अंगाईगीत

नीज माझ्या नंदलाला

नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झऱ्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे

झोपल्या गोठ्यात गाई
साद वा पडसाद नाही
पाखरांचा गल्बलाही बंद झाला, बंद झाला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

सावल्यांची तीट गाली
चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

नीज रे आनंदकंदा,
नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागऱ्यांच्या छंदताला, छंदताला रे
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नीज रे नीज शिवराया

गुणि बाळ असा, जागसि का रे वाया
नीज रे नीज शिवराया ॥ ध्रु ॥

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला, तिळ उसंत नाही जिवाला
निजवायचा, हरला सर्व उपाय, जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका, हा असाच घटका घटका
का कष्टवीसी तुझी सावळी काया ॥ १ ॥

ही शांत निजे, बारा मावळ थेट, शिवनेरी जुन्नरपेठ
त्या निजल्या त्या, तशाच घाटाखाली
कोकणच्या चवदा ताली, ये भिववाया, बागुल तो बघ बाळा
किती बाई काळा काळा, इकडे तो सिद्धिजमान
तो तिकडे अफ़जलखान, पलिकडे मुलुखमैदान
हे आले रे, तुजला बाळ धराया ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई, शेजारच्या अंगणात
फ़ुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यांत ॥ १ ॥

आली बघ गाई गाई, चांदण्याचे पायी चाळ
लाविले का अवधान, ऐकावया त्यांचा ताल ॥ २ ॥

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हंसलीस, उमटली गोड खळी ॥ ३ ॥

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे ॥ ४ ॥

आली बघ गाई गाई, काढीतसे लांब झोका
खेळूनिया दमलीस, मीट मोतियांच्या शिंपा ॥ ५ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: