स्वयंपाकातील विठोबा

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न.

पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी. पाट्याचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत. पूर्वी प्रत्येकाच्या घरात त्यांच्या ऐपतीनुसार किंवा आवडीनुसार पाट्यावरवंट्याचे छोटे किंवा मोठे आकारमान ठरलेले असायचे.

लहानपणी या पाट्यावरवंट्याचा बराच सहवास लाभला आहे. अगदी कळत नव्हते तेव्हा, बालपणात म्हणाल तर कुठलातरी पाला वाडीतून आणायचा आणि पाट्यावर वाटून ती मेंदी आहे का, रंग येतो का ते पाहायचं, कारण मेंदीची पानेच तेव्हा ओळखता यायची नाहीत. काही दिवसांनी मेंदीच्या पानांचा शोध माझ्या बालदृष्टीस लागला आणि त्यावर मी माझ्या इवल्याश्या बोटांनी मेंदीचा पाला रगडू लागले. तेव्हा खरंतर वरवंटा हातात यायचा नाही. जड असल्यानं फार कष्टानं तो उचलून घ्यायचा. कधीकधी ठेचताना हाताची बोटे वरवंट्याखाली सापडायची. कळ यायची पण मेंदीचा रंग ती कळ सुसह्य करायचा. रंग येण्यासाठी त्यात काथ, लिंबूरसही वाटायला घेत असत. मेंदीचा पाला वाटत असतानाच हात लाल होऊन जायचे. आताच्या बाजारी मेंदीपेक्षा तो वाटलेल्या मेंदीचा सुगंध, रंगच काही और असे.

pata-1.png

आई पाट्यावर वाटण वाटायची. ते पाहत असताना मलाही अनुकरण करावेसे वाटे. वरवंटा धरण्याइतपत हातात बळ आले तेव्हा कधीतरी चटणी वाटायला घ्यायचे. चटणीत कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, खोबर्‍याचे तुकडे किंवा खरवडलेले खोबरे, जाड मीठ, मिरची घ्यायचे. पहिले खोबर्‍याचे तुकडे ठेचायचे, मग त्यावर मिरची, कैरी / हिरवी चिंच किंवा करवंद, मीठ टाकून सगळे एकत्र ठेचायचे. मग ते सर्व जिन्नस पाट्याच्या खालच्या बाजूला घेऊन वरवंट्यानं घसपटून वाटत वरच्या भागावर न्यायचे. एकदा वाटून चटणी बारीक व्हायची नाही. मग परत वरचे वाटण खाली घेऊन अजून एकदोनदा वाटून ही चटणी बारीक वाटायची. ही चटणी आठवूनच तोंडाला पाणी सुटतं.

भाजी आणि मासे, मटणाच्या रश्शाचे वाटणही या पाट्यावर वाटल्यानं अगदी चविष्ट लागायचं. भाजी आणि माश्यांसाठी खोबरं, मिरच्या, आलं, लसूण हे सगळं एकत्र वाटून वाटण केलं जायचं, मटणासाठी, चवळी, छोले या भाज्यांसाठी आलं-लसूण असं वेगळं वाटण केले जायचं, तर अजून अख्खे कांदे आणि सुक्या खोबर्‍याची वाटी चुलीत भाजून दोघांचे एकत्र वाटण केले जायचे. भाजलेलं सुकं खोबरं ठेचताना मध्येच एखादा तुकडा तोंडात टाकायचा छंद होता मला. मग त्या खोबर्‍याची अप्रतिम चव वाटण कमी व्हायला कारणीभूत असायची. चुलीत भाजल्यानं कांदा-खोबरं काळं झालेलं असे. त्यामुळे हातही काळपट व्हायचे. मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे. मी याचं नंतर अनुकरण करू लागले.

pata3.jpg

उन्हाळ्यात चिंचा तयार होऊन काटळून (काटळून म्हणजे चिंचेतील बिया काढणं) झाल्या की त्याचे आई-आजी मीठ लावून गोळे करत असत. चि़ंचेच्या गोळ्यांसाठी जाड्या मिठाचा वापर करतात. हे जाडं मीठ आई-आजी पाट्यावर जाडसर वाटायच्या. मीपण हे मीठ वाटताना पाट्यावर मिठात हात घालून लुडबूड करायचे. पाट्यावरच्या खरडलेल्या मिठाचा तो खरखरीत स्पर्श कोवळ्या हातांना टोचणारा, पण सुखकारक वाटायचा. याच पाट्यावर आई-आजी चिंचेचे गोळे वळायच्या.

साबुदाण्याच्या खिचडीसाठी किंवा इतर कशासाठी लागणारा शेंगदाण्याचा कूट पाट्यावर छान भरडून निघत असे. थोडा जाडसर कूट असेल, तर अजून मजा यायची. भरडताना भाजलेल्या शेंगदाण्यांचा येणारा खरपूस वास त्या पाट्यालाही काही काळ बिलगून राही.

दिवाळीत साठ्याच्या करंज्या करतानाही करंजीचे पीठ कुटण्यासाठी पाट्यावरवंट्याचा उपयोग केला जायचा. अजून उपयोग व्हायचा, तो म्हणजे पापडाचे पीठ कुटण्यासाठी. हे काम भाऊ किंवा वडील किंवा आजूबाजूची एखादी दणकट बाई करायची. कारण हे ताकदीचं काम असायचं. पण सगळ्याच कामात लुडबुडायचं, ही सवय असल्यानं मीपण मध्येमध्ये बिचार्‍या पिठावर घाव घालायचा प्रयत्न करायचे. पण फार कठीण काम आहे, हे समजून पाय मागे घ्यायचे. पापडाचे घट्ट मळलेले पीठ कुटूनकुटून घेऊन ते जरा मऊ व्हायचे. मग त्याच्या लाट्या करून त्याचे पेढे, म्हणजे छोटे गोळे कापून पापड केले जायचे.

घरात कधी अक्रोड, बदाम सापडले की ते जाऊन पाट्यावरच वरवंट्याने फोडायचे, झाडावर येणारे गावठी बदामही लाल होऊन झाडावरून पडले, की ते आणून पाट्यावर फोडून त्यातली बी, म्हणजे गर खायचा. या बदाम फोडण्यानं पाटा लाललाल होऊन जात असे. पण पाट्याला चिकटलेला चिमूटभर गर खाण्यानंही परमानंद मिळत असे.

ही पाट्यावरवंट्याची जोडी नुसती अन्नपूर्णादेवीचीच मदत करत नसे, तर घरात कोणाला दुखलंखुपलं की झाडपाल्याची औषधं ठेचून, रगडून प्रथमोपचाराचं कार्यही करत असे. वैद्यकीयदृष्टीनं म्हणाल, तर घरातील बायकांना वेगळा व्यायाम करण्याचीही गरज भासत नव्हती. पाट्यावर वाटण वाटण्यासाठी लाइटची नव्हे तर श्रमाची गरज असे. त्यामुळे पंधरा मिनिटं पाटा-वरवंटा छान व्यायाम करवून घ्यायचा.

पूर्वी या पाट्यावरवंट्याचा धाकही असे घरोघरी. राग आला, की पाट्यावर ठेचून काढेन/आपटेन, वरवंटा घालेन डोक्यात/टाळक्यात अशा धमक्या घराघरातून ऐकू यायच्या.

पाट्याचा भरपूर वापर झाला, की पाट्याची टाकी, म्हणजे धार कमी होत असे. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदातरी त्या काळी पाथरवट, किंवा पाट्याला टाकी लावणारे दारावर येत असत. त्यांची "टाकीयेsssssss " अशी हाक ऐकू आली की आई त्यांना बोलवून पाट्याला टाकी लावून घेत असे. ही टाकी लावणारा एक लोखंडी जाड तासणी पाट्यावर ठेवून त्यावर हातोडीनं ठकठक करत ठोकून गाळलेल्या जागा भराच्या तुटक रेषांप्रमाणे पूर्ण पाट्यावर टाकीच्या रेषा ठोकत. हे बघताना मला तसं करण्याची फार इच्छा होई. मी कधीतरी खेळ म्हणून आमच्या घरातली तासणी घेऊन हातोड्यानं तासणी पाट्यावर ठोकायचा प्रयत्न करायचे. पण पाटा फार शिस्तीचा कडक होता. ज्याचं काम त्यानंच करावे, या तत्त्वाचा. माझ्यासाठी कध्धीकध्धी त्यानं नरमाई म्हणून घेतली नाही आणि मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.

वयोवृद्ध पाटा कुटुंबाची सेवा करूनकरून मधून झिजायला लागायचा. पण तो आपलं कार्य शेवटपर्यंत सोडत नसे. स्वतःला मधून खड्डा पडला, तरी खालच्या किंवा वरच्या बाजूनं चांगले वाटण करून गृहिणीला आधार देत असे.

धार्मिक कार्यातही पाट्यावरवंट्याला घरच्या थोरामोठ्यांप्रमाणेच अगदी मानाचं स्थान असते. बारशात पाट्यावरच पाचवीचं पूजन केलं जातं. पिठाचे दिवे, मोदक, थापट्या, लाट्या ठेवून पाचवी पुजली जाते. बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात. मग 'गोविंद घ्या, माधव घ्या'च्या पहिल्या राउंडला या वरवंट्याला बाळाप्रमाणे अलगद उचलून, खालीवर करून नामकरणाच्या विधीतही समाविष्ट केलं जातं.

अशी ही पाट्यावरवंट्याची जोडी आता नामशेष होत चालली आहे. त्याची जागा आता स्वयंपाकघरात अगदी ओट्यावर मिक्सरनं घेतली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात गरजच आहे या उपकरणाची. पण मला अजूनही त्या पाट्यावरवंट्याचं फार आकर्षण आहे. म्हणून आमच्या पडवीत मी अजून हा पाटावरवंटा जतन करून ठेवला आहे. वर्षातून एकदादोनदातरी वेळ मिळेल तेव्हा आणि लहर येईल तेव्हा मी या पाट्यावरवंट्यावर वाटण वाटते. साठ्याच्या करंजीचे पीठही मी दिवाळीत या पाट्यावरवंट्यावर कुटते. असं पीठ कुटताना किंवा वाटण वाटताना या स्वयंपाकातील विठोबासोबत बालपणात, रम्य वातावरणात गेल्यासारखं वाटतं.

- सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे (जागू)

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

हो अवल मलाही आई ओरडायची म्हणून मी लांबूनच पहायचे. पण तरी हाता-पायाला एखादा तुकडा लागून छोटा झटका बसायचाच. :हाहा:

वा जागू, अतिशय सुंदर लेख. शीर्षक तर अप्रतिम.

तू उत्तम स्वयंपाक करणारी तर आहेसच, या शिवाय स्वयंपाकाला लागणार्‍या सर्व साधनांवरही तुझे खरेखुरे प्रेम असल्याचे जाणवते.

खुपच आवडला लेख. साधासोपा तरीही निराळा. गाळलेल्या जागा भरा रेषा वाचून अगदी अगदी झालं! पाट्या-वरवंट्याचा वापर करून केलेला स्वयंपाक म्हणजे पूर्वीच्या सुगरणींचं एक महत्वाचं लक्षण म्हणता येईल. ते वाटणाचे जिन्नस इकडेतिकडे सांडू न देता निगुतीनं वाटणं आणि पाटा धुणं, केवढी कौशल्याची कामं होती. काकुकडे पाट्यावर पुरण वाटल्याचं आणि तारांबळ झाल्याचं नीटच आठवतंय. इतक्या छान आठवणी जाग्या केल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद.

मस्त लेख! मी पाटावरवंटा फक्त पाहिला आहे आमच्या घरी. वाटणं वगैरे काही केलेले नाही. एवढा जड वाटायचा! नाही म्हणायला वरवंट्याचा उपयोग फक्त नारळ फोडायला केला आहे. :)

पाटावरवंटावर लेख फक्त जानूच लिहू शकते :) आमच्या घरीही आहे. कधीतरी आई आणि आजी वापरायच्या पण मी कधी वापरला नही.

जागू, चांगलं लिहीलं आहेस. इतक्या साध्या विषयावर वाचताना सुद्धा कंटाळा येत नाही.

खुपच मस्त! बर्‍याच आठवणी जाग्या झाल्य :) पापडाचे पीठ, करंज्यांचे पीठ कुटलेय मी पण चटणी मात्र नाही जमली फारशी कधी पण आता शिकेनच मी ....आईकडे अजुनही आहे पाटावरवंटा.

मस्त समरसुन लिहिलेला लेख.पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा.आमच्याकडे अजुन आहे.विज नसली कि हा विठोबा धाऊन येतो मदतीला.

कसलं छान लिहिले आहेस जागु!! स्मरणशक्ती मस्तय तुझी. आमच्याकडे कितीतरी उशीरा आला मिक्सर. पाट्यावर मस्त वाटायला यायचं, आता येईल का शंकाच आहे.

खुप छान लेख आहे.

जागू काय सुरेख लिहिलयस स्मित अगदी नावापासूनच प्रेमात. अगदी सार्थ नाव दिलयस ग +++१११११११११११

छान झालाय लेख .. नोस्टाल्जिक करणारा .. :)

शशांकजी, सई, माधवी, नताशा, मिलिंदा, आदिती, शोभनाताई, सुनिधी, मानसी, सृष्टी सशल तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तसेच तुमच्या सगळ्यांच्या आठवणीही छान.

जागु ......खरच फ्लॅश बॅक मधे गेले मी .....कुठे असेल आमचा विठोबा??? आठवतच नाहिये ग्ग्ग.....पण आठवणी परत एकदा ताज्या झाल्या.....मस्त

जागु, मस्त लेख. माझं बालपण अगदी समोर उभ केलसं. पाट्यावरच्या वाटणाची चव, मिक्सरच्या वाटणाला नाही. आम्ही कडधान्य पण शिजवून पाट्यावर थोडं वाटून घ्यायचो. आमटी करण्यासाठी. :स्मित:

मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे. मी याचं नंतर अनुकरण करू लागले.>>>>>>>>>>>हे हे अगदी आमच्याच घरचं वर्णन. :स्मित:

आमच्याकडे अजूनही पाटा-वरवंटा आहे. पण आता वापरला जात नाही. वापरायचा विचार डोक्यात आला की गेलेली वीज त्वरीत येते आणि मिक्सर वापरला जातो. :अरेरे:

छान लेख

मस्तच!

छान लेख

लेख अतिशयच सुरेख उतरलाय जागू. जुन्या आठवणी जाग्या केल्यास.

मस्त लेख.
पाटा कधी वापरला नाही मात्र आजी , आई यांना वापरताना पाहीला आहे.

छान लेख!!!!!!!! :स्मित:

अप्रतिम लेख! मी पाटा-वरवंटा कधी वापरला नाही. पण त्यावर वाटलेल्या खोबर्‍याच्या वाटणात केलेली माशांची आमटी... आजीच्या हातची... खाल्ली आहे. ती चव विसरता येत नाही अजुनही!

चांगल लिहिलय. सर्वच डिटेल्सशी रिलेट करु शकलोय. :)
वाचता वाचता आई पुरण पाटा वरवंट्यावर लाटत आहे.
मी तिथेच बसलोय. आणि ती गोड झालय का बघ म्हणुन एक गोळा मला खायला देत आहे हे लहाणपणीच नेहमीच सुखद चित्र समोर आलं. :)
पाटा वरवंटा आईकडे आहे अजुन पण वयोमानानुसार तिलाही नाही वापरता येत.

जागू काय सुरेख लिहिलयस

mastach jamalaay lekh, jaagU. maajhyaa maaheree hotaa paaTaa-varavanTaa. te boTa sapaTavUn vagaire gheNa kelay.
Chaan upamaa... viThobaachi.
aaNi te <<मला कधी एका शब्दाचीही गाळलेल्या जागेची रेषा बनवता आली नाही.
>>
layee bhaaree.

मस्त गं जागू..

माझ्या लहानपणीच्या पाट्या-वरवंट्याच्या बर्याच आठवणी जुळताहेत तुझ्याबरोबर. रविवारचं मटणाचं वाटण, त्याआधी कांदा अख्खा भाजल्याचा वास आणि त्यापाठोपाठचं खोबरं...
मे महिन्यातलं चिंच काटाळणे, पुर्वी ती एक बाई यायची..आजकाल चुलतभावाची बायको डायरेक्ट उंडा पाठवते कधी कधी :)

आज बर्याच दिवसानी इथे आलो. आणि तुझा लेख वाचुन नोस्टालजीक झालो.

पाटावरवंट्यावरच्या चटणी अथवा वाटणाला जी चव आहे ती मिक्सर मधे बनवलेल्याला नाही. असे माझे मत आहे.

धन्यवाद सगळ्यांना.

छान लेख आहे ,,, सोपे व मनाला भिडणारे लेखन आहे तुमचे!