कथा

चिठ्ठी

म्हन्जे काय झालं होतं की किल्लीचं आणि माझं भांडण झालेलं. आता माझी बेस्टंबेस्ट फ्रेंड कोण हे आमच्या शाळेतल्या टिचर्स रूममधे जाऊन विचारलंत तरी कळेल... किंवा आमच्या गल्लीतल्या किंवा किल्लीच्या आळीतल्या कुठल्यापण बाईला विचारा. 'सारख्या काय गं कुचूकुचू बोलत असता?' हे वाक्य आमच्यासाठी खास आहे. शाळेतल्या सगळ्या बाई ते जस्संच्या तस्सं म्हणतात... त्यांच्या त्यांच्या तासाला. असं म्हणल्यावर आम्ही निदान दीड मिनिट गप्प बसतो, म्हणून का काय, काय माहीत ?! पण त्यामुळं आमचं बोलणं शाळा संपली तरी संपतच नाही. मग शाळा सुटली की आम्ही सायकलवर गप्पा मारत जातो माझ्या घरापर्यंत. मग सायकली पुढच्या अंगणात लाऊन मग तिथं गप्पा मारतो थोडा वेळ. मग आई आतून ओरडती, "असं करायचं ना, शाळेतच थांबायचं सायकलीला टेकून गप्पा मारत! मी आणि किल्लेदार वैनी दुधाचे पेले आणि पोह्याच्या बशा घेऊन तिथंच आलो असतो." मग आम्ही सायकली लाऊन आत जातो. हातपाय धुवून दूध आणि पोहे खातो. तेंव्हाही आई साडेतेरा वेळा सांगती की आधी खा आणि मग बोला. मग किल्ली घरी जाती. आता ती मला सोडायला घरी आली म्हणल्यावर मला पण जायला पायजे की नाही ? मग आम्ही थोड्या वेळ तिथं पण गप्पा मारतो. मग किल्लीची आई ओरडती, "अगं बसून अभ्यास करा. नुसतं हिकडून तिकडं, तिकडून हिकडं ! आणि काय गं? साऽऽऽरखं कुचुकुचू काय बोलता गं?"

अभ्यासाचं नाव काढल्याबरोबर मी आपली सायकलीवर जाऊन बसतेपण. मग किल्ली मला आळीच्या तोंडापर्यंत सोडायला येती. मग गप्पा संपल्या असतील तर बरं, नाहीतर आम्ही तिथंपण थोडा वेळ बोलतो. आमच्यासारख्याच अजूनपण आमच्या आणि बाकी शाळांच्या पोरीपण असतात अशा सायकलींवरून चकरा मारत. पण आमच्या आईसाहेबांना वाटतं, आम्हीच तेवढ्या सारख्या बोलत असतो कुचूकुचू.

हां, तर त्या दिवशी माझं आणि किल्लीचं भांडण झालेलं... मी तिच्याऐवजी नवीन आलेल्या साळुंकेच्या शेजारी बसले म्हणून. किल्ली उशिरा आलेली त्या दिवशी. आता मी कशाला स्वतःहून बसतीय! बाईंनीच बसवलं होतं. म्हणे, सारखं कुचूकुचू करत असता, आज बस हिच्याशेजारी. नवीन पोरगी आहे म्हणून कमी बोलेल असं बाईंना वाटलं का काय काय माहीत?!

साळुंके पण भारीच निघाली एकदम. तिच्या वहीच्या मागच्या पानांवर गणपतीची वेगवेगळ्या नावांनी काढलेली चित्रं होती. तिच्या मामानं काढलेली. ती नावंपण म्हणे गणपतीचीच असतात आणि ती मोडनिंबवरून आलेली आमच्या शाळेत. तिथं म्हणे एवढी गर्दी नाहीये. मस्त शांत वाटतं. पण हे खूप मोठं गाव आहे. रात्री नऊ वाजतापण रस्त्यावर लोक असतात कितीतरी. म्हणून तिला मस्त वाटतंय. बल्यासारखाच तिला पण एक मोठा भाऊ आहे. तिचे आज्जीआजोबा आणि मामापण इथंच राहतात... भवानी पेठेत.

"अय्या ! म्हणजे आमच्या घराच्या जवळच की. मग तू येत जा नेहमी घरी," असं मी म्हणलं. इतक्यात बाईंचा आवाज आला, "कुठंही बसवा, कुचूकुचू चालूच. उठ गं बाई, त्या किल्लेदारच्याच शेजारी बस. हिला बिघडवू नकोस आणि!"
मी उठून किल्लीच्या शेजारी बसले तर बोलेचना माझ्याशी. अरेच्या! आमचं भांडण व्हायचं कधीकधी पण बोलणं बंद? आता ही पनिशमेंटच झाली की नाही? मी कित्ती म्हणलं, अगं बाईंनी बसवलेलं. पण नाहीच. मग मला एक आयडिया सुचली. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर आमचा ग्रूप साखळीपाणी खेळतो ग्राऊंडवर. मी टोल व्हायच्या थोडी आधीच वर्गात आले. माझ्या वहीतलं मागचं पान फाडून त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं "सॉरी" आणि तिच्या कंपासमधे ठेऊन टाकलं. टोल झाल्यावर सगळे वर्गात आले. किल्ली कंपास कधी उघडतेय त्याची मी वाट बघत होते. ती आपली पलीकडच्या बाकावरच्या स्वाती जोशीशी बोलत होती. तेवढ्यात बाई आल्या. मग तिनं पेन काढायला कंपास उघडला. पेन उचललं आणि कंपास बंद केला. आतली चिठ्ठी बघितली का नाही काय माहीत?! माझ्याकडं बघितलंच नाही. मग फार बोअर झालं. तिला पण होत असणार. मला काय कळलंच नाही.

आता शाळा सुटल्यावर मी 'घरी बरोबर जायचं का कसं' याचा विचार करत नखं खात उभारले होते वर्गाबाहेर. ती सायकल स्टॅंडकडं गेल्यावर मी गेले, तर ती सायकल हातात धरून वाट बघत होती. मी सायकल काढली आणि आम्ही निघालो. तिच्या घराचा रस्ता आल्यावर ती वळली. फक्त म्हणाली, "दप्तराच्या वरच्या कप्प्यात बघ." मला जाम हसू आलं. आता उतरून तिथंच दप्तरात बघावं असं वाटत होतं, पण नको. घरी गेले. हातपाय धुवून सैपाकघरात गेले, तर आई म्हणाली, "काय गं, मधुरा आली नाही का आज?"
मी म्हणलं, "घरी गेली ती."
"का गं, भांडण केलंत का काय?"

आईला कसं कळलं? ती काय अगदी रोजच येत नाही घरी. मी एका वाक्यात उत्तर दिलं, म्हणून का काय काय माहीत?! मी काय विचारलं नाही. नायतर मग सगळा यडबंबूपणा सांगावा लागला असता. मी पटकन खाल्लंपिल्लं आणि माझ्या खोलीत पळाले. जाऊन दप्तर उघडलं. आत चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, "आता काय, तुला नव्वीन मैत्रीण मिळाली. मग आम्ही कशाला आठवतोय? कित्ती छान गप्पा चाललेल्या."

आईशप्पत! मी तर काय गप्पाच मारल्या नव्हत्या. फक्त वहीवरची गणपतीची चित्रं, तिचे घरचे, तिचा यडबंबू भाऊ एवढंच काय काय... आणि मारल्या गप्पा तर काय? आमच्या कित्तीतरी अजून मैत्रिणी आहेत. मधल्या सुट्टीचा ग्रूप आहे. मग याच मुलीशी बोललं, तर काय झालं काय माहीत?! मग मी पण एक चिठ्ठी लिहून ठेवली, "मग काय झालं? मी तुझ्याशेजारी बसले होते, तर तू पण स्वाती जोशीशी कित्ती मस्त गप्पा मारत होतीस." आणि दप्तरात ठेवली गुपचुप.
शाळेत गेल्यागेल्या मला साळुंके दिसली. शाळा भरायला वेळ होता अजून. म्हणून आम्ही ग्राऊंडवर गेलो. आम्ही शाळेत कुणीपण पोरगी नवीन आली की तिला 'बुचाच्या फुलांची बिनदोर्‍याची वेणी आणि पाकळ्यांचे फुगे येतात का?' विचारतो. ग्राऊंडच्या कडेनं बुचाची झाडं आहेत खूप. शाळा भरायच्या आधी आणि मधल्या सुट्टीत कोण ना कोण तिथं वेण्या करत बसलेलं असतंच. तिला माहितच नव्हतं. मला वाटलेलंच! मग आम्ही फुलं वेचली आणि कट्ट्यावर बसलो... वेणी करत. त्या वेण्या कुण्णी घालत नाही बर्का डोक्यात. त्या आपल्या चॉकलेटच्या कागदाच्या बाहुल्यांसारख्या पूर्ण झाल्या की कुठंपण पडून जातात.

शाळा भरल्यावर मी चुपचाप किल्लीच्या शेजारी बसले. ती पाणी प्यायला गेल्यावर चिठ्ठीपण ठेवली कंपासात. मग तासाच्यामध्ये साळुंके माझ्याशी बोलायला आली. 'मी तुमच्याबरोबर जेवायला येऊ का' विचारायला. मला काय, मस्तच! आमचा चॅंप्स ग्रूप अजून वाढेल. मधल्या सुट्टीत आम्ही डबे खाल्ले, साखळीपाणी खेळ्ळो आणि परत आलो. तर माझ्या कंपासात चिठ्ठी. बरंच मोठं काय काय लिहिलेलं. मी गपचुप चिठ्ठी दप्तरात टाकली... घरी जाऊन वाचायला.
घरी जाऊन खोलीत जाऊन पटकन दप्तर उघडलं. तेवढ्यात पंक्याचा आवाज आला. म्हणून मी चिठ्ठी दप्तरात ठेवली. पण सारखं दप्तर उघडून बघू वाटायला लागलं. म्हणून आज्जीच्या खोलीत गेले. तिथं फक्त देवासमोर समई असते लावलेली. मस्त उबदार वाटतं. आज्जी डोळे मिटून स्वामी समर्थांचा जप करत होती. मी जाऊन बसले तिच्या बेडवर. आता उघडावं दप्तर तर तेवढ्यात तिनं डोळे उघडले. मग पाठीवरून हात फिरवत हातावर खडीसाखर ठेवली. आता काय बरं करावं? मी पुन्हा माझ्या खोलीत आले. तर माझ्या मागून पंक्यापण आला.

लाडू तोंडात ढकलत त्यानं विचारलं, "काय खास आहे गं तुझ्या दप्तरात?"
मी दचकलेच. याला कसं कळलं? आता असं त्याला डायरेक्ट विचारायला मी काय यडचाप नाहीये. मी नेहमीच्याच कॉन्फिडन्सनं म्हटलं, "हॅ! काय खास असणार? पुस्तकं आहेत शास्त्र आणि गणिताची. घे वाच."
"गपे! अशी दप्तर घेऊन काय फिरतीय घरात? एका खोलीतून दुसर्‍या खोलीत... आणि अभ्यास करतच नाहीस तर दप्तर कशाला पायजे बरोबर सारखं?"

मी धोका ओळखून पळत सुटले अंगणात. पण मोठ्या चुलतभावाशी तुम्ही कधी रेस जिंकलायत का? मी पण नाही. म्हणजे त्या दिवशी तर नाहीच. पंक्यानं दप्तर ओढलं. तिथंही मी थोडी फाईट दिलीच. पण मी कुठली फाईटपण जिंकले नाहीये कधी... म्हणजे पंक्याशी. शाळेत जिंकते कधीकधी. दप्तर हातात आल्यावर त्यानं मला ढकललं. मी ते काय दप्तरात होतं ते पळवून नेईन म्हणून का काय काय माहीत?!
पण तोच म्हणाला, "लांब रहा हां तू! नाहीतर चावशील बिवशील."

मी एकदा त्याच्या हाताला चावले होते फाईटमधे, पण ते खूप लहानपणी... माझं मोराचं चित्र बघून तो "पोत्यातून नाग बाहेर आल्यासारखा दिसतोय" म्हणला होता आणि बल्या म्हणला होता, "पोतंपण गळकं गव्हाचं," आणि तो आणि बल्या गडाबडा लोळले होते हसून हसून... आणि चित्र पण सोडेना हातातून... तेव्हा. आता कुठल्याही बहिणीनं हेच केलं असतं ना? असे वण उमटले. रक्ताचा पण ठिपका आला एक. सॉलिड घाबरले होते मी. आता आई आणि काकू मिळून माझी एकदम म्यागी नूडल करून टाकणार म्हणून. पण पंक्यानं त्यांना सांगितलंच नाही. बल्या निघाला होता आईकडं, तर त्यालापण नाही जाऊ दिलं. "जाऊ दे रे, या भैणी असल्याच रडूबाई असतात," म्हणला.

तर मला ढकलून पंक्या दप्तर अंगणात मोकळं करणार होता, तेवढ्यात मी म्हणलं, "आण, मी दाखवते काय आहे ते."
मग मी आतल्या कप्प्यातून हळूच एक घडी घातलेलं वहीचं पान बाहेर काढलं आणि पंक्याला दिलं आणि तोंड डाळिंबाच्या झाडाकडं करून उभी राह्यले. आता मला म्हाईती होतं की तो तो बल्याला हाक मारून दोघं कट्ट्यावर बसून जोरजोरात हसणार, लोळणार... नेहमी असं करतात मला... आणि चिडले की आहेच मग, या पोरी ना...
माझं तोंड अजून डाळिंबाच्या झाडाकडंच. खूप वेळ गेला. जवळजवळ सव्वाआठराशे सेकंद तरी. तरी पंक्याचा आवाज येईना. म्हणलं, आता झाली जाहीर महासभा माझ्या चिठ्ठीची. म्हणून मी मागं वळले. तर पंक्या तिथंच उभा होता आणि... चक्क डोळ्यात पाणी! मी यडबंबूसारखी बघत राहिले. मग एकदम डोळे पुसून म्हणला,

"त्या किल्लीनी लिहिलीय ही चिठ्ठी? ती रोज येती तुमच्या घरी ती ना? गोरी? लांब दोन वेण्या वाली?" त्यानी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. पंक्याचं घर शेजारीच आहे, त्यामुळं त्याला सगळं माहीत असतंच.
"हो रे. असू दे. दे इकडं," मी चिठ्ठी हिसकवायचा प्रयत्न केला आणि चक्क पंक्यानी लगेच दिली!
मी वाचायला लागले. छोटं पत्रच होतं ते...

प्रिय मैत्रिण पल्लूस,
('शि सा न वि वि राहिलं,' मी पत्रलेखन आठवून मनात म्हणाले.)
इतके दिवसांची आपली मैत्री. आपण सगळ्या मज्जा शेयर करतो. डबापण शेयर करतो. ती नवीन मुलगी आली की सगळं गेलं ना! तुला नवीन मैत्रीण मिळाली आता. आता काय, डबा खायलापण ती बरोबर. आता तर तुला जुन्या मैत्रिणीची गरजच नाही आणि तू मला विसरून जाणार असंच मला वाटतंय.

तुला बसायचं असेल तर बस तिच्याशेजारी आणि मी आता तुझ्याशी बोलीनपण. त्यात काय? बाकीच्या मुलींशी बोलते तसं तुझ्याशीपण बोलीन. 'रुसायचं ते आपल्या माणसांवर. जर फरकच पडणार नसेल, तर कशाला रागावायचं?' असं आमची आई म्हणते.

त्यामुळे उद्यापासून तुझ्याशी बोलायचं मी ठरवलंय. फक्त आता गमती शेयर करण्याआधी विचार करीन.

तुझीच (जुनी) मैत्रीण मधुरा

किल्लीचा मराठीत नेहमी हाय्यस्ट असतो, हे डोळे पुसताना मला आठवलं.

पंक्या यडपट अजून तिथं उभारला होता. मी बघितलं की म्हणला, "कित्ती इमोशनल आहे तुझी मैत्रीण!"
"असू दे," मी तुसडेपणानी म्हणलं.
"मी तुला मज्जा सांगतो ती ऐक. म्हणजे नो प्रॉब्लेम."
मग मी दुसर्‍या दिवशी शाळेत जाताना किल्लीच्या घरी गेले. तिला घाई करून आम्ही लौकर शाळेत पोचलो.
ती जास्त बोलत नव्हतीच काय. सायकल लावली. साळुंके दिसलीच कट्ट्यावर. मी किल्लीला हाताला धरून तिच्याकडं नेलं.

"ए साळुंके, ही ना माझी बेस्टंबेस्ट फ्रेंड किल्ली. हिलापण तुझ्या वहीतली गणपतीची चित्रं दाखव ना."
आधी किल्ली जरा मागं उभी राहिली, पण मग चित्रं बघून पुढं आली. मग साळुंकेनं तिलापण तिच्या मामाची चित्रं, तिचं घर असल्या गमती सांगायला सुरुवात केली. त्या बोलत असताना मी पाणी पिऊन आले, तरी त्यांचं चाललेलंच. मग मी आल्यावर किल्ली म्हणली, "हिनीपण एक सायकल घ्यायला पायजे ना? मग आपण तिघी मस्त साखळी करून येत जाऊ शाळेत." मी खूष! पंक्या हुषारच आहे.

असं मी त्याला संध्याकाळी म्हणलं, तर डोक्यावर जोरात खारीक देऊन म्हणला, "गमतींसारख्या आणि डब्यासारख्याच मैत्रिणीपण शेयर करायच्या असतात बेस्ट फ्रेंडशी, यडपट!" आणि हसला गेटकडं बघून. मी बघितलं तर किल्ली सायकल लाऊन गेटमधून आत येत होती.

- sanghamitra

लेखन प्रकार: 

निरीक्षक

हे होईल अशी शंका मला काही काळापूर्वीच आली होती. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे मला लहानपणापासूनच जाणवायला लागलं होतं छोट्या छोट्या प्रसंगांमधून. मला तुमच्यातलं वेगळेपण कसं जाणवलं माहितीये ? माझ्या आठवणीतला एक प्रसंग सांगतो. तुम्ही स्टडीमध्ये काँप्युटरवर काहीतरी काम करत होतात. मी तिथेच एका पुस्तकातली चित्रं बघत बसलो होतो. अंधार पडू लागला तसं तुम्ही मला लाईट लावायला सांगितलात. मी उठून तो लावला आणि बटन दाबून जेव्हा मी वळलो, तेव्हा तुम्ही माझ्याकडेच बघत होतात... अगदी रोखून. तुम्ही मला विचारलं होतं...

"तुला लाईटचं बटन माहिती होतं ?"
"नाही."
"मग तुला कसं कळलं कुठलं बटन लाईटचं आहे ते ?"
"एकाच बटनापर्यंत माझा हात पोहोचतो. त्यामुळे ते दाबलं मी."
"पण काय रे, दुसरं कुठलं बटन लाईटचं नसेल असं का वाटलं तुला?"
"दुसरं कुठलं बटन लाईटचं असतं तर तुम्ही मला लाईट लावायला सांगितलं नसतंत."

... हा प्रसंग मला लक्षात आहे, कारण तुम्ही त्यानंतर काम सोडून खूप वेळ माझ्याशी खेळत होतात. आपण बरीच चित्रं पाहिली, त्यांच्याबद्दल मला माहिती दिलीत आणि त्या चित्रांवर तुम्ही मला बरेच प्रश्नसुद्धा विचारले होतेत. मग तुम्ही जादूचे प्रयोग करून दाखवलेत... खूप मजा आली असा माझ्या आठवणीतला तो पहिला प्रसंग. पण बाबा, हे तिथेच थांबलं नाही. यानंतर मी तुम्हाला अनेकदा पाहिलं... मला न्याहाळून बघताना. पण खरं सांगा बाबा, तो प्रसंग म्हणजे तुमच्या माझ्यावरच्या प्रयोगांची नांदी होती, हो ना ?

तसा मी एक नॉर्मल मुलगा आणि तुम्ही मला वरकरणी तरी नॉर्मल मुलासारखंच वाढवलंत. वरकरणी असं म्हणतो कारण माझं लहानपण बाय एनी स्टँडर्ड्स पूर्ण नॉर्मल नव्हतं, बरोबर ? म्हणजे मी शाळेत गेलो, मित्रमैत्रिणी जमवले, दंगामस्ती केली, अभ्यास केला, हट्टही केला... एक सर्वसाधारण पोर जे करेल तसंच... अन् तरीही ते करत असतानासुद्धा माझ्या मनात कुठेतरी एक वेगळं असल्याची भावना होती. अगदी लहानपणापासूनच मी तुमचा मुलगा आहे हे कळल्यावर लोकांची नजर बदलायची, ते लगेच कळायचं. अशा गोष्टी लहान पोरांना लगेच जाणवतात. एक खूप मोठ्या शास्त्रज्ञाचा मुलगा असणं ही खास बाब होतीच. पण तेवढंच नाही. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने मला वाढवलंत त्यात काही उणीव नव्हती... पण त्यातला वेगळेपणा फक्त आपल्या दोघांनाच माहिती असेल. उदाहरण म्हणून मी पाचवीत असताना झालेला अपघात घ्या. शाळेत दुरूस्तीसाठी एक लोखंडी कठडा भिंतीला टेकवून ठेवला होता. आम्ही काहीजण तिथे खेळत असताना तो अचानक कलंडून खाली पडला... त्यात माझ्या तिन्ही मित्रांना बर्‍यापैकी लागलं, पण मला मात्र काहीच झालं नाही, कारण तो पडतोय असं कळल्याक्षणी मी उडी मारून बाजूला झालो. संध्याकाळी तुम्हाला ही घटना मी सांगितली तेव्हा...

"तुला कसं कळलं की तो कठडा पडतोय ?"
"अं... माहिती नाही. म्हणजे मला असं वाटलं की तो पडतोय आणि मी उडी मारून बाजूला झालो आणि इतरांना सांगणार तेवढ्यात तो खाली पडलाच."
"तुला खेळताना खूप कमी वेळा लागतं ना ?"
"अं... हो, म्हणजे मी कमी वेळा पडतो..."

... तुम्ही मला निरखत राहिलात. खरं सांगू, तेव्हाच पहिल्यांदा माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तुमचं ते मला निरखणं मला थोडं विचित्र वाटायला लागलं ना, ते याच प्रसंगापासून. नंतर २-३ दिवसांनी तुम्ही मला पहिल्यांदाच तुमच्या प्रयोगशाळेत घेऊन गेलात आणि मग सुरू झाले तुमचे प्रयोग, ते आजपर्यंत. पहिल्यापहिल्यांदा तुम्ही मला समोर बसवून काही चित्रं दाखवायचात आणि प्रश्न विचारायचात... मग तुम्ही मला वेगवेगळे प्रसंग वर्णन करून सांगू लागलात आणि मग विचारायचात की मी त्या प्रसंगांत कसा वागेन. मग तुम्ही मला वेगवेगळी कोडी घालायला सुरूवात केलीत... हे सगळं करताना मला मजा यायची, पण कशाचीतरी भीती वाटत रहायची. मी अस्वस्थ असायचो हे प्रयोग सुरू असताना. पण तुम्ही इतरांपेक्षा थोडे 'हटके' आहात अशी जी माझी भावना होती, त्या भावनेमुळे मी निमूटपणे हे सगळं केलं.

शेवटी, साधारण महिन्यापूर्वी तो टीव्हीचा प्रसंग घडला. तेव्हा सई होती इथे. एका संध्याकाळी गंमत म्हणून तिला मी जादूचे प्रयोग करून दाखवत होतो. ते करताना तिला मी टीव्हीवरचे चॅनेल्स बदलण्याची जादू दाखवत होतो... आपल्या टीव्हीला २ रिमोट कंट्रोल्स आहेत हे तिला माहिती नव्हते. त्यातले एक रिमोट तिच्या हातात ठेवले होते अन् दुसरे रिमोट माझ्या पायाखाली होते... त्यातली चॅनेल एकाने कमी-जास्त करण्याची बटने पायाच्या अंगठ्याने दाबायला मला व्यवस्थित जमायचे. माझे हात रिकामे, रिमोट तर तिच्या हातात असे असूनही मी चॅनल बदलायला लागल्यावर तिला जे आश्चर्य वाटले... तिचे विस्फारलेले डोळे बघून मी हसत असतानाच तुम्ही तिथे आलात... मी काय करतोय हे तुमच्याही लगेच लक्षात आलं, पण तुम्ही तरीही माझ्याकडे निरखून बघू लागलात... सईलाही ते जाणवलं, बाबा. तो खेळ मला बंद करायला सांगून तुम्ही मला लगेच प्रयोगशाळेत घेऊन गेलात आणि ते सेन्सर्स लावून पुढचा तासभर तुम्ही कसली रीडिंग्स घेत होतात ते मला तेव्हा कळलं नाही... पण त्यावेळी ती अनामिक भीती खूप तीव्र झाली. तिचं रूप अधिक स्पष्ट झालं तेव्हा. मला जी भीती होती ती तुमचीच होती बाबा... तुमच्या वेगळेपणाची भीती. हे इन्स्टिंक्ट कसं आलं, कुठून आलं हे तुमच्यासारख्या उच्च दर्जाच्या मानसशास्त्रज्ञाइतकं दुसर्‍या कोणाला कळेल?!

त्या प्रयोगाच्या दुसर्‍याच दिवशी तुम्ही मला सीटीस्कॅन करायला घेऊन गेलात. 'असं करावं हे अचानक तुमच्या मनात का आलं ?' या डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही 'मला त्याच्यात काही सिम्प्टम्स दिसलेत' एवढंच दिलंत... तुम्ही स्वतः मूळचे एक डॉक्टर, त्यात थोर वैज्ञानिक... तुमच्याशी कोण वाद घालणार ? त्या स्कॅनचा रिपोर्ट मला माहितीये. कसा, ते मला सांगता नाही येणार, पण असं समजा की माझं तुमच्याबद्दलचं इन्स्टिंक्ट इतकं तीव्र होतं की त्याने हे माझ्याकडून करवून घेतलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझ्या डोक्यात एक ट्यूमर आहे... एक अनैसर्गिक वाढ! बरोबर? अनैसर्गिक... हं! काय अनैसर्गिक आणि काय नैसर्गिक हे कसं ठरवायचं हो बाबा? मी तुमचा जीवशास्त्रीय मुलगा नसून तुम्ही मला तुमचा दत्तक मुलगा म्हणून वाढवलंत हे नैसर्गिक... की मला ट्यूमर आहे हे कळूनही तुम्ही माझ्यावर पुढील काही उपचार सुरू केले नाहीत हे नैसर्गिक? की तुम्ही त्या दिवशीच घरभर क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवले हे नैसर्गिक? उपचार टाळणे आणि कॅमेरे बसवणे या दोन घटनांमुळे तर 'तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात' ही माझी भावना अगदी दृढ झाली. पण मी काय करू शकत होतो? गेल्या महिन्याभरापासून तुम्ही मला या घरात अडकवून ठेवलंय... हो, मला माहितीये की मी इथे बंदी आहे.

बाबा, मला हे माहितीये की मी तुमच्या संशोधनाचा केवळ एक भाग नव्हतो, तर मीच तुमच्या संशोधनाचा विषय होतो. तुम्ही मला इथे बंद करण्याआधीच मी प्रयोगशाळेतला आतापर्यंतचा सगळा डेटा, तुमची त्यावरची टिप्पणी सगळं वाचलंय... तुम्हाला हे खरं वाटत नाहीये, बरोबर? पण असं बघा... मी आता तुमच्याशी बोलताना काही विशिष्ट प्रसंगांचीच निवड का केली? कारण तुमच्याच मते, तुमचा संशोधनाच्या इतिहासात हे प्रसंग महत्त्वाचे आहेत म्हणूनच. लाईट लावण्याचा प्रसंग महत्त्वाचा होता, कारण मला माहिती नसूनही मी तुम्हाला 'लाईटचे बटन कुठले?' हा स्वाभाविक प्रश्न विचारला नाही. 'तुम्ही ज्याअर्थी मला काम सांगत आहात, त्याअर्थी ते मला शक्य असणारच. तेव्हा जे अशक्य आहे ते वगळून उरलेली शक्य गोष्ट करणे' असा विचार मी त्या लहान वयात करणे ही खास बाब होती. त्यात तुम्हाला माझी असाधारण बौद्धिक वाढ तर दिसलीच, पण त्याहीपेक्षा मी तुमच्या बौद्धिक क्षमतेबद्दल अन् तुमच्या विचारपद्धतीबद्दल अचूक अंदाज बांधला ते तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त महत्त्वाचे वाटले. त्यानंतर तुम्ही माझ्यावर प्रयोग करत गेलात आणि तुम्हाला दिसू लागले की माझी निरीक्षणशक्ती अत्यंत तीक्ष्ण आहे, तिचा वापर करून आणि तार्किक विचार करून मी काही अंदाज बांधतो... ही माझी क्षमता तुम्हाला अनन्यसाधारण वाटली.

त्याच सुमाराला तो लोखंडी कठड्याचा अपघात झाला. त्या चौघांत फक्त मलाच काही न होणे यात तुम्हाला केवळ एक योगायोग दिसला नाही, कारण तुम्हाला माझी अतितीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि ती वापरून माझी पुढची तर्कसंगती माहिती होती. त्यामुळे, त्या प्रसंगानंतर तुम्ही थोड्या वेगळ्या दिशेने विचार करू लागलात... तुम्हाला वाटले की माझी केवळ निरीक्षणशक्ती ही असामान्य नाही, तर तिच्यामागे काहीतरी आणखी मूलभूत अशी शक्ती आहे... माझे इन्स्टिंक्ट्स, माझी जाणीव, एकंदरीतच गोष्टी सेन्स करण्याची माझी क्षमताच अचाट आहे असे तुम्हाला वाटू लागले... त्या प्रसंगात काही निरीक्षण करून कुठलाही विचार करण्याचा मला वेळच नव्हता... म्हणजे तो कठडा पडतोय असे मला वाटणे हे मला सेन्स झाले आणि उडी मारण्याची क्रिया ही प्रतिक्षिप्त क्रिया होती... मला फार कमी वेळा जखम होते, त्याचेही कारण हेच असावे असं तुम्हाला वाटलं. थोडक्यात, माझी ज्ञानेंद्रियं आणि त्यांच्याकडून येणार्‍या माहितीवर प्रक्रिया करणारा मेंदू हे असाधारणपणे तीक्ष्ण आहेत असा अंदाज तुम्ही बांधला आणि सेन्सर्ससकट तुमचे प्रयोग सुरू झाले.

पण तुमच्या संशोधनाला सर्वात मोठी कलाटणी मिळाली ती माझ्या टीव्ही चॅनल बदलण्याच्या जादूच्या प्रयोगांनी. बाबा, त्या दोन्ही रिमोटमध्ये बॅटरीज होत्या, पण माझ्या पायांखालचा रिमोट आदल्याच दिवशी नादुरूस्त झाला होता हे मला माहितीच नव्हते. तुम्हाला मात्र ते माहिती होते... त्या 'जादूच्या प्रयोगां'चा खरा अर्थ तुमच्या तत्क्षणीच ध्यानात आला. मी चॅनल बदलू कसा शकतो ? माझा मेंदू खरंच इतका असामान्य होता का की मी टीव्हीवरचे चॅनल्ससुद्धा काही इतर साधन न वापरता बदलू शकतो ? अन् तसे जर असेल तर माझ्या मेंदूच्या रचनेत आणि साधारण मेंदूच्या रचनेत नक्कीच काहीतरी फरक असेल असा विचार करून तुम्ही माझा सीटीस्कॅन केलात. त्यात त्या डॉक्टरांना दिसला तो ट्यूमर... एक अनैसर्गिक वाढ ! पण आपण अनैसर्गिक कशाला म्हणतो? जे निसर्गात इतरत्र दिसत नाही, जे नैसर्गिक रचनेच्या आड येऊन ढवळाढवळ करते ते अनैसर्गिक. पण कुठली रचना नैसर्गिक म्हणायची? म्हणजे 'हे अनैसर्गिक' असे म्हणताना आपण काहीतरी एक गोष्ट 'हे नैसर्गिक' म्हणून मानत असतो... या मापदंडाबरोबर आपण तुलना करतो. मग 'अमुक काही अनैसर्गिक' असे ठरवताना आपण योग्य तोच नैसर्गिक मापदंड घेतला पाहिजे, बरोबर? हेच म्हणायचे आहे ना तुम्हाला तुमच्या टिप्पणीत? समजा, एखाद्या गोष्टीसाठीचा 'नैसर्गिक मापदंड'च आपल्याकडे नसेल तर? समजा, एखाद्या गोष्टीसाठीचा 'नैसर्गिक मापदंड' हा रूढ, प्रचलित मापदंडापेक्षा वेगळच असेल तर? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेत.

बाबा, तुम्ही खरंच इतरांपेक्षा फार वेगळे आहात... तुमचं वेगळेपण दिसतं ते तुम्ही या प्रश्नांची जी उत्तरं दिली आहेत त्यातून. माझा नैसर्गिक मापदंडच वेगळा आहे असं अनुमान तुम्ही काढलं आहे... एखाद्या सर्वसामान्य माणसाने, नव्हे, एखाद्या सर्वसामान्य शास्त्रज्ञानेदेखिल 'हा ट्यूमरच' असं अनुमान काढलं असतं... पण असं अनुमान काढताना आपली काही गृहितकं असतात... त्यांची एक उतरंड असते... या उतरंडीत तुम्ही अगदी खाली गेलात... या उतरंडीतलं सर्वात खालचं, सर्वात पहिलं असं जे गृहितक तेच तुम्ही हलवलंत. हे तुमचं वेगळेपण मला, आम्हाला खूपच इंटरेस्टींग वाटतं... होय, आम्ही. मी मानव नाही, या ग्रहावरचा नाही हे तुमचं अनुमान अचूक आहे. आम्ही कुठले हे महत्त्वाचं नाही. पण इथे आम्ही कैक वर्षांपासून आहोत एवढंच सांगतो. आम्हाला तुमच्यावर वर्चस्व गाजवायचं नाही, तुमचा ग्रह ताब्यात तर मुळीच घ्यायचा नाही. बाबा, आम्ही फक्त निरीक्षक आहोत... या मानवजातीचे, या ग्रहाचे अन् या सूर्यमालेचे. तुमच्या ग्रहावर अभयारण्ये आहेत ना, तसं ही सूर्यमाला म्हणजे एक अभयारण्यच आहे... आमचं मूळरूप मानवी रूपापेक्षा फार वेगळं नाही. त्यात थोडे बदल केले की बाह्यरूप मानवी दिसायला लागतं, त्याचा फायदा घेऊन आम्हाला तुमचा अगदी जवळून अभ्यास करता येतो. आता काही अंतर्गत फरक असतात, जसे की तो 'ट्यूमर'. त्या भागामुळे तर आमचा मेंदू मानवी मेंदूपेक्षा अधिक सक्षम आहे... आमच्या जाणीवा अतिशय संवेदनशील आहेत. पूर्वी मला तुमची जी भीती वाटायची, ती याच आदिम प्रवृत्तीमुळे किंवा बेसिक इन्स्टिंक्ट्समुळे होती. पण आता मात्र मला तुमची भीती वाटत नाही... तुमच्यापासून मला धोका नाही, त्यामुळे मी तुम्हाला मारणार वगैरे नाहीये. तुमचा विश्वास बसत नाहीये ? पण बाबा, माझी जाण्याची वेळ आली असली तरी तुम्हाला मारण्याची गरजच नाही, कारण तुम्ही मला अडवूच शकत नाही. शिवाय, तुम्ही हे बाहेर कुठेही सांगितलंत तरी कोणाचा विश्वास बसेल ? ही पहिलीच वेळ नाही आमच्याबद्दलचं सत्य मानवांना कळण्याची. पण तुम्हाला न मारण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण वेगळंच आहे... समजा, तुम्ही जंगलात चिंपांझींच्या एका कळपाचा अभ्यास करताय. त्यातला एक चिंपांझी इतरांपेक्षा वेगळा आहे, त्याची क्षमता इतरांपेक्षा वरच्या दर्जाची आहे. तुम्ही त्याचं काय कराल? त्याला माराल की त्याचा अधिक बारकाईने अभ्यास कराल?
अलविदा!

- slarti

लेखन प्रकार: 

भोवरे

मीरा

डोअरबेलचा आवाज झाला तशी मीरा दचकली. आपण कुठे आहोत हे लक्षात यायलासुद्धा दोन मिनिटं लागली तिला. आणि त्यावरही विश्वास बसू नये इतका अंधार घरात!

चाचपडत तिने दिवा लावला. दाराकडे जाता जाता सवयीने हॉलकडे एक नजर टाकली. आता दोन मोठ्या माणसांच्या घरात असा पसारा तरी काय असणार? पण तरीही बैठकीवरची चुरगळलेली चादर आणि कोपर्‍यात पडलेला अर्धवट प्यायलेल्या चहाचा कप खुपलेच तिच्या डोळ्यांना. एरवी हा असासुद्धा हॉल पाहुण्या माणसाच्या नजरेला पडला नसता. पण आज ना तिच्यात ते आवरायचे त्राण होते, ना इच्छा, ना बघणार्‍याला काय वाटेल याची फिकीर.

"तू निदान प्रयोग म्हणून एक दिवस अजिबात आवरा आवरी न करता काढ" म्हणायचा शिरीष. आत्ता त्याने हे पाहिलं असतं तर तो काय आणि किती उपरोधिक बोलला असता या कल्पनेनेच त्या ही मनःस्थितीत तिला विषण्ण हसू फुटलं. बाकी एकमेकांचा उपरोध हसू येण्याइतका अती झालाच होता गेली कित्येक वर्षं.. पण म्हणून..

पुन्हा बेल वाजली. खरंतर दार उघडायची इच्छाच होत नव्हती. शिरीष गेल्यानंतरच्या महिन्याभरात कंटाळा येण्याइतकं सांत्वन झालं होतं. तेच सराईत प्रश्न, तीच सरावाने नेमकी होत गेलेली उत्तरं, आणि तेच परस्परांचं दुःख मापण्याजोखण्याचे डाव.. नक्की काय साधतं यातून? ज्या जखमेला उपचारांची खरी गरज आहे ती तर..

काय होईल नाहीच उघडलं दार तर? कोण असेल ते आपण नाही आहोत असं समजून जाईल निघून!
पण आता दिवा नाही का लावला? ते दिसलं असेल की दाराच्या फटीतून.
मग? समजा नाहीच उघडायचं मला! काय हरकत आहे?

या खेपेला मात्र निर्वाणीची वाजल्यासारखी बेल वाजली. काय हा नादिष्टपणा म्हणून स्वतःलाच फटकारत तिने जवळपास धावत दार गाठलं. उघडते तो दारात करण.

हा क्षण आज ना उद्या येणार, कितीही टाळला तरी येणार, हे काय तिला माहीत नव्हतं का? मग तरी ती इतकी कशी गाफील राहिली? इतकी? नुसतंच डोळे विस्फारून त्याच्याकडे तब्बल अर्धं मिनिट बघत उभं राहण्याइतकी?
"मीरा.. मी.. आत आलो तर.. ?" शेवटी त्यानेच सुरुवात केली.
"अं.. हो.. हो.. सॉरी करण.. मी.."
"इट्स ओके. आय अन्डरस्टँड." त्याने तिच्या खांद्याला हलकेच थोपटलं.
त्या स्पर्शाने चटका बसल्यासारखी मीरा मागे सरली. गडबडीत त्याच्याकडे पाठ फिरवत आत हॉलमधे आली. बैठकीवर बसत त्याला खुर्चीकडे निर्देश करत "बस ना" म्हणेपर्यंत त्याच्या मुद्रेवर क्षणभरासाठी आलेलं प्रश्नचिन्ह विरून गेलं होतं.

"आय ऍम सॉरी अबाऊट.."
"हं." तिने जवळपास तोडलंच ते वाक्य.
"कशी आहेस?"
"...."
"हं. काम कधी सुरू करत्येस परत?"
"नाही माहीत"
"असं करून कसं चालेल मीरा? अवस्था बघ तुझी. जेवतेखातेस तरी की नाही? काम सुरू केलंस तर तेवढंच.. म्हणजे, मला माहीत आहे हे दुःख मोठं आहे, पण.."
"करण प्लीज!!"
ते मघाचं प्रश्नचिन्ह आता अधिकच मोठं होऊन पुन्हा उभं राहिलं त्याच्या चेहर्‍यावर.
"अम्मी कसा आहे?"
"कोण जाणे!"
"मीरा!"
"काही कळतच नाही रे त्याचं! रडला नाही एकदाही.. पण गप्प गप्प असतो.. बोलायला जावं तर लक्ष नसतं.. इतका उत्साही मुलगा.. मिटून गेल्यागत झालाय.. बाहेर पडला नव्हता इतके दिवस. आज मित्रांनी ओढून नेलाय अक्षरशः"
"ओह! पुअर चाईल्ड!"
"हं.."
"या वयातली मुलं दाखवत नाहीत अटॅचमेंट, पण बाप गेल्याचं दुःख.."
"हं"
"त्यात तूही अजून सावरत नसलीस तर त्याला कठीण नाही का?"
"हं"
"हे बघ मीरा, थोडं स्पष्ट बोलतो. तुझ्या नाजुक मनःस्थितीची कल्पना आहे मला. आणि हे सगळं टायमिंग किती विचित्र होतं याचीही. मी तेंव्हा पुढे केलेला हात कधीच मागे घेणार नाही हे जितकं खरं, तितकंच मी तुला कसलीच घाई किंवा फोर्स करणार नाही, हे ही. तू त्या काळजीने कामावर येणं टाळत असलीस तर.. "
"तसं नाहीये करण! कसं सांगू तुला!!"
"एनी प्रॉब्लेम?"
"प्रॉब्लेम तर केव्हाचा होताच ना करण? तू तुझ्या मनातली गोष्ट मला सांगितल्यावरसुद्धा किती दिवस आणि केवढं धैर्य पणाला लागलं होतं तो sms करण्यापूर्वी! चाळिशीची बाई अशी कोणासाठी मॅड होईल हे कोणाला पटेल? पण हे असं इतकं सहज प्रेम, आपुलकी गेल्या कित्येक वर्षांत वाट्याला आलीच नव्हती रे माझ्या! मला पडला मोह तिचा. वाटलं, का नाही? का या इतक्या अपार सुखाला नाही नाही म्हणत रहायचं? शिवाय एक शारीरिक जवळीक सोडली तर काय शिल्लक राहिलं होतं आपल्यात व्हायचं? इतके अंतर्बाह्य झालोच होतो की एकमेकांचे! मला सांग, आपण एकमेकांना गेल्या वर्षभरात जितके ओळखायला लागलो तितकं आपल्या लग्नाच्या जोडीदारांनी जन्म सोबत काढून जाणलं का आपल्याला?"
"आय नो... आय नो. मग मला सांग, इतकी अस्वस्थ का आहेस?"
"कारण करण, शिरीषला जेव्हा हार्ट अटॅक आला, तेव्हा आपले ते sms झालेला माझा सेलफोन त्याच्या हाताशी टेबलवर होता!"
"काय?"
"हं.. मला शब्द न शब्द तसाच्या तसा आठवतो त्यातला. 'Home alone. thinking abt u. can u cm see me? ask me all those qstions again.. u might get lucky this time..&yes, luv u..' "
"..!"
"तुझं 'येतोय, तयार रहा' म्हणून उत्तर आलं, आणि सोळा वर्षांच्या मुलीसारखी हरखून बावरून आवरायला पळाले मी. शिरीष आणखी दोन दिवस यायचा नव्हता मुंबईहून, अम्मी त्याच्या मित्राकडे रहायचा होता अभ्यासाला.. त्यामुळे निष्काळजीपणा झाला.. आंघोळ करून बेडरूममधे कपडे करत होते.. बाहेर भांडं पडल्याचा आवाज आला, म्हणून बघायला आले तर शिरीष डायनिंग टेबलपाशी बसला होता.. कधी आला होता कोण जाणे.. चेहरा वेदनेने पिळवटलेला.. उजव्या हाताने छातीला डाव्या बाजूला आवळत चोळत होता.. जमिनीवर त्याच्या हातातून पडलेलं भांडं आणि पाण्याचं थारोळं.."
"बाप रे! त्याने.. पाहिला होता मेसेज?"
"कसं कळणार?!! 'शिरीष.. शिरीष.. काय होतंय.. थांब डॉक्टरना फोन करते.. आडवा होतोस का आत तोवर..' म्हणून मी त्याच्या जवळ जाऊन डाव्या हाताला धरायला लागले तर इतक्या जोरात हात झटकलान.. दुखत होतं म्हणून.. की.. की.."
"माय गॉड!"
"डॉक्टर यायच्या आत सगळं संपलंच होतं. ते म्हणाले बहुधा हा पहिला अटॅक नसावा. आधी लक्षात आलं नसावं.."
"ओह!"
"इतकी वर्षं एकत्र काढलेलं माणूस गेलं की कसे का संबंध असेनात, दुःख होतंच ना.. पण तुला सांगू, मला एक तो त्याच्या हाताशीच पडलेला सेलफोन आणि त्याने जाण्याआधी माझा झटकलेला हात यापलिकडे काही सुचतच नाही.."
"मीरा..!"
"सगळा जन्म चिडत रडत का असे ना, पण एकनिष्ठ होते ना त्याच्याशी? नशीब बघ माझं.. मोह पडला तुझा, पण ते पाऊल घातलंही गेलं नाही, आणि तरी.. तरी.. जाताना तो हे मत करून गेला असेल माझ्याबद्दल? मी कारण झाले असेन त्याच्या मृत्यूला? बरं तसं झालं की नाही, हे तरी नक्की कळावं?? ते ही नाही? नुसतेच भोवरे? का??"

===

अम्मी

"अम्मी, यार अब बस भी कर!"
"हं"
"अरे 'हं' काय? काय म्हणतोय मी?"
"सुखी, प्लीज!"
"नो! बहुत हो गया यार! किती दिवस असा मूँह फुलवून बसणार आहेस?"
".."
"देख, मला समजतं वडील जाण्याचं दुःख आहे.. टेन्शन आहे.. पण आता महिन्याच्या वर होऊन गेला यार! कॉलेजला ये.. थोडा घुल मिल ले.. नाहीतर कसा बाहेर येणार यातून?"
"हं"
"तू तरुण मुलगा असा वागलास तर तुझ्या आईने कोणाकडे बघायचं?"
"हं"
"पिक्चरला येतोस का?"
"नको यार.. मूड नाही.."
"अरे मूड नाही म्हणून तर! मस्त एखादा बकवास पिक्चर बघू.. खाना खाऊ.."
"पिऊ..!" रोहितला अगदीच राहवलं नाही.
इथे अम्मी दचकला.
"न.. नको.. नको.. तुम्ही लोक जा.. मी जातो घरी.."
"भगवान! ये कब बडा होगा!!" इति अर्थातच रोहित.
"शट अप रोहित. कभी तो भेजा इस्तेमाल कर!" म्हणत सुखीने अम्मीच्या गळ्यात हात घालत त्याला बोलत ग्रूपपासून दोन पावलं पुढे नेलं.
"अम्मी, कुछ प्रॉब्लेम है क्या? रोहितकडे लक्ष नको देऊस. तुला नाही पटत मला माहीत आहे. कोणी तुला पिण्याबिण्याचा आग्रह नाही करणार ये मेरा जिम्मा. बस?"
"वोह बात नहीं है सुखी.."
"फिर क्या बात है? बोल तो!!"
"तुला आठवतं, डॅड गेले त्या संध्याकाळी बारमधे ओढत नेलं होतं तुम्ही मला?"
"हाँ .. पण तू कुठे बधलास?"
"माझे आजोबा.. वडिलांचे वडील.. दारूच्या व्यसनापायी.."
"ओह!"
"डॅडना त्यामुळे भयानक तिटकारा होता त्या गोष्टीचा. आणि असल्या सवयी सहसा मित्रांच्या आग्रहाने लागतात म्हणून एकूणच मित्राबित्रांच्या फार नादी लागण्याचाही! तुला माहीत आहे, त्यांना स्वतःला एकसुद्धा मित्र नव्हता कधी!"
"मॅन!"
"माणूसघाणेच होते. आई खरी सोशल स्वभावाने. पण कोणाला तोंड भरून 'या ना आमच्याकडे' म्हणावं असं वातावरणच नसायचं घरात. घरात जो काही संवाद व्हायचा तो आई आणि माझ्यातच. ते बोललेच कधी तर दोनच गोष्टी.. मी अभ्यास नीट करतो की नाही आणि दारूबिरू पीत नाही ना!"
"सॉरी यार अम्मी. ये सब पता होता तो.."
"अरे, मी बारावी झालो ना, इतके चांगले मार्क्स.. मनासारखी ऍडमिशन मिळालेली इंजिनियरिंगला.. एक 'शाबास' इतका शब्द नाही निघाला त्यांच्या तोंडून!! काय बोलले असतील? 'आता कॉलेजमधे जाणार.. उगाच नाही त्या मुलांच्या नादी लागून नाही ते प्रकार करू नकात. तू कधी कसलं व्यसन केल्याचं जर मला कळलं ना अमित, जीव जाईल माझा – लक्षात ठेव!'"
"माय गॉड!!"
"त्या दिवशी आपण बार मधून बाहेर पडलो. तुम्ही तिघे बर्‍यापैकी.."
"ड्रंक होतो! पता है. तू इतका आग्रह करूनसुद्धा प्यायला नाहीस म्हणून तुझी वरात काढायची टूम निघाली.. आम्ही उचललाच होता तुला.."
"जर मी तुला सांगितलं की त्याच वेळी तिथेच समोर रस्त्यावर सिग्नलला डॅडची कार उभी होती, तर?"
"क्या??"
"हं. डॅड खरंतर मुंबईत असायचे होते. प्रोग्राम बदलला असावा. दुसर्‍या बाजूने जाणार्‍या गाडीचा उजेड पडला त्यात मी ओझरतं पाहिलं."
"ओह! नक्की? नक्की तेच होते? त्यांनी पाहिलं तुला?"
"तेच होते हे नक्की. कार पण ओळखली की मी. त्यांनी पाहिलं का ते माहीत नाही. पण गाडी जर तिथे सिग्नलला मला वाटतंय तितका वेळ उभी असेल, तर आपण बार मधून एकत्र बाहेर पडलो आणि तुम्ही मला डोक्यावर घेतलंत.. एवढं आणि एवढंच दृष्य त्यांना दिसलं असेल."
"ओह नो!! पर तुझे पक्का पता नहीं है.. शायद नहीं देखा हो.."
"तेच तर!! नक्की कळायला तरी हवं होतं यार – पाहिलं की नाही?? हा असला गिल्ट सहन होत नाही यार!! त्यांना तसं सिग्नलला पाहतो काय आणि घरी गेल्यावर त्यांना हार्ट अटॅक येतो काय! काय समजायचं? जे मी केलंच नाही, त्याच्या धक्क्याने गेले असतील? का यार? असं का असतं लाईफ??"

===

शिरीष

"मेमसाब.. कैसी हो आप?"
"ठीक हूँ रंजीत. तू सांग, कसा आहेस? कसं चाललंय काम? बायको काय म्हणते तुझी? कधीची तारीख दिल्ये?"
"अभी तो टाईम है मेमसाब. ठीक है वो."
"हं. चहा घेतोस?"
"नहीं मेमसाब.. वो सब.."

आता यापुढे काय बोलायचं मीरालाही कळेना. रंजीत हा शिरीषचा कंपनीने दिलेला ड्रायव्हर. पोरगेलासाच होता. शिरीष गेल्यावर आज इतक्या दिवसांनी भेटायला आला होता.
"मेमसाब, वो.. आप से एक बात करनी थी.."
"बोल ना"
"वो.. कल गुप्तासाब सस्पेंड हो गया"
"अं? हो का? अरे बाप रे!"
"कुछ कंपनीके पैसेका लफडा किया था.."
आता मीराला यात इन्टरेस्ट असेल असं याला का वाटावं? उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून ती म्हणाली, "ओह!"
"दो महिने पहले दीपकसाबको लफडेका पता चल गया था.. कौन किया मालूम नहीं था.."
"अस्सं.."
"वो.. वो पहले शायद अपने साब पर शक किया था मेमसाब.."
"काऽऽय??"
"हाँ मेमसाब.. बम्बईमें मीटिंगके बाद दीपकसाबने उनके होटलमें बुलाया था साब को.. मैं नीचे रुका था तब दीपकसाब का ड्रायव्हर बोला मुझे.."
"अरे पण.. कसं शक्य आहे!"
"उस दिन साब होटलसे बाहर निकला तो उनका सूरत देखके मैं समझ गया.. कुछ गडबड है.. पर पूछता कैसे मेमसाब?"
"अरे देवा! दीपकने तेव्हा.."
"क्या पता मेमसाब क्या बोला.. बोला भी के नहीं.. एन्क्वायरी शुरू भी कहाँ हुआ था तब? पर साब बोला – 'कल की मीटिंग के लिये नहीं रुकना है – अभी घर जायेंगे – तबीयत ठीक नहीं है – जल्दी चलो – खाना खाया?'.. इतनी भी बात कहाँ करते थे साब?"
"हं.."
"वो एन्क्वायरी अभीतक चल रहा था मेमसाब. मुझे मालूम था – साब ऐसा आदमी नहीं था. उनको जरूर सदमा पहुँचा होगा इस बात का"
"रंजीत!"
"मेमसाब, आपने हमेशा मेरा अच्छा खयाल रक्खा. चायपानी, कभी देर हो गई तो खाने का पूछनेका.. कौन पूछता है कंपनीके ड्रायव्हर को? इसलिये मुझसे रहा नहीं गया मेमसाब.. बतानेका जरूरी समझा."
"थँक्स.. रंजीत."
"नहीं मेमसाब. मुझे तो सोचके नींद नहीं आयी रातभर. कैसी जिंदगी है! जो काम साब कभी किया ही नहीं, जिसका एन्क्वायरी अभी शुरू भी नहीं हुआ था, जो शक दीपक साब बताया के नहीं ये भी पता नहीं.. उनकी जान.. क्या उस वजह से.. या सचमुच सिर्फ तबीयत ही खराब हो गयी थी? हमको बस ऐसा लगता है के हमको सब पता है क्या हो रहा है.. पर सोचो तो कुछ भी ठीक से मालूम नहीं रहता! कैसी जिंदगी है मेमसाब!! आप ही बताओ – कैसी जिंदगी है!!"

===

- स्वाती आंबोळे

लेखन प्रकार: 

समाधी योग, सकर्मक यंत्र की स्टॅटिस्टिकल यक्ष?

अनिकेत, बाजीकोवा, चंदर, डेव्हिड आणि नेव्हिल ठरल्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी चंदरकडे जमले होते. रीडर्स डायजेस्टचे लॉजिकचे कोडे बनवता यावे इतके त्यांचे आचार-विचार आणि आयुष्य वेगळी होती. नमुनेच द्यायचे झाले तर सध्या ते जरी पॅसाडेनामध्ये भेटत असले तरी केवळ अनिकेत मूळचा कॅलिफोर्निअन होता. अजून दोघे भारतीय, एक जपानचा तर एक इस्ट कोस्ट वरील.

अनिकेत स्वेच्छेने शाकाहारी होता, तर चंदर तत्व म्हणून. नेव्हिल अभियंता होता, डेव्हिड व्यापारी होता, बाजीकोवा शिक्षक होता तर इतर दोघे आधी उच्च शिक्षणाच्या पदव्या कमावून आता शेअर्सच्या उलाढाली करीत. त्यांची धर्माबद्दलची मतेदेखिल भिन्न होती. असे सर्व जरी असले तरी एक समान दुवा म्हणजे पटखेळांची व्यसन म्हणता येईल इतकी आवड. चंदर अविवाहित असल्यामुळे त्यांचा अड्डा त्याच्याकडे जमत असे.

खेळांमध्ये ते नेहमी खर्‍या आयुष्याशी असलेल्या आणि अनेकदा नसलेल्याही समांतरता शोधत असत. अगदी खर्‍या आयुष्याचे भान विसरून. बर्‍याच आधी ते पाचहीजण या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचले होते की हे खेळ पूर्णपणे तार्किकरित्या खेळून काही फायदा नाही. इतर लोक तर्कच नव्हे, तर कारणमीमांसेचा पदर सोडूनदेखिल कुठल्याकुठे पोहोचू शकतात. आज ते गढले होते स्कॉटलंड यार्ड खेळण्यात.

खेळ हे चुरस निर्माण करण्याकरता, मनोरंजनाकरता बनवले जातात. त्यामुळे त्यात शक्याशक्यतेचा अंश असतो, तसाच खर्‍या आयुष्यात कितपत असतो हा प्रश्न त्यांच्यापैकी प्रत्येकालाच अनेकदा पडला होता. ते सत्याच्या किती जवळ होते हे त्या एका ब्रह्मदेवालाच ठाऊक.

ब्रह्मदेवाने विश्वाचे बस्तान बसवल्यानंतर तो विधीलिखिताप्रमाणे त्याच्या एका दिवसानंतर झोपायला गेला. ब्रह्मदेवाचा एकच दिवस जरी असला तरी अर्थात मानवाची त्यात १००० महायुगं लोटली होती. कृत, त्रेता, द्वापार अन् कली युगांत हळूहळू होत गेलेली अधोगती पाहून आधी तो हळहळायचा, पण मायेची कांडी फिरल्याप्रमाणे जेंव्हा पुन्हा सगळे सुरळीत व्हायचे तेंव्हा तो हुरळूनदेखिल जायचा. पण हे काही महायुगेच चालले. नंतर त्याला त्या सर्वाचा कंटाळा येऊ लागला. त्याने ’बदल हवा’ अशी विष्णूची प्रार्थना केली. आधी तर विष्णूने ते हसण्यावारी नेले. पण जेंव्हा ब्रह्माचा आग्रह दिसला, तेंव्हा तो मंद स्मित करून म्हणाला,"विधीलिखित हे लिखित असे काही नसून केवळ निसर्गनियम असतात. निसर्ग म्हणजे माझीच माया जरी असली तरी निसर्गात मीदेखिल ढवळाढवळ करू शकत नाही. जशी माया माझ्यामुळे आहे, तसाच मी मायेमुळे आहे. तरी पण, तू म्हणतोच आहेस तर ठीक आहे. रात्री जेव्हा झोपशील तेंव्हा तुझ्या स्वप्नात माझे काही नास्तिक भक्त येतील - हो, आस्तिक काय आणि नास्तिक काय, सर्व माझे भक्तच. नारदालापण तुझ्या मदतीला पाठवतो. अखंड विश्वात माझी माया प्रत्यक्षात अनुभवली आहे अशा दोनच व्यक्ती आहेत आणि नारद त्यांपैकी एक आहे."

रात्री स्वप्नांच्या उत्कंठेनी बराच वेळ ब्रह्माला झोप लागली नाही. सकाळी जरा उशीराच नारदाच्या 'नारायण नारायण'च्या गजरानी त्याला जाग आली ती जरा कन्फ्युज्डावस्थेतच. दुर्बोध रोगावर स्वप्नाचे रामबाण औषध मिळाले असल्याचा भ्रम क्षणार्धात विरून गेला. एका स्वप्नाऐवजी ब्रह्माच्या चारही डोक्यांना वेगवेगळ्या स्वप्नांची स्मृती होती. एकात आइनस्टाईन 'रिलेटिव्हिटी'बद्दल सांगून गेला होता, एकात बोह्र 'क्वाण्टम मेकॅनिक्स'बद्दल, एकात हाईझनबर्ग 'अन्सर्टन्टी'बद्दल तर एकात कॉनवे 'गेम ऑफ लाईफ'बद्दल. बाकी तपशील काही आठवत नव्हता. हे जेंव्हा त्याने हतबुद्ध होऊन नारदाला विषद केले तेंव्हा तो उद्गारला,"नारायणाची लीला अगाध आहे. चार-चार अंशावतारांचा एकाच दिवशी दृष्टांत! त्यांनी तुम्हाला ऐरावताच्या चार अंगांचे दर्शन घडविले आहे. मी विचारच करत होतो की मला तुमच्याकडे का पाठवले असावे. या पूर्ण रहस्याचा उलगडा करण्यात मजा येणार. पाहूया हे रहस्य आधी तुम्ही सोडवता का मी. पहिला दुवा मी देतो, पण नंतर मात्र आपले दुवे आपणच शोधायचे. कॉनवेच्या 'गेम ऑफ लाईफ'वरून पहिला सुगावा मिळाला. जरूर त्यांना असं वाटतंय की मी तुम्हाला येथील नवी नॉन-अलाईंड गेम रूम दाखवावी. तिथेच ही अवकाशीय ट्रेजर हंट साकारणार. तिथे आज नेमका स्कॉटलंड यार्डचा पट जमणार आहे. त्यात बरोब्बर चार डिटेक्टिव्हरूपी खेळाडू एका चोररूपी रहस्याच्या मागे लागले असतात. चला, निघूया लगेच."

हा नॉन-अलाईंड गेम रूम काय प्रकार आहे या ब्रह्माच्या प्रश्नावर नारद म्हणाला,"बहुतांश खेळ प्रांतीय असतात. जे खेळ वैश्विक असतात त्यांचे संकेतार्थ भिन्न प्रांतीयांकरता भिन्न असतात. असे खेळ खेळीमेळीच्या वातावरणात पाहता व खेळता यावे म्हणून या नॉन-अलाईड गेम रूमची स्थापना ईक्स्ट्लील्टन या ऍझटेक अतिमानवाने केली. तिथे तुम्हाला केवळ दोनच हात असलेले अनेक अतिमानवसुद्धा दिसतील. अर्थात भिन्नधर्मीय."

खेळाच्या वेळी जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा तिथे सेंट जॉन, तीर्थंकर पार्श्वनाथ, शंकराचार्य आणि इतर अनेक महारथी आधीपासूनच हजर होते. खुद्द ब्रह्माला तिथे पाहून अनेक नजरा त्यांच्याकडे वळल्या. नारदाने लगेच सारवासारव केली की पुढच्या कल्पात भगवंताला नवे फीचर्स ऍड करायचे असल्यामुळे नव्या कल्पनांना अंतिम स्वरूप देण्याकरता ब्रह्मदेवाचा हा फेरफटका आहे.

आज डेव्हिड चोर बनला होता आणि लंडनभर त्याला पकडण्याकरता इतर चौघे बस, ट्रेन, टॅक्सी व होड्यांचा वापर करुन त्याचा मागोवा घेत फिरत होते. खेळाच्या सुरुवातीला प्रत्येक वाहनप्रकाराची ठराविक तिकिटे प्रत्येक डिटेक्टिव्हला मिळतात. चौघांपैकी कोणीही एखादे तिकिट वापरले की ते चोराला प्राप्त होत असे. चौघे असूनही एकट्या चोराला पकडणे सोपे नसते कारण चोर केवळ दर पाचव्या खेपेलाच पटावर अवतीर्ण होऊन दर्शन देत असतो. डिटेक्टिव्ह मात्र कुठे आहेत हे त्याला सततच दिसत असते. आपण पटावर कुठे पाहतो आहोत हे कळू नये म्हणून डोळ्यांवर चढवण्याकरता चोराजवळ एक व्हायजर असतं. कोणता मार्ग घेतला तर त्याच्यापर्यंत पोहोचू याबाबत अनिकेत, बाजीकोवा, चंदर आणि नेव्हिल यांच्यात सतत खलबतं आणि वादविवाद सुरू होते. विसाव्या खेळीपर्यंत बाजीकोवाला आपण चोराच्या जवळ आहोत असे वाटत होते. खूप काळजीपूर्वक त्याने बस, ट्रेन स्टेशन्स इत्यादींचा आणि चोराच्या आधीच्या स्थानांचा अभ्यास करून आपला मार्ग आखला होता. पण चोर जेव्हा थोडा दूरवर अवतरला तेंव्हा मात्र त्याचे मन शंकित झाले. एका कुठल्यातरी छोट्याशा पर्टर्बेशनमुळे पुढचे सगळे बदलले होते.

इकडे जॉनला त्याचे मॅथ्यु, मार्क आणि ल्युकबरोबरचे दिवस आठवले. स्वत:ला तो बाजीकोवाच्या ठिकाणी कल्पू लागला होता. असेच ते चौघे नाझरेथला येशूच्या मागे फिरत असत. असा विचार मनात येतो न येतो तोच त्याने तो आतल्याआत दाबला... 'काय आपण एका चोराची आणि येशूची तुलना करतो आहोत?! धिक्कार असो.'

शंकराला मात्र अशा विचारांचे वावडे नव्हते. एखाद्या वादविवादात असल्याप्रमाणे त्याने थेट आपला मुद्दा मांडला,"चोर-बीर प्रकार आपल्याला आवडत नाहीत. आपण याचे पॉझिटिव्ह रूप का घेऊ नये? डिटेक्टिव्ह चोराच्यामागे लागले आहेत असे न समजता काही भक्त हरीला प्राप्त करण्याकरता त्याला शोधताहेत असे का समजू नये? हरीला सतत भक्तांची जाणीव असते. भक्त मात्र त्यांचा मार्ग चाचपडत असतात. चार वाहनप्रकार म्हणजे प्रभूपर्यंत पोहोचण्याचे चार मार्ग."

ब्रह्मदेवाकडे एक तिरकी नजर टाकून पार्श्वनाथ म्हणाला, "हा चार डोक्यांचा हरी जास्त योग्य वाटतो चौघांचे ध्येय म्हणून. ध्येय जरी एकच असले तरी प्रत्येकाकरता त्याचा मुखडा वेगळा असतो." हा विचार ब्रह्माच्या मनालाही चाटून गेला असल्यामुळे तो खूष झाला. व्हायजरप्रमाणेच उपयोगी पडणार्‍या आपल्या चार काळ्या गॉगल्समागे आपल्या डोळ्यांमधला आनंद लपवीत त्याने मनातल्या मनात स्वत:चीच पाठ थोपटली. तो आनंद मात्र क्षणभरच टिकला. नारद आपल्या प्रभूप्राप्तीच्या कठोर पण तशा असफल तपस्येची आठवण येऊन म्हणाला, "पण प्रभू असा भक्तांपासून दूर पळाला नाही तर जास्त मजा येईल, नाही का?" आपले एस. वाय.चे मॉडेल अजून प्रगल्भ बनवण्याच्या प्रयत्नांत असलेल्या शंकराने नारदाचा हा वाद धुडकावून लावला. तो म्हणाला, "मी मांडली आहे ती ऍनॉलॉजी आहे. ती तिच्या उपयोगितेपलीकडे ताणायची नसते."

अनिकेत चोराच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याची आधीची प्रगती पाहून इकडे नारद स्वत:ला त्याच्याबरोबर आयडेन्टीफाय करू लागला होता. अगदी हातातोंडाशी आलेला चोर टॅक्सीची तिकिटे संपल्यामुळे मात्र अनिकेतच्या हातातून निसटला. हरिप्राप्तीचा मार्ग खुंटल्याचा नारदाला पुन:प्रत्यय आला.

एकेक करुन इतरही खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आणि खेळाच्या शेवटी हरी मोकळाच राहिला. सगळा खेळ खल्लास. हरी प्राप्त का झाला नाही याबद्दल सर्वांचे नॉन-अलाईड गेम रूममध्ये तर्क-वितर्क सुरू असतानाच डेव्हिडने उतरवलेले व्हायजर डोळ्यांवर चढवून चंदरने जाहीर केले, "मी आता चोर बनणार. या पकडा मला." हे पाहून 'पुनर्जन्म! आणि हे काय अघटित - देव माणूस बनतो आणि माणूस देव! चमत्कारच म्हणायचा!’ असे स्तिमित व दिङ्मूढ उद्गार वेगवेगळ्या धडांवर असलेल्या मुखांमधून ऐकू आले.

तितक्यात चोहीकडून विष्णूचा गंभीर पण त्याचवेळी मन शांत करणारा आवाज आला,"होय. तुमचा डेटा थेअरीला फिट झाला नाही तर थेअरी बदलावीच लागते. मशीदीत राम नाही सापडला तर तो सेतूत सापडतो. शेवटी काय, सगळा एक खेळच आहे. पण खेळात असतो तेव्हा तो सिरियसली घ्यायलाच हवा. चला, आपण आपली कामे करावीत. नाहीतरी भक्त तयारच असतात म्हणायला की देव झोपा काढतात!"

- aschig

लेखन प्रकार: 

म्हाद्याचं कलाट

बँडवाले क्लॅरनेट ह्या वाद्याला कलाट म्हणतात. बहुतेक वेळेला बँडचा मालकच कलाट वाजवतो. बँडच्या आकारमानानुसार त्यात कधी दोन ट्रंपेटवाले तर कधी चार ताशावाले असतील. पण कलाट हा फक्ट बॅंडच्या नायकाचा अधिकार असतो. जर बँडमधल्या सगळ्यांचा 'झिरमिळ्या लावलेल्या लाल रंगाचा' पोशाख असेल तर कलाट वाजवणारा मात्र काळ्या रंगाचा कोट घालून मध्यभागी दिमाखात उभा असतो. गणपतीच्या वरातीत 'सुखकर्ता दु:खहर्ता'ची सुरुवात असो किंवा 'कुहू कुहू बोले कोयलिया'ची तान असो, ती कलाटवाला हुबेहूब उतरवतो आणि मग मागाहून इतर वादक आपले वादन सुरू करतात.

खालील लघुकथा चेकॉव्हच्या 'रॉथ्सचाइल्ड्स फिडल' ह्या लघुकथेवरुन स्फुरलेली आहे. ही कथा जर चांगली झाली असेल तर त्याचे संपूर्ण श्रेय हे चेकॉव्हला आहे. जर काही त्रुटी, उणीवा राहिल्या असतील तर तो माझा दोष समजावा.

====

सकाळच्या उन्हात उंबरठ्यात बसून बिडी पिताना म्हाद्याला बोळाच्या कोपर्‍यावर, त्याच्याच घराकडे येणारा पाप्या दिसला. म्हाद्यानं मनातल्या मनात पाप्याला शिव्या देत बिडीचं टोक जमिनीवर घासलं. म्हाद्याला दारातच बघून पाप्या जरा लांबच थांबला. एका पायावरुन दुसर्‍या पायावर शरीराचा जोर देत, नजर जमिनीकडं लावून, पाप्या म्हाद्याला म्हणाला,
'रसूलचाचा बुलारा रे तेरे को. टाकळीमे शादी होता. बजाना है. आधे घंटे मी जीप निकलता देख.'
'ए पाप्या, फुकनीच्या', रस्त्यावर पचकन थुंकत म्हाद्याने पाप्याला शिव्या घातल्या.
'रसूलला सांग मी काय न्हाय येणार ये. कामं हायती मला.'
पाप्याला काय बोलावं ते कळेना. थोडा वेळ तो तिथेच उभा राहिला.
'अरं जा की तुझ्या मायला. पळ.' असं म्हाद्याने डाफरल्यावर तो उलटपावली पळाला

पाप्याचे आई-बाप कोण हे आख्ख्या रेवणीत कुणालाच माहिती नव्हतं. पाप्या रेवणीत रहायचा पण नाही. स्टँडजवळ वेश्यांच्या वस्तीच्या आसपासच्या दुकानाच्या पायरीवर पाप्याची झोपायची जागा ठरलेली होती. दिवसभर मात्र रेवणीत 'इब्राहिम ब्रास बँड'च्या ओसरीत पडीक असायचा. लहानपणी झालेल्या खाण्यापिण्याच्या आबाळीमुळं पाप्या दिसायला मरतुकडा, मुडदुश्या होता. आई-बाचा पत्ता नसल्यानं, म्हाद्या पाप्याचा उल्लेख करताना, 'अक्करमाश्या, फुकनीचा, रांडंची औलाद' अश्या शब्दांनीच करायचा. पाप्याचा चेहरा मात्र कायम हसतमुख असायचा. गणपतीच्या आधी किंवा लग्नाच्या हंगामाच्या आधी, बँडच्या तालमी सुरु व्हायच्या. तेव्हा चहा-बिड्यांची व्यवस्था करणे, साथीचा खुळखुळा वाजवणे, असली सगळी पडीक कामं पाप्या करायचा. कधी एखाद दिवशी कोणी हजर नसेल तर त्याचं वाद्य - मग ट्रंपेटपासून ताश्यापर्यंत - काहीही वाजवायचा. कधी कधी बँडचा म्हातारा मालक रसूल, त्याला आपलं जुनं क्लॅरनेटपण वाजवू द्यायचा. ऑर्केस्ट्राचं किंवा कॉलेजच्या गॅदरिंगचं काम मिळालं की त्यात पाप्याचा मिमिक्रीचा आयटम नक्की असायचा. दादा कोंडके आणि निळु फुलेच्या कुत्र्यांचं भांडण हा पाप्याचा खास आयटम. उरुसात दहा दिवस पाप्या जादुगाराच्या नाहीतर हसर्‍या आरश्यांच्या स्टॉलच्या बाहेर उभा राहून गर्दी खेचायचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. तिथे मग जळती बिडी तोंडात आत उलटी घेणे, जिभेवर काडेपेटीची काडी विझवणे असली कला दाखवायचा. आणि काहीच नसेल तेव्हा स्टँडच्या आसपास पत्त्याचा जुगार आणि संध्याकाळच्या आकड्याची उत्सुकता ह्यावर दिवस घालवायचा.

म्हाद्याला पाप्या मुळीच आवडत नसे. का ला काही फार अर्थ नव्हता. कधी म्हाद्याला पाप्या कायम हसत असायचा म्हणून चीड यायची तर कधी त्याच्या अनौरस असण्याची तर कधी उगीचच. म्हाद्याचा खरं तर सगळ्या जगावरच राग होता. लहानपणापासून म्हाद्या रेवणी गल्लीत राहात होता. पण त्याला ना कुणी मित्र होता ना म्हाद्या कधी कुणाशी एक शब्द नीट बोलला असेल तर शप्पथ. भावकीत भांडणं होऊन म्हाद्याचा बाप शिंपी गल्ली सोडून रेवणीत राहायला आला तेव्हा म्हाद्या दहा-बारा वर्षांचा असेल. रेवणी गल्ली म्हणजे, मार्केटच्या दुकानांच्या मागच्या बाजूला असलेली गोडाऊनं आणि किल्ल्याचा खंदक, यांच्यामध्ये वसलेली वस्ती. रेवणीत मधोमध गाडीतळासाठी मोकळी जागा होती आणि बाजूनं बैलगाडीच्या चाकाच्या आर्‍यांप्रमाणं गोल सात-आठ गल्ल्या पसरल्या होत्या. रेवणीचं वैशिष्ट्य म्हणजे रेवणीत हिंदू-मुसलमान आणि त्यातसुद्धा सगळ्या जातीच्या लोकांची घरं होती. खंदकाच्या बाजूच्या गल्ल्यात मुसलमानांची वीस-पंचवीस घरं होती तर उरलेल्या गल्ल्यातनं हिंदूंची. त्यात रेवणीतले मूळचे लोहार, कोकणातनं देशावर आलेले मजूर, म्हाद्यासारखा एखादा शिंपी असे सगळे होते. रेवणीवर एक जुनाट शेवाळ्यासारखी घसरडी हिरवट कळा होती. तीच कळा आता म्हातारा झालेल्या म्हाद्याच्या अंगा-खांद्यावर पसरली होती. त्याच्या चेहर्‍यावर सदैव एक अत्यंत त्रासिक अवकळा होती.

खंदकाकडच्या मुसलमानांमध्ये रसूलचा 'इब्राहिम ब्रास बँड' होता. बाहेरच्या खोलीत ऑफिस, तालमीची जागा, वाद्यं ठेवण्यासाठी कपाटं आणि मागं रसूलचं घर. रसूलचा बाप सर्कशीत कलाट, ट्रंपेट असली वाद्य वाजवायला शिकला आणि नंतर त्याने गावात येउन स्वत:चा बँड सुरु केला. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, कॉलेजची गॅदरिंगं असल्या सगळ्या ठिकाणी हा बँड वाजवत असे. रसूलला बापानंच कलाट वाजवायला शिकवलं. रसूलच्याच वयाच्या आसपासचा म्हाद्यापण इब्राहिमकडून कलाट वाजवायला शिकला. शिंप्यांच्यात उपजत असलेला संगीताचा कान आणि म्हाद्याच्या बोटातली कला ह्या मुद्दलावर म्हाद्या उत्तम कलाट वाजवू लागला. पण म्हाद्या लहरी होता. एखाद्या दिवशी जर दोन सुपार्‍या असतील तर एका पार्टीबरोबर रसूल आणि दुसर्‍याबरोबर म्हाद्या अशी योजना रसूल करायचा. पण म्हाद्या येईल का नाही, येईल का नाही अशी शेवटपर्यंत रसूलला धाकधूक वाटत असायची.

म्हाद्याचा शिंप्याचा धंदापण कधी फार चालला नव्हता. म्हाद्याचं दुकान म्हणजे जिन्याखालची एक खोली होती. तिच्यामागं आत त्याचं घर म्हणजे एक छोटीशी खोली - त्यातच एक पडदा लावून केलेलं न्हाणीघर. बाहेरच्या खोलीतून वरती रहाण्यार्‍या बिर्‍हाडाचा जिना गेला होता. त्या जिन्याखालच्या त्रिकोणी जागेत म्हाद्याचं मशिन होतं आणि बाकी सगळीकडं चिंध्या पसरलेल्या असायच्या. सुरुवाती सुरुवातीला रेवणीतली लोकं त्याला ईद-दिवाळीचे कपडे शिवायला देत होती. पण म्हाद्यानं वेळेवर कधीही कपडा मिळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतल्याने त्याच्याकडं लंगोट, तालमीतल्या कुस्ती-मल्लखांब खेळणार्‍या पोरांच्या हनुमान चड्ड्या आणि म्हातार्‍यांचे सदरे-पायजमे किंवा लहान पोरांचे शाळेचे शर्ट ह्याख्रेरीज अजून कुठलं काम आलं नाही.

त्यादिवशी पाप्याला हाकलून लावल्यावर म्हाद्याकडं करायला फारसं काही काम नव्हतं. पण आज वाजवायचंच नाही अशी लहर- त्यामुळे तो गेलाच नाही. दिवसभर नुसतं बिड्या फुंकत मशीनवर बसला. संधाकाळी रसूल तणतणत म्हाद्याच्या घरी आला आणि म्हाद्याला म्हणाला की, दोन दिवसानी आणखी एक सुपारी आहे. त्यादिवशी जर आला नाहीस तर परत कधीही वाजवायला बोलावणार नाही. म्हाद्यानं निर्विकारपणे रसूलचं बोलणं ऐकलं आणि रसूल गेल्यावर शांतपणे उठून आत घरात गेला.

चुलीशी सगळी भांडी रिकामी बघून 'आज गिळायला काय न्हाय काय?' असं म्हणत म्हाद्या बायकोला शिव्या घालत वळला. तरुणपणाच्या जोशात म्हाद्यानं कित्येकदा असल्या बारीक-सारीक कारणांवरून बायकोला लाथा घातल्या होत्या. वय झालं तसं म्हाद्याचे हात-पाय कमी आणि तोंड जास्त चालायला लागलं होतं. म्हाद्या वळला आणि त्याला म्हातारी जमिनीवर सतरंजी अंथरुन सांजेचंच झोपलेली दिसली. 'आयला, काय अवदसा आठवली म्हातारीला' असा विचार करत म्हाद्या तिच्याजवळ गेला तर तिच्या घशातून क्षीणसा कण्हण्याचा आवाज येत होता. त्यानं तिच्या कपाळाला हात लावला तर चटका बसेल एव्हड्या तापानं म्हातारी फणफणली होती. संतरजीच्या आत पाय पोटाशी दुमडून म्हातारी पडली होती. तिची अवस्था बघून म्हाद्याला घाबरून आलं.

तिला एका हातानं आधार देत त्यानं उभं केलं आणि जवळच्या डॉक्टरकडे घेवून गेला. तिथं बाहेरच्या खोलीत, बारक्या-सारक्या आजारांवर कंपाऊंडरच लोकांना औषध देत होता, सुई टोचत होता. म्हाद्याच्या बायकोला बघताच कंपाऊंडरच्या लक्षात आलं की हिचा काय फार वेळ आता उरलेला नाही. त्यानं एक-दोन गोळ्या पुडीत बांधून म्हाद्याला दिल्या आणि त्याला जायला सांगितलं.
"अवो, म्हातारी तापानं फणफणलीया-कण्हतीया बघा कशी. जरा आत मोठ्या डाक्टरास्नी दाखवू दे की. न्ह्यायतर सुई तरी टोचा एक." म्हाद्या काकुळतीनं कंपाऊंडरला म्हणाला.
"काय उपयोग न्हाय रं तेचा. तू घीऊन जा बघु म्हातारीला हतनं', असं म्हणत कंपाऊंडरने म्हाद्याला दवाखान्याबाहेर हाकलला.

'पैसेवाल्यास्नी लगीच आत सोडतूया. माज आलाय समद्या रांडेच्यास्नी' असं बडबडत आणि सगळ्या जगाला शिव्या घालत म्हाद्या म्हातारीला घेउन घरी आला. म्हातारीला सतरंजीवर झोपवून त्यानं चूल पेटवायला घेतली.
'देवीला जाउन नवस फेडला असता तर आज पोरगी जगली असती बघा आपली. तेव्हडं काय तुमच्या हातनं झालं न्हाय', म्हातारी ग्लानीत बडबडत होती. 'एव्हड्या नवसानं पोर झाली. एक वरीस काय बघितलं न्हाय तिनं.'
'कुटली पोरगी. याड लागलय तुला. झोप तू गुमान', असं म्हणत आणि चूल पेटवायचा नाद सोडून म्हाद्या बाहेर जाउन मशीनवर बसला. थोडा वेळपर्यंत त्याला आतनं म्हातारीची 'पोरगी, देवी, नवस, आई, अक्का' अशी बडबड ऐकू येत होती. हळूहळू तिचा आवाज लहान होत गेला आणि ती परत ग्लानीत गेली.

म्हाद्याला कळेना की म्हातारी तापात खुळ्यागत बडबडायला लागलीये की त्याला खरच एक मुलगी झाली होती. म्हाद्याला लग्न होवून घरात आलेली म्हातारी आठवली. लग्न झालं तेव्हा म्हाद्याचा बाप जिवंत होता. तो आणि म्हाद्या मिळून बर्‍यापैकी पैसे कमवत होते. म्हाद्याचा लग्नानंतर त्याच्या बापानं आपलं अंथरुण मशीनच्या बाजूला बाहेरच्या खोलीत हालवलं. म्हाद्या दिवसभर बापाबरोबर काम करत असे आणि कधी कधी रात्र-रात्र बँडवाल्यांबरोबर घालवत असे. सुरुवाती सुरुवातीला म्हाद्या एखाद दिवशी बायकोला घेऊन देवळात गेला होता. पहिल्या वर्षी जत्रेला म्हाद्या बायकोबरोबर पाळण्यातसुद्धा बसला. पण दिवस सरतील तसे म्हाद्याचा वेळ घरी कमी आणि कलाट-बँडमध्ये जास्त जाऊ लागला. पुढं बाप गेला आणि म्हाद्याचा लहरीपणा पण वाढीला लागला. इकडे लग्नानंतर बरीच वर्षं पोर होत नाही म्हणून म्हातारी दिसेल तिकडं नवस बोलत होती, देवळांच्या-मठांच्या पायर्‍या झिजवत होती. पुढे तिला एक अतिशय अशक्त, चिरक्या आवाजात रडणारी मुलगी झाली खरी. म्हातारीला मुलीचं कोण कौतुक. पण म्हाद्यानं पोरीला कधी हातात घेतलं नाही की पोर झाल्याच्या आनंदात चार शब्द गोड बोलला नाही. म्हातारी 'देवीला जाऊन नवस फेडू या' म्हणुन म्हाद्याच्या मागं लागली. पण म्हाद्या काय तिला घेउन कधी देवीला गेला नाही. पुढं वर्षाच्या आतच पोरगी मेली. तसंही फारसं न बोलण्यार्‍या म्हातारीनं म्हाद्याशी बोलणंच टाकलं. म्हाद्यालाही त्याचं काही वाटलं नाही. तो आपल्याच तंद्रीत जगत होता. कधी म्हातारीशी दोन शब्द बोलला नाही की तिला एक नवीन लुगडं-चोळी, एखादा डाग त्यानं आणला नाही. जे काय पैसे हातात पडत होते ते चहा-बिड्या, बँडवाल्यांबरोबर कधीतरी छटाक-पावशेरमध्ये म्हाद्या घालवत होता. म्हातारीनं जवळच्या व्यापार्‍यांच्या घरात कामं धरली. घरात धान्य, बाकी किडुक-मिडुक म्हातारीच आणत होती. लोकांकडं धुणी-भांडी करुन म्हातारीनंच घर चालवलं. एखाद्या दिवशी रात्री देशी मारुन आल्यावर कालवणात तिखटच कमी आहे नाहीतर भाकर्‍याच केल्या नाहीत म्हणून म्हातारीच्या पेकाटात लाथ हाणणे ह्याखेरीज म्हाद्यानं घराच्या आणि म्हातारीच्या बाबतीत अजून काही केलं नाही. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीचं पाणी आटतं तशी म्हातारी हळूहळू खंगत आकसत गेली

डोक्याला त्रास देऊनसुद्धा म्हाद्याला शेवटचं कधी म्हातारीशी दोन शब्द बोलल्याचं आठवत नव्हतं. रात्रभर तो मशीनवरच बसला.

पहाटेला चहा टाकायला म्हणून म्हाद्या आत गेला तर म्हातारीचा खेळ आटोपला होता. तांबडं फुटल्यावर आजूबाजूच्या चार लोकांना घेउन तो घाटावर जाउन पुढचं उरकून आला. पुढचे चार-पाच दिवस म्हाद्या खिन्नपणे बाहेरच्या खोलीत बिड्या फुंकत बसला. मग पाचव्या दिवशी संध्याकाळी त्यानं आतल्या खोलीतनं फळीवर ठेवलेलं कलाट खाली उतरवलं, फडक्यानं स्वच्छ पुसलं आणि बाहेरच्या खोलीत खाली बसून सूर लावला. म्हाद्या आज आपलंच काहीतरी वाजवत होता. शेजारी-पाजारी दाराशी घोळका करुन ऐकू लागले. त्याच्या कलाटातून आज त्याचे सूर बाहेर पडत होते. म्हाद्या वाजवत राहिला. लोकं ऐकत राहिली.

'म्हाद्या उद्याच्या सुपारीला येतो का बघ' म्हणून रसूलने पाप्याला म्हाद्याकडे धाडला होता. पाप्या दबकत-दबकत गर्दी सारुन दरवाज्यातून आत आला तेव्हा म्हाद्याचे कलाट बोलत होते. म्हाद्या स्वतःच्याच नादात कितीतरी वेळ वाजवत राहिला. तो थांबला तेव्हा त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. म्हाद्या थांबल्याचं बघताच, हा आता आपल्यावर खेकसणार, असं लक्षात येउन पाप्या चटकन उडी मारुन उंबर्‍याशी पोचला. पण म्हाद्या पाप्याकडं बघून फक्त हसला. पालथ्या हातानं त्यानं आपले डोळे पुसले आणि आपलं कलाट पाप्याला देऊन तो आतल्या खोलीत निघून गेला.
.
.
.
म्हाद्या त्यानंतर परत कधीही बँडमध्ये वाजवायला गेला नाही. तो हळूहळू संपला. पाप्या शेवटपर्यंत बँडची पडीक कामं करत बँडबरोबरच राहिला. एखाद्या रात्री बँडची नवीन गाण्यांची तालीम संपली किंवा दुसर्‍या कुठल्यातरी गावची सुपारी संपवून सगळे एसटी स्टँडवर बसची वाट बघत बसले असले की ते पाप्याला म्हाद्याचं कलाट वाजवायला सांगायचे. पाप्या म्हाद्यानं जी शेवटची चाल आळवली होती ती तशीच्या तशी कलाटामधून उतरवायचा. पण उभ्या आयुष्यात पाप्यानं कधी कलाटामधून अजून काही वाजवलं नाही.

- tanyabedekar

लेखन प्रकार: 

शेवटचा पुरावा

डिसूझाने सिगारेट विझवली... कंटाळा आला म्हणून. देवापुढे मेणबत्ती लावली... तेसुद्धा एक कर्तव्य म्हणून, मेरी लावायची म्हणून. मेरीला आपण भकाभका सिगारेटी ओढतो ते बिलकूल आवडायचं नाही आणि ती चिडते म्हणून आपण मुद्दाम ओढायचो, तिच्या समोरच, तिच्या अंगावर धूर सोडत. मग तिला खोकल्याची उबळ यायची... डोळ्यांतून पाणी काढत खोकायची... रागावून लटकी चापट मारायची... आपण तिला जवळ घ्यायचो, तिच्या ताज्या मधासारख्या गालावर हात फिरवायचो... ती झिडकारायची, पण तिला ते आवडत असणारच. डिसूझाला नवल वाटलं. चांगला ३ वर्ष संसार केला आपण मेरीबरोबर.. पण तिचा एकही गुण आपल्याला कसा लागला नाही? तिचा नीटनेटकेपणा, तिचं सुबक रहाणं, तिचं बोलणं, तिचं वागणं... काही म्हणजे काहीच कसं आपल्याला लागलं नाही? नाहीतर आपण वेंधळट, रासवट... तिला शोभेसे नव्हतोच आपण. अगदी विजोड जोडा. म्हणून तर देवाने...

घरातल्या प्रत्येक गोष्टीवर मेरीची आठवण दाटून राहिलीये. तिने सजवलेलं कपाट, तिनं कुण्या ओळखीच्याला सांगून आणवलेला काश्मिरी गालीचा, तिची नीटनेटकी खोली. तिच्या कपड्यांना अजून तिचा गंध चिकटलाय. सहज गंमत म्हणून त्यानं तिच्या कपाटातला एक ड्रेस काढला. तिच्या कपाटाला, तिच्या वस्तूंना हात लावलेला तिला बिलकूल खपायचं नाही. मग अश्शी चिडायची ती... डिसूझाला हसायला आलं. कडवट औषधाची चव जीभेवर रेंगाळावी तसं कडूशार हसू. आता आयुष्याची चव कडवट झालीये. उरलाय तो फक्त एकटेपणा! नाही म्हणायला, तो शेजारचा डॉक्टर दामले येतो कधीतरी पाहुणचाराला. तसा आधीही यायचा आपल्या आणि मेरीबरोबर गप्पा ठोकायला. पण आता येतो तो एखादा उपचार म्हणून. नको-नको म्हणताना कॉफी करून देतो मला. इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो, जुन्या आठवणी काढत बसतो. नाहीतरी आता बोलायला उरलंय काय वेगळं...

मेरीला दैनंदिनी लिहायची सवय होती. आपण तिची चेष्टा करायचो, म्हणायचो, काय लिहिण्यासारखं असतं त्यात? आज काय तर म्हणे, उशीरा उठले, भाजीवाल्याने भाजी स्वस्त दिली, आज डिसूझा लवकर घरी आले... असलंच काहीतरी नॉन्सेन्स. इडीयटसारखं. कधीतरी तिची वही लपवून ठेवायचो. मग ती घरभर शोधत रहायची. मग आपण तिचं लक्ष नाही बघून हळूच मूळ जागेवर ठेवून द्यायचो... मग वही सापडली, की एखाद्या लहान मुलीसारखे तिचे डोळे चमकायचे. दामले म्हणायचासुद्धा, 'लेका डिसूझा, तुझ्यात एक लहान, खोडकर मूल दडलंय!' अगदी खरं. आता बघूया का तिची वही ? ती म्हणायची की अशी दुसर्‍यांची वही चोरून वाचू नये... पण आता काय फरक पडणार आहे? तेवढाच मनाला उद्योग.

दिनांक सोळा एप्रिल: आज सकाळीच उठून पॅन केक केला. डिसूझांना खूप आवडतो. कॉफी बरोबर पॅन केक आणि न्यूजपेपर मिळाला की बास! काही विचारायला नको.

दिनांक बारा मे: आज डिसूझांनी माझी वही लपवून ठेवलेली. त्यांना वाटलं मला कळणारच नाही म्हणून. पण कळते बरं मला अशी खोडी.

दिनांक सोळा जून: आज रात्री दामले आलेले गप्पांना. डिसूझा, मी, आणि दामलेंनी खूप गप्पा मारल्या. खूप खूप बोललो.

डिसूझा वहीची पानं चाळत राहिला. दिनांक सव्वीस जुलै. म्हणजे आपल्या त्या लाँग ड्राईव्हच्या आधीची रात्र. कुठून आपण ही वही वाचायला काढली असं डिसूझाला झालं. खपली धरलेल्या जखमेवरची खपली कुणीतरी ओरबाडून काढावी आणि पुन्हा ती तांबडी भळभळीत जखम उघड्यावर पडावी तसं काहीसं.

दिनांक सव्वीस जुलै: आज मी खूप आनंदात आहे. उद्या मी आणि डिसूझा लाँग ड्राईव्हला जाणार आहोत. खूप दिवसांनंतर मनमुराद भटकणार आहोत.

डिसूझाला आठवत राहिलं... आपण आणि आपल्या गळ्यात हात घालून बसलेली मेरी. तिचा धुंद करणारा वास... तिचा प्रेमळ स्पर्श... थोडंसं धुकं होतं. पण अशा धुक्यात तर खरी मजा येते गाडी जोरात उडवायला. मेरी घाबरलीये, आपल्याला अधिकच बिलगून बसलीये. इतक्यात समोर दिसणारा तो ट्रक... कसलासा माल नेणारा... अचानक त्याचा वेग मंदावलाय... आपण वेगात आहोत... लवकर वेग कमी करायला हवाय... आपण जोरात ब्रेक्स दाबलेत... आता गाडी थांबायला हवीये... पण हे काय ? गाडी थांबत का नाहीये ?? रस्त्यावर पडलेल्या त्या डीझेलने घात केलाय... गाडीची चाकं रस्त्याची ग्रिपच घेत नाहीयेत... ब्रेक लावून उपयोग नाहीये... आता फक्त वाट बघायची गाडी ट्रकला धडकायची... मग पुढचं काही नीटसं आठवत नाहीये... थोडंसं आठवतंय ते - भेदरलेली, किंचाळणारी मेरी, जोरात बसलेला हिसका, गाडीच्या फुटलेल्या काचा, आगीचा भडका आणि डोक्यात बसलेला कसलातरी जबरदस्त फटका. शुद्धीवर आलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दिसला तो डॉक्टर दामले, आपल्याकडे बघतोय. आणि मेरी कुठाय? ती का दिसत नाहीये कुठेच ?? आपण दामलेला विचारतोय मेरीबद्दल. दामले काहीतरी सांगतोय पण ते आपल्याला कळतच नाहीये. आपण ऐकतोय पण डोक्यातच शिरत नाहीये तो काय बोलतोय ते. आपले डोळे पुन्हा मिटताहेत...

डिसूझाला आठवत राहतोय तो भयानक अपघात, त्यात आपले निकामी झालेले पाय... आणि मेरी ? दामले सांगतोय, मेरी त्या आगीत जळाली. जळून कोळसा झाली, अगदी ओळखता न येण्याइतपत विद्रूप झाली. आपण मात्र त्या अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचलो. दोन आठवडे कोमात होतो म्हणे. आता उरल्या आहेत त्या मेरीच्या आठवणी आणि हे दोन अधू पाय - भूतकाळाची साक्ष देणारे.

वार्‍यावर वहीची पान फडफडताहेत... ते काय आहे ? पाहिल्यासारखं वाटतंय काहीतरी... पण हे कसं शक्य आहे ? भास म्हणायचा का ? का मनाचे वेडे खेळ ? त्या वहीत पुढे काहीतरी लिहीलंय का ?

दिनांक दोन सप्टेंबर: डिसूझा मला तुम्ही असे कसे हो सोडून गेलात ? इतकी वर्ष सवय झालीये तुमची. तुम्ही कुठे आहात ? कसे आहात ?

डिसूझा वीज पडल्यासारखा चमकला. कष्टाने लिहिल्यासारखं अगदी अस्पष्ट लिहिलंय. पण कुणी लिहिलंय हे ? मेरीने ? पण हे कसं शक्य आहे ? ती तर... बापरे ! देवा हा काय खेळ चालवलाहेस ? की आपल्याला वेड लागतंय ?

आज दामले येऊन गेला. आपण त्याला ती वही दाखवली. त्या तारखेला लिहिलेलं अजूनही आपल्याला दिसतंय. मग दामले असं का म्हणाला, की त्याला काहीच दिसत नाहीये म्हणून? की ते फक्त आपल्यालाच दिसतंय ? मेरी जिथे कुठेही आहे, आपल्याशी संवाद साधू इच्छितेय. डिसूझाच्या अंगावर शहारा आला. मेरीचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे आणि ती वहीच आता आमच्या दोघातलं संवादाचं साधन आहे.

दिनांक आठ सप्टेंबर: डिसूझा, मला खूप एकटं वाटतंय हो ! कधी एकदा तुम्हाला भेटतेय असं झालंय. इथे मला बिलकूल करमत नाहीये तुमच्याशिवाय. मला भेटणार ना लवकर?

अगदी अस्पष्ट लिहिलंय. माझी मेरी खूप त्रासात आहे. तिला माझी कमतरता जाणवतेय. तिला एकटी पडू देता कामा नये. तिला लवकर भेटायला हवंय. पण कसं ? कसं ? ती माझ्या जगात येऊ शकत नाही हे तर नक्की. मग ? मग काय झालं ? मी तर तिच्या जगात जाऊ शकतो ना. तिच्यासाठी एवढं करायला हवंय. मघाशी ते सफरचंद कापायला म्हणून सुरी आणली होती दामलेने ती तो टेबलावरच विसरलाय. मी भर्रकन ती सुरी उचललीये आणि सर्रकन मनगटावरून फिरवलीये. रक्ताची धार मला दिसतेय... तांबडं भडक रक्त. हे वाहणारं रक्तच मला मेरीकडे घेऊन जाणारेय. माझ्या डोळ्यासमोरचा प्रकाश अंधूक होतोय, माझी शुद्ध हरपतेय... मी आता मेरीला भेटणार आहे. लवकर, लगेच, आत्ताच...

दोन आठवड्यानंतर दामले त्याच्या आऊटहाऊसवर दारुचे पेग भरत होता. एक स्वतःसाठी आणि दुसरा त्याच्या लाडक्या मेरीसाठी. आता त्या दोघांना लपून भेटावं लागणार नव्हतं. त्यासाठी दोघांनी अगदी शिताफीने प्लॅन आखलेला... डिसूझा त्याच्या सापळ्यात अलगद अडकला. मेरीचा मृत्यू तो सहन करू शकला नाही. त्यात डिसूझाला भेटायला जाऊन दामले मोठ्या शिताफीने ती वही बदलत होता. त्याने सांगितल्याप्रमाणे मेरी वहीत लिहित गेली. आता तीच वही मेरीच्या हातात होती. ही वही आता फक्त नष्ट करायची म्हणजे शेवटचा पुरावाही नाहीसा करायचा. मग आपल्याला कधीच कुणी पकडू शकत नाही. दामले स्वतःवरच खुश होता. तो ओरडला, "चीयर्स फॉर अवर सक्सेस." मेरी हसली. तिनेही ग्लास उचलला. इतक्यात जोराचा वारा आला आणि वहीची पानं फडफडली. तिनं वाचलं...

दिनांक बावीस सप्टेंबर: मेरी, तू कुठे आहेस ? मला तुझी आठवण येतेय. खूप एकटं वाटतंय. तुला लवकर भेटायचंय. तुझाच डिसूझा.

- kedar123

लेखन प्रकार: 

प्लँचेट

दुपारी जेवायच्या पानावर बसल्यापासून मी बघत होते सगळ्यांना.... काहीतरी गुफ्तगू चालू होतं त्यांचं आपापसात. रश्मीताई, वंदू एकमेकींच्या कानात काहीतरी सांगत होत्या आणि सुनीलदादा, अभि, ऋषीदा वगैरे मंडळी मुक्यांनेच खाणाखुणा करून 'वर, वर' असं काहीतरी बोलत होते. आप्पा जेवायला आले तशी सर्वांची बोलती बंद झाली आणि मुकाटपणे सगळे जेवू लागले. हात धुवायच्या वेळी मी ऋषीदाला गाठलंच...
"काय ठरवताय तुम्ही? मी पण येणार..."
"अनु, तू नको येऊस... आमची मोठ्या लोकांची मीटिंग आहे, तुझं काय काम तिथे?"
"नाही, तुम्ही लोक 'वर, वर' असं काहीतरी बोलत होतात, मी येणार म्हणजे येणार.."
"अनु, नको गं प्लीज, तू घाबरशील तिकडे, तू झोप ना आजीजवळ.. प्लीऽऽज" ऋषिदा अजिजीने म्हणाला.
"म्हणजे तुम्ही खरंच माडीवर जायचं ठरवताय.. मी येणारच" मी अगदी हटून बसले होते.
"बघ तू माझं ऐकलंस तर मी माझ्या वाटणीतले दोन आंबे तुला देईन..."
"तुम्ही कॅनेस्ट्रा खेळलात तरी मी त्रास नाही देणार, बाजूला बसून बघेन, हवं तर मार्क पण लिहून देईन, पण मी पण येणार माडीवर..." मी जरा मस्काबाजी करायचा प्रयत्न केला.
"कॅनेस्ट्रा नाही गं...तुला सांगितलं ना महत्त्वाचं काम आहे म्हणून... हवं तर आमचं काम झाल्यावर तुला मी बोलावीन, पण तू सुरुवातीपासून येऊ नकोस." जरा आवाज चढवतच ऋषिदा म्हणाला.
"मी आप्पांना सांगेन.... " मी शेवटी ब्रम्हास्त्र काढलं.

कोकणातल्या आजोळच्या घरावरची माडी हे आम्हां सगळ्याच भावंडांसाठी एक मोठं आकर्षण होतं. संपूर्ण घरात आता शहरी सोयी करून घेतल्या होत्या आप्पांनी.. पण डाव्या बाजूकडला वरचा भाग... ज्याला 'माडी' म्हणत असत.. तो मात्र तसाच ठेवला होता. तिथल्या लाकडी फळ्या टाकून तयार केलेल्या जमिनीवरून चालताना मस्तपैकी धाऽऽड धाऽऽड असा आवाज येत असे. माडीला असलेल्या गॅलरीतून घराच्या कौलांवर उड्या टाकता यायच्या. कौलांवर उतरलं की थोडं उतरून मागच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाची फांदी पकडून सहज झाडावर चढता येत असे. माडीच्या भिंतींना दिलेला गडद निळा आणि पोपटी रंग, कोनाडे आणि छताच्या उंचीवर असणारे झरोके यामुळे तिथलं वातावरण अगदी गूढ बनलेलं होतं. जुने पण महत्वाचे कागदपत्र माडीवर ट्रंकांमधून भरून ठेवले होते. तिथे फारसा कोणाचा वावर नसे त्यामुळे साफसफाईही जेमतेमच असायची आणि त्यात अडगळीचंच सामान असल्याने उंदारांचा वावरही जोमाने होता. त्यामुळे आजी किंवा आप्पा आम्हां मुलांना तिथे जायला देत नसत.

पण आज सुनीलदादा आला होता. तो असल्यावर सगळीच मुलं अगदी बिनधास्त असत. तो काय काय युक्त्या करून आप्पांना पटवत असे. आप्पांचा भारी विश्वास होता त्याच्यावर.... पोलिस इन्स्पेक्टर होता ना तो. त्याच्या जबाबदारीवर ही सगळी भुतावळ माडीवर जमणार होती. मी जरी सगळ्यांच्यात लहान असले तरी ही मुलं माझ्यावर दादागरी कधीच करीत नसत. अप्पांच्या धाकाने की काय माहित नाही, पण सगळेच जण मला सांभाळून घेत असत.

आमची टोलेबाजी चालू होती तिथे रश्मीताई आली आणि एकूणच माझा तक्रारीचा सूर पाहून ऋषीदाला म्हणाली,"येऊ दे रे अनुला पण, शेवटी तिच्यामुळेच तर आपल्याला ते प्रकरण कळलं. आणि अनु, एक लक्षात ठेव, आम्ही मोठे माडीवर जे काही बोलू त्यातलं एक अक्षरही आजी किंवा आप्पांना कळता कामा नये, कळलं?"

मी आज्ञाधारकपणे मान हलवली. ती काय 'प्रकरण' वगैरे म्हणाली त्याचा संदर्भ मला फारसा कळला नाही पण मीही फारशी खोलात शिरले नाही. नाहीतर मग मला माडीवर जायला मिळालं नसतं.

मी रश्मीताईबरोबर माडीवर पोचले तर तिथे बरीच मंडळी आलेली दिसली. ऋषीदा, सुनीलदादा, अभि, वंदू वगैरे होतेच आणि संध्याताई बरोबर नयना पण आलेली होती. मला तिथे पाहून नयनाने लगेच तोंड वाकडं केलं. मी काही लक्ष दिलं नाही तिच्याकडे. सुर्‍या आणि विशू पण दिसले. मोठाच प्रोग्रॅम ठरवलेला होता. खाली आजी, आप्पांना ह्याचा काहीच सुगावा लागलेला दिसत नव्हता. सुनीलदादाने काहीतरी जोरदार थाप मारून माडीची किल्ली मिळवलेली होती.

ह्या लोकांचा खेळ चालू झाल्यावर माझा गॅलरीतून कौलांवर जायचा प्लॅन होता. एक टपोरलेला शेंदरी आंबा मी सकाळीच हेरून ठेवला होता. पण सुनीलदादाने माडीवर ठेवलेल्या ट्रंकेच्या मागून एक बोर्ड काढला आणि सगळ्यांचेच डोळे विस्फारले. एका फडक्याने तो बोर्ड स्वच्छ पुसून त्याने खोलीच्या मधोमध ठेवला आणि त्याच्या भोवती पाणी शिंपडले. त्या बोर्डच्या चारही बाजूंनी A ते Z पर्यंत अक्षरं काढलेली होती. आणि 1 ते 9 आकडे पण होते. बरोब्बर मध्यभागी तीन गोल काढले होते, त्यात डाव्या बाजूच्या गोलात 'yes'' आणि उजव्या बाजूच्या गोलात 'no' असं लिहिलं होतं. मधला गोल रिकामाच होता.
"हे काय आहे?" मी रश्मीताईला ढोसलं.
तेव्हा 'श्श्ऽऽऽ' असं करून ती हलक्या आवाजात पुटपुटली, "ह्याला प्लँचेट म्हणतात, बोलायचं नाही हां अजिबात हे चालू झाल्यावर...कळलं ना?"
मी जोरात मान हलवली.

सुनीलदादाने वंदू आणि ऋषीदाला खुण केली तशी ती दोघं त्याच्याबरोबर त्या बोर्डच्या बाजूला बसले. सुनीलदादाने एक पितळेची पंचपात्री त्या मधल्या गोलात ठेवली आणि हात जोडून डोळे मिटले. वंदू आणि ऋषीदाने पण डोळे मिटले सुनीलदादाने मोठ्याने 'हूँऽऽऽ' असा आवाज काढला. केवढ्याने घुमला तो आवाज माडीवर.... नयनाने तर संध्याताईला घट्ट धरून ठेवलं. मला हसूच आलं तिचं.. भित्री भागूबाई कुठली!!

आता सुनीलदादा चक्क घुमायला लागला होता... नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी त्या कुंकवाने माखलेल्या बायका घागर घेऊन हुंकार काढत घुमतात ना अगदी तस्साच घुमत होता तो.... मला कंटाळा यायला लागला म्हणून मी उठून जायला लागले तर रश्मीताईने माझा हात धरून बळेच खाली बसवलं मला.. तिथे बसलेल्या सर्वांचेच डोळे अक्षरशः बटाट्यासारखे झाले होते. थोडा वेळ घुमल्यावर सुनीलदादा शांत झाला... त्या तिघांनीही त्या पंचपात्रीवर आपल्या उजव्या हाताची अनामिका ठेवली.

वंदू मग सर्वांना म्हणाली, " ती आलीये.. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा... पण एकामागून एक विचारायचे, कोणीही दंगा करायचा नाही.."
"ती म्हणजे कोण गं?" मी हळूच रश्मीताईला विचारलं.
"पणजी आजीचं भूत... ती आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार.. तू विचारलास तरी चालेल प्रश्न.." रश्मीताईने कुजबुजत उत्तर दिलं.
आयला! सहीच!! पणजी आजी आली होती आणि ती प्रश्नांची उत्तरं देणार होती. सुनीलदादाला काय काय किती किती येतं... भन्नाटच आहे तो... मला एकदम अभिमानच वाटला त्याचा.
सुरुवातीला कोणी काहीच बोललं नाही. नयना तर नुसती थरथर कापत होती. सुर्‍याचा एकदम ठोकळा झाला होता.
शेवटी मग रश्मीताईने विचारलं, "मला मेडिकलला ऍडमिशन मिळेल का?" तिची आत्ताच बारावीची परीक्षा झाली होती.
काहीच झालं नाही. मग ऋषीदाने परत तोच प्रश्न विचारला, तेव्हा ती पंचपात्री जागच्या जागी थोडी फिरली मग अगदी हळूहळू सरकत 'yes' वर जाऊन परत मधल्या गोलात आली.
मी तोच विचार करत होते की पणजी आजी कशी देणार उत्तरं... समजा ती बोलली तर सर्वांना ऐकू येईल का? कारण ती गेली त्याआधी बरेच दिवस तिच्या तोंडातून आवाजच येईनासा झाला होता. पण हा प्रकार सहीच होता. रश्मीताई एकदम खुश झाल्यासारखी दिसत होती.
मग सुर्‍याने पण विचारलं त्याच्या दहावीच्या मार्कांबद्दल.... तर त्या पंचपात्रीने सरकत जाऊन ६ आणि ९ असे आकडे दाखवले. म्हणजे त्याला ६९% मिळणार होते. विशूने त्याची हरवलेली मांजर मिळेल का असं विचारलं तर 'yes' असं उत्तर आलं. पण 'कुठे मिळेल?' ह्या प्रश्नावर मात्र ती पंचपात्री काहीच बोलली नाही.... म्हणजे कुठेच फिरली नाही.
"पणजी आजीला इंग्लिश कुठे येत होतं?" मी हळूच अभिला विचारलं. हसायलाच लागला तो मोठ्याने... सुनीलदादाने रागाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा गप्प झाला.
"अगं पणजी आजी आता स्वर्गात गेली ना, म्हणजे आता तिला सगळ्याच भाषा येतात.." रश्मीताईने मला समजावलं.
मला मज्जाच वाटली खूप... मीही मग माझ्या स्कॉलरशिपबद्दल विचारलं तर आधी काहीच उत्तर आलं नाही, मग वंदूने परत तोच प्रश्न विचारल्यावर पंचपात्री झपकन 'yes' वर गेली.
यूssहू ssss म्हणजे मला स्कॉलरशिप मिळणार होती तर....
मग अभिने संध्याताईच्या लग्नाबद्दल विचारलं तेव्हासुद्धा ती पंचपात्री 'yes' वर गेली. संध्याताईने एक धपकाच घातला त्याच्या पाठीत... पण हळूहळू आता सगळ्यांनाच त्या खेळात गंमत वाटू लागली होती. रश्मीताईने विचारलं की संध्याताईला कुठलं सासर मिळेल? तेव्हा पंचपात्रीने U, S, A अशी अक्षरं दाखवली.
हूssss अम्मेरिका...... सगळेच एकदम हुरळून गेले. संध्याताईचे गाल एकदम लाल लाल दिसायला लागले.

मग विशूने नयनाला प्रश्न विचारायचा आग्रह केला. ती काहीच बोलायला तयार होईना. विशू म्हणाला की मीच तिच्या वाटचा प्रश्न विचारतो... तर सगळेजण त्यालाच 'विचार, विचार' असं म्हणायला लागले. मग त्याने तोच संध्याताईचाच प्रश्न विचारला... म्हणजे लग्नाचा... नयना तर रागाने उठून जायला लागली पण संध्याताईने तिला अडवलं. सुनीलदादा आणि वंदूने एकमेकांना डोळ्यांनी काहीतरी खुणावलं... आणि रश्मीताईकडे पाहिलं तर तिनेही 'हो' म्हटल्यासारखी मान हलवली.

अभिने परत प्रश्न विचारला की नयनाचं लग्न होईल का? आणि झालं तर कोणाशी होईल... ती पंचपात्री आधी 'no' च्या दिशेने सरकत होती पण मध्येच थांबली आणि 'yes' वर जाऊन परत मधल्या गोलात आली. नयनाचा चेहरा जाम घाबरलेला दिसत होता... शी!! घाबरायचं काय त्यात... लग्न तर होणारच ना... संध्याताई घाबरली का? आता ती पंचपात्री इंग्लिश अक्षरांच्या दिशेने जायला लागली होती. R, O, S, H ही अक्षरं दाखवातच मी जोरात ओरडले, "रोशन!! रश्मीताई रोशनच.... मी तुला म्हटलं ना त्या दिवशी..."

नयना ताडकन् उठून उभीच राहिली. माझ्याकडे पाहून रागारागाने ओरडायला लागली,"हिच्यामुळे वाट लागली माझी... चुगलखोर कुठली.. उगाच घेऊन गेले तुला बाजारात त्या दिवशी.... लगेच घरी येऊन सांगायची काही गरज होती का?"

खरी होती तिची गोष्ट..... आजीने सांगितलं म्हणून मी गेले होते तिच्याबरोबर बाजारात त्या दिवशी.. तेव्हा तिला तो भेटला होता... शी!! कसातरीच होता तो एकदम... कानात काहीतरी रिंगसारखं घातलं होतं.. शर्ट असाच पँटच्या बाहेर आला होता... त्याच्या हातात सिगरेट होती आणि ओठ पण एकदम पान खाल्ल्यासारखे लाल लाल झाले होते. त्याच्या कपाळावर शिवण मारल्यासारखी एक मोठ्ठी खूण होती. खूपच रागीट दिसत होता तो त्यामुळे....तो कपाळावरचे केस मागे सारत होता तेव्हा ती खूण अगदी स्पष्टपणे दिसली मला..... नयनाला पाहून त्याने चक्क शिट्टी मारली... नयना पण गेली त्याच्याकडे धावत... एकदम माझा हात सोडून... किती वेळ मी एकटीच उभी होते तिथे.... ते दोघे दुकानाच्या आत जाऊन पडदा लावून बोलत होते किती तरी वेळ.... उभं राहून राहून माझे पाय दुखायला लागले... खुप वेळाने नयना बाहेर आली आणि मग मागे पाहून तो दिसेनासा होईपर्यंत त्याला टाssटा करत होती. तिला टाटा करताना पचकन् थुंकला तो.... शी!! घाणेरडा कुठला... मला एकदम घाणच वाटली त्याची... मी घरी येऊन रश्मीताईला सगळं सांगितलं... तेव्हा ती मोठे मोठे डोळे करून परत परत मला त्या मुलाबद्दल ती खोदून खोदून विचारत होती. मला तो मुलगा आवडला नव्हता एवढंच मी रश्मीताईला सांगितलं होतं.. ह्यात नयनाची कुठे मी चुगली केली होती? काही पण बोलते... बावळट कुठली!!

बराच वेळ नयना मोठ्या मोठ्याने ओरडत होती. माझ्याकडे रागारागाने बघत होती. मी रश्मीताईचा हात घट्ट पकडून ठेवला होता. काय माहीत.... मला मारायला वगैरे आली तर काय करायचं? पण तसं काही झालं नाही. बराच वेळ ओरडून बोलल्यावर ती एकदम खालीच बसली... आणि रडायला लागली.

वंदूने एव्हाना प्लँचेटचं सगळं सामान आवरून ठेवलं होतं. पणजी आजी कुठे गेली कोणास ठाऊक...

नयना जरा शांत झाल्यावर सुनीलदादाने तिच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. ती रोशनला कशी ओळखते? कधीपासून ओळखते? तुम्ही दोघे कुठे भेटता? भेटता तेव्हा अजून कोणी बरोबर असतं का? त्याचं घर कुठेय माहित्ये का वगैरे वगैरे.... नयना जमेल तशी तुटक तुटक उत्तरं देत होती. सुनीलदादा सकाळी आला तेव्हा त्याने मलाही त्या रोशनबद्दल काय काय विचारलं होतं. तो कसा दिसतो? साधारण किती उंच आहे? त्याच्या कपाळावरच्या खुणेबद्दलही त्याने परत परत मला विचारलं. शेवटी मी त्याला एक काटकी घेऊन मातीत ती खूण काढून दाखवली. मला फक्त तो 'शाब्बास' एवढंच म्हणाला. पण सुनीलदादाचा मला रागच आला. सकाळी मी त्याला म्हटलं की तुझ्या लाल दिव्याच्या गाडीतून मला एक चक्कर मार गावात तेव्हा मारे म्हणाला की 'मी एका ऑपरेशनवर आलोय, मला वेळ नाहीये तुझे लाड करायला'... मला फिरवायला वेळ नव्हता ह्याला मग आप्पा-आजीच्या नकळत हे प्लँचेट वगैरेचे धंदे करायला बरा वेळ आहे... आणि पोलिस काय करतात ऑपरेशन?

रोशन चांगला मुलगा नाहीये, त्याचे काय धंदे चालतात ते तुला माहीत नाही वगैरे काय काय सांगून सुनीलदादा आणि अभि नयनाला समजावत होते. पण ती हट्टीपणाने एकच एक म्हणत होती की आम्ही दोघे लग्न करणार आहोत.... शी!! रोशनशी लग्न? इतक्या घाणेरड्या मुलाशी? नयनाने रोशनशी लग्न केलं तर आप्पा तिला ठेवतील का कामावर?

त्यांचं बराच वेळ बोलणं चालू होतं. खालच्या चटईवर मी कधी झोपले तेच मला कळलं नाही. जाग आली तेव्हा माडीवर फक्त रश्मीताई, वंदू, सुर्‍या, अभि, संध्याताई आणि सुनीलदादा होते. विशु नयनाला घेऊन घरी गेला होता. सुनीलदादाने मला जवळ घेतलं आणि पुढच्या वेळी गाडीतून फिरवायचं प्रॉमिस केलं.

संध्याताई रात्रीच्या गाडीने मुंबईला जायची होती. आप्पांना सांगून नयनाला मी माझ्याबरोबर घेऊन जाते असं ती म्हणत होती. सुर्‍यानेच म्हणे तसं तिला सुचवलं होतं. इथलं वातावरण निवळलं की तो नयनाला आणायला संध्याताईकडे जाणार होता. कसलं वातावरण कोणास ठाऊक... सगळ्यांच्याच चेहर्‍यावर टेन्शन दिसत होतं.

सुनीलदादा जसा अचानक आला तसाच अचानक गेलासुद्धा...... तो खरं म्हणजे रात्री परत जाणार होता. बरीच तयारी करायला हवीये वगैरे काहीतरी म्हणत होता. नयनाने संध्याताईबरोबर जायला खूपच कटकट केली. पण सुर्‍याने तिचं सामान आधीच गाडीत ठेवलं होतं आणि अभिने बळजबरीनेच तिला गाडीत बसवलं. ती खूप रडत होती, 'एकदाच मला त्याला भेटू दे' असं म्हणत होती. पण अभिने तिचं अजिबात काही चालू दिलं नाही.

नंतरचे चार-पाच दिवस अगदीच कंटाळवाणे गेले. रश्मीताई, वंदू, ऋषीदा वगैरे सगळेच खूपच टेन्शनमध्ये वाटत होते. डोंगरावर करवंदांच्या जाळीतसुद्धा यायला कोणी तयार नव्हतं. मी मध्येच एकदा वंदूला म्हटलं पण की आपण पणजी आजीला परत बोलावू या का? तर त्यावर ती म्हणाली की हे प्लँचेट वगैरे काही खरं नसतं! खरं नसतं तर मग केलंच का त्या दिवशी माडीवर? उगाच नाटक करायला का? सतत चार वर्ष दहावीला बसतोय सुर्‍या...... त्याला दहावीला ६९% मिळणार म्हणजे मग झालंच त्याचं कल्याण.. ह्याचा अर्थ माझं स्कॉलरशिपचं पण खोटंच होतं. आणि संध्याताईची अमेरिका पण खोटीच होती.

रश्मीताई सतत माझ्या मागे मागे असायची... पण न बोलता. बाजारात जाऊन फिरून येऊया का म्हटलं तर घाबरून नको म्हणायची. म्हणे त्यांनी तुला बघितलंय नयनाबरोबर... मला काही कळतच नव्हतं त्यांचं बोलणं. सुनीलदादासकट सगळ्यांचाच राग येत होता. कोणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. आई बाबांची सारखी आठवण येत होती. कधी एकदा सुट्टी संपून मुंबईला त्यांच्याकडे जातोय असं झालं होतं.

एक दिवस मात्र सक्काळी लवकर अभि स्टँडवर जाऊन खूप सारे पेपर घेऊन आला. सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर सुनीलदादाचा मोठा फोटो होता. आणि अख्ख्या पेपरभर त्याच्याबद्दल छान छान सगळं लिहिलं होतं. त्याने म्हणे एक गँग पकडली होती. ती गँग रात्रीच्या वेळी किनार्‍यावर येणार्‍या बोटींतले खोके आपल्या गाडीतून आणून कुठे कुठे लपवून ठेवायची. आणि परत आपल्या गाडीतून कुठे लांब लांब पोचवायचीसुद्धा....

रश्मीताईला मी विचारलं गँग आणि खोक्यांबद्दल... ती एवढंच म्हणाली, "बाँबचं सामान असायचं त्या खोक्यांमध्ये... तू त्या रोशनचा पत्ता सांगितलास म्हणून सुनीलदादा एवढं सगळं शोधू शकला."
मी म्हटलं, "मला नाही माहीत रोशनचा पत्ता वगैरे आणि मी आधी कधी त्याला पाहिलंही नाहीये इथे गावात.."
तर ती म्हणाली, "कोणीच पाहिलं नव्हतं त्याला... पण तू त्याच्या कपाळावरची ती खूण सांगितलीस ना त्यावरूनच सुनीलदादाने अंदाज बांधला.. आणि तो अंदाज खरा ठरला. मग नयनाकडून त्याच्याबद्दलची माहिती विचारून घेतल्यावर त्याला शोधून काढणं फारसं कठीण नाही गेलं. पण त्याची पाळंमुळं शोधायला बराच त्रास झाला सुनीलदादाला..."

माय गॉड!! म्हणजे रोशन त्या गँगमध्ये होता. शी!! नयना पण वेडीच आहे, असं गँगमधल्या माणसाशी कोणी लग्न करतं का....

आप्पांना आणि आजीला मग अभिने सगळंच सविस्तर सांगितलं. आप्पा तर आपल्या नातवावर एकदम खुश झाले होते. आजीने ऋषीदाला मिठाई आणायला बाजारात पिटाळलं. मग दिवसभर कोण ना कोण तरी घरी येत-जात होते. आप्पांचं, सुनीलदादाचं अभिनंदन करायला... आप्पा सगळ्यांना मुद्दाम माझ्याबद्दलही सांगत होते, माझं कौतुक करायला सांगत होते.

दोन दिवसांनी सुनीलदादा घरी आल्यावर एक जंगी मेजवानी दिली आजीने सर्वांना.... गावाने त्याचा सत्कारही केला. मज्जाच मज्जा सगळी.... मधल्या चार-पाच दिवसांचा कंटाळा एकदम पळूनच गेला. पण आमची सुट्टी संपत आली होती. त्यामुळे मुंबईला जाणं भाग होतं.

आम्ही आजीकडून निघालो तेव्हा आप्पांनी मला बक्षिस म्हणून आंब्याची एक पेटी जास्त दिली इतरांपेक्षा.... नयनाची आई गंगूमावशी सारखी येऊन मला कवटाळत होती. 'माझ्या बायच्या डोक्यावरचं भूत उतरवलंस' असं काहीतरी म्हणत होती. मी तिला कित्ती सांगितलं की ते भूत वगैरे खोटं असतं तरी तिचं माझ्या डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटं मोडणं चालूच होतं.

मुंबईला गेल्यावर मैत्रिणींना सांगायला माझ्याकडे भरपूर मालमसाला होता. सुनीलदादाच्या पराक्रमामुळे ह्यावेळची सुट्टी एकदम मस्त झाली होती. सुनीलदादा आम्हा सगळ्यांना मुंबईला सोडायला येणार होता...... तेही चक्क लाल दिव्याच्या गाडीतून!! त्याची आता मुंबईलाच बदली झाली होती. तो आता आमच्याचकडे राहणार होता. मस्तच धमाल होती सगळीच.........

- manjud

लेखन प्रकार: