त्या तिथे पलिकडे

त्या तिथे पलिकडे, माझिया प्रियेचे झोपडे ॥ ध्रु ॥

गवत उंच दाट दाट, वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे, झाड एक वाकडे ॥ १ ॥

कौलावर गारवेल, वार्‍यावर हळू डुलेल
गुलमोहर डोलता, स्वागत हे केवढे ॥ २ ॥

तिथेच वृत्ति रंगल्या, चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो, तिथे मनास सापडे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ती गेली तेव्हा रिमझिम

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुज मागतो मी आता

तुज मागतो मी आता
मागतो आता, तुज मागतो मी आता
मागतो आता, मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता ||धृ||

तुझे ठायी माझी भक्ती
विरुढावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती ||१||

धरणीधरा ऐसे द्यावे
सर्वाहूती लीन व्हावे
तुज शरण, शरण, शरण
आलो पतीत मी जाण ||२||

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षूचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुज लागी गजानना ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे

तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे
वधूनी जाई प्राण घेई (जगी) ठेवू नको रे

याचे ममतेचा लोभ मला कळ्ळा आता
कोण्या ठिकाणी आहे जाऊन लावा पता
तिथे चालत जाईन आप अंगे स्वतः
जाऊन सांगा की रानभरी (?) होऊ नको रे
वधूनी जाई प्राण घेई ठेवू नको रे
तुझ्या प्रितीचे...

जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
होऽऽऽऽ
(जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झडप घेऊन देतो प्राण दीपकाचे वरी -२)
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्न टाकून पदरात गार घेऊ नको रे
वधूनी जाई प्राण घेई ठेवू नको रे
तुझ्या प्रीतीचे...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तांडा चालला रं गड्या

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

तो : आज हिथं उद्या तिथं
खेळ नवा मांडला... खेळ नवा मांडला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

तो : एक गाव सोडूनी दुसरं गाव जोडूया
मुशाफिरी वस्ती ही घडोघडी मोडूया
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला... पाठीवरी बांधला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

तो : वनवासी जिनं हे जल्माला लागलं
[जल्माला लागलं]
दु:खाचं ताट कुठं ठायीठायी पेरलं
कधी सरल वाट ही ठावं नाही कुणाला... ठावं नाही कुणाला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

ती : हिरवळीचा बिछाना
धुक्याची रं वाकाळ
को. धुक्याची रं वाकाळ
रात कधी संपली कधी झाली सकाळ
माकडीच्या माळाला झेंडा आज रोविला... झेंडा आज रोविला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

तो : एक गाव सोडूनी दुसरं गाव जोडूया
मुशाफिरी वस्ती ही घडोघडी मोडूया
संसाराचा डोलारा पाठीवरी बांधला... पाठीवरी बांधला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

तो : वनवासी जिनं हे जल्माला लागलं
[जल्माला लागलं]
दु:खाचं ताट कुठं ठायीठायी पेरलं
कधी सरल वाट ही ठावं नाही कुणाला... ठावं नाही कुणाला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

ती : हिरवळीचा बिछाना
धुक्याची रं वाकाळ
को. धुक्याची रं वाकाळ
रात कधी संपली कधी झाली सकाळ
माकडीच्या माळाला झेंडा आज रोविला... झेंडा आज रोविला

[तांडा चालला रं गड्या
तांडा चालला... तांडा चालला]

गाण्याचे आद्याक्षर: