गझल

उघड्या पुन्हा जहाल्या

उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या
फुलती तुझ्या स्मृतींच्या, कलिका मनातल्या ||धृ||

येऊ कशी निघोनी, पाऊल अडखळे
विरहात वेचितांना, घटना सुखातल्या ||१||

उठता तरंग देही, हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी, भेटी वनातल्या ||२||

हासोनिया खुणावी, ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या, तारा नभातल्या ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जळला माझा आत दंग झालो ॥धृ॥
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो॥१॥
किरण एक धरूनी हाती मी पुढे निघालो
अन्‌ असाच वणवणताना मी मलाच मिळालो
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो॥२॥
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी
तरू काय? इंद्रायणिचा मी तरंग झालो॥३॥
कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी
मी इथेच केली माझी सोसण्यात बारी
पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग झालो ॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जगत मी आलो असा की

जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे मी कधी शिकलोच नाही

वाटले मज गुणगुणावे ओठ पण झाले तिर्‍हाइत
सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही

कैकदा कैफात माझ्या मी वीजांचे घोट प्यालो
हाय! पण तरीही प्रकाशा मी कधी पटलोच नाही

संपल्यावर खेळ माझा आंधळ्या कोशिंबिरीचा
लोक मज दिसले अचानक मी मला दिसलोच नाही

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: