कविता

अंतरे (गझल)

नाव नव्हते दिले, प्रेम केले खरे
आठवू लागता लोपले चेहरे

आत डोकावण्या मी उभा राहिलो
आरसे जाहले कावरेबावरे

झगडुनी शेवटी जीव त्यांनी दिला
सोसण्याऐवजी फार केले बरे

आठवांचा तुझ्या झोत पडला तसे
ह्या मनाचे सुने उजळले कोपरे

कारणे वाढली, अर्थ शब्दाळले
भावनांवर खर्‍या खोल पडले चरे

हेलकावे किती आतल्या आत हे!
मन बिचारे किती शोधते आसरे!

ज्या क्षणी सत्य स्वीकारती माणसे
त्याक्षणी काळही मिटवतो अंतरे

- नचिकेत जोशी

लेखन प्रकार: 

बेदरकार

तुझा सख्खा हट्ट,
आणि माझ्या इच्छा मात्र, सावत्रासारख्या!
माझ्याच घरात
मला पाठ करून उभ्या..

आजही हट्ट धरावा, इतका मी तुला
विश्वासू वाटतो -
ह्या समाधानाचं हसू आणि
कैक दिवसांनी हसण्यासाठी
विलगलेले ओठ!

तुझ्या हट्टाचं, माझ्या
संयमाशी कधीच पटत नसतं!
त्यातच सवय मोडलेली -
कुणाचं ऐकून घेण्याची!

मग आपसूकच दरीचं विस्तारणं,
तुझं उदास मनानं परतणं...
आणि तू गेल्यावर, तुझ्या हट्टानं
माझ्या पुढ्यात रेंगाळत राहणं....
घरातल्या नकोशा गुंतवळाप्रमाणे-
मी त्याला उचलून बाहेर टाकणं... अन्
पुन्हा जगण्याच्या एका कोपर्यात
जाऊन बसणं...

तुला हक्काचा वाटलोच इथून पुढेही,
तर तू येशीलच.

लेखन प्रकार: 

देणे तुझे ...

नको देऊ आणा-भाका नको शपथा वचने
मागितल्या विना मिळाले ते जपायचे आनंदाने

आनंदाने मन भरे नाही विषादाची छाया
गंधकोष प्रफुल्लित तूच दिला रिझवाया

रिझवाया सांजवेळी गाती स्मृतींची पाखरे
तुझ्या वस्तीतून आले सप्तरंगी भास सारे

भास सारे नक्षत्रांचे नभी रेखिती रांगोळी
तुझ्या नावे गुंफियल्या लक्ष मोतियांच्या ओळी

ओळी उतरल्या पानी दव रोमांच अधरी
रान तमाचे उजळी तुझा फुलोरा केशरी

केशरात हळदून पुन्हा उमलावे वाटे
कनकाचा साज तुझा ल्यावा एकदा पहाटे

पहाटेस फुलायचा माझा अपुरा प्रयास
नजरेत हासू तुझ्या, कानी हळू बोललास

बोलसी तू, "रातराणी ! सखे आता मिटायाचे

लेखन प्रकार: 

हेच खरे

काळजाशी फक्त त्यांनी जोडले नाते खरे
जे तुला जमले न, दु:खांना कसे जमले बरे?

मी तुझ्या डोळ्यांत आता वाळवंटे पाहतो
ते तुझ्या नजरेतले का आटले सारे झरे?

दूर तू गेलीस, जाताना जरा हसलीस तू
सांग कोणी हे सुखाचे कवडसे कैसे धरे?

ही अशी आमंत्रणे देतात का कोणी कधी?
शोधतो पत्ता, निशाणी, नाव अन् सारी घरे

मी पुसोनी स्वच्छ केले माणसांचे आरसे
तो मला दिसलेच माझ्या चेहर्‍यावरचे चरे...!

- मिलन टोपकर

2013_HDA-chehare.jpg

लेखन प्रकार: 

हे ढळणे जर सुपीक असले...

हे ढळणे जर सुपीक असले
फुलवित राहू येता जाता
पोचवायचे असे गतीला...
काळाच्याही विरूद्ध आता!

अगम्यतेच्या कुण्या किनारी
स्वतःस नेउन असे सोडले?
आणि कुणाचा भक्त व्हावया...
मी श्रद्धेचे स्फटिक फोडले?

अस्तित्त्वाच्या तुटती तारा
तरी स्वरांचे उरते नाव...
लाज राखण्या भूपाची तरी
तुझी भैरवी पणास लाव!

म्हणू नको ना "उत्तर नाही!"
डोळ्यामधले प्रश्न बोचले
क्षितीज नाही अशा प्रवाहा -
समोर आता हात टेकले!!

2013_HDA-neniveche_daas.JPG

- सुशांत खुरसाले

लेखन प्रकार: 

भविष्यातील एके दिवशी...

आज तुम्ही सारे नाहीत
मन विषण्ण...
याच स्वार्थी माणसाच्या बेगडी आयुष्यामुळेच
उद्ध्वस्त झाले तुमचे जीवन

काय दिमाखाने सजवल्या होत्या त्या वाटा दुतर्फा,
ज्या वाटेवरी माझ्यापरीच खूप जणांनी
तुमचं रूप न्याहाळलंय...

तुम्हांस पाहता, तिरंग्याच्या हिरव्या रंगाचा गर्व वाटायचा
या घडीला या मानवरूपी असुराच्या मतीची लाज वाटतेय..
ती हिरवाई, तो परांचा किलबिलाट
ती शीतल छाया, तो मधुर गर
असं किती किती...खूप...
आता मात्र शून्य, फक्त शून्य...

आता, त्या वाटेवरून जाणे नरकाप्रमाणे भासते
पण मन वेडे तुमच्या स्मृतींमुळे
तिकडेच सैरभैरत सुटते

एक एक फांदी तुटताना मी पाहिल्यात तुमच्या वेदना

लेखन प्रकार: 

स्टेशन

दोन सुखाच्या घासांवरही भागत असते
कुठे जिंदगी इतके सारे मागत असते

ऊर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते

तुला द्यायचा आहे तर दे स्वर्ग असा की
गरिबीचेही जेथे हसून स्वागत असते

इतकी येते याद कुणाला माहेराची
लागे चटका किंवा भाकर डागत असते

फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते

वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते

माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते

'शाम' बदलल्या इथल्या माणुसकीच्या व्याख्या
दुनिया हल्ली पैसा बघून वागत असते

- शाम

लेखन प्रकार: 

ती रात्र...

ती रात्र साधे ओळखीचे हासली
माझीच स्वप्ने मग चुकीचे वागली

सांगा तिला आता पुन्हा भेटू नको
माझी नजर नाही अताशा चांगली

काही तरी कानावरी गेले तिच्या
राखून अंतर चालते ती सावली

झाले कमी ना सोहळे गावातले
आमंत्रणे पण यायची ती थांबली

काठावरी फसवीच आहे शांतता
यमुना मनाची कालियाने व्यापली

- (जयन्ता५२) जयंत कुळकर्णी

2013_HDA_footer_1.jpg
लेखन प्रकार: 

नेणिवेचे दास

तुडवीत वाट जातो, ती रोजचीच आम्ही
हे सिद्ध रोज करतो, लायक जिण्यास आम्ही

तो मुक्त वाहणारा, वेढे नभास वारा
भूतला व्यापून उरलो कोरडे नि:श्वास आम्ही

छंद नाही पोसले की धुंद नाही जाहलो
कंठण्या निस्तेज जीवा ओतले सायास आम्ही

खेद ना आम्हा कशाचा, रोष ना कोणाप्रती
ना छेडण्यास धजलो, कधीही कुणास आम्ही

मुखवटे लेवून हसरे, नित्य सारे नेम पाळू
धन्य चाकोरीस मानू, नेणिवेचे दास आम्ही

रणशिंग फुंकलेले, संघर्ष-घोष घुमतो
क्रांती जरी समोरी, मृतवत उदास आम्ही

- श्रीराम बर्वे

लेखन प्रकार: