सर्जा गेल्यावरी अंधाराच्या सरी

सर्जा गेल्यावरी अंधाराच्या सरी
चांदणी एक न्हाई काळ्या चांदव्यात

आशीचा चांदूबा दिसना गं...
दिसना गं काळ्या चांदव्यात

घाबरून लपली धरतीची बाळं
कांबरून कांबळं आबाळाचं... आबाळाचं

किरकिरती किडे, रात जणू रडे
का दैवाची पावलं आडंनातं

सर्जा बिगी येई तुझी जाई घरी
डोई जीव धरी मायेच्या कुशीत... मायेच्या कुशीत

कोमेजलं फूल करपेल येल
दूरुन ती आग जीवाला जाळीत

पार्वतीनं घातलं तप संबूसाठी
आला तिच्या भेटी दयाळू धावत... दयाळू धावत

नका धनी तथं कष्टू पारूसाठी
परजाईच्या जीवाची पुरवा जी आस

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सरणार कधी रण

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी? ||धृ||

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतरज्योती
कसा सावरु देह परी? ||१||

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमीवरी ||२||

पावनखिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी? ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

समाधी साधन संजीवन नाम

समाधी साधन संजीवन नाम | शांती तयासम सर्वांभूती || १ ||
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू | हरिनाम उच्चारू दिधला तेणें || २ ||
शम दम कळा विज्ञान सज्ञान | परतोनि अज्ञान न ये घरा || ३ ||
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट | भक्तीमार्ग नीट हरिपंथी || ४ ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍यांचे
आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी
स्वर आले दुरूनी...

विरहात मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी
स्वर आले दुरुनी...

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी
स्वर आले दुरुनी...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबलेला कुणाशी बोलले ना
चालले लुटुतुटु पाही ससा

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांजवेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सखी गं मुरली मोहन मोही मना

सखी गं मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा

शृंगाराची प्रीत करिता चिंतन
अनुराग त्याचा देतालिंगन
चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा
मोही मना...

कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येतानंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा गं
सखी गं...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्वप्नात रंगले मी

ती: स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
तो: हे वेड प्रेमिकांचे गीतात गाईले मी
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी

ती: या वृक्ष-वल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिले मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्नात रंगले मी...

तो: एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा
या नीलमंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्द-सूर हे हार गुंफिले मी
ती: सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्नात रंगले मी...

ती: घेशील का सख्या तू हातात हात माझा
तो: हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
दोघे: या जन्म-सोबतीला सर्वस्व वाहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्नात रंगले मी...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सप्तपदी मी रोज चालते

सप्तपदी मी रोज चालते
तुझ्यासवे ते, शतजन्मीचे हो, माझे नाते

हळव्या तुझिया करांत देता
करांगुली ही रूप गोजिरी
गोड शिरशिरी उरात फुलता
स्पर्शाने जे मुग्ध बोलते

करकमळांच्या देठांभवती
झिम्मा खेळत प्रीत बिलवरी
दृष्ट लाजरी, जरीकाठी ती
तुझ्या लोचने वळुनी बघते

आठवे पाऊल प्रीत मंदिरी
अर्धांगी मी सगुण साजिरी
मूर्त होता तुझ्या शरीरी
अद्वैताचे दैवत होते

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सोनसकाळी सरजा सजला

सोनसकाळी सरजा सजला, हसलं हिरवं रान
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

झुळुझुळु आला पहाटवारा
हळुच जागवी उभ्या शिवारा
झाडं वेली नीज सांडती नाचनाचतं पान
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

पिढ्यापिढ्यांचं पातक सरलं
शिवनेरीला शिव अवतरलं
शिवरायांच्या मंगल चरणी
पावन झाली अवघी धरणी
जय भवानी बोल गर्जती आज पाचही प्राण
राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सुंदर ते ध्यान

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया

तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: