायचे. मग एकदा दोनदा आजारी पडली तेव्हा म्हणायची, "आई, अॅबीला येऊ दे ना इथं." मी सांगायचे की बरी झालीस की तोच घेऊन जाईल तुला. एकदा त्याचा फोन आला. मला वाटलं नेहमीप्रमाणे शीलला न्यायला येणार असेल. पण म्हणाला, "मी कॉलेजात जातोय. येतेस? कॅन्टीन ला जाऊ या." हा नकार देताना शीलला जन्म देताना झाल्या नव्हत्या तेवढ्या वेदना झाल्या. मी कधी चुकून 'ती'च्या बद्दल विचारलं नाही. शील तिला अधूनमधून भेटते हे मला माहीत होतं. पहिल्यांदा भेटली तेंव्हा तिनं घाबरत घाबरत सांगितलं. मी काहीच बोलले नाही म्हटल्यावर अजून घाबरली. माझ्या मागं मागं फिरत राहिली. मग विचारलं, "आई चिडली आहेस का? अगं अॅबीनं विचारलं आणि मला पण क्युरिओसिटी होती. आता यापुढं नाही पुन्हा भेटणार. मी अॅबीला पण सांगितलंय." मग तिला जवळ बसवलं आणि समजावलं की "तुझं तू ठरव बेटा तुला काय करायचंय. मी माझी मतं तुझ्यावर कशी लादेन? शिवाय जितकी माझी तितकी त्याचीही आहेस. आणि तुझे सगळेच मित्र मैत्रिणी काही माझ्या choice चे नसणार ना." एकूणच ओढाताण करून कुणाला बांधून बिंधून ठेवायच्या भानगडीत पडायचं नाही हे मी त्या सोनेरी उन्हांच्या विलक्षण, विचित्र संध्याकाळी कायमचं ठरवून टाकलं होतं. "तुला अॅबीजवळ राहू वाटलं मला सोडून, तरी तू जाऊ शकतेस." हे वाक्य ऐकल्यावर शील मला घट्ट मिठी मारून खूप रडली. मला म्हणाली "आई मला माहितीय गं बाबा आपल्याला सोडून गेला. माझं फार प्रेम आहे त्याच्यावर. पण तुला एकटीला सोडून मी जगूच शकणार नाही." मग रात्री माझ्या स्टडी टेबलावर एक ग्रीटिंग मिळालं मला. "मी गुलाबाचं रोप आहे. अॅबी पाणी आहे आणि तू जमीन. पाणी अधूनमधून चालतं. जमिनीतून बाहेर आलं तर मात्र रोप मरून जातं." माझं बाळ मोठं होत होतं. आणि भाषेची तयारी जोरात चालू होती. तेंव्हा शील बारा वर्षांची होती.
४.
शील : माझा जीव. माझ्याशिवाय न राहणारं माझं पिल्लू. अभी गेल्यावर मीच तिचं जग झाले. दोन्ही आजीआजोबांची जीव की प्राण. हुशार, भावुक, सुंदर लिहिणारी, डोळ्यात पाऊस आणि हिरवाई घेऊन मोठी होत असलेली माझी शील. ती तेरा वर्षांची झाली आणि मग शिंगं फुटली तिला. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न वाढायला लागले. मतं आली. ठाम मतं आली. अभीला मी इतक्या सहजपणे जाऊ दिलं याबद्दल ती चिडचिडायला लागली. म्हणायची थोडं रोखलं असतंस तर तो राहिला असता. आता या मुलीला हे असलं कधीपासून समजायला लागलं याचा विचार करेपर्यंत तिनं एक दिवस विचारलं की,
"अॅबी परत आला तर तू काय करशील?"
मी सांगितलं, "तसं काही करायची वेळच येणार नाहीये कारण तो इथं कधीही येणार नाही."
"पण तो आला आणि म्हणाला की त्याला यायचंय, तर?"
"तेच सांगतीय की. त्याला वाटो की तुला, तो इथं येणार नाहीये."
"आई तू त्याला जाऊ दिलंस आणि आता जर त्याला यायचं असेल तरी तू येऊ देणार नाहीयेस. मला हवाय गं ऍबी माझ्याबरोबर." अश्रूपात.
आता हे पॉइंट्स एकमेकांत मर्ज व्हायला लागलेत. शील आणि अभीचे. होणारच नाही का अगं. तुझं स्वत:चं जे आख्खं जग आहे त्यात तेच दोघं सगळ्यात जास्त जागा अडवून बसलेत शेजारीशेजारी.
असो. तर..
झालं असं होतं की, अभी आणि 'ती'. दे जस्ट फ़ेल आऊट ऑफ लव्ह. आधी ही अशी आकर्षणं त्यातल्या अशक्यतांमुळं भयंकर जोर धरतात. मग ते फारच प्लॅटॉनिक आणि जन्मजन्मांतराचं वाटायला लागतं. मार्गातले सगळे अडथळे दूर झाल्यानं ते सगळं फार ऑर्डिनरी होऊन गेलं. माझ्याकडून काही संघर्ष नसल्यामुळं कसला हौतात्म्याचा मुलामा त्याला चढेना. त्यात पुन्हा शीलला भेटायलाही मी काही आडकाठी ठेवलेली नसल्यामुळं खोटी दु:खं आणि त्यावर एकमेकांचे आधार शोधणं वगैरेही भानगडी झाल्या नाहीत. ते एका नात्यात शांतपणे शिरले आणि मग उरली ती केवळ 'हे इतकं सगळं यासाठी झालं का?' या प्रश्नाची पोकळी. मग झालं असणार मूल्यमापन. तो माझ्यातून बाहेर आला नव्हता हे मला माहीतच होतं. आणि आता हातात काही फारसं उरलं नसल्यामुळं शीलची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसणार. पण हे फारच होतं बरं का! त्यानं निर्णय घेतला तेंव्हा मी तो मान्य केला आता मागंबिगं फिरणं नाही. तिनं तिच्या आजीआजोबांना फोन केले. समरला सांगितलं. अपेक्षेप्रमाणं माझ्या आईनं मला समजावायचा प्रयत्न केला. बाबांनी आईचेच शब्द दुसर्या दिवशी पुन्हा ऐकवले. आईशी चर्चेनंतरची सुधारित आवृत्ती. "मग शेवटी तुला योग्य वाटेल ते कर. हे म्हणेपर्यंत आईनं फोन काढून घेऊन "नीट विचार कर आधी. घाईनं बोलून जाऊ नकोस काहीही." वगैरे सांगितलं. अभीच्या आईवडिलांनी काहीच केलं नाही. ते कुठल्या तोंडानं मला काही सांगणार होते? (तो गेल्यावर त्याचे आईवडील एकदा घरी आले होते. चेहर्यावर अतिशय अपराधी भाव. शील सोडून दुसर्या कसल्या आनंदाची अपेक्षाच आता त्यांना नव्हती. मी त्यांना शांत केलं. म्हटलं "प्रश्न माझा आणि अभीचा आहे. तो आम्ही आमच्या पद्धतीनं सोडवलाय. तुम्ही आणि शील दोघांना काही मतं, अधिकार नव्हतेच त्या सगळ्यात. तर शिक्षा तरी का? आणि माझ्या पोरीला जीव लावणारी माणसं मी का कमी करू? पूर्वी यायची तशीच शील तुमच्याकडे येत राहील. तुम्हीही हवं तेव्हा या". त्यामुळं त्या बाबतीत काही फरक पडला नाही. मी तर तशी सगळ्यांपासूनच दुरावले होते.)
समर नेहमीप्रमाणं, "माहितीच होतं मला हे. एकदा तुला भेटलेली माणसं तुला सोडून नाही राहू शकत. पण तुला हवं तेच कर," म्हणाला. स्वत: मानसिक त्रासातून गेल्यामुळं त्यानं या गोष्टीकडं माझी सरशी अशा दृष्टीनं पाहिलं असावं. मी कशालाच बधले नाही. हे झालं आणि माझं आणि शीलचं रसायन बिघडलं. सुट्ट्यांमधे आजीआजोबांकडे, अभीकडे जायला लागली. मला टाळायला लागली. बरोबर कुठं चल म्हटलं की 'तुला कशाला कुणाची सोबत लागतेय?' वगैरे फ़िल्मी डायलॉग मारायला लागली. प्रत्येक वेळी एक ठेवून द्यावी असं वाटून माझा पाराही चढायला लागला. फक्त एक होतं की तिचा अभ्यास, अॅक्टीविटिज यात आम्ही दोघीही कसल्या तडजोडी नाही करायचो.
५:
बिली : हा अजून एक ताप. डोकेदुखी. शीलचा मित्र. मित्र म्हणजे व्यवस्थित बॉयफ़्रेंड. शाळेतच ही असली थेरं. म्हणजे हा शब्द अगदीच चीप आहे. पण जेव्हा पहिल्यांदा मला हे कळलं तेव्हा मला हाच सुचला. बिली शीलच्या मित्रांपैकीच एक. घरी यायचा लहानपणापासून. मग हळूहळू त्यांच्यातली जवळीक माझ्या लक्षात आली. आणि डोकंच उठलं माझं. पंधरा हे काय वय आहे असल्या गोंधळात पडायचं? शीलला मी समोर बसून सुनावलं. म्हटलं लहान वयात या फंदात पडून माझ्या आयुष्याची काय वाट लागली ते बघ. तर मॅडमचं म्हणणं, "काय वाट लागलीय तुझ्या आयुष्याची गं? मी आहे तुझ्याबरोबर. सगळं छान चाललंय. अॅबी परत यायला तयार आहे. तू माझी वाट लावायचा प्लॅन करतेयस खरं तर." खाड! माझा माझ्याच हातावर विश्वास बसेना. मी सरळ उठून निघून गेले. मरा सगळे जण. करा काय वाट्टेल ते. नंतर माझ्यासारखी दोष देत बसू नकोस स्वत:च्या आईला. मग त्यानंतर शील माझ्याजवळ आली. सॉरी म्हणाली. बिलीचं कौतुक केलं. म्हणाली "तो खूप मॅच्योर आहे आणि आम्ही आमचे करियर चॉईसेस ठरवलेत. कुठलाही मूर्खपणा करणार नाहीयोत. तू खूपच सिरीयस्ली घेतेयस हे. अगं बिली माझ्या आयुष्यात असणं हे आमच्या दोघांसाठी फार स्टेबिलायाझिंग आहे. तुला नाही समजणार. पण माझ्यावर विश्वास ठेव आई." मला नाही समजणार? मीही हाच विचार केला होता ना. मलाही अभी माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू वाटलेला. किती अवलंबले मी त्याच्यावर छोट्या मोठ्या सगळ्याच बाबतीत. अगदी जिवंत राहण्यापर्यंत. आणि म्हणूनच बिलीचे सरळ दिसत असणारे जे काही चांगले गुण होते ते ही मी नाकारत होते. या अशा गोंधळात मी जगतेय. म्हणून शरीराला काही दुखणं नसताना हे सगळं होतंय.
तिनं डोळे उघडले. किती वाजलेत? या डायग्नॉसिसमधे किती वेळ गेला कुणास ठाऊक? वेट्रेस आली. "मॅडम, आता आणू कॉफी? आर यु ओके?"
ओह! खरंच की. मी कॉफी ऑर्डर करून छानपैकी स्पा करत बसले स्वत:चा. वेळ किती गेलाय? फक्त पाऊण तास. पाऊण तासात असा आपल्या जगण्याचा आढावा घेता येतो?
"हो प्लीज. आय ऍम पर्फ़ेक्टली ऑलराईट. मी ऍक्चुअली रिलॅक्स करत होते."
"शुअर मॅम. काही हरकत नाही. तुम्ही इथून कामही करू शकता. इंटरनेट पॉईंट्स पण आहेत तुम्हाला लॅपटॉप कनेक्ट करायचा असेल तर."
नकोच. काय करायचंय इंटरनेट? तिला तिच्याशीच कनेक्ट व्हायचं होतं आज. पुन्हा डोळे बंद .
"अभी असता ना तर दोघांनी मिळून या मूर्ख मुलीला समजावलं असतं." हे मीच बोलतेय?
"बास. काही गरज नाहीये त्याची." मीच पुन्हा. पण जास्त कणखर.
"शीलला जन्माला घातलं तेव्हा तर होती."
"बरं मग आता काय त्याचे ऋण फेडायसाठी सगळं विसरू?"
"त्यानं जी वर्षं तुझ्या पदरात घातली.."
"हॅलो, मै तुलसी तेरे आंगनकी.. पदरात घातली काय? उपकार केले का? मी पण माझं सर्वस्व उधळलं की त्याच्यावर."
"हो पण तो तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर स्पॅन होता की नाही?"
"सो? म्हणून वाट्टेल ते वागावं? त्या बयेकडे असं लगेच आकर्षित व्हावं?"
"आहा! दॅट्स युअर रियल पेन पॉईंट. पझेसिव्ह झालीस आणि मान्य पण नाही करायचं तुला."
"वॉटेवर. मी नाही फेस केले असे निसरडे क्षण? प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात ते. आपण तुलना करून नाही ठरवू शकत काय महत्त्वाचं आहे ते? मी जा म्हटलं की निघाला लगेच."
"मग रोखलं का नाहीस गं बाई त्याला?"
"काय करायला हवं होतं मी? त्याच्या पायाशी लोळण घ्य़ायला हवी होती?"
"लोळण कशाला? अगं, तो म्हणतच होता की भांड, नको जाऊ देऊस."
" हाहाहा. ते तो त्याच्या गिल्टमधनं थोडा बाहेर आला असता म्हणून."
" आर यु क्रेझी? गिल्ट वाढला असता अजून उलट. तुला हवं होतं ते जास्त इन्टेन्सिटीनं झालं असतं."
"काय हवं होतं मला?"
"त्याचं तडफ़डणं."
" हॅं! माझं माझं तडफ़डणं कमी होतं की काय? मी त्या मन:स्थितीत तरी होते का तो गेला तेंव्हा?"
"मग का सांगितली नाहीस तुझी तडफड त्याला? तो गेल्यावर उश्या भिजवल्यास ते त्याची छाती भिजवायची ना तुझ्या अश्रूंनी. सगळं सगळं शेयर केलं होतंस तोपर्यंत. मग हेही सांगून टाकायचं."
"नो वे. त्याला ते समाधान द्यायचंच नव्हतं मला. "
"हं".. शांतता.
आता तो आतला आवाज काहीच बोलेना. त्यालाही हेच हवंय? मी विसरून जाऊ घडलेलं? आणि काही झालंच नव्हतं या आविर्भावात शरण जाऊ परिस्थितीला? माझं आयुष्य म्हणजे काय त्यागमूर्ती स्त्रीच्या आयुष्यावरची बायकांना रडवणारी कमर्शल फिल्म आहे? भावनांचा पूर आणून हा आतला आवाजही मला ब्लॅकमेल करणार?
"ओके मग तुला स्वत:च्या पायांखाली स्वत:च्याच भावनांचा चुराडा करत, त्याच पायांवर खंबीरपणे उभी असलेली पॅरलल सिनेमाची हिरोईन व्हायचंय?" मी गप्प.
"बरं मग तुला काय हवंय?" पुन्हा एकदा.
"उं.. शांतता.."
"आहेच की मग ती. "
"तसं नाही.. आता हे शीलचं वागणं.."
"ओके म्हणजे तुला असं म्हणायचंय की अभी तुला सोडून गेला याची भरपाई म्हणून आयुष्यानं कुठलेही प्रॉब्लेम्स तुझ्याकडं फ़ेकू नयेत."
"अं.. नाही म्हणजे.."
"बाई तुला एकटीला प्रॉब्लेम्स फ़ेस पण नाही करायचे. माणूस स्वीकारायचाही नाही. मग नवीन आयुष्य बांध. लग्न कर दुसरं."
"शिट.. तो विचार तर मी करूच शकत नाही. शरीराबाहेरचा प्राण समजले होते त्यानं असं केलं तर दुसर्यावर कसला डोंबलाचा भरवसा?"
"आयुष्य म्हणजे मार्केटमधे डिझायनर पिशवी आणि मूठभर कार्डस घेऊन फिरत हवं ते निवडायचं आणि बाकीचं दुर्लक्षायचं अशी सिलेक्टिव प्रोसेस नाहीये बाई. एक गोष्ट उचललीस की त्याबरोबर हजार गोष्टी येतात. त्यातल्या काही हव्या, बर्याच नकोशा. त्यांची तयारी असेल तरच उचलायची ती गोष्ट. खरंतर काही न उचलताही मिळतच असतात बर्याच गोष्टी. तुला काय हवंय ते बघ. आणि त्याची किम्मत मोजायची तयारी ठेव. सतत योग्य ते वागण्याचं दडपण घेत आणि इतरांना धडे शिकवण्याचं समाजकार्य करत बसणार असशील आणि नको त्या गोष्टी मागं लागू नयेत म्हणून हव्याशाचे दरवाजेही बंद करणार असशील तर तुझ्यासारखी करंटी तूच.. "
कॉफी येते. ती घेत असताना ती रिकामी.. शांत.. आतून बाहेरून..
-संघमित्रा
प्रतिसाद
संघमित्रा, छान लिहिली आहे
संघमित्रा, छान लिहिली आहे कथा. तुझ्या कथेचा वेग आवडला.
mastach
mastach
सुरेख कथा संघमित्रा !!!
सुरेख कथा संघमित्रा !!!
जबरदस्त .....
जबरदस्त .....
कित्ती दिवसांनी वाचतेय तू
कित्ती दिवसांनी वाचतेय तू लिहिलेलं.
छान कथा आहे. आवडली. :)
संघमित्रा, चांगलं लिहीलं
संघमित्रा, चांगलं लिहीलं आहेस.
छानच..
छानच..:)
आवडली. मस्तच. सहीच लिहिलियस.
आवडली.
मस्तच.
सहीच लिहिलियस.
कथा आवडली. शेवट जरा पटकन
कथा आवडली. शेवट जरा पटकन गुंडाळल्यासारखा वाटला. एवढं स्पा करुन-बिरुन नंतर मात्र अगदी पटकन निर्णयास आल्यासारखी वाटली नायिका.
मस्तच.
मस्तच.
थीम आवडली संघमित्रा.
थीम आवडली संघमित्रा. पात्रेही. आणि बर्याच ठिकाणी टिपिकल होण्यापासून वाचवलीस तेही.
पण अजून गोळीबंद होउ शकली असती कथा.
मस्त मस्त, जरा नेमानी लिहित
मस्त मस्त, जरा नेमानी लिहित जा हो बाई तुम्ही :)
कथा मस्त लिहीलेय.. शेवटचा
कथा मस्त लिहीलेय.. शेवटचा परिच्छेद फार आवडला. :)
वा सन्मे... बरेच दिवसांनी
वा सन्मे... बरेच दिवसांनी तुझं काहीतरी वाचायला मिळालं.
शेवट गुंडाळलास असे वाटले मात्र. माफ कर. :)
छान लिहीली आहे, आवडली.
छान लिहीली आहे, आवडली.
अप्रतिम!
अप्रतिम! :)
शैली नेहमीप्रमाणेच सुंदर
शैली नेहमीप्रमाणेच सुंदर :)
(शेवटच्या परिच्छेदात जे थेट मांडलंय, ते कथेतूनच, अजून काही प्रसंगांतून समोर आलं असतं तर...?)
"माईंड स्पा" मस्त कल्पना अन
"माईंड स्पा" मस्त कल्पना अन तितकीच मस्त कथा :-)
आवडली!
आवडली! :)
ललि +१, माईंड स्पा ही थीमच
ललि +१, माईंड स्पा ही थीमच प्रेमात पाडणारी :)
जबरी कल्पना, मित्रा. (होतीस
जबरी कल्पना, मित्रा. (होतीस कुठे?)
सगळं सगळं खूप आवडलं. शेवटचा पॅरा आरपार. खरतर ते अख्खं स्वतःच स्वतःशी वादणं-संवादणं... जियो
छान लिहिलंयस, संघमित्रा.
छान लिहिलंयस, संघमित्रा.
जबरदस्त कथा आहे. आवडली
जबरदस्त कथा आहे. आवडली :)
कित्ती दिवसांनी वाचतेय
कित्ती दिवसांनी वाचतेय तुला....... !!
सुरेख उतरलीये कथा.
अतिशय वेगवान......मनात ज्या वेगाने विचार येतात अगदी तोच वेग पकडला आहेस.... शेवट...... शेवटला पॅरा........जबरदस्त !
मस्त. खूप आवडली
मस्त. खूप आवडली :)
आवडली
आवडली :)
आवडली.. तरीपण ललिता +१
आवडली.. तरीपण ललिता +१
धन्यवाद दोस्त्स..
धन्यवाद दोस्त्स.. वाचल्याबद्दल आणि मस्त मोकळ्या प्रतिसादांबद्दल..
सिंडी, रैना, नी, ललिता +१०००
मला पण नाही आवडला शेवट.. मलाही थोडा विस्तार आणि स्पष्टता हवी होती. नायिका निर्णयाला आली नाहीये अजून.. तिला फक्त तिच्या दुखण्याची कारणं समजण्याची शक्यता निर्माण झालीय.. अर्थात हे स्पष्ट न होणं हे माझं अपयश..
आणि हो ते चित्र फार मस्त
आणि हो ते चित्र फार मस्त आलंय.. गोष्टीबरोबर चित्र म्हणजे त्या गोष्टीचे लाडच केल्यासरखं वाटतं एकदम.. तिला एकदम दागिन्यांनी नटवल्यासारखं.. आणि हे चित्र तर अगदी कॉस्च्युम ज्युलरीच..
छान लिहिलयस, लॉजीक, फ्लो आणि
छान लिहिलयस,
लॉजीक, फ्लो आणि गती एकदम छान आल्ये.
मस्त
सुधीर