'इ
तिहासाचे पंख लावून वर्तमानात वावरणार्या' मानसिंग कुमठेकरांना इतिहास उलगडून दाखवणार्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद जडला. सांगलीत तरुण भारत दैनिकात काम करणारे मानसिंग सांगत आहेत आपल्या छंदाच्या प्रवासाबद्दल.
इतिहासात रमायला तसं सगळ्यांनाच आवडतं.. मराठी माणूस तर इतिहासवेडाच...महाराष्ट्राच्या भूमीला शेकडो वर्षांचा समृद्ध आणि रोमहर्षक इतिहास लाभला आहे..छत्रपती शिवरायांसारख्या महापराक्रमी राजानं इथं नवं साम्राज्य निर्माण केलं. स्वतंत्र मराठी राज्य स्थापन केलं...शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पाऊलखुणा आजही सह्यकड्यातल्या गडकोट किल्ल्यांमधून, गावोगावी असणार्या मंदिरे, वाडे यांच्या अवशेषरुपातून दृष्टीस पडतात. शिवरायांनंतर मराठेशाहीचा विस्तार अटकेपार झाला. या इतिहासाचे साक्षीदार जागोजागी विखुरले आहेत. कुठे ते ऐतिहासिक वास्तूंच्या रुपात, तर कुठे कुणा सरदार-संस्थानिकांच्या दफ्तरांतील मोडी कागदपत्रांत दडले आहेत.
इतिहासाचा अभ्यास करताना या मूक साक्षीदारांना शोधावं, जुन्या दफ्तरांतून त्यांचा धांडोळा घ्यावा, दुर्लक्षित राहिलेल्या घटना, व्यक्ती, वास्तूंना समाजासमोर आणावं, या हेतूने महाविद्यालयीन जीवनात माझी "शोधयात्रा" सुरु झाली. १६ वर्षांच्या या यात्रेत खूप काही गवसलं. अमोल कार्य करूनही आजवर दुर्लक्षित राहिलेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या व्यक्ती, आजवर अपरिचित असणार्या घटना, वास्तू, समाध्या, इतिहासप्रसिद्ध व्यक्तींची स्वहस्ताक्षरांतील शेकडो पत्रं असं बरंच काहीबाही मिळत गेलं..त्यातून स्थानिक इतिहासाचे धागे नव्याने जोडता आले..
इतिहासवेडातून झालेली भटकंती ही बहुतांशी दक्षिण महाराष्ट्रातच झाली. या भटकंतीत या भागातले विविध संस्थानिक, सरदार-सरंजामदारांचे राजवाडे, मंदिरे, मठ, मशिदी, दर्गे, दफनभूमी, बारव, घाट यांचा अभ्यास करता आला. त्यासंबंधीची कागदपत्रे आणि वास्तूंची दुरवस्था पाहायला मिळाली. ऐतिहासिक माहिती मिळवताना कुणी संशयाच्या नजरेने पाहिले, कुणी भीतीपोटी कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केली. काहींनी तर, मौल्यवान अशी कागदपत्रे जाळून टाकली. दुर्मीळ हस्तलिखिते कृष्णार्पण केली. अनास्थेच्या या कृष्णमेघांमध्ये काही ठिकाणी इतिहासप्रेमाच्या सोनेरी कडाही नजरेस आल्या. मी इतिहासाचा अभ्यास करतो आहे असे म्हटल्यावर काही ऐतिहासिक घराण्यातील व्यक्तींनी आपल्या घराण्याचा दफ्तरखाना खुल्या मनाने उघडून दिला. त्यातली कागदपत्रे अभ्यासासाठी दिली. या काळात
महाराष्ट्रातील काही रद्दीविक्रेत्यांशी माझी गट्टी जमली. त्यांच्याकडूनही मौल्यवान ग्रंथ, मोडी कागदपत्रे मिळवता आली. जसजसा इतिहासाच्या सागरात खोल खोल जाऊ लागलो, तसतशी अनेक मोती आणि रत्ने गवसली.
आज माझ्या संग्रहात शिवपूर्वकालातील मोडी लिपीतील सनदा, इब्राहिम दिलशाह, अली अदिलशाह, महंमद अदिलशाह यांच्या काळातील कागदपत्रे; थोरले माधवराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे, यशवंतराव होळकर, दुसरे बाजीराव पेशवे, मराठेशाहीतील प्रसिद्ध सरदार गोपाळराव पटवर्धन, पांडुरंगराव पटवर्धन, परशुरामभाऊ पटवर्धन, चिंतामणराव पटवर्धन यांच्या हस्ताक्षरांतील पत्रे; राजर्षी शाहू महाराज,लोकमान्य टिळक यांची पत्रे, सन १८६५ ते १९१३ या दरम्यानच्या मुंबई इलाख्याच्या सर्व गव्हर्नरांची मूळ पत्रे, १८५७ च्या उठावासंबंधींची दुर्मीळ कागदपत्रे, १९३० ते १९४६ या काळातील दक्षिण महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्यासंबंधीची गोपनीय कागदपत्रे, क्रांतिकारकांच्या घरांच्या झडतीत तत्कालीन पोलिसांना मिळालेली कागदपत्रे, साने गुरुजी, क्रांतिसिंह नाना पाटील, अच्युतराव पटवर्धन, बॅ. नाथ पै, भाई माधवराव बागल, रत्नाप्पाण्णा कुंभार, बर्डे गुरुजी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील भाषणांचे गुप्तचर पोलिसांनी केलेले अहवाल, सन १९४२ च्या चळवळीतील भूमिगतांच्या हालचालींचे गोपनीय अहवाल, १८५० पूर्वीची दोल्मुद्रिते (मुद्रणकलेच्या प्रारंभकाळातील पुस्तके), जुन्या नाटकांच्या, चित्रपटांच्या जाहिराती, पेशवेकालीन हस्तलिखित पोथ्या, चित्रे, जुनी छायाचित्रे, मिरज, सांगली, कोल्हापूर, कुरूंदवाड या संस्थानांसंबंधी मोडी आणि फारसी लिपीतील दुर्मीळ कागदपत्रे अशी पंचवीस हजाराहून अधिक ऐतिहासिक साधने जमा झाली. ही साधने अप्रकाशित आहेत. त्यातून दक्षिण महाराष्ट्राच्या गेल्या ३०० वर्षांच्या अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकता येतो.
तशी इतिहासाची आवड ही मला बालपणापासूनच होती. शालेय जीवनात मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणार्या खाजगी क्लासहून परतताना किल्ल्यातील खंदकातून फेरफटका मारणे, तेथील भुयारसदृश मार्ग पाहणे असे प्रकार आम्ही काही मित्र करीत असू. त्या अजाणत्या वयात इतरांसारखी नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे गोळा करीत असू. पण त्यामागे केवळ संग्रह करण्यापलिकडे दुसरा हेतू नव्हता.
महाविद्यालयीन जीवनात गेल्यावर मात्र जगण्याचं प्रयोजन गवसलं. इतिहासाचा डोळस अभ्यास करण्याची "दृष्टी" निर्माण झाली. मिरजेतील साळुंखे महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध होते. तेथील इतिहासाची जाडजूड पुस्तके वाचू लागलो. ही पुस्तके वाचताना मिरज शहराचे उल्लेख येत, ते मी टिपून ठेवत असे. बघता बघता मिरज शहरासंबंधी खूप माहिती संकलित झाली. ती माहिती दै.तरुण भारत मधून "इये मिरजेचिये नगरी" या लेखमालेतून ५५ भागात प्रसिद्ध झाली. या लेखमालेतून मिरज शहराच्या एक हजार वर्षांतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण, नाट्य, साहित्य, संगीत अशा वैविध्यपूर्ण पैलूंचा आढावा घेण्यात आला होता. महाविद्यालयीन जीवनातच लिहिलेली ही लेखमाला खूप गाजली. त्याला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिसादामुळे मला प्रोत्साहन मिळाले.
याच काळात ऐतिहासिक कागद वाचण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे वाटू लागले. त्यामुळे मोडीसंबंधी जुनी पुस्तके आणि माहिती गोळा केली. त्याद्वारे घरीच अभ्यास सुरु केला. हळूहळू कागदपत्रे वाचण्याचा सराव होत गेला. सन १९९७ मध्ये एका कामानिमित्ताने नाशिकला जाण्याचा योग आला असता, तेथे गोदापात्रात जुन्या कागदांचे एक गाठोडे पाण्यात तरंगताना दिसले. काठीच्या सहाय्याने हे गाठोडे पाण्याबाहेर काढले. त्यात काही मोडी कागदपत्रे होती. मी संकलित केलेले हेच पहिले मोडी कागद...इतिहासाच्या दृष्टीने त्यातील मजकूर फारसा महत्त्वाचा नसला तरी आजही मी ते कागद जपून ठेवले आहेत.. मोडी कागदपत्र-संकलनाचा माझा प्रारंभ पुण्यभूमी नाशिकमधील गोदामाईच्या पवित्र पात्रात झाला.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच एका थोर, पण विस्मृतीत गेलेल्या स्त्रीची समाधी शोधून काढली. मनोरमा मेधावी असं तिचं नाव.. एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांची ही एकुलती एक, लाडकी मुलगी. वयाच्या तिसर्या वर्षी तिला आईने अमेरिकेला पाठविले. तिचं बालपण आईविना अमेरिका, इंग्लंड येथेच व्यतीत झालं. अमेरिकेत असताना भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ.आनंदीबाई जोशी यांनी लहानग्या मनूवर उपचार केले होते. पहिल्या भारतीय महिला डॉक्टरने उपचार केलेली पहिली भारतीय रुग्ण म्हणजे ही मनू उर्फ मनोरमा..वयाच्या बाविसाव्या वर्षी मनोरमा भारतात आली. तिने आपल्या आईचा समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला. केडगावच्या शारदा मिशनमध्ये विधवा आणि परित्यक्तांसाठी तिने मोठे काम केले. १९२१ मध्ये ती खूप आजारी पडली. तिला मिरजेच्या मिशन इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. पण ’आपला मृतदेह आईला दाखवू नये, तिला खूप दु:ख होईल,’ अशी विनंती तिने मृत्यूपूर्वी केली होती. त्यामुळे तिचे पार्थिव मिरजेतील ख्रिश्चन दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यावर संगमरवरी दगडांची सुंदर समाधी उभारली.
सुमारे ४० वर्षांच्या अल्पायुष्यात मनोरमाबाईंनी महिलांच्या कल्याणासाठी अनेकविध प्रकारची कामे केली. या थोर समाजसेविकेची समाधी मिरजेत आहे, याची कल्पना फारशी नव्हती. ख्रिश्चन स्मशानभूमी महाविद्यालयाजवळच असल्याने काही मित्रांना घेऊन मी दफनभूमीत फेरफटका मारला. तेव्हा एका चाफ्याच्या झाडाखाली ही संगमरवरी समाधी दिसली. त्यावर पंडिता रमाबाईंची एकुलती कन्या असे इंग्रजीत लिहिले होते. सुमारे ७५ वर्षे ही समाधी उन्हा-पावसाचा मारा सहन करीत कशीबशी उभी होती. समाधीवरचा क्रॉस तुटून पडला होता. समाधीतून छोटी झुडपे उगवली होती. आम्ही मित्रांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. एका थोर समाजसेविकेच्या समाधीच्या दर्शनाने आम्ही कृतकृत्य झालो होतो. या थोर महिलेच्या समाधीचा शोध लागल्याचा आनंदही आमच्या डोळ्यांत तरळत होता.
दफनभूमीत असणार्या या समाधीमुळे दफनभूमीतही इतिहासाचा खजिना दडलेला असतो, याची जाणीव मला झाली. त्यातून मग बर्याचवेळा ही संपूर्ण दफनभूमीच पालथी घातली. आणि मला आनंद आणि आश्चर्याचे अनेक धक्के बसत गेले. मिरज-पंढरपूर रोडवरच्या या दफनभूमीत दक्षिण महाराष्ट्रातील ख्यातनाम डॉक्टर डॉ. विल्यम वॉन्लेस यांच्या पत्नी मेरी वॉन्लेस, कॅन्सरवर रेडियम थेरपीचा उपचार करणारे पहिले डॉक्टर डॉ. व्हेल, ज्यांच्या बहारदार संगीताने मराठी चित्रपटसृष्टीला वैभवशाली सुवर्णकाळ मिळवून दिला आणि ज्यांनी लावणीसंगीत लोकप्रिय केले, ते ख्यातनाम संगीतकार वसंत पवार चिरविश्रांती घेत आहेत. या दिग्गजांच्या समाध्या मला तेथे गवसल्या. ही दफनभूमी ख्रिश्चनांमधील प्रोटेस्टंट पंथियांची तर, कोल्हापूर रोडवर कॅथलिक लोकांची दुसरी स्मशानभूमी आहे. तेथेही अनेक दिग्गजांच्या समाध्या आहेत. पूना इंजिनिअरिंग कॉलेजच्या(आता कॉलेज ऑफ इंजिनियरिंग , पुणे- COEP) पहिल्या गोल्डमेडलिस्ट विद्यार्थ्याची समाधी येथे आहे.
मिरजेतील प्रसिद्ध मिरासाहेब दर्गा आवारातील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीतही अनेक इतिहासप्रसिद्ध व्यक्तींच्या समाध्या आहेत. मोगलसम्राट औरंगजेब याचा मुक्काम सन १७०१ साली मिरजेत असताना त्याचा मुख्य बक्षी मुखलीसखान मरण पावला. त्याला या दर्ग्याभोवती असणार्या दफनभूमीत दफन केलं. आज ही समाधी पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून तो भाग मकसपखाना या नावाने ओळखला जातो. याच दफनभूमीत किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक, सवाई गंधर्वाचे गुरू संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांचीही समाधी आहे.
एकेकाळी पारशी समाज मिरजेतही होता. त्यांची हॉटेलंही मिरजेत होती. मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बरेच पारशी येत. त्यांच्या अंत्यसंस्काराची जागा जी टॉवर ऑफ सायलेन्स या नावाने ओळखली जाते, ती ईदगाह माळाजवळ आहे. पारशी समाजात मृतदेहाचे दहन अथवा दफन न करता ते उघड्यावर ठेवतात. पारशी समाज १९५० नंतर मिरजेत अस्तित्वात नाही. पण ही जागा आज अवशेषरुपात या समाजाच्या अस्तित्वाचे पुरावे देत उभी आहे.
या भिन्नधर्मीय समाजांच्या स्मशानभूमींमधूनही इतिहासाचे धागेदोरे सापडत असल्याचे माझ्या ध्यानात आले आणि त्यातूनच 'स्मशानभूमीत दडलाय इतिहासाचा खजिना' हा लेख आकाराला आला. त्यानंतर काही शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, इतिहासप्रेमी नागरिक यांच्या सहली केवळ याच दफनभूमीत मी आयोजित केल्या. 'स्मशानभूमीत सहली काढणारा' म्हणून काहींनी माझी हेटाळणीही केली. पण सहलींमध्ये सहभागी व्यक्तींच्या प्रतिक्रिया मात्र वेगळ्या होत्या. दफनभूमीत आत शिरताना प्रत्येकाच्या मनात आणि डोळ्यात दिसणारी भीती तेथून परत येताना कुठच्या कुठे पळालेली दिसे. त्याच त्या इतिहासाच्या घोकंटपट्टीला इतिहास म्हणणारे विद्यार्थी आणि नागरिक दफनभूमीतला हा अपरिचित इतिहास पाहून आणि ऐकून स्तब्ध होतात, तेव्हा इतिहासाचा एक प्रेमी म्हणून निश्चितच आनंद होतो. इतिहासाच्या अभ्यासाचं एक अप्रसिद्ध अंग आपण समाजासमोर आणल्याचं समाधानही मिळतं.
अशीच कहाणी पानिपतच्या रणसंग्रामात पराक्रम गाजविणार्या, पण विस्मृतीत गेलेल्या एका सरदाराची. मिरजेपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरचं कळंबी हे छोटसं गाव. या गावातलं इनामदार घराणं हे इतिहासप्रसिद्ध घराणं. या घराण्यातल्या तीन पिढ्यांनी पेशवाईतील विविध लढायात सहभागी होऊन पराक्रम गाजविला. सातारच्या शाहू महाराजांनी या घराण्याला हे गाव इनाम दिलं होंतं. याच घराण्यातील काळनाक नावाच्या सरदाराने सन १७६१ साली पानिपत येथे झालेल्या इतिहासप्रसिद्ध लढाईत सहभागी होत पराक्रम गाजविला. लढता लढता रणांगणावर देह ठेवला. या पराक्रमाची माहिती त्यांच्या आजच्या पिढीतील वंशजांना नव्हती. इतिहासाच्या शोधयात्रेत या पराक्रमी व्यक्तीसंबंधी कागदपत्रे मिळाली आणि एका अप्रसिद्ध सरदाराची कहाणी उलगडली. ही कहाणी प्रसिद्ध केली आणि ती वाचून
शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कळंबीला धारातीर्थयात्रेचे आयोजन केले. पानिपतकार विश्वास पाटलांना निमंत्रित करण्यात आलं. इनामदारांच्या देवघरात असणार्या चिलखत आणि तत्कालीन अवशेषांचे दर्शन घेऊन पानिपतकारही भारावले. जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांतून एका अप्रसिद्ध योद्ध्याचा पराक्रम साधार समाजासमोर मांडता आला यातच मोठं समाधान होतं.
इतिहासाच्या अभ्यासात अनेक सरदार, सरंजामदार, संस्थानिकांचे वाडे धुंडाळले. हे करत असताना अनास्था आणि दुर्लक्षामुळे इतिहासाच्या अमूल्य ठेव्याचं होणारं अपरिमित नुकसान पहावयास मिळालं. अनेक वाड्यांत दफ्तरखाने म्हणजे कचराकुंड्या झाल्या होत्या. मौल्यवान कागद पावसाने भिजून गेले होते. वाळवी, कसरींना या कागदपत्रांच्या रूपाने अनेक वर्षे एकाच ठिकाणी मिळणारे खाद्य उपलब्ध झाले होते. धुळीने माखलेल्या अशा कागदांच्या ढिगार्यातून चांगल्या अवस्थेतील कागद मिळविणे हे एक दिव्य होते. पण असे ढिगारे उपसताना मला मोडी आणि फार्सी लिपीतील अनेक मौल्यवान कागद गवसले.
एकदा एका प्रसिद्ध घराण्यातील हस्तलिखित पोथ्या पोत्यांमध्ये भरून नदीत विसर्जन करण्यासाठी नेण्यात येत असल्याचे मित्राकरवी कळले. तत्काळ तेथे गेलो आणि त्यांना त्या पोथ्यांच्या अभ्यासाचे महत्त्व पटवून त्या मिळवल्या. या पोथीसंग्रहात मला एक अनमोल वस्तू मिळाली. ती म्हणजे देशात मुद्रित झालेलं पहिलं पुस्तक. सन १८०५ साली मिरजेच्या संस्थानिकांनी तांब्याच्या पत्र्याचे ठोकळे करून भगवद्गीता छापली. देशात झालेल्या या पहिल्या ठोकळाछाप पुस्तकाची देशात उपलब्ध असलेली एकमेव प्रत माझ्या संग्रहात आहे. ती पाहण्यासाठी अनेकजण येतात.
एकदा पुण्यात फुटपाथवर बसणारी रद्दीची दुकाने चाळताना एक दुर्मीळ पुस्तक हाती लागलं. ना.ब. पैठणकर नावाच्या कुणा लेखकाने लोकमान्य टिळकांना भेट दिलेलं नाटकाचं हे पुस्तक आहे. लोकमान्यांनी साक्षात ज्या पुस्तकाला हस्तस्पर्श केला ते पुस्तक मला मिळालं, या भावनेनं मी क्षणभर शहारून गेलो. आज माझ्या संग्रहातलं ते एक मुख्य रत्न आहे. मी ते जीवापाड जपलंय.
लोकमान्यांचं असंच एक पत्र मला मिरजेत नायकिणीच्या वाड्यात सापडलं. मिरजेला शनिवार पेठेत नायकिणींची मोठी वस्ती होती. त्यांचे भलेमोठे वाडे या परिसरात होते. दर्गा आणि मंदिरे यांमध्ये नृत्य करण्यासाठी आदिलशाही काळापासून त्यांना इनामे दिली होती. या नायकिणी साक्षर होत्या. १८५८ साली त्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेली पत्रे माझ्या संग्रहात आहेत. त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. त्या राष्ट्रप्रेमी होत्या. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरल्यानंतर तो खटला चालविण्यासाठी लागणारी मदत महाराष्ट्रातून करण्यात आली. त्यामध्ये मिरजेच्या नायकिणींचाही वाटा होता. त्यामुळेच लोकमान्यांना या नायकिणींबाबत सहानुभूती होती. सन १९१९ साली नायकिणींनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानणारे पत्र टिळकांनी त्यांना पाठविले होते. हे पत्र या नायकिणींच्या संग्रहात मिळाले.
कोल्हापूरला एका रद्दीवाल्याकडे एका संस्थानिकाचा मोठा पत्रव्यवहार मिळाला. त्यामध्ये १८६५ ते १९१३ या काळात झालेल्या मुंबई इलाख्याच्या सर्व गव्हर्नरांची हस्ताक्षरयुक्त पत्रे आहेत. अशाच एका रद्दीत स्वातंत्र्यलढ्याची अप्रसिद्ध कहाणी सांगणारी पाचशेहून अधिक कागदपत्रे, देशभक्तांविषयी पोलिसांचे गोपनीय अहवाल मिळाले. मिरजेच्या जुन्या थिएटरसंबंधी मिळालेल्या कागदपत्रांतून रंगभूमीच्या सुवर्णकाळात मिरजेत झालेली नाटके, तत्कालीन नाटककंपन्या, त्याचे व्यवहार यांची माहिती मिळाली.
गेल्या १६ वर्षांच्या शोधकार्यात खूप काही जमलं..अनमोल रत्ने गवसली..पण अजूनही मोठं काम बाकी आहे. आजही अनेक दफ्तरांत ऐतिहासिक कागद धूळ खात पडून आहेत. 'आम्हाला बाहेर काढा, आमचा जीव गुदमरतो आहे...शेकडो वर्षांची आमची अंधारकोठडी संपवा..' असा पुकारा करताहेत, त्यांच्या या हाका मला ऐकू येत आहेत. त्यांना जीवदान देण्यासाठी माझी शोधयात्रा सुरूच राहणार आहे.
हितगुज दिवाळी अंक २०१२ छंदमग्न सदरासाठी
प्रतिसाद
सुरेख लेख. सगळीच माहिती नवीन
सुरेख लेख. सगळीच माहिती नवीन आहे माझ्यासाठी. धन्यवाद :)
अफलातून ! हॅट्स ऑफ !
अफलातून ! हॅट्स ऑफ !
वा. खुप आवडले.
वा. खुप आवडले.
अप्रतिम लेख आणि छंद. तुम्ही
अप्रतिम लेख आणि छंद. तुम्ही खूप मोठे काम करत आहात. :)
सेनापती +१. तुमच्या कामासाठी
सेनापती +१.
तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. :-)
मस्तच... तुमच्या शोधयात्रेला
मस्तच... तुमच्या शोधयात्रेला खूप खूप शुभेच्छा !
अप्रतिम लेख... तुमच्या
अप्रतिम लेख... तुमच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा :)
जब्बरदस्त काम... भेटायला
जब्बरदस्त काम...
भेटायला आवडेल तुम्हाला!
कसे जमवावे?
:)
श्री. मानसिंग कुमठेकर सरांनी
श्री. मानसिंग कुमठेकर सरांनी स्थापन केलेल्या मिरज इतिहास संशोधन मंडळाचे हे फेसबुक पेज आहे.
https://www.facebook.com/pages/Miraj-Itihas-Samshodhan-Mandal-%E0%A4%AE%...
सध्या थोडीशीच माहिती आहे, प्रसंगवशात अजून अपलोड केली जाईल पुढे, शिवाय मंडळाचा एक ब्लॉग काढण्याचादेखील विचार आहे, जेणेकरून मंडळाचे कार्य लोकांना कळत राहील. तूर्तास हे फेसबुकचे पेज पहावे अशी विनंती. सरांना भेटायचे असल्यास शक्यतोवर मिरजेला येणेचे करावे ही अजून एक विनंती :) जर कुणाला या उपक्रमाबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल, किंवा काही मदत करण्याची इच्छा असेल, तर फेसबुक
पेजवर संपर्क साधावा, किंवा nikhil.bellarykar@gmail.com इथे एक मेल टाकावा. सर्वांच्या भरघोस प्रतिसादाबद्दल अनेक आभार!! :)
सेनापती +१
सेनापती +१
अप्रतिम... जणू अलीबाबाची
अप्रतिम... जणू अलीबाबाची गुहाच... सरांच्या जिदीला, मेहेनतीला व अक्षरशः कचर्यातून रत्ने शोधून त्यांचे जतन करण्याच्या वृत्तीला सलाम! खरा ईतीहास हा असा जाणून घ्यायला हवा असे वाटते. एरवी पाठ्यपुस्तकातील धडे, बखरी, ई. मधून निव्वळ शब्द व प्रसंग समोर येतात.. पण कुमठेकरांच्या खजीन्यातील कागदपत्रे बोलकी असतील हे निश्चित!
भविष्यात एकदा तरी सरांना भेटायलाच हवे...
सही आहे. कार्यासाठी खूप खूप
सही आहे. कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा! पुढेमागे काही मदत करायला नक्की आवडेल.