कविता

श्री. ना. धों. महानोर

mahanor.jpg

श्री. ना. धों. महानोरांच्या अतिशय रसरशीत, निर्भय, आर्त कवितेने आपल्याला खेड्यातील सुखदु:खांचा, सौंदर्याचा परिचय करून दिला. खेड्यातील मातीत रमणार्‍या आणि राबणार्‍या मनाने रचलेल्या या ढंगदार कविता मनाला भुरळ पाडणारी चित्रे आहेत..

आपल्या खास ढंगात काही सुंदर कवितांचं वाचन करत आहेत श्री. ना. धों महानोर..

लेखन प्रकार: 

आरती प्रभू - विक्रम गोखले

aratiprabhu.jpg
vikramgokhale.jpg

एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा प्रत्यय येतो तो आरती प्रभूंच्या कवितेत..या रसरशीत, चिरतरुण, चित्रमय कवितेतील जोष, नाद, लय, सामर्थ्य विलक्षण मोहवून टाकणारं असंच आहे... स्वतंत्र जाणिवा आणि स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती यांमुळे आरती प्रभूंची कविता जीवनाशी एक नवं नातं निर्माण करते...

श्री. आरती प्रभू यांच्या निवडक कवितांचं वाचन केलं आहे श्री. विक्रम गोखले यांनी...

लेखन प्रकार: 

सुनीताबाई देशपांडे - शुभांगी गोखले

sunitabai_0.jpg
shubhangitai.jpg

श्री. जी. ए. कुलकर्णी आणि श्रीमती सुनीताबाई देशपांडे यांचं मैत्र अतिशय समृद्ध होतं. आठ वर्षं त्यांचा पत्रव्यवहार होता. जीएंनी स्वतःला सात दरवाज्यांमागे बंदिस्त करून घेतलं असलं तरी सुनीताबाईंशी त्यांच्या असलेल्या पत्रव्यवहारामुळे त्यांची जीवनाविषयीची आणि साहित्याविषयीची भूमिका त्या पत्रांमधून आपल्यापर्यंत पोहोचू शकली. तीक्ष्ण संवेदनेच्या, अस्मितासंपन्न सुनीताबाईंनी जीएंना लिहेलेली पत्रं हा संपन्न लेखनशैलीचा एक अप्रतिम नमुना आहे.

'प्रिय जी. ए.' या संग्रहातील एका पत्राचं वाचन करत आहेत श्रीमती शुभांगी गोखले...

लेखन प्रकार: 

बा. भ. बोरकर - सुनीता देशपांडे

borkar.jpg
sunitabai.jpg

जीवनाच्या विविधतेला होकार देणारी, ऐंद्रीय अनुभवांनी धुंद होणारी अशी श्री. बा. भ. बोरकरांची कविता. एक अतिशय तीव्र अशी आत्मनिष्ठाही या कवितांच्या ठायी आहे. जीवनातील विविध भाव, संवेदना बोरकरांची कविता मुक्तपणे चित्रित करते..बोरकरांच्या कवितेत वास्तव आणि कल्पित वास्तव यांचे रंग बेमालूम मिसळलेले असतात. नाजूक आणि रसरसलेल्या जाणिवा अतिशय सहजतेने या कवितेतून व्यक्त होतात...

श्री. बा. भ. बोरकरांच्या काही निवडक कवितांचं वाचन केलं आहे श्रीमती सुनीताबाई देशपांडे यांनी..

लेखन प्रकार: 

बा. सी. मर्ढेकर - डॉ. श्रीराम लागू

mardhekar.jpg
DrLagoo.jpg

श्री. बा. सी. मर्ढेकर हे मराठी साहित्यातले दुसरे केशवसुत. मराठी नवकवितेचे एक अध्वर्यू. काव्य क्षेत्रातले ते एक सृजनशील संशोधक होते. पाश्चात्य आणि पौर्वात्य वाङ्मयीन परंपरांच्या संगमावर उभी असलेली त्यांची चिंतनात्मक, प्रयोगशील कविता आजही तितकीच उत्कट वाटते. त्यांच्या इतकी अर्थपूर्ण भावकविता अर्वाचीन कालखंडात दुसर्‍या कोणत्याही कवीने लिहिलेली नाही.

आपल्या समर्थ अभिनयाने मराठी अभिनयक्षेत्रावर अधिराज्य गाजवणार्‍या नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू यांनी श्री बा. सी. मर्ढेकर यांच्या निवडक कवितांचं वाचन केलं आहे.

लेखन प्रकार: