कविता

कैदी

Kaidi.jpg
घनगर्द पर्णसंभार, गडद अंधार, रांगती जर्द सर्प बुंध्यात
वर निर्मम संततधार, गहन गंधार कोंदतो घमघमत्या गंधात

पायांत झिरपती ओहळ वाहत काजळ पाहुन भोवळती पडछाया
वर उंचनिंच माथ्यास कंच हिरव्यास खोल नि:श्वास येत ऐकाया

पोवळे बिंब कोवळे उदे मोकळे कुठेशी दूर निळ्या आकाशी
अंदाजच येथे फक्त, पहारे सक्त, कसे पोचावे सत्य मुळाशी

कर्दमात रुतले तमात अन् संभ्रमाशीच नाते जडल्याची धास्ती
अस्वस्थ आत उध्वस्त रान बंदिस्त स्वत:च्या अस्तित्वातच कैदी

- swaatee_ambole

लेखन प्रकार: 

पैलतीर

pailateer_ajay_patil.JPGतुलाच ना नकोसं होतं
लहरींवर रुसून
लाटांना भिऊन
वार्‍याकडे पाठ करून
नकाराचा नांगर टाकून
बसायला वाळूत तोंड खूपसून

म्हणूनच तर ना माझ्या मना
आपण निघालो पैलतीरी
लहरींवर झुलत
लाटांवर बागडत
वार्‍याला झुलवत
खारे फवारे झेलत
कधी डुचमळत
तर कधी कोलमडत
पण कधीही
न बसता रडत

पैलतीर दिसताच मग
का आठवलं सुकाणू
तट्ट फुगलं शीड
का पाहतोयस गुंडाळू
अरे,जाऊ ना असेच मस्तीत
भिडू त्याही तीराला मजेत
अन् कुणी सांगावं
असेल तोच आपला
खराच ऐलतीर
सोडून आलो आत्ता

लेखन प्रकार: 

श्री. मिलिंद बोकील, श्रीमती शांता शेळके - सोनाली कुलकर्णी

milindbokil.jpg
shantabai.jpg

श्री. मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' या कादंबरीनं वाचकांना भुरळ घातली. या कादंबरीइतक्याच त्यांच्या कथाही सशक्त आहेत. शिवाय विशेष उल्लेखनीय आहे, ते त्यांचं सामाजिक क्षेत्रातील कार्य.

श्रीमती शांता शेळके हे प्रत्येक मराठी माणसाला कायम आपलंसं वाटणारं नाव. कथा, कादंबर्‍या, ललित, कविता, गीते असे विविध लेखनप्रकार त्यांनी लीलया हाताळले. अनेक कथा-कादंबर्‍यांचे उत्कृष्ट अनुवाद केले. त्यांपैकीच एक 'चौघीजणी'. लुईसा मे अल्कॉट यांच्या 'लिट्ल विमेन' या कादंबरीचा हा अतिशय सुरेख अनुवाद.

sonali.jpg




या कादंबरीतील 'प्रथम परिचय' या प्रकरणाचं, तसंच श्री. मिलिंद बोकील यांच्या 'झेन गार्डन' या कथासंग्रहातील 'अधिष्ठान' या कथेचं वाचन केलं आहे सोनाली कुलकर्णी यांनी...

लेखन प्रकार: 

श्री. द. मा. मिरासदार

mirasdar.jpg

श्री. द. मा. मिरासदारांनी वाचकांना खळखळून हसवलं. बारीकसारीक तपशीलांसकट उभी राहणारी पात्रं, भन्नाट संवाद आणि जीवनाचं वास्तव चित्रण हे त्यांच्या विनोदकथांचं वैशिष्ट्य.

कथाकथन या प्रकाराला ज्यांनी महाराष्ट्रात प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यातले मिरासदार हे आघाडीचे शिलेदार. शंकर पाटील व माडगूळकरांसोबत कथाकथनाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. ग्रामीण आणि विनोदी कथांची जी अवघड वाट त्यांनी चोखाळली, ती इतक्या वर्षांनंतरही सवघड झालेली नाही, आणि इथेच मिरासदारांच्या कथेचे यश आहे..

'चकाट्या' या कथासंग्रहातील 'अभ्यास' ही कथा खुद्द श्री. द. मा. मिरासदार यांच्या आवाजात..

लेखन प्रकार: 

श्री. सुधीर मोघे

SudhirMoghe.jpg



श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकानं इतिहास घडवला. विशेष गाजली ती या नाटकातील रागमालिका. मुलतानी ते भैरवी असा तो सुरेल प्रवास होता.

कालांतराने या रागमालिकेच्या रंगमंचीय आविष्काराच्या निमित्ताने श्री. सुधीर मोघे यांनी काही रागचित्रे रेखाटली. शब्दांच्या माध्यमातून त्यांनी त्या रागांची वैशिष्ट्ये, सामर्थ्यस्थळे उभी केली होती. त्यापैकी या काही कविता श्री. सुधीर मोघे यांच्या आवाजात..

लेखन प्रकार: 

डॉ. अरुणा ढेरे

aruna_dhere.jpg

डॉ. रा. चिं. ढेरे हे मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक. इतिहास, धर्म, भाषा, तत्त्वज्ञान या संस्कृतीच्या विविध अंगांचा त्यांनी केलेला अभ्यास थक्क करणारा आहे.

डॉ. अरुणा ढेरे या एक समर्थ, संवेदनाशील कवयित्री व लेखिका आहेत. 'बापलेकी' या पुस्तकातील त्यांनी लिहिलेला हा लेख..
ही ध्वनिफीत (एकूण २७ मिनिटे) ३ भागात आहे. आधीचा भाग संपल्यावर पुढील भाग आपोआप चालू होईल.

लेखन प्रकार: 

श्रीमती दुर्गाबाई भागवत - केतकी थत्ते

durgabai.jpg
ketaki.jpg

दुर्गाबाईंचं निसर्गाशी एक खास नातं होतं. सार्‍या सृष्टीशी त्यांचं मैत्र होतं. झाडांशी, फुलांशी, पक्ष्यांशी संवाद साधायला त्या कायम उत्सुक असत.

'ऋतुचक्र' हे दुर्गाबाईंनी रचलेलं निसर्गसूक्त आहे. विलक्षण भावकोमल आणि बुद्धीच्या तेजाने उजळलेलं असं हे लेखन आहे. या पुस्तकातील 'सोनेरी आश्विन' वाचत आहेत केतकी थत्ते..

लेखन प्रकार: 

श्री. जी. ए. कुलकर्णी - अमृता सुभाष

GA.jpg
amruta_subhash.jpg




श्री. जी. ए. कुलकर्णी हे एक अतिशय प्रतिभाशाली कलावंत होते. या मातब्बर लेखकाने घडवलेल्या साहित्यशिल्पांनी मराठी भाषा झळाळून उठली.

जीएंच्या 'बखर बिम्मची' या पुस्तकातील एक भाग वाचत आहेत अमृता सुभाष...

लेखन प्रकार: 

श्री. दिलीप प्रभावळकर

DilipPrabhavalkar.jpg

आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटनांकडे, त्यांतील विसंगतीकडे मिस्कीलपणे पाहण्याची विलक्षण हातोटी श्री. दिलीप प्रभावळकर यांच्याकडे आहे. क्रिकेट, चित्रपट, राजकारण यांसारख्या असंख्य विषयांवर त्यांनी खुसखुशीत लेखन केलं आहे.

एक तालेवार अभिनेता आणि समर्थ लेखक, अशी ओळख असणार्‍या श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांच्या मोठा सहभाग होता. 'झूम' या लेखसंग्रहात, 'सुह्रद' या लेखात त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत.

ही ध्वनिफीत (एकूण ३३ मिनिटे) ३ भागात आहे. आधीचा भाग संपल्यावर पुढील भाग आपोआप चालू होईल.

लेखन प्रकार: 

श्री. मंगेश पाडगावकर

magesh_padgaonkar.jpg

गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकाची मिस्कील नजर यांची एकदम आठवण होते ती श्री. मंगेश पाडगावकरांच्या कवितेत. ती कधी चित्रमयी बनते तर कधी कोड्यात टाकते. या कवितेचं रूप, व्यक्तित्व सारंच वेगळं आहे.

पाडगावकरांनी आपल्या कवितांतून कायम सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं आहे. समाजातील भ्रष्टाचार, कोडगेपणा, सत्तालोलूपता यांमुळे अस्वस्थ होऊन त्यांनी 'उदासबोध' रचला. या संग्रहातील काही कविता त्यांच्याच आवाजात...

लेखन प्रकार: