आज अचानक गाठ पडे

आज अचानक गांठ पडे ॥ धृ ॥

भलत्या वेळी, भलत्या मेळी
असतां मन भलतीचकडे ॥ १ ॥

नयन वळवितां, सहज कुठे तरि
एकाएकी तूच पूढे ॥ २ ॥

दचकुनि जागत, जीव निजेंतच
क्षणभर अंतरपाट उघडे ॥ ३ ॥

नसतां मनिंमानसी अशी ही
अवचित दॄष्टीस दॄष्टी भिडे ॥ ४ ॥

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागें मुरडे ॥ ५ ॥

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे ॥ ६ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आला पाऊस

आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग ॥ धॄ ॥

आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥

कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥

लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥

झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई, शेजारच्या अंगणात
फ़ुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यांत ॥ १ ॥

आली बघ गाई गाई, चांदण्याचे पायी चाळ
लाविले का अवधान, ऐकावया त्यांचा ताल ॥ २ ॥

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हंसलीस, उमटली गोड खळी ॥ ३ ॥

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे ॥ ४ ॥

आली बघ गाई गाई, काढीतसे लांब झोका
खेळूनिया दमलीस, मीट मोतियांच्या शिंपा ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आज कुणीतरी यावे

आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

जशी अचानक या धरणीवर,
गरजत आली वळवाची सर
तसेच यावे त्याने

विचारल्यावीण हेतू कळावा
त्याचा माझा सूर जुळावा
हाती हात धरावे

सोडूनीया जन्माची नाती
निघून जावे, तया संगती
कूठे, तेही ना ठावे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: