मालवून टाक दीप

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग ॥ ध्रु ॥

त्या तिथे फुलांफुलांत, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढ्यात स्वप्नभंग ॥ १ ॥

गारगार या हवेत, घेउनी मला कवेत
मोकळे करुन टाक, एकवार अंतरंग ॥ २ ॥

दूरदूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून, एकएक रुपरंग ॥ ३ ॥

हे तूला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग, का कधी जळेल, एकटा जगी पतंग ॥ ४ ॥

काय हा तूझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझिया नयनांच्या कोंदणी

माझिया नयनांच्या कोंदणी
उमलते शुक्राची चांदणी

तम विरते, रात्र सरते
पहाट-वारे झुळझुळते
प्राजक्ताचे तरु मोहरते
हृदयीच्या अंगणी

प्रहर पहिला अविरत येतो
भूपाळीचे स्वर गुणगुणतो
अरुण मनाचा हर्ष रंगतो
पूर्वेच्या लोचनी

दंव बिंबातुनी क्षण सोन्याचा
उजळीत राही जीव जीवाचा
स्वर्ग हासतो वसुंधरेचा
किरणां-किरणांतुनी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझे जीवन गाणे

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे

व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे

कधी ऐकतो गीत झर्‍यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वाऱ्यातुन, कधि तार्‍यातुन झुळझुळतात तराणे

तो लीलाघन सत्य चिरंतन
फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे

गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन उसळे प्रेम दिवाणे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: