लाविला तुरा फेट्यासी

लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी

बसताच उद्या मंचकी
विसाराल जुन्या ओळखी
विसर तो स्नेह सुखवासी, हो हो

महालात जिगाचे पडदे
भोवती शिपाई प्यादे
कोठली वाट दीनासी .१

मज हवी भेट राजांची
बाई तू कोण कुणाची
क्षण नसे वेळ आम्हासी

हे हास्य मोकळे असले
मी प्रथम जयाला फसले
दिसणे न पुन्हा नजरेसी ..२

येईल नवी युवराणी
अति नाजुक कमळावाणी
पुसणार कोण चाफ्यासी

लाडके तुझ्यावाचोनी
मज आवडतेना कुणी
पहिलीच भेट रमणीसी ...३

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

मुली तू आलीस अपुल्या घरी

लिंबलोण उतरता अशी का, झालीस गं बावरी?
मुली, तू आलीस अपुल्या घरी

हळदीचे तव पाऊल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुन गं झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी

भयशंकित का अजुनी डोळे?
नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही, आले याच घरी

याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी, बिलगुनी माझ्या उरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

लाल केशरी गुलमोहराचे

लाल केशरी गुलमोहराचे क्षितिजी फुलले तुरे
आणि फुटाण्यापरी उडाली दिपलेली पाखरे
सर्कशीतल्या बालकापरी धीट चपल कोकरे
आढ्यावरूनी खुडीत होती कोमल पाने त्वरे
बिंब तयांचे होते पडले निळसर ओढ्यामध्ये
गार उन्हातील चित्र दुहेरी तरळत होते मुदे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

लाविशी का वेड मजला

लाविशी का वेड मजला राजहंसा येऊनी
जाशी का तू हळू मला अर्धी कहाणी सांगुनी ॥धृ॥
मोतियाचा रम्यसा रे मी तुला देईन चारा
नित्य तू माझ्या गवाक्षी करित जाई येरझारा
तृप्त होते राजसची दिव्य कीर्ती ऐकुनी॥१॥
मंद कलकल गुंजणारी बोल तू शब्दातुनी
ओळखू ये गायिलेला राग तो हंसध्वनी
हरखुनी जाते सहज मी या तुझ्या नादातुनी॥२॥
मी इथे तू दूर कोठे अन्‌ अनोळखी वाट रे
मीलना मध्येच मंगल तूच अतंरपाट रे
बैसवुनी तुझिया विमानी जा मला तू घेऊनी॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

लळा जिव्हाळा शब्दच खोटे

लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणे बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडुनि जाई

रक्तही जेथे सूड साधते, तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन् सद्भावा
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: