सहज सख्या एकटाच येई सांजवेळी

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरुखाली

हिरवळीत गीत गात
सांजरंगी न्हात न्हात
स्वप्नांना रंगवुया लेवुनिया लाली

अधरी जे अडत असे
सांगीन तुज गुज असे
प्रीति ही प्रीतिविण अजुनही अबोली

तृणपुष्पे ही मोहक ती
उमलतील एकांती
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सूर येती विरून जाती

सूर येति विरुन जाति कंपने वाऱ्यावरी, हृदयावरी

या स्वरांचा कोण स्वामी की विदेही गीत देही
हाय अनोखी ही आलापी कवळिते मजला उरी

बंधनी आहे तरी ही मुक्त झालो आज मी
पंख झालो या स्वरांचे विहरतो मेघांतरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सासु-यास चालली

सासुऱ्यास चालली, लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला !

ढाळतात आसावे मोर-हरीणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षि बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते, तुला !

पान पान गाळुनी दुःख दविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंति धरुनि पल्लवा, आडवी खुळी तिला !

भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदास सोसवे, दुःख हे कसे बरे ?
कन्यका न, कनककोष मी धन्यास अर्पिला !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सावर रे

सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला
सुख मला भिवविते सांगू कसे तुला ?

आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला

फांदी झोक्याने हालते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे
सांभाळ तू बावरल्या वेड्या तुझ्या फुला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सजणा पुन्हा स्मरशील ना

सजणा पुन्हा स्मरशील ना
साऱ्या खुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

चकवून कुणा आले कोण
दिधले प्रिया चुंबनदान
कोणी कुणा, सजणा पुन्हा स्मरशील ना !

प्रीतीतले लाख बहाणे
तू मी नवे खेळ पुराणे
मनमोहना, सजणा पुन्हा स्मरशील ना !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सजणा, कशासी अबोला ?

सजणा, कशासी अबोला ?
घडला, असा रे माझा काय गुन्हा ?

छळितो मजसी हा दुरावा
ध्यास तुझा जुलमी !
मोहरली वसुधा तरी का
सावन हा विरही ?
नवरंगी पुकारि माझि साद तुला
नवरंगी पुकारी साद तुला !

भास तुझा फुलवी सुखाचा
पारिजात हृदयी
आस मनी झुरते अनोखी
व्याकुळल्या समयी
रतिरंगि बुडालि अशि चंद्रकला
रतिरंगि बुडाली चंद्रकला !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सारेच हे उमाळे आधीच योजलेले

सारेच हे उमाळे आधीच योजलेले
सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले !

सांभाळतात सारे आपापली दुकाने;
माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !

मी हा भिकारडा अन्‌ माझी भिकार दु:खे;
त्यांचे हुशार अश्रू आधीच गाजलेले !

माझी जगायची आहे कुठे तयारी ?
त्यांच्या नकोत युक्त्या जे जन्मताच मेले !

माझ्या शिळ्या भुकेची उष्टी कशास चर्चा ?
जे घालतात भिक्षा तेही उभे भुकेले !

आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे ?
येतात जे दिलासे तेही उगाळलेले !

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सजल नयन नितधार बरसती

सजल नयन नितधार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती ||धृ||

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती ||१||

चंद्र चांदणे सरले आता
नीरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतील अमृतधारा
तुझ्याविण विषधारा होती ||२||

थकले पैंजण चरणही थकले
वृंदावनीचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजून उखाणे मला घालिती ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सूर मागू तुला मी कसा?

सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळिले
दुःख माझा तुझा आरसा

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो खेळ झाला जसा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: