रीतीप्रमाणे लग्न, दोन मुली; दृष्ट लागेल असा संसार होता तिचा. संजयची बदलीची नोकरी तशी थोडी पथ्यावरच पडली होती. लांब राहून सगळ्यांशी चांगले संबंध ठेऊन होते ते. संजयचा स्वभाव थट्टेखोर, तर मनीषा मस्करीपासून चार हात लांब. कुणावर कॉमेंट्स करणे, खेचणे हे तिच्या पचनी पडत नसे. कुठेतरी खटके उडायचे दोघांमधे. पण मुलींमुळे प्रकरण फार वेळ ताणले जायचे नाही. तरीसुद्धा आत कुठेतरी धुसफूस, असमाधान मूळ धरत होते. कुणाचीतरी दृष्ट लागत होती. कळत नव्हते, जाणवत नव्हते इतकेच! तिला वाचनाची आवड, त्याला वावडे. त्याला पिक्चर्स पहाणे, भटकणे यांचे वेड; तर ती नवर्याबरोबर करायच्या म्हणून या गोष्टी करणारी.