कविता

अस्वस्थ

हे घर माझे नाही अन् मीही इथली नाही
सोनेरी पाण्यामधली मासोळी स्वजली नाही

आत्म्याच्या नुसत्या गप्पा, बांधील प्रवाहालाच
मी काय वेगळी म्हणून मिरवू? हाताला बोटे पाच

घडते ते स्वीकारावे अन् दिसल्या वाटे जावे
पण खेळ मनाचे अजब, धुंडते रोज वेगळी गावे

भोगांची गणिते चुकती, कर्मांची बाकी उरते
हा तुझाच अट्टाहास, नशिबावर सटवी फिरते

मग निर्वातातुन कुणी सांडते गहिरे अनवट गाणे
थकल्या दिवसाखेरी झळके पायी सुवर्णनाणे

मी शांत अता गर्भात निजण्यास पुन्हा आतूर
पुढच्याचा पत्ता नाही अन् जुने राहिले दूर

- sanghamitra

लेखन प्रकार: 

"आभास"

तुझे भास किती आमंत्रणांचे आभास किती
मनातल्या मृगजळाची आग्रही आरास किती

लहरी मोगराही करतो सराईत इशारे
गाण्यांतल्या कहाण्यांची ही मिजास किती

पहाटेचा प्राजक्त अन तुझे लाघवी सुगंध
स्वप्नांनीही पहावी स्वप्ने असे मधुमास किती

सुगंध वेचण्याचे हिशेब केवढे जीवघेणे
पहाटेच्या प्राक्तनात रात्रीचे वनवास किती

लळा लावतो चंद्र पण हेळसांड तारकांची
नभाच्याही नशिबी ग्रहणे खग्रास किती

मिठीतल्या मंथनांची श्वासांनी केलीच चर्चा
विघ्ने सगुणा-निर्गुणाची या आत्म्यास किती

लेखन प्रकार: 

मदार

काय होता निरोप वार्‍यावर?
पान हलते अजून झाडावर...

शब्द साधा किती खुलून दिसे
अर्थ थोडा वयात आल्यावर

पाखरांचा बघा रुबाब जरा
नभ जणू तोलतात पंखावर!

का तुलाही निघून यावेसे -
वाटते; देवळात गेल्यावर?

हात अश्रूंत चिंब भिजले जे
या जगाची मदार त्यांच्यावर

- pulasti

लेखन प्रकार: 

कृत्रिम पाऊस

तू आल्यावर पाहू म्हणून, छप्पर गळकंच सोडून दिलं
काल माझं छप्पर, सारं वार्‍यावर सोडून, उडून गेलं

बाबा म्हणाला होता....

आभाळातून बघेल तो, खाली वाकून बघत नाही
दोन-चार कवडशांनी कुणी जळून मरत नाही

बाबा, बघ तुला आधार देत वाशांना तडा गेला
वाशांचा आधार छप्पर सोडून उडून गेला

रहाटाचा कोरडा दोर टोचला असेल ना त्याला
कितीदा तुटला दोर.. कालच कसा तरून गेला ?

आभाळ पाहणारे डोळे आता आभाळातून पाहतात
आभाळातून रडतो बाबा तिथेही अश्रू कोरडे वाहतात

लेखन प्रकार: 

एका टाकाबद्दल...

कुठलेही कागद आणा
नि धरा काहीही खाली
अन् पहा कशी झरझरते
ही माझी स्पेशल झरणी

गुळगुळीत, जाडा, कोरा
ते नकोत किमती नखरे
भरला कागद आणा, ज्या
कंगोरे अनंत कोरे

कोर्‍याला रंग न कुठला
सोवळी शुभ्रता टाळा
रंगेल आतवर शाई
असताच रंग पाण्याचा

मौनाचा कातळ काळा
रगडून मिळवली शाई
ती रंग उषःकाळाचे
मग स्वतः पेरते रात्री

शाईच्या कुठल्या दौती?
ती सरस्वतीची करणी
अडखळते, संतत झरते
ही माझी स्पेशल झरणी

- asaneman

लेखन प्रकार: 

एक‍‍‍टाकी भरण्याबद्दल...

लिहायचं म्हटलं, की असंच होतं
उतरायला हवं ते उतरत नाही,
उतरवू म्हटलं तर जमत नाही
मनात आणायचंच नाही
असं कधी ठरवता येतं?
नि येऊन न उतरलेलं
न साचता ठेवता येतं?
मग काय? फक्त वाट
भरेस्तोवर काठोकाठ
मोठ्ठ्या मनाचा मोठ्ठा तोटा
तेवढा वेळ अजून तिष्ठा
एवढा वेळ काय करा?
स्वतःशीच झुंजत रहा...
पहा, पहा, भरलं! भरलं!
एक थेंब नि झरलंच झरलं...
थेंब कुठला नि झरतंय कसलं
द्रव कुठलं, पात्रच झरलं!
उतरणार काय नि उतरवणार कोण?
झरणार कोण नि भिजणार कोण?
अशावेळी होतं कसं?
जसं असतं, तसं तसं

लेखन प्रकार: 

क्षणिक

आठवणींचा दिवस
जीव ओला जडावला
रिझवत मन खुळे
क्षण पुरे पासंगाला

क्षण हासतो रुसतो
क्षण क्षणिक झुरतो
क्षणोक्षणी क्षणांतुनी
क्षण एकटा उरतो

क्षण राहे आसपास
सावरत जुने श्वास
तुझ्या माझ्या मनातील
सारे आवर्त आभास

क्षण ओला मावळता
क्षण न ये हाती घेता
क्षण पापण्यांचे ओझे
डोळा साठवुनी जाता

आठवणींचा दिवस
क्षण न ये आवरता
क्षणांपुरते जगावे
इतुकेच श्वास आता

- shuma

लेखन प्रकार: 

पान्हा!

मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा
अगदी काही महिन्यांचाच.. तेव्हा
झाडाला बांधलेल्या पाळण्यातून रडायचो मी सकाळी सकाळी भुकेने
कळवळून.. खूप वेळ..
आणि यायची धावत माझी आई
शेतातून, काम करता करता कुडकुडत थंडीने
इतर बायांची सहानुभूती झेलीत
मला घट्ट धरीत छातीशी घेऊन आडोशाला
अजूनच भडभडून,
माझ्या आकार घेत असलेल्या चेहर्‍यात शोधत, आठवत कोणालातरी
आणि मी बघायचो तिच्याकडे टक लावून
निजता निजता.. निर्व्याज..
रोजच तिच्यातच माझा बाप शोधीत..
हे रोजच.. कितीतरी दिवस.......
.
..
...
आज
माझ्या सुखाच्या महालात
रात्री माझ्या घरातील देवघरातून
हलकासाही येताच आवाज
माझ्या आईचा

लेखन प्रकार: 

अन्वय

नकोस अवघड प्रश्न विचारू
नकोस मागू नवी उत्तरे
जुन्या उत्तरांचेही अजुनी
कुठे समजले अन्वय सारे?

नकोत आता आणाभाका
नकोस घालू नवे साकडे
मोडुन झाल्या शब्दांचे मी
जुळवित आहे अजून तुकडे

प्रेम, जिव्हाळे, निष्ठा.. सारे
एका परिघापर्यंत असते
त्या त्रिज्येच्या आत नेमके
कोण राहते? कैसे दिसते?

जरा वेगळे चालू दे मज
तुझ्याहून अन् माझ्यापासुन
माझे माझे म्हटलेलेही
पाहिन म्हणते अर्थ तपासुन

- swaatee_ambole

लेखन प्रकार: