अभिप्राय

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००९बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा.
-संपादक मंडळ

प्रतिसाद

व्हिडिओ विभागात रेसिपिज छान जमल्यात.
रुमाली वड्या मस्तं, निवेदन आणि आवाज छान आहे मृण्मयी चा :).
कराडकर नी केलेल्या करंज्या पण एकदम सुबक, एक सारख्या !

'रेणुका कुलकर्णी' यांचे वन स्ट्रोक पेंटिंग जबरदस्त !
बाकीचे व्हिडिओज अजुन पाहिले नाहीत, नंतर उरलेल्या प्रतिक्रिया देइन :).

ट्यु,
स्मिता पाटील वर लिहिलेला लेख मस्त झालाय.

टण्या अरे काय हे तुझ्या गोष्टीखाली तू आधी लिही बरं की हापिसात बसून वाचू नये म्हणून..
छे काय धमाल आहे... हसू दाबायचं तरी किती..
एक नंबर..

सुंदर अंक्.मुखप्रुश्ठ छान.पा.क्रु. चे वीडियो खुप आवडले. सर्वा चे अभीनंदन.:)

गोष्टीखाली तू आधी लिही बरं >>> म्हणजे गोष्ट वाचुन झाल्यावरच कळेल ते!

आज एखादी चित्रांगदा सिंग, स्मृती मिश्रा नाहीतर सीमा बिश्वास कधीतरी काहीतरी वेगळं असं एखाद्या सिनेमात करून जातात आणि मिडिया-प्रेक्षक सगळ्यांना स्मिता पाटील आठवते.
>>>
बहोत खूब लेख ट्युलिप.. फार संयत लिहिला आहेस.. आईच्या वर्गात असलेली एक नटी ह्यामुळे लहानपणी कुतुहल निर्माण झालेली आणि आजवर अनेक चित्रपटातून झपाटून (हाँट) टाकलेली स्मिता खरेच ग्रेट होती.. भुमिका, अर्धसत्य, अगदी निशांत मधली छोटीशीच पण अवघड भुमिका, अनेक अनेक..

मुकुंदा, प्रा. दि.ब.देवधर आणि पद्माकर शिवलकरांवर फारच सुरेख लेख लिहिला आहे. आवडला. मिलिंदाचा पण छान आहे, खुमासदार.. फक्त मिलिंदाने काही बोचरे विनोदी नाही लिहिले तर चुकल्या-चुकल्या सारखे होते म्हणुन थोडा अळणी वाटला :)

चंपक, रयतने खेड्यापाड्यातून जे काम (खरे तर चळवळ) घडवून आणले आहे ते सर्वस्वी तुमच्या वडीलांसारख्या शिक्षकांमुळेच शक्य झाले आहे. रयतचे काम माहिती असलेल्यांना हा लेख अजूनच भावेल. अश्या शिक्षकांना सलाम!

(वाचक मोड सुरु)
काल 'आख्यान' वाचायला घेतलं, आणि आज पुर्ण केलं.

'अ लव्ह साँग' आणि 'सांवरा रे' ही आख्यानची फ्लॅगशिप म्हणता येतील अशी लिखाणे. जबरदस्त जमून आलेला फ्लो-मांडणी, आशयातली ताकद आणि मनोव्यापारांची सुंदर उकल करणारी सिद्धहस्त शैली ही या दोन्ही कथांची वैशिष्ट्ये वाटली. कथेच्या लांबीने त्या-त्या विषयांना चांगला न्याय दिला आहे, असेही वाटले.

वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे विनोदी लिखाणाचा विभाग वेगळा हवा होता, असे वाटले.
'गड आला पण..' प्रचंड आवडले. त्या लहान्याची निवेदनशैली आणि आणि त्यात गुंफलेले प्रासंगिक विनोद यामुळे एक सही फार्स तयार झाला आहे. (पाचवीत बसवलेले 'रामशास्त्री प्रभुणे' नाटक आठवले. ऐनवेळी प्रचंड तुपकट काहीतरी खाल्ल्यामुळे २-३ जणांचे घसे बसून प्रचंड विनोदनिर्मिती झाली होती.)
'दिगुलीला' ही सही जमले आहे. गाडगिळांचे बंडु-स्नेहलता आठवले. (तुलनेचा हेतु नाही). शीर्षक मात्र किंचितसे खटकले. वेगळे कोणते हवे होते, ते काही सुचले नाही. या दोन विनोदी कथांमुळे बर्‍यच दिवसांनी मनापासून हसलो. :)

'सुशीलाकाकू आणि तत्सम' हेही थोड्या वेगळ्या शैली अन विषयामुळे आणखी एक लक्षात राहिलेले लिखाण. थोडे छोटे अन कुठेतरी अपूर्णता मात्र वाटली.

'देवी' आणि 'त्रिशंकू' या कथांत विषयाच्या दृष्टीने नाविण्य वाटले नाही. या दोन्ही लेखिकांची क्षमता यापेक्षा चांगले लिहिण्याची आहे, असे वाटले. त्या तुलनेत 'आवा, ई कोकणवा हमार है बा!' या कथेने विषयाचे नाविण्य नसूनही मनावर छाप सोडली. वास्तव आणि उत्कृष्ट वातावरण निर्मिती मुळे असेल, किंवा आणखी कशामुळे.

'ती...स्वप्नपरी..!' ही कथा विषयाच्या दृष्टीने आवडली. लेखनशैली चांगली असली, तरी मांडणी साचेबद्ध झाली, असे वाटले. 'नेहेमीचे यशस्वी' मुद्दे घेऊन कथा फुलविण्याचा प्रयत्न केल्यामुळे असे वाटले का, ते मला सांगता येणार नाही.

बाकी 'आख्यान'ने वैविध्य मस्त जपले आहे. (यासाठीच विनोदी कथाही इथे टाकल्या का?). दाद, श्रद्धा, पूनम, चाफ्फा, स्वाती आम्बोळे, नीरजा, संघमित्रा यांच्या कथाही हव्या होत्या. (ही आता आठवली तेवढी नावे. आणखीही असतील. :) )

वरती व्यक्त झालेली सारी मते माझी वैयक्तिक.
कोणतेही डावे-उजवे, आधी-नंतर असे न करता संपादकांनी ठेवलेल्या क्रमानेच सारे वाचणार आहे. :)

(वाचक मोड सुरुच..)

'आख्यान' विभाग पूर्ण वाचून झाला.

शोनूची 'सांवरा रे' बेहद्द आवडली. माझ्या मते ह्या दिवाळी अंकातील साहित्याचा शिरोमणी म्हणजे ही कथा..
'सुशिलाकाकू आणि तत्सम'... अगदी वेगळा विषय. खुप्पच आवडली.
ट्युलिपची 'अ लव्ह साँग' मी सुद्धा थोडीशी वाचली होती. त्यामुळे माझं सुद्धा थोडंसं adm सारखं देजावू झाल्यासारखं झालं आणि कथेत गुंतायला आलं नाही, ती वरवरच वाचली गेली.
भ्रमाची 'कोकण....' फार सुंदर झाली आहे. मालवणी संवादांमुळे वाचताना मजा आली. त्याने सगळ्यांच्या मनातल्या भावनांना मूर्त स्वरूप दिले आहे. पण जगनचं स्वप्नं खरं न होवो हीच देवाजवळ प्रार्थना.
सुमॉच्या 'देवी' चं कथासूत्र बर्‍याच कथांमध्ये वापरून गुळ्गुळीत झालं आहे. पण लिखाणाची शैली आणि हातोटी अगदी वाखाणण्यासारखी...
अश्विनीने 'त्रिशंकू' अगदी मस्त लिहिली आहे. कथासूत्र खूपच आवडलं. पण अजून फुलवता आली असती. कथा अ‍ॅब्रप्टली एण्ड केल्यासारखी वाटली. हेच 'स्वप्नपरी...' च्या बाबतीतही म्हणता येईल. अजुन वेगळ्या स्तरावरचे तुलनात्मक प्रसंग कथेत मांडता आले असते. खुपच जनरल कम्पॅरीझन झालं आहे. ह्या दोघींकडून अजून लिखाणाची अपेक्षा आहे.

'गड आला सिंह गेला' अगदी हहपुवा... शाळेत असताना किंवा सोसायटीत गणेशोत्सवात नाटुकली बसवायचो त्याची आठवण झाली. काही काही संवादांवर मी अशक्य हसले... :-)

'दिगूलीला'च्या अभिप्रायांसाठी सर्वांना अनेक धन्यवाद. ;-)

गड आला, स्मिता, आवडले, सुंदर.
वन स्ट्रोक पेंटींग क्लास आहे , अप्रतिम. !!!

दिवाळी अंकाला हातभार लावलेल्या सर्वांचे अभिनंदन. अंक वरवर चाळलाय केवळ. देखणा आणि नेटका अंक.
शर्मिला,
राही च्या स्फोटक व्यक्तिमत्वाची चांगली ओळख करून दिलीयेस. त्याच्याबरोबर तुंबाडवर थोडं काम करणार होते मी तेव्हा आम्ही भेटलो होतो. आज मुलाखतीतून परत भेटला हा हिरा!

अनुभूतीबद्दल...
त्यातला रंग तरंग भागच बघितलाय पूर्ण अजून. अप्रतिम यात काही वाद नाही. पण काही गोष्टी पुढच्या वर्षीच्यासाठी.
ग्लास पेंटींगचं प्रेझेंटेशन/ स्क्रिप्ट सोपं आणि मुद्देसूद. विषय मांडणे, उलगडवणे आणि पूर्ण करणे सगळंच यथास्थित. रंगांच्या बाबतीत म्हणाल तर खालचा पांढरा कागद कधी निळसर कधी दुधी पांढरा दिसणे इत्यादी गमती आहेत पण हॅन्डीकॅमवर याहून काही मिळणार नाही. कॅमेरा अजून स्टेडी ठेवता आला असता तर बरं झालं असतं रे सत्या.

जलरंग - अजयच्या पेंटीगच्या कौशल्याबद्दल काही शंकाच नाहीये.
प्रेझेंटेशनमधे मात्र खूप काही खटकलं.
१. प्रेझेंटेशनचं स्क्रिप्टींग असायला हवं होतं - सुरूवात कशापासून, जलरंगाच्या तंत्राची वैशिष्ठ्ये, घ्यायची काळजी, तंत्रातले छोटे छोटे भाग/ पायर्‍या सुट्या दाखवणे, ब्रश कसा पकडायचा ते रंगांचं मिश्रण कसं करायचं असे मुद्दे, प्रत्येक वेळेला पूर्ण कागद/ चित्राचा एक भाग/ ब्रश फिरणारा भाग यातलं नक्की काय दिसायला हवं याचा आराखडा हे सगळं या स्क्रिप्टिंगमधे आवश्यक आहे.

२. व्हॉइसओव्हर असायला हवा होता - तंत्र समोर वापरलं जात असताना त्यातले बारकावे, त्याची पद्धत, पायर्‍या हे सांगणारा आवाज बरोबर असायला हवा होता.

३. प्रकाशाचा व रंगांचा विचार असायला हवा - जलरंगांसारखं फसवं/ हलतं (जलरंगात काम करणार्‍या प्रत्येकाला याचा योग्य तो अर्थ कळेल..) माध्यम समोर असताना जे जसं आहे तसंच दिसायला हवं असेल तर ज्याच्याद्वारे हे लोकांना दिसणार आहे त्या तंत्रामधे खूप Sophistication असणे गरजेचे आहे. हॅन्डीकॅमचा उपयोग नाही. मधेच कागदाचा पांढरा बर्न होतो तर मधेच त्याला निळी छटा येते. कागदावरचं रूपरेषा म्हणून आखलेलं स्केच दिसतच नाही. निळा रंग हा तसाही फसवा असतो आणि हॅन्डीकॅममधून तो प्रत्येक वेळेला वेगळा दिसतो. यामुळे बघणार्‍याला वेगळ्या रंगाचं मिक्सिंग केलंय असं वाटत रहातं. हे टाळलं जायला हवं.

वन स्ट्रोक पेंटींग -
मस्त टेक्निक, फारच आवडलं. दिसताना सोपं दिसत असलं तरी हातात बसायला भरपूर प्रॅक्टीस करावी लागणार हे लक्षात येतंय.
रंग कुठले वापरले आणि पाण्याचं/ मिडियमचं प्रमाण याबद्दल थोडे तपशील अजून यायला हवे होते.
मधलं म्युझिक खूप मोठं आणि व्हॉइसओव्हर खूप कमी आवाजात असं झालंय. ते टाळता येऊ शकतं.
बाकी प्रकाश आणि रंग या बाबतीत वरचाच मुद्दा क्र. ३ थोड्याफार प्रमाणात आहेच.

अजय किंवा रेणुकावर टिका म्हणून हे सांगत नाहीये. या विषयातली किंचित माहीती असल्याने हे सुचवते आहे. अगदी थोड्या पैशात, थोड्याश्या एफर्टसमधे यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकतं. आपल्या घरच्या कॉम्पवर बेसिक एडिटींगचं सॉफ्टवेअर टाकून घेता येऊ शकतं. त्यालाही फारसा खर्च येत नाही. पण हे केल्याने पूर्ण क्लिपमधे खूप चांगला फरक पडू शकतो. हौशी पातळीवर असलं तरी जे सांगितलं जातय त्याचा दर्जा जर अत्यंत 'प्रो' असेल तर केवळ तंत्रज्ञानात मार का खायचा?

पुढच्या वर्षीच्या लोकांसाठी सूचना असं समजा हवं तर.

'ती...स्वप्नपरी..!' ही कथा विषयाच्या दृष्टीने आवडली. लेखनशैली चांगली असली, तरी मांडणी साचेबद्ध झाली, असे वाटले. 'नेहेमीचे यशस्वी' मुद्दे घेऊन कथा फुलविण्याचा प्रयत्न केल्यामुळे असे वाटले का, ते मला सांगता येणार नाही.

अजुन वेगळ्या स्तरावरचे तुलनात्मक प्रसंग कथेत मांडता आले असते. खुपच जनरल कम्पॅरीझन झालं आहे. >>>> हम्म अस झालय खर. पुढच्या वेळी अजुन विचार करता येईल. :)

बाकी अंक मस्तच. जमेल तसा वाचतेय.
त्रिशंकु, दिगुलिला, सावर रे, गड आला, भ्रमर च कोकण मस्तच
बाकी अजुन वाचायच बाकी आहे. विकेंडलाच फक्त घरुन बघता येत असल्याने वाचण्याचा स्पिड कमालीचा मंदावलाय

केवळ अप्रतिम अंक!
पहिलं पान निरखलं, आणि संपादकीय वाचायला घेतलं... मधेच कधीतर"बहू असोत" मागे सुरू झालं आणि जो काटा आला अंगावर.....
अतीव देखणा अंक झाला आहे. अख्ख्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवादही. जगभर विखुरलेल्या मुठभरांनी जगभर विखुरलेल्यां मराठी मनांसाठी निर्माण केलेला हा सुखाचा, विरंगुळ्याचा ठेवा...
हे सगळे जड शब्दं जाऊदे..... अगदी अगदी खर्रं, मनातलं सांगायचं तर दिवाळी अंक चाळला आणि ह्यासाठी श्रमलेल्या सगळ्यांना एक गच्चंम मिठी माराविशी वाटली :)

ट्युलिपचं "लव्ह साँग" वाचलं आणि... आणि काही नाही! तिचं वाचल्यवर जे होतं तेच परत एकदा झालं... नि:शब्दं बसून राहिले. त्यातल्या मधुमालतीच्या गुलाबी पाकळ्यांसारखी कल्पना, त्यातले शब्दं, वाक्यं झिरमिळत राहिली.... आज आता दुसरं काही वाचायचं नाही असं ठरवलं... अगदी इमेल सुद्धा नाही!

"आठवणीतली नाटकं" लेख आवडला! बालरंगभूमीची आवर्जून दखल घेतल्याने फार बरं वाटलं. बालरंगभूमी दुर्लक्षित राहणं खरंच दुर्दैवी आहे. सुधाताईंच्या उन्हाळी सुटीमधल्या एका अभिनयशिबिरात मी (बहुतेक ४-५वीत) सहभागी झालो होतो. अजूनही त्यातल्या काही काही गोष्टी आठवतात.
अनुषंगानेच पण अवांतर - मराठीला "वाचवण्यासाठी" जे काही बरे-वाईट प्रयत्न वगैरे चालू आहेत, त्यात मलातरी कुठे "मराठी बालरंगभूमी" बद्दल काहीच ऐकण्यात, वाचण्यात आलं नाही. भाषा जर वाढवायची असेल, जगवायची असेल (ही खरं तर द्विरुक्ती आहे, वाढल्याशिवाय जगणं शक्य नसते) तर ती नव्या पिढीत रुजवली पाहिजे, आणि त्यासाठी बालरंगभूमीचा विलक्षण उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. असो...

संगीत नाटकांवरचा लेखही फार फार आवडला! ती ध्वनीफीत तर अप्रतिम...

कर्नल बकरेंची मुलाखतही छान आहे. डॉ. अनिल पांडेंची मुलाखत अजून पूर्ण वाचून झाली लाहिये. पण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद! नाहीतर आजकाल "यश" आणि "प्रसिद्धी" (सक्सेस आणि फेम) यामधला फरकच कळेनासा झाला आहे...

'मर्मबंध' वाचून झाले.
सर्वच कविता छान आहेत. Bhau Namaskar, swaatee_ambole, Satyajit_m, asaneman, Girish Kulkarni इत्यादींच्या विशेष आवडल्या.
(वि.सू. - कवितांमधले फार जास्त कळत नाही. :) )

संपादकीय आवडले, हे सांगायचे राहून गेले होते.

(वाचक मोड सुरुच..)

अगदी दर्जेदार आहे आपला दिवाळी अंक. खूप वाचनीय. जगभरातील मराठी वाचक आपल्याला नक्कीच धन्यवाद देत असतील.

सर्व दिवाळी संवाद वाचून झाले. वैशालीची व अजय अतुल ची मुलाखत वाचताना तबस्सुमची आठवण झाली. काही साचेबंद प्रश्न अन काही खास भोचक, खोचक प्रश्न यांचं मस्त मिश्रण असायचं तिच्या मुलाखतींमधे. या दोन्ही मुलाखती प्रेडिक्टेबल वाटल्या. वैशाली मायबोलीवरच्या कविता वाचत असते हे वाचून तिच्याबद्दल आदर वाटला!

कर्नल बकरे यांच्या मुलाखतीत त्यांच्या पोस्टिंगबद्दल अजून वाचायला आवडलं असतं.

विद्या बाळ व राही बर्वे यांच्या मुलाखती खास जमल्या आहेत. राही बर्वेंचं लिखाण मिळवून वाचायला लागणार.

डॉक्टर अशोक पांडे यांच्या मुलाखतीत या क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍यांसाठी मार्गदर्शक असे काही प्रश्न असायला हवे होते - या क्षेत्रात काम करायचं असेल तर शैक्षणिक पात्रता काय लागते, नोकरी शोधायची असेल तर कशी शोधावी, नोकरीत बढतीचे, चौफेर अनुभव मिळण्याचे चांसेस कसे असतात इत्यादी. ही मुलाखत नव्या पिढीला आकर्शित करायची चांगली संधी होती डॉ पांडे यांच्यासाठी.

मुलाखती घेणार्‍या, त्यांचं शब्दांकन, मुद्रितशोधन करणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

किल्ला - लहानपणीच्या किल्ल्याच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आम्ही सुद्धा अशाच प्रकारे एक शहरच तयार करत होतो. दिव्यासह रस्ते, विमानतळ, पूल, नदी, तलाव, घरे, रेल्वे, असे एक छोटेसे शहरच
असे. रस्त्यावर खांब व त्यावर छोटे दिवे लावत असू. ह्यात एक किल्लासुद्धा असे व त्याच्या मागे एक माठ, हा आमच्या नदीचा उगम. गाव सारे औषधाच्या रिकाम्या खोक्या पासून करत होतो. त्यासाठीचा कच्चा माल जवळ जवळ वर्षभर गोळा करत असू. आपल्या लेखाने मला ४०-४५ वर्षे मागे नेले, त्यावेळेचा तो किल्ला ते गाव डोळ्यासमोर उभे राहिले. त्या आठवणी पुन्हा आल्या. आजही मी त्याच ठिकाणी रहातो पण तसे हल्ली कोठेच दिसत नाही. हे सारे करायला अंगणेच नाहीत, असलीच तर उत्साह नाही, दूरदर्शनने सारीच दुर्दशा केली आहे. श्रावणभाऊ लेखाने आठवणी जागवल्या, मनःपूर्वक धन्यवाद.

देखणा दिवाळी अंक, अभिनंदन संपादकांचे !!
'अ लव्ह साँग' वाचले, केवळ अप्रतीम.

कोकणवा हमार. कोकणच का सार्‍या महाराष्ट्राचीच परिस्थिती अशी आहे. आपण आपले मराठीपण हरवत चाललो आहोत. भोंडला म्हणजे काय हे आज सांगावे लागेल पण गरबा दांडिया सार्‍याना माहीत.
आपण मराठी आहोत आपलीही काही संस्कृती आहे आचार आहेत सण आहेत हे आपण विसरून गेलो आहोत.

विनोद कोठेही दिसत नाही
हे म्हणजे चकली शिवाय फराळ करावा लागावा अस्से आहे

अंक अतिशय सुरेख झला आहे.गड आला..नाटिका खुपच धमाल आहे.प्रकाश नरायण सन्तच्या लिखाणाची आटवण आली. अन्क अजुन वाचुन झाला नाही पण सुन्दरच असेल.

सुंदर, दर्जेदार अंक. सर्वांनीच खूप जीव ओतून निर्मिलेला. आवडला. मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
मर्मबंध, स्पंदन हे जास्त आवडले. संपादकीय व संवादही छान आहेत.
अजून काही वाचायचे आहे.

खुपच छान.....

संपादक मंडळाचे मनःपुर्वक आभार,
असा छान अंक काढल्याबद्दल.

वाचतो आहे सावकाश....

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

इतक्या सुंदर दिवाळी अंकाच्या संपादनाच्या कामात हातभार लावायची संधी दिल्याबद्दल प्रमुख संपादकांचे आणि सहकार्याबद्दल संपादकमंडळातील इतर सहकार्‍यांचे आभार.

आणि स्पेशल थॅन्क्स दिव्याला. तिने अतिशय सुंदर व सुयोग्य रेखाटन लव्ह सॉन्ग साठी करुन दिल्याबद्दल.

आजच राही बर्वेची मुलाखत वाचली. चांगली झाली आहे. त्याचा आगावपणा म्हणा, स्पष्टवक्तेपणा म्हणा आवडेलसा आहे. काहींना चुंबकीयही वाटू शकतो. नंतर आख्यान विभागात घुसलो. गड आला, पण सिंह गेला वाचली. महाविद्यालयीन आहे. छान आहे.

साहित्याची आरास फारच सुंदर केली आहे सार्‍या साहित्यिकांनी. प्रत्येक पणतीचा वेगळा प्रकाश वेगळे तेज. सार्‍यांचे मनःपूर्वक आभार. आवडलेल्या सार्‍यांचे प्रिंट्स घेऊन ठेवले आहेत व ध्वनिरूप रिअलप्लेअर मध्ये रेकॉर्ड केले आहे. याआधीचे अंक कोठे वाचावयास मिळतील ?
तसेच संपादक मंडळास एक विनंती शक्य असल्यास याआधीचे काही अंक मिळून एक छापील अंक करावा. चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटते.

सर्वांग सुंदर झालाय आपला दिवाळी अंक! जबरदस्त आवडतोय (अजुन पूर्ण वाचुन झाला नाहीये). श्रेयनामावलीतील सगळ्यांचे अभिनंदन आणि सगळ्यांना धन्यवाद.
ट्ण्या 'वारी' आणि 'गड..' वाचल्यावर तुझं लिव्हिंग सर्टिफिकिट दाखवल्याशिवाय तू खरच शाळा पास झालायस हे मानणं कठीण आहे. 'गड....' वाचतांना हहपुवा. 'सारे प्रवासी घडीचे' मधल्या बागाईतकर मास्तरांचे सुगीचे गाणे ('हावभावांसहीत म्हणण्याचे गाणे') फार फार आठवलं.
साजिर्‍या 'फॉर ऑल दोज..' जबरदस्त जमलय. कितीतरी आठवणी जागवल्यास.
'दौलु' आणि 'भेळ' सुद्धा मस्त जमलेत. अभिनंदन.

अजुन इतकच वाचलय. जसं वाचत जाईन तसं आणखी लिहीन.

क्ष... केवळ सुंदर आणि अभ्यासपूर्णं लेख! (प्रिंट काढून घेऊन सबुरीने परत वाचला).
फ, एक पेण्सिल आणि चार खोड-रब्बरवाल्या माझ्या चित्रकलेतल्या बुद्धीला खूपच झाली त्यातली माहिती. पण... त्यासाठी केलेलं संशोधन, अभ्यास, त्यामागची तळमळ आणि धडपड... बुद्धीच्या पार पोचलीच.
शर्मिला, झाडांवरचा लेख मस्तच आहे. माझ्या आईला झाडा-पानांचा सोस आहेच आणि माहितीही. तिला वाचायला दिला.
(त्यातला पिवळा धम्मक केळीचा घड बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं!)

'स्पंदन' कालच वाचून झालं होतं. पण काल जमलं नाही प्रतिसाद द्यायला.

मनोहर सप्रे आणि रस्किन बाँड यांच्याबद्दल वाचायला मनापासून आवडले. या दोघांबद्दल आजवर वाचले नव्हते. आता आणि त्यांच्या लिखाणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. स्मिता पाटीलवरचा लेख सुंदर शैलीमुळे लक्षात राहिला. त्यातली काही माहितीही माझ्यासाठी नवीन होती.

'सुसूत्र' आणि 'मांजरपण' वेगळा विषय म्हणून आवडले. खुसखुशीत अगदी. 'किल्ला' काही दिवसांत ऐतिहासिक दस्तावेज होईल की काय असे वाटले. गणपतीतही आम्ही हे किल्ले करत असू, त्यावेळची धामधुम आठवली, शिवाय किल्ला राखायला एक जण रात्रभर जागायचा, अंगणातला अख्खा चौक व्यापल्यामुळे मोठे लोक ओरडायचे हेही आठवले.

'वॉर अँड पीस' वाचून अक्षरशः स्तंभित झालो. हे कुठे परदेशात नाही तर माझ्याच इथे, आजूबाजूला नेहेमी घडत असते. पात्रे बदलतात, प्रसंग तोच. भाषांतरित साहित्य याआधी दिवाळी अंकात आले होते की नाही, हे माहिती नाही; पण हा 'भाषांतरित' विभाग यापुढेही हवाच हवा.

बाकी, बाप माणूस वाचून माझेच वडील, दौलू वाचून आमचे लहाणपणीचे भिकामामा आठवले.

भेळ वरून आठवले. 'कल्याण भेळ'ने इथे 'शोरुम्स' वाटतील, अशी आऊटलेट्स चालू केली आहेत. अप्रतिम चव. नुसती पाणीपुरी किंवा 'वन्-बाय्-टु' भेळ खायला गेलेली माणसे पोट फुटेस्तोवर चरूनच बाहेर येतात. :)

असो. आता 'प्रिय अमुचा' वाचायला घेतो आहे.

(वाचक मोड सुरुच..)

फार छान अन्क
चन्द्रा

हुश्श, आज संपला वाचुन.

अगदी छान जमलाय अंक. सगळ्यांची मेहनत दिसते आहे. श्रेयनामावलीतील मंडळी, सर्व लेखक आणी कवी मित्र-मैत्रिणी यांचे अभिनंदन.

माझ्या कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :-)

आपल्या दहा दिवाळी अंकांतील उत्कृष्ट साहित्य घेउन एक विशेषांक काढता येईल का?